मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१८

सुक ना दुक


गनामामाला सगळं गाव नेता म्हनायचं. गावात कुठला पुढारी आला, परचारसबा आसली की, गनामामा हार घालायला सगळ्यात पुडं. इस्टेजवर खुडचीत गनामामा दिम्माकात बसायचा. गनामामा आडानी  फाटका मानूस, पर कोनी 'नेते' म्हनलं, की ह्याचं आंग फुगायचं. टोप्या घालायला गनामामा वस्ताद. पैशे घेऊन कोर्टात खोट्या साक्शी द्याचं कामबी करायचा. एकदा साक्श द्यायला गेल्यावर गनामामानं पानाची पिचकारी मारली. ती नेमकं बघितलं जजनं. हूं का हूं. टाकलं बसवून. हिकडं आशील हुडकून बेजार. शेवट त्येनं दुसरा साक्शीदार हुडकून भागिवलं. येताना गनामामा दिसला. गरीबावनी तोंड करून बसलेला. दंड भरून सोडवून आनावं लागलं. पावनेरावळे हुडकत नाही तितं जायाचा. खाऊन पिऊन निगताना तिकिटाला मनून धा-पंदरा रूपय मागायचा, लईबी नाही. ह्येच्या शेतात तुरीचं धाटबी नसलं तरबी, जुन्या वळकीवर आडत्याकून तुरीवर उच्चल आनायचा.
     थोरली शकुंतला. तिला समदे 'छकी'च मनायचे. तिच्या पाठीवरचा राजा. गनामामाचं खटलं काय जास्त नव्हतं. बायकू तर गायीवनी गरीब. छकीचं लगीन झालतं. राजाचं लगीन करून गनामामानं त्येला खात-बी-बियान्याच्या दुकानात चिटकावलता. समदं मार्गी लावून गनामामा एक्या दिवशी आंगावर ईज पडून मेला.
     राजा बापाच्या वरचं निगालं. एक आवतन सोडायचंनी. आवतन नसलं तरबी खूत मारून जेऊनच निगायचं. रईवारी सुट्टीच्या दिवशी  मैस घिऊन लोकाचे बंधारे तुडवत हिंडायचं. मैस चारून तैट करायचं. कामाला जातानाबी कुनाची  फुगटची गाडी मिळत्याय का बगायचं. बाप मेल्यावर सरकारी ईमा मिळाला. कोन गाठ पडलं का त्या पैशांचंच बोलायचं. शेवटला 'माजा बाप लई चांगला  होता गा!' मनून रडायचं.
     फुटकं नशीब घेऊनच छकी जन्माला आली. छकीचा सोभाव  सुतासारका सरळ. तिला आचपेच कळतनी. भोळंभाबडं छकी. बिनमळी. सासू कजाग. भांडन केल्याबिगर तिला भाकरच गोड लागतनी. नवरा ट्रकडायवर. बेवडा. मायीचं आयकून छकीला गुरासरकं बडवायचा. जाच सोसत का व्हयना छकी नांदलालती. दोन सोन्यासरके लेकरं झाले. लेकरावाकड बगून रोजगार करत, शिव्या खात, मार खात तिनं संवसार करलालती. नवरा एडसनं धरनीला पडला. छकीनं त्येचं समदं केलं. माय मननारीबी नाकाला पदर लावून लांब बसायची. इळबर वदरायची. 'हिनंच पांडऱ्या पायाची हाय. इवशी घरात शिरली मनून तर माज्या  लेकराची कड लागली.' मनायची.
     नवरा मरून गेला. दोन लेकरं घेऊन छकी माहेरच्या आसऱ्याला आली. ह्या कडू राजाच्या जीवाला घोर लागला संबाळायचा.
वरल्या वाड्यातली सरूआत्या आलती गिरनीला दळन घेऊन. तिला बगून छकी गडबडीनं बाहीर आली.

छकी मनली,
"लई चांगलं लगीन झालं मन की ये तुझ्या पुरीचं."

" हूं! का करावं? चिट्टी दिऊनबी तू आलनीसच की लगनाला."

"लई  जीव वडलालता ये आत्या, पर ह्येन्ला  लईच  झालतं बग. हालायलाबी येना झालतं. कसं यिऊ सांग  ह्येन्ला टाकून?"

"काय बाई तुझं दैव छकी! शाऊ लेकराचं वाटूळं  झालं. रांडा सुकानं नांदलालत्या. सासू आसली. यी गं कळी न बस पाटकुळी. जाच सोसूनबी तू नांदायला नगं म्हनलनीस. कसला का आसना नवरा बिचारा, पर तुला आर्द्या हिरीत सोडून निगून गेला. म्हायेरच्या आसऱ्याला आल्यायस पर बापबी मरून गेला. राजाबी लई हावलाखोर हाय कडू भाड्या. बाईचा जलमच वंगळा बग. दुबत्या जनवारावनी जन्माला आल्याबरूबर गळ्याला दावं..."
सरूआत्या भडभडा बोललाली. छकी उगू गप आइकुलालं खाली बगत.

"म्हायेर, सासर, कोनचं आपलं की काय की? तुला बगितल्यावर पोटात चर्र करतंय बग." सरूआत्याला दुक दाटंना. पदर डोळ्याला  लावून बसली.

छकी हासंतच मनली,
"उगूच आवगड वाटून घिवलालीस माय. नशिबात आसल्यालं  का चुकतंय? माय-आन्नानं चांगलं घर हाय मनूनच दिलते की तितं. ती काय की मनतनीते गोम कुटं हाय तर...."

दोघी सुकदुक उकलत बसल्या. जरा वेळानं सरूआत्या गेली. छकी  तसंच बसलं. सुक ना दुक आसं.
     छकी आधीच काळी. त्येच्यात भुंडं कपाळ. गालं बसलेले. डोळे खोल. तोंड लईच वटवट दिसलालतं. वरचीवर बारीकबी दिसलालती. राजाचं ध्यान कुठं ऱ्हातंय घरात? त्येला बायकूकड बगायला फुरसत नाही. भैन तर लांबच ऱ्हायली.
    राजाची बायकू रंगी. तिच्या बापानं तिला वटी यिऊन वरीसबी लोटू दिलनी. हाडं भाजून मोकळा झाला. एकाम्हागं एक लेकरं हून रंगीबी पार चिपाड झालती. नवरा आसला माकडावनी.
     रात्री उशीरा मटरेल तोंडात धरून राजा आला. रंगीनं ताट वाडलं.

"ती थुका आता तोंडातलं. आन चुळ भरून जेवा."

राजा तोबरा धरून 'हूं ' मनला. चूळ भरून जेवाया बसला. वचवच वान्न्यारावनी जेवलाला. रंगीचं बोलनं चालूच होतं. आसं झालं. तसं झालं. हेचं ना जेवल्यावर ध्यान, ना बोलन्यावर.

"आवोऽ ताई लई वंगळं दिसलालत्या."

"हूं. " मचमच मच...

"त्येंचे मालक एडसनं मेलते जून की ओऽ"

"तुज्या मायला." राजा.

"तुमी काय बी मना. मला तर तीच संवशय यिवलालाय. कमीपना वाटाया का झालंय? उगवू संवशय तर काडा. लव्हाऱ्याला न्हिवून दावा. सरकारी दवाखान्यात रगत तपासल्यावर कळतंय मन ओऽ"

राजा गप हात धिऊन उटला. लक्षुमीच्या कट्ट्यावर आला. समोरच्या टपरीत एक छिटा सुपारी सांगून रामतात्याजवळ येऊन बसला.

 " आज केलो बगा एक नोट खडी तात्या."

आसलंच बोलनं कडूच्या तोंडात. हावरं मुलकाचं. सदा डोस्क्यात  पैशाचं येड. आसा मनात इचार करत तात्या मनले,
 "छकीला का झालंय रे? लई वंगाळ दिसलाल्याय. जरा दावावं का न्हाई डाक्टरला. काय तर टानिकबिनीक दिल्यावर फरक पडतंय."

" अय! का होतंय तात्या? आसं झालंय मनून दोसरा काडल्याय जून. कायबी झालनी."

" तसं नव्हं रे, दावायचं दाव बर!" जोर देऊन तात्या मनले

"हूं! बगू."  राजा.

        शेवट राजानं शकूताईला लोहाऱ्याच्या सरकारी दवाखान्यात न्हेला. रगत तपासलं. डाक्टरनं राजाला बोलवून घेऊन रिपोट दिला. एड्स हाय मनून सांगितलं. भाऊ बाहीर आल्याआल्या छकीनं  इचारलं,

"का मन ये भाऊ डाकटर?"

"कायबी नाही चल."
मनत राजा  छकीला घेऊन स्ट्यांडवर आला.
यसटीत बसून राजानं पक्का इचार केला. उद्या शकूताईला रानातल्या कोट्यात हालवायचं.
    छकीला  कोट्यात टाकल्यापसून सोयरे, गावातले लोकं रोज बगायला याचा सपाटा सुरू झाला. येवस्ता करायला मायीशिवाय कोन ऱ्हातंय? रंगीला तर घर सोडाया कसं जमतंय? तिचे दोन, छकीचे दोन लेकरं, नवरा, सासू-नंदंचा डब्बा... छकी मयाळू. त्येच्यात तिच्या आयुश्याचं आसं मातरं  झाल्यानं लोकबी लईच सुटलं तिला बगाया  कोट्यावर. गावकरीच शेत होतं. काय आवगडबी नाही. रोज सकाळी घरला येताना माय कोट्यातले बिस्कुटपुडे आनायची. रंगीच्या, छकीच्या लेकरावाला रोज च्यासंगं बिस्कुटं खायाला मिळलाले. राजाबी मागायचाच दोन बिस्कुटं.

    उनासंगं छकीचं दुकनंबी वाडत चाललं होतं...........

      उनाचं जिजाक्का छकीला बगाया आलती. जिजाक्काची छकीवर बारकी आसल्यापसूनच मया. 'बाजंवर पडल्याली छकी हातरूनात दिसना सुद्द्या झाल्याय की माय!' वाटलं जिजाक्काला.

आक्काला बगून छकी उल्लास आनून मनलं,
"यी ये! ह्यवडं उनाचं का आल्यायस आक्का? जरा तवरून येवं का न्हाई ये?"

 आक्का बाजंवर बसत मनली,
"आले माय. घरातबी रकरक करलालतं. तुजीच याद यिवलालती. आले सरसर. का लई लांब हाय?"

जिजाक्कानं पुडा हातात दिल्यावर छकी रागानं मनली,
"मी का नेनती हाव का ये? कशाला आनल्यायस? उगू बोलून जायाचं दोन गोश्टी."

कोरड्या व्हटावर जीब फिरवत छकी बोललाली.
" आक्का, मायच करलाल्याय बग माजं समदं. आता हामी मायीचं करायचं, तर आजूबी मायीकूनच करून घेवं का ये? मी मेल्यावर आता कुटं जातेव ये? पुन्ना मला आसली माय मिळंल का ये?"

 छकीचे डोळे डबडब भरले. मायनं रडायचा सूरच काडला. जिजाक्का दोगीलाबी समजावलाली. आपूनबी रडलाली.

"माय, आक्काला शरबत तर कर ये. लिंबू हाय जून की. " छकी.

" गप्प. रोज तुला बगाया ढिगारा लोकं यितीते. का सगळ्याला शरबत पाजवत बसाया जमतंय?" आक्का कळवळून मनली.

    छकीनं डोळे झाकल्यावनी केली. पुना डोळे उगडून मनली,
" बग माय, तुला अक्काच्या पुडं सांगलालेव. मी मेल्यावर पंडूचं ट्याकटर सांगून न्ही ट्याकटरमदी. कुनाच्या तोंडाकड बगत बसनूक. लोकं कायबी बोलतीते. ध्यान दिवनूक. तुला बोलनं सोसतनी आदीच. लोकाचे तोंडं का धराया येतंय, व्हय ये आक्का?"

मधीच छकी आक्काकड वळली.
"बग ये आक्का, माजंमाजं ताट, वाटी येगळं ठीव मनलं तर आयकंना माय. त्येच्यातच जेवत्याय आपूनबी. आपलापून जपून ऱ्हावं का नाही बर? तू तर सांग ये!"

जिजाक्का चमकून मनली,
"व्हय वो, लेकराचं खरंच हाय की!"

"....आनी का माय, माजी पोरगी तू संबाळ. आजू नेनती हाय. पोराला सासूकड सोडून यी. तिला तर दुसरं कोन हाय? आनी दोनीबी लेकरं तुज्याच गळ्यात नकू माय..."

बोलत बोलत छकीची नजर कोट्याबाहीर गेली. उनानं एकदम तिचे डोळे बांदल्यावनी झालं. बोडक्या रानावर चिटपाखरू दिसत नव्हतं. उनाच्या झळानं शिवार करपल्यावनी झालतं. व्हावटळीनं कडब्याचा पाचोळा गरगरत वर वर आबाळाला जावलालता.
------------------------------------------------------------------------
पूर्वप्रसिध्दी: मिळून साऱ्याजणी (डिसेंबर 2010) साभार
 चित्रे साभार- सुयोग कांबळे
टिप- कथेचे पुनर्लेखन केलेले आहे.

३ टिप्पण्या:

शेतकऱ्यांच्या होरपळीची गाथा: ‘वीजेने चोरलेले दिवस’

       'वीजेने चोरलेले दिवस' ही संतोष जगताप यांची एका ज्वलंत आणि वेगळ्या विषयावरची कादंबरी नुकतीच दर्या प्रकाशन, पुणे यांच्याकडून आल...