रविवार, २४ जून, २०१८

गझल

1
आठवणींची धास्ती कशाला
रोजच असते रात्र उशाला

हाडवैरी झोप ही असली
बोलत बसतो रामोशाला

चांदण्यांची संगत होते
लटकत डोळे आकाशाला

अजून संयम आहे बाकी
वाटेतच जरि मधुशाला

आता कुठे लागले कळाया
किंमत नसते भरवशाला
------------------------------
2
तुझ्या गोऱ्या उन्हात मला जळू दे
कुंतलांच्या सावलीला निथळू दे

हरिणकाळीज तू सैरभैरशी
हिर्व्या रानालाही जरा कळू दे

डोळ्यात तुझ्या मी उगवलो होतो
आता तिथेच मला मावळू दे

बांधून तुला नजरेने केवळ
तुझ्या नाजूक ओठांना छळू दे

तू मिठीत माझ्या सावळी झालेली
रंग जरासा आता निवळू दे
---------------------------------------
3
डोळ्यात चंद्र आणि हातात फूल होते
होशील तूच माझी डोक्यात खूळ होते

ती प्रीत चांदण्यात होती विरून गेली
ते चांदणेच तेव्हा झाले गढूळ होते

श्वासात श्वास जावा मिसळून एकदा
ही कल्पनाच खोटी हेही कबूल होते

मागे तुझ्या स्वरांच्या कैफात धावलो मी
 वाटेवरी फुलांचे नाजूक सूळ होते

स्वप्नात रंगण्याचे सरले दिवस हळवे
आकाशवेड आणि मातीत मूळ होते
--------------------------------------------
4
साहतो आहे सुना वनवास आता
झाला ना माझाही देवदास आता

विसरलो मी मोगरीचे रूपही ते
शुभ्र, कोमल, गंधित आभास आता

तू नको त्या पैंजणांनी जाग आणू
होईल नशाच सारी खलास आता

संपले तारे कसे गगनातले
चंद्र एकट हिंडतो भकास आता

कोड घेऊन चांदण्यांची रात्र येते
वाहतो आहेच वारा उदास आता
------------------------------------
        प्रमोद कमलाकर माने.
सूचना: परवानगीशिवाय काॅपी अथवा शेअर करू नये.

गुरुवार, ७ जून, २०१८

कारवनी

वैशाख शुक्ल पौर्णिमेला कर्नाटकचा पोळा हा सण असतो. बैलपोळ्यासारखाच हा सण.  या कर्नाटकी पोळ्याचे नाव आहे 'कारहुणवी'. पण आमच्याकडे 'कारवनी' म्हणतात. माझं गाव मराठवाड्याच्या टोकाला कर्नाटक राज्याच्या सीमेजवळ आहे. आमच्या भागात काही गावात पोळा तर काही गावात कारवनी साजरी करतात. उमरगा या तालुक्याच्या शहरातही निम्मे शेतकरी पोळा, निम्मे कारवनी करतात.
    कारवनी मृगात येत असल्याने उन्हाळ्यापासूनच कारवनीची तयारी सुरू व्हायची. ओढ्यात भिजायला टाकलेल्या अंबाडीच्या सलमकाड्यांपासून अंबाडा सोलण्याची जणू स्पर्धाच चाले. मला अजून याद आहे: वैशाखातल्या रणरणत्या उन्हात चावडीतल्या थंडगार सावलीला बसून वृद्ध मंडळी बैलांसाठी अंबाड्यापासून मुंगसे, बाशिंग, कान्या, कासरे, म्होरक्या, वेसणी, कंडे, माटाट्या असे साज तयार करायचे. बैठक मारून, हाताला थुंकी लावून मांडीवर दावे वळायचे. चावडीम्होरं गोट्या खेळणाऱ्या आम्हा पोरांना बोलावून घोडा नाचवायला सांगायचे. म्हणजे दाव्याचे दोन टोक हातात धरून पिळ्या द्यायचं काम.
     गावातले नुकतेच कुणबिकीत पडलेले शेतकरी कुणबिकीतून निवृत्त झालेल्या म्हाताऱ्यांकडे यायचे आणि अंबाड्याचे साज करून घ्यायचे. आमच्या आजोबांकडे चापे, घाणे, लिंबोळ्या, लागबंद हे बैलांचे साज करून घ्यायला रीघ लागायची. आप्पा वैतागायचे. 'तुमी कवा शिकनार?' असं म्हणायचे. पण कुण्या बापड्याला ते नाउमेद करत नसत. आप्पांचाही दुपारचा वकत चांगला गुजरत असे. उरलेल्या अंबाड्यापासून आप्पा आम्हाला चाबकं करून द्यायचे. आम्ही दिवसभर चाबकाचे आवाज काढत हिंडायचो. लाकडाचा दांडा तासून त्याला चाबूक बांधायचो आणि रंगाऱ्याजवळ तीन रंगात रंगवून घ्यायचो. रंग हडकेपर्यंतही दम पडायचा नाही.
      कारवनीचा आदला दिवस म्हणजे 'खंडमळण्या'. त्या दिवशी वडलांबरोबर मी रानात जायचो. नदीवर बैलांना घासूनपुसून अंघोळ घालायचो. थंडगार पाणी बैलांच्या पाठीवर उडवल्यावर तिथली कातडी थरथरायची. मारका 'इंग्रज्या' नावाचा बैल सतवायचा. बैलांची लख्ख अंघोळ झाल्यावर गाय, म्हैस, वासरं, कारवडी, वागारी यांचीही अंघोळ व्हायची. घरून आईनं दिलेल्या हळद व लोण्यानं बैलांच्या माना चोळायचो. नांगराचा, कुळवाचा, गाडीचा 'जू' घेऊन घट्टे पडलेल्या माना बघून वाईट वाटायचं. लोण्यानं चोळल्यावर मान गुळगुळीत मऊ पडायची. मग वडील बैलांचे शिंग घासून घासून गुळगुळीत करायचे. वारनेसापं रंगवल्यावर शिंगं कशी ऐटदार वाटत.
      कारवनी दिवशी बैलांना गावात आणलं जाई. माने-मंडळीच्ये सगळ्या बैलांची एकत्र मिरवणूक निघे. रंगीत शिंगांना चमकीचे पट्टे लावलेले. फुगे बांधलेले. पाठीवर झूल, गळ्यात घुंगुरमाळा, दृष्टमण्यांच्या माळा, शिंगांच्या टोकांना पितळेच्या शिंगोट्या, रंगीबेरंबी माटाट्या, बाशिंग, पायात काळे कंडे, कातरून आकार दिलेली गोंडेदार शेपटं, अंगावर पिवडी....बैलं नवरदेवापेक्षा देखणे दिसायचे.वाटायचं जणु आज बैलांचं लगीनच हाय. मिरवणुकीपुढं बाजा, धनगराचे ढोल, झांजा. सुतळीबाँबच्या आवाजानः बोल बिचकायचे.बुजायचे. बारके पोरं भिऊन लांब पळायचे. म्हारतीपुढं पूजा होऊन वाजतगाजत मिरवणूक घराकडे येई. सर्वात पुढे रहायचा मान पाटलाच्या बैलांचा बाकीचे सगळे मागे. दिवसभर मिरवणूका. बैलांवर उधळलेल्या चुरमुऱ्यांमुळे रस्ते पांढरेशिप्पट दिसायचे. जमादारांच्या बैलांच्या मिरवणूकीपुढं पोतराज व गुरगुंपांग वाजवणाऱ्या मरगम्मा (कडकलक्ष्मी) असल्यामुळे ही मिरवणूक बघायला गर्दी व्हायची.
           मिरवणूक झाल्यावर दारापुढे बैलांची पूजा होई. वडील दोन्ही बैलांच्या म्होरक्या धरून मधी उभारायचे. आई पूजा करायची. मग बैलांना पूरणपोळी चारली जाई. एखादा बैल पोळी खाईना झाला की; सगळे 'बैल रूसला...बैल रूसला ' म्हणायचे. मग भजे घुगऱ्या, कोडबळ्यांचं गाडगं बैलांच्या तोंडाला लावालं जाई. वरून गुळवणी पाजलं जाई. शिंगात कोडबळे अडकवले जात. शेवटी घरातले सगळेजण बैलांच्या पाया पडायचे.
    ज्यांच्याकडे पोळा असतो असे पाहुणे घरोघरी आल्याने कारवनीला गाव गजबज वाटायचा. आमच्याडे किल्लारीचे दादा आवर्जून यायचे. जाताना पोळ्याचं आवतन देऊन जायचे. ते रात्री आम्हा मुलांना चमत्कारिक गोष्टी सांगायचे. एक गोष्ट तीन-चार दिवस चालायची. त्यांना काल गोष्ट कुठपर्यंत आली होती ते आधी आम्ही सांगावं लागायचं. मगच पुढची गोष्ट ऐकायला मिळायची. एकदा त्यांनी घोरण्याचा विषय काढला. मी त्यांना विचारलं, 'दादा, घुरतात कसं ओ?' त्यांनी घोरण्याचं प्रात्यक्षिक मला साग्रसंगीत दाखवलं आणि माझ्याकडून करूनही घेतलं. तेव्हापासूनच मी रात्री झोपेत घोरायला लागलो म्हणे! पुन्हा दादा कधी आले की विचारायचे, 'कुटं गेला तो घुऱ्या?' माझं नावच त्यांनी घुऱ्या पाडलं.
      कारवनीच्या दिवशी बैलांच्या खांद्यावर जू दिला जात नाही. अगदी महत्त्वाचं काम असलं तरी बैलांना गाडीला जुंपत नाहीत.
    कारवनीचं वैशिष्ट्य हे आहे की; हा सण पोळ्यासारखं हंगामाच्या अधेमधे येत नाही; तर मृगाच्या सुरूवातीला येतो. बैलांची पूजा करून, कौतुक करून, कृतज्ञता व्यक्त करूनच त्यांना कामाला जुंपले जाते.
       आता कारवनीची ती मजा राहिली नाही.उन्हाळ्यात बैलांचे साज तयार करणारे, दावे वळणारे बुजूर्ग आता दिसत नाहीत. सगळे साज आता बाजारात आयताळ मिळतात. सुताचे.
        आता चाबुक वाजवणारे मुलं दिसत नाहीत तर बैलांसोबत सेल्फी घेणारे आहेत. एकूण लहानपणीचा तो आनंद उरला नाही.

सोमवार, ४ जून, २०१८

गेंद्या

   मी लहान असताना आमच्या घरी एक बैलजोडी होती. गेंद्या व घरड्या. त्यातला गेंद्या हा घरच्या गाईचा खोंड होता. दरबारी नावाच्या गाईला झालेला हा खोंड. आईसारखाच बांडा होता. गोल टोकदार शिंगं. नंदीबैल वाटावा असा हा बैल. हा खोंड लहान असतानापासूनच त्याला आजोबांनी म्हणजेच आप्पांनी लळा लावला. पुढे गेंद्या खूप प्रसिद्ध झाला.
     लहानपणी गुरांच्या वाड्यात गेंद्या आईला पिताना आप्पांनी ' हं, चल आता पुरं कर.' म्हटलं की; गेंद्या तोंडातलं थान सोडून वाड्याकड निघायचा. एरवी थान सोडेल ते वासरू कसलं? ओढून काढलं तरी आचळाखालून निघत नाहीत. शेताकडून येताना पुढं गेंद्याची माय. मागे गेंद्या. त्यामागे आप्पा. वाटेत कुणाला आप्पा बोलत थांबले की  गेंद्याही आप्पाचं बोलणं होईपर्यंत थांबायचा.
        थोरले काका आजीला चोरून हरभऱ्याची दाळ टोपीत आणून गेंद्याला चारायचे. वडील त्याला हरभऱ्याचा ढाळा चारायचे.  आजी भरडा, पेंड चारायची. साऱ्या घराचेच गेंद्याला लाड होते.
    पुढे आप्पांनी त्याला विहिरीत उडी मारायला शिकवले. पाठीवर हात थोपटून ' हं, मार हुडी.' म्हटल्याबरोबर गेंद्या थोडं मागं सरकून सुसाट धावत येऊन कठोकाठ विहिरीत उडी मारायचा. पोहत एक फेरी पूर्ण करूनच बाहेर यायचा. एकदा शेतात साळ खुरपणाऱ्या बायांनी विषय काढला, 'तुमचा गेंद्या हिरीत हुडी मारतोय मन ! खराय का?' आप्पांनी बांधावर चरणाऱ्या गेंद्याला हाक मारली. आप्पा म्हणाले, ' ही बाया तुला पवायला येतनी मनलालत्या. चल मार बर हुडी ' असं म्हटल्याबरोबर गेंद्यानं धावत जाऊन उडी मारली. बाया कौतुकानं चेकाळू लागल्या. बाहेर येऊन गेंद्या पुन्हा चरू लागला. आप्पांना अजून हुक्की आली. ते गेंद्याला म्हणाले, 'बाया तुला भेलं म्हनलालत्या. आरे मर्दासरका मर्द तू. यी. मारून दाव आजू एक हुडी.' गेंद्यानं कान टवकारले. तोंडातलं धाट टाकून सुसाट विहिरीकडं धावत आला आणि उडी मारली. एक फेरी घालून बाहेर आला. सगळ्या बाया अवाक.
     गेंद्या स्वतःच शिंगांनी जू खांद्यावर घ्यायचा. मग उचललेल्या जुवाखाली घरड्या मान घालायचा. आप्पांनी त्याला कधीच हातांनी जुंपले नाही. आमची दोन शेतं होती. दूरदूरवर. मळा आणि माळ. गेंद्या-घरड्या मळ्यात असायचे. आजोबा गावातून माळाकडे जायचे. मळ्यातून वडील बैलांना सोडून द्यायचे. दोन्ही बैल सोबत माणूस नसताना सरळ माळाला जाऊन आंब्याखाली उभारायचे. मग आप्पा येऊन पाळी मारून बैल मोकळे सोडून सांजच्यापारी घरी. दोन्ही बैल सरळ मळ्यात येऊन वडलांजवळ. माळाकडून मळ्याकडे बैल निघाले की; वाटेने जाणारे शेतकरी म्हणायचे, 'निघाले बघा नंदी !'
       एकदा आत्त्याच्या गावी(मंगरूळ) पोळ्याच्या आदल्या दिवशी (खंडमळण्या) वडील नदीवर गेंद्या-घरड्याला धूत होते. घरड्याला धूताना त्यांनी ' हं, कर पाय वरी.'  म्हल्याबरोबर घरड्यानं पाय वर उचलला. तो पाय धुवून 'आता ही पाय कर वरी' म्हटल्यावर त्यानं दुसरा पाय वर केला. त्या गावचे लोक आपापले बैल धुवायचे सोडून ही गंमत आश्चर्याने बघू लागले. घरड्याला आप्पांनीच हे शिकवलं होतं.
    एकदा नांगरताना घरड्याच्या खुरात तुराटीची कोयली घुसली. बैल लंगडू लागला. घरड्याला पाय वर करायला सांगितल्यावर त्याने पाय वर केला. घरड्याचा पाय मांडीवर घेऊन वडलांनी ते धस्कट मोठ्या सायासांनी काढलं. वेदना होत असूनही घरड्यानं लाथ झाडली नाही. त्याचं सारं अंग थरथरत होतं. तोंड वासलं होतं. पायाला रक्ताची धार लागलेली. वडलांचं धोतर लालबुंद. घरड्यानं सोसलं पण मालकाला त्रास दिला नाही.
     गेंद्या रात्री रानातून बरेचदा दावं तोडून सुटायचा. रात्रभर कुठं चरून यायचा, की काय करायचा देव जाणे! पहाटे आपल्याच जागेवर घरड्याशेजारी उभा असलेला दिसायचा. कधीच कुण्या शेतकऱ्याची 'आमचं पीक खाल्लं' म्हणून तक्रार आली नाही. रात्री गेंद्या सुटलेलं लक्षात आलं तरी वडील-चुलते त्याला शोधत नसत. त्यांना वाटायचं ' कुटं जातोय? पाट्टं यील की आपल्या जाग्याला.'

         गेंद्या म्हातारा झाला तरी त्याला आप्पांनी विकला नाही. एके दिवशी म्हातारा गेंद्या चरता चरता मागचे पाय निसटून तोल जाऊन आमच्या त्याच विहिरीत पडला. सात पुरूष खोल विहिरीत एकदीड पुरूषच पानी होतं. आपटल्याने जबरदस्त मार लागला. सगळ्यांनी त्याला बाहेर काढलं. चारपाच दिवसानंतर गेंद्यानं डोळे मिटले. आप्पा, वडील, चुलते धाय मोकलून रडले. सारं घर...सारा शिवार रडला. गेंद्याला शेतातच पुरलं.

शेतकऱ्यांच्या होरपळीची गाथा: ‘वीजेने चोरलेले दिवस’

       'वीजेने चोरलेले दिवस' ही संतोष जगताप यांची एका ज्वलंत आणि वेगळ्या विषयावरची कादंबरी नुकतीच दर्या प्रकाशन, पुणे यांच्याकडून आल...