गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८

घर

आमचं मातीचं घर होतं. मागं सात खण इमला. पुढे पत्र्याची ओढणी. मोठं अंगण. एका बाजूला गुरांचा गोठा. वाड्याच्या बाहेरच्या भिंती शेणानं सारवलेल्या. खोल्यांमध्ये फक्त पांढऱ्या मातीचं पोतरं. खाली धूम्मस केलेल्या जमिनीवर शेणाचं सारवण. अंगणात शेणाचा सडा. सडा-रांगोळ्या झाल्यावर घर कसं लख्ख व निर्मळ वाटे.
    देव्हाऱ्यावर ज्ञानेश्वरी. तुकाराम गाथा, एकनाथी भागवत, हरिपाठ, शिवलीलामृत आदि ग्रंथ बासनात व्यवस्थित बांधून ठेवलेले असायचे. देव्हाऱ्यात दोन लंगडे बाळकृष्ण, घोड्यावरचा सिद्धनाथ, विठ्ठल-रखुमाई, अंबाबाई, गणपती...अशी देवांची वर्दळ. अंगणात तुळशीचा कट्टा. तुळशीबुडी महादेवाची पिंड.
    इमल्याच्या दोन खोल्यांना लागून एक जुनी अंधारी खोली होती. या खोलीत फासा, कुऱ्हाडी, चाडे, नळे, कुदळी...अशी इकनं, गठुडे, घुंगुरमाळा, दृष्टमण्यांच्या माळा, मुंगसे, जुनी गंजाटलेली तलवार, पाळणा, मोठमोठ्या रव्या, हंडे, गाडग्याच्या उतरंडी, कनगी, गुम्मे....असे बरेच अडगळीचे सामान असे. त्या खोलीची मला फार भीती वाटायची. मी रूसल्यावर आजी मला भीती घालायची, "गप्प बैस, न्हायतर जुन्या खोलीत कोंडवीन."
मी शहारून गप्प बसायचो. हळूहळू या खोलीची भीती कमी झाली. आईच्या पदराला घट्ट धरून कधीमधी खोलीत जाऊ लागलो. सुट्ट्याला आत्याचे लेकरं आल्यावर मी त्यांना दहशत घालू लागलो, " जुन्या खोलीत बावा हाय." ते मानायचे नाहीत. मग मी त्यांना दारापाशी थांबायला सांगून; आत अंधारात जाऊन खुंटीवरच्या घुंगुरमाळा वाजवायचो. बाहेर येईपर्यंत सगळे आवाज ऐकून पसार झालेले असायचे. नंतर ते मला विचारायचे, "भावजी, तुला तो बावा कसा खात नाही रे?"
मी सांगायचो, " त्येनं माजा दोस्त हाय."
घरात कुणी रागावलं की, मी जुन्या खोलीत आतून कडी घालून, अंधारात दिवसभर उपाशी बसायचो." बाहेरून कुणी कित्ती विणवलं तरी बाहेर यायचो नाही. आजोबांची प्रेमळ हाक ऐकल्यावर मात्र नाईलाज व्हायचा.
      चौथीच्या इतिहासातील शिवराय व मावळ्यांचा प्रताप भान विसरून वाचायचो. अन् त्या जोशात जुन्या खोलीत जाऊन; ती काळी जड तलवार कशीबशी हातात घेऊन हात फिरवायचो. शिंक्यावरच्या मोठ्या सलदाला शत्रू समजून घाव घालायचो.
      वाड्यात एका बाजूला अर्धवट बांधकाम झालेला गोबरगॅस होता. दोन्ही बाजूंच्या हौदांमधून आत उतरायचो. आतील भाग मंदिरासारखा. वर गोलाकार घुमट. उन्हाळ्यात तिथं थंडगार वाटायचं. हीच आमची खेळायची जागा.
       मी चौथीला गेल्यावर शेजारच्या मनामायनं अभ्यासासाठी तिनं स्वतः तयार केलेली चिमणी दिली होती. माझ्या शिक्षणाला मिळालेली ही पहिली प्रेरणा! त्या दिव्याउजेडी बसून मी कवाबवा घटकाभर पुस्तकातली चित्रं बघायचो. चिमणीचा धूर नाकात जाऊन नाक काळंभोर झालेलं सकाळी दिसायचं.
     पडवीला वडील, चुलते, बामणाचा पबाकाका, हबीबचाचा यांच्या रामायण, महाभारत, पुराण, संत, भक्ती, शेती या विषयांवरच्या गप्पा चालत. आम्ही भावंडं शांत बसून या गोष्टी ऐकायचो. काही कळायचं. काही कळायचं नाही.
      आप्पांची बाज अंगणात. मी त्यांच्याजवळ झोपायचो. ते चांदण्या रात्री आकाशातील तिफण, इच्चू, ध्रुव अशा नक्षत्रांची ओळख करून द्यायचे. मला चांदण्या मोजून दाखव म्हणायचे. थोडावेळ माझी मज्जा बघायचे. आप्पांनी मला बाजेवर पडल्या-पडल्या अनेक अभंग शिकवले. नाटी शिकवल्या. मी त्यांच्या मागे म्हणायचो.
    'आम्ही कुणबियांची मुलं।
     आम्हा सार्थक विठ्ठल ॥
     धरिला द्रव्याचा नांगर ।
     काशा काढितो सागर ॥
     रामनामाची कुऱ्हाडी ।
     प्रपंचाच्या पालव्या तोडी ॥
  मी अभंग म्हणत होतो. वडील आप्पांना म्हणाले, " उगू कायबी शिकवनूक त्येला. ही अभंग गाथ्यात नाही. मनानं जोडलेला हाय."
आप्पा म्हणाले, " हाय गा ! नामदेवाच्या गाथ्यात हाय." मग वडील निरूत्तर होत.
      जनावरांचा गोठा साफ करून वाड्याचं सडासारवण करता-करता आई मेताकुटीला यायची. घरात दारिद्र्य असूनही सडासारवण, रांगोळ्या अशा नीटनेटकेपणामुळेच या घरच्या लेकी म्हणजे आमच्या आत्या चांगल्या घरी गेल्या. अडीनडीला, दुष्काळानं गांजून एकेक जनावर विकून टाकल्यानं गोठा रिकामा झाला. काही दिवसांनी गोठाही काढून टाकण्यात आला.
       खोल्यातली भूई खडबडीत झाल्यावर धूम्मस केली जाई. जमीन खोदून, पाणी-माती कालवून, सपाट करून, पुन्हा बडवून सपई केली जाई. उन्हाळ्याच्या दिवसांत धूम्मस केलेल्या घरात थंडगार वाटे. वर लाकडी फळ्यांचा इमला (माळवद). इमल्याच्या खोलीत उन्हाळ्यात थंडगार तर हिवाळ्यात उबदार वाटे. हा इमला वडिलांनी माळाला सात पोते तुरी झाल्यावर घातला. पाच पोत्यांना  तेराशे रूपये पट्टी आली आणि वडलांचं 'इमल्याचं' स्वप्न पूर्ण झालं. इमला घातला त्यावेळी मी रांगत होतो म्हणे!
      मोठ्या माणसांचा डोळा चुकवून  न्हाणीघराच्या आखूड भिंतीवरून उडी मारून मी पाटलाच्यात टीव्ही पहायला जाई. तेव्हा गावात तेवढाच एक टीव्ही होता. एकदा टीव्ही बघत पाटलाच्या सोप्यात बसलो होतो. बाहेर खूप अंधार पडलेला. दारातून हाळी ऐकू आली, "बाग्याऽव" मी तटकन उठून बाहेर आलो. बाहेर मुसळधार पाऊस. वडील पोत्याचं घोंगतं पांघरून आलेले. वारं-वावधान. ईजा चमकत होत्या. वडलांच्या पुढंपुढं घरी आलो. मोठ्या दारातून आत आलो. समोरची सोप्याची भिंत ढासळून पत्रे खाली आले होते. वडलांनी शिव्या-मन-शिव्या दिल्या. पोटभर शिव्या खावून झोपी गेलो. नशीब! मार मिळाला नाही. वडलांनी कधी पाची बोटांनी शिवलं नाही. आईचा मार मात्र उठता-बसता खायचो. कामाच्या दगदगीनं आणि घरातल्या लोकांच्या बोलाला वैतागून सगळा राग ती माझ्यावर काढायची.
     पुढं भूकंप झाला. तेव्हा अंगणात पत्र्याच्या खोपी घातल्या गेल्या. तेव्हा साऱ्या गावात खोपीच खोपी. माणसांना या खोलीत वाकूनच वावरावं लागे. या त्रासाला कंटाळून शेवटी आम्ही बैलगाडीनं वढ्यातले बेशरमाचे सोट कापून आणले. त्यांचं कूड गुंफून अंगणात पत्र्याच्या दोन वढण्या घातल्या. बरीच वर्षं त्या बेशरमाच्या कुडाच्या घरात राहिलो. कधी स्वप्नातही असं रहायचा विचार केला नव्हता.
       पुढं काही वर्षांनी भूकंप पूनर्वसन अनुदान म्हणून एक खोलीच्या बांधकामाचे साहित्य आणि थोडे पैसे मिळाले. त्यात काही पैसे घालून आम्ही पक्क्या विटांचा वाडा बांधला. खोल्यांना दारं, भिंतींना गिलावा, फरशी....काहीच करू शकलो नाही. या पक्क्या इटकुराच्या लाल घरातही बरीच वर्षं काढली. पुढे दहाबारा वर्षांनी उरलेली कामं माझ्या हातानं झाली. घराला घरपण आलं. आता तर आरसीसी घरही बांधून झालं. पण वडलांनी हौसेनं बांधलेलं मातीचं, इमल्याचं, धूम्मस केलेलं, सडा-सारवण-रांगोळ्यांचं, गोठ्यासहित मोठ्या अंगणाचं ऐटदार घर; 'घर' या नावाला शोभणारं होतं.

    (पूर्वप्रकाशित : तिफण)

शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१८

बाईपणातून जाणाऱ्या बाईचा प्रवास: झिम पोरी झिम  बालाजी मदन इंगळे यांची 'झिम पोरी झिम' ही पहिलीच कादंबरी.  यापूर्वी त्यांचा 'मातरं' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे.  या संग्रहाने त्यांना ग्रामीण कवी म्हणून मान्यता मिळवून दिली. त्यांच्या काही कवितांमधून  स्त्रीचे भावविश्व साकारले आहे. ग्रामीण स्त्रीचे समग्र भावजीवन त्यांना नेहमीच खुणावत असावे. या अस्वस्थतेतूनच त्यांनी कादंबरी हा जास्त अवकाश असणारा वाङ्मयप्रकार जाणीवपूर्वक निवडलेला दिसतो.

       या कादंबरीतील मध्यवर्ती पात्र असलेल्या जनीचे प्रथमपुरुषी निवेदन वाचकाला सरळ तिच्या गावात, तिच्या घरी नेऊन सोडते. जनी ही कुठल्याही खेड्यातली, कुठल्याही सामान्य कुटुंबातली एक सामान्य मुलगी आहे. ती तिच्या जीवनातल्या वरवर सामान्य वाटणार्‍या गोष्टी सांगत एक असामान्य अनुभव देते. मुलगी म्हणून जन्माला आल्यामुळे तिचे त्या घरातले दुय्यम स्थान तिला शंकर या तिच्या भावाच्या जन्मानंतर प्रकर्षाने जाणवते. तिच्या जन्माच्या वेळी 'दुसऱ्या वेळीही मुलगीच झाली' हा मायबापाचा असंतोष तिच्या वाट्याला आलेला असतो. मात्र जनी आजारी पडते तेव्हा हेच मायबाप तिची काळजी घेतात, हा विरोधाभासही तिला जाणवतो. यातून लेखक खेड्यातल्या माणसांच्या स्वभावातील सूक्ष्म बारकावेही किती नेमकेपणाने मांडतो आहे, हे कळून येते.

       घरातल्या कामाचा भोगवटा ग्रामीण भागातल्या मुलींच्या वाट्याला अगदी कोवळ्या वयापासूनच येतो. जनीही त्याला अपवाद नाही. हे शेतकरी कुटुंब या घरातल्या मुलीच्या लग्नपाई सावकाराच्या पाशात सापडते व त्याच्या शोषणामुळेच भूमिहीन होऊन उघड्यावर येते. जनीचे माय, बाप, बहीण या साऱ्यांनाच लोकांच्या शेतात मजुरीने कामाला जावे लागते. जनीला अपरिहार्यपणे घरातल्या कामाचा बोजा पडतो. तिला तिची शाळा सांभाळून घरातली कामं करावी लागतात. जरा सवड मिळाली की हळूच ती मैत्रिणींसोबत खेळायला सटकते. हे सर्व अत्यंत चित्रमय पद्धतीने लेखकाने सजीव केले आहे.

       जनीचे घरातल्या प्रत्येकासोबत असलेले नैसर्गिक भावबंध लेखकाने अत्यंत कारागिरीने विणले आहेत. खेड्यातल्या चालीरीती, हुंडाप्रथेमुळे मुलीच्या लग्नाची मायबापाच्या मनातली धास्ती, या लोकांच्या जगण्यावर पडलेल्या मर्यादा अचूकपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे. आजच्या टीव्ही चॅनल्सच्या युगात लोप पावत चाललेली खेळगाणी, लोकगीते या मुलीच्या जगण्याचा एक भाग बनून येतात.  ही गीते वजा केली तर तिच्या या गोष्टीला अर्थच उरणार नाही, इतकी ती तिच्या व्यक्तिमत्त्वाशी, जीवनाशी एकरूप होऊन येतात.

      ग्रामीण बोलीच्या सहजतेसह कादंबरीचा ओघवतेपणाही लक्षात येतो. या कादंबरीच्या भाषेचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही केवळ मराठवाड्यातील उमरगा परिसराची बोली नसून; ती या प्रदेशातील ग्रामीण स्त्रीची अस्सल बोली आहे. ग्रामीण बोलीचा जिवंतपणा पुरुषांपेक्षाही स्त्रीच्या बोलण्यातचं अधिक शिल्लक आहे. सुरुवातीला वाचताना शहरी पांढरपेशा वाचकाला काहीसं अडखळल्यासारखं झालं तरी, पुढे वाचक या भाषेला सरावतो. 'करलालतं',  'वाटलालं',  'काढलालेव',  'यिवलालतं',  'दिसलालतं', 'दुखलालंय' यासारखी क्रियापदं ह्या भाषेला सुलभ व गोड बनवतात, तसेच लयही प्राप्त करून देतात. या भाषेसह या प्रदेशातील म्हणींचाही वापर व्हायला हवा होता, असं मात्र जाणवतं.  'येळवस' या सणाचे, लग्नाचे वर्णन वाचताना आपल्याला या प्रदेशाच्या ग्रामीण कृषिनिष्ठ संस्कृतीचीही ओळख व्हायला मदत होते.

        या कादंबरीतून प्रकट झालेले ग्रामीण वास्तव हे पांढरपेशी शहरी वाचकांसाठी निश्चितच धक्कादायक आहे. तालुक्यापासून जवळचे गाव असूनही या मुलींना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. साठ-सत्तरच्या दशकातल्या कादंबरीत चित्रित झालेले ग्रामीण वास्तव व आजची परिस्थिती यात फारसा फरक नसल्याचे ही कादंबरी वाचताना लक्षात येते. यावरून स्वातंत्र्योत्तर पाच-दहा दशकांतली ग्रामीण विकासाची कल्पना करता येईल. त्यासाठी पंचवार्षिक योजनांचे आराखडे, आकडे, राष्ट्रीय/दरडोई उत्पन्नातील वाढ अशा गोष्टींकडे पाहण्याची गरज उरत नाही. गावात कॉइनबॉक्स आला हा वरकरणी किरकोळ वाटणारा बदलही लेखकाने टिपला आहे. गावात मोबाईल फोन, टीव्ही आले तरी जनीच्या जीवनाशी या वस्तूंचा संबंध येत नसल्याने त्यांचा उल्लेख नसावा.

    तिच्या मैत्रिणींचं वयात येणं, तिचं वयात येणं, पौगंडावस्थेत शारीरिक बदलांमुळे गोंधळलेली मानसिकता, तिच्या तईचे पाटलाच्या पोराबरोबरचे शारीरिक संबंध, बन्याचं तिच्या मागं लागणं, धोंडुरामच्या पोरांनं तिला मिठी मारणं, ती घरी एकटी असताना नात्यातला मुलगा घरी आल्यावर निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना, कावळे मास्तराचा लोचट व विकृत स्पर्श, स्वतःच्या शरीरावयवांची चीड, मैत्रिणींचे अनुभव, तिच्या अपेक्षा, शेवटी तिच्या वाट्याला आलेलं भीषण वास्तव, अशा साऱ्यातून लेखकाने जनीचे जे लैंगिक भावजीवन उभे केले आहे ते चकित करणारे आहे. स्वतः पुरुष असूनही त्यांनी आपल्या नायिकेला चांगला न्याय दिला आहे. लैंगिक बाबीवर लिहिताना त्यांच्या लेखणीचा कुठेही तोल ढळला नाही.

त्यामुळेच हे वाचताना कधीही लैंगिक भावना चाळवल्या जात नाहीत.
       जनीनं तिच्या शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाचा तपशीलही या कादंबरीचे महत्त्वाचे अंग आहे. तिच्या लग्नाचे बापाच्या डोक्यावरचे ओझेही त्यामुळे कमी झाले असले तरी; लग्नानंतर समाजमान्य चौकट लाभल्यानंतरच खऱ्या अर्थाने तिचे लैंगिक व आर्थिक शोषण सुरू होते, हे वाचताना स्त्रीला केवळ माणूस म्हणून नव्हे तर स्त्री म्हणून समजून घेता येण्याची गरज अधोरेखित होते.                                                                                                              कादंबरीचे कथानक सुरुवातीला काहीशा संथ गतीने पुढे सरकते. नंतर जनीची दहावी, बारावी, डीएड, लग्न असा थोडा वेग घेते. लेखकाला या कथानकावरची पकड ढिली होऊ द्यायची नसल्याने असे झाले असावे. मात्र त्यामुळे मूळ विषयापासून भरकटत जाण्याची व निरर्थक, अनावश्यक तपशिलांचा भरणा होण्याची भीती कमी झाली आहे हेही जाणवते. लेखकाने कथानक व पात्रांचे नैसर्गिक विकसन यांवरच भर दिला असल्याने आपोआपच अन्य गोष्टींकडे काहीसे दुर्लक्ष झाले असावे. उदाहरणार्थ, या कथानकाच्या विकासक्रमात कुठेही प्रतिमांचा वापर लेखकाने केला नाही. पण यामुळे हे कथानक कुठेही लंगडे पडले आहे, असेही म्हणता येत नाही. उलट रांगडी व जिवंत अनलंकृत बोलीभाषा तसेच वास्तवाची थेट मांडणी यामुळे ते अधिक प्रत्ययकारी झाले आहे. जगण्यातील वास्तव कलात्मकता सांभाळूनही थेटपणे मांडण्याचे आव्हान लेखकाने येथे सांभाळले आहे. वाचकाला चकित करण्यासाठी भुलवण्यासाठी अन्य कोणतीही क्लृप्ती लेखकाने वापरलेली नाही.

         कादंबरीचा शेवट करतानाही लेखक वास्तवाची कास सोडत नाही. 'आजपसून निवड मंडळाच्या परीक्षेचा अभ्यास चालू करू आसं ठरविले. वतलापुढून उठले. करकचून केस बांधले अन् आंघोळीला आले.'  या शेवटच्या ओळी जनीचा संघर्ष लग्नानंतरही सुरूच आहे, हे सूचित करतात. बाया खंबीरपणे वास्तवाला तोंड देतात. जीवन थांबत नसतं ही लेखकाची जाण इथे प्रकट होते.               
थोडक्यात, ग्रामीण स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण शिक्षणामुळे सकारात्मकपणे बदलणारी तिची मानसिकता, बाईपणातून जाणाऱ्या कुठल्याही बाईच्या मानसिक, भावनिक, लैंगिक व बौद्धिक गुंतागुंतीचे अनेक पदर त्या गुंतागुंतीच्या नैसर्गिक बंधासह प्रभावीपणे लेखकाने मांडले आहेत.

(साभार : नवाक्षर दर्शन, जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर 2009)

सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

आमराईतले दिवस


  शाळेच्या परीक्षा संपल्या की, कोंडलेलं मांजर धूम पळावं तसं मी आमराई गाठायचो. मला बघितल्यावर गुरं सोडून आमराईत धिंगाणा घालणारे गुराखी लगोलग गुरं वळवायचे.
    आख्खं शिवार जळताना आमराईतली सावली थंडगार वाटायची. दिवसभर आमराई हलू द्यायची नाही. आमराई साऱ्या शिवाराला साद घालायची. सकाळची कुळवपाळी आटपून आजूबाजूचे कुळवकरी दुपारी आमराईत टेकायचे; अन् बापाचा गप्पांचा फड रंगायचा. आम्ही पोरं इळभर सुरपारंब्या खेळण्यात दंग. माकडासारखं ह्या फाट्यावरून त्या फाट्यावर. आमचा गलका वाढला की बाप वरडायचा. मग आम्हाला गुपचूप ओळीनं झोपावं लागायचं. खेळून, दमून गडद झोप लागायची. ऊनाचा एखादा चुकार ठिपका तोंडावर आला की, झोपमोड व्हायची. बाप जागा बदलून झोपायला सांगायचा. आमराईत ऊनाच्या झळाही लागत नसत. थंडगार! झिरपणाऱ्या खापरातल्या बिंदगीतलं पाणीही थंडगार!
    मग झोप मारून झाल्यावर पडल्या-पडल्या नजर इकडून तिकडं पळणाऱ्या खारींवर जायची. तुरूतुरू एखादी खारूताई वर-वर जायची. माझ्या नजरेचा पाठलागही सुरूच असायचा. एक नेमक्या आंब्याजवळ जाऊन खारूताई त्याला टोकरायची. त्या टोकरलेल्या ठिकाणी लालबुंद दिसायचं. मी एकदम आनंदानं उठून; सरसर चढून तो पहिला पाड तोडून आणायचो. पडलेल्या पाडांवरून आम्हा पोरांची भांडणं लागायची. मग वाटणी. मला फक्त कोय!
     पहिल्या पाडाचा शोध खारूताईनं लावल्यापासून, आमराईची राखण करायची एक नवी जिम्मेदारी आमच्यावर न सांगता पडायची. मग दररोज सकाळी जल्दी उठून, भाकर घेऊन आमची टोळी आमराईत दाखल व्हायची. गेल्याबरोबर पाड हुडकायची स्पर्धा लागायची. दुपारपर्यंत पडलेले पाड तोंडी लावायला घेऊन आम्ही जेवायचो. साधंच जेवण अगदी गोड लागायचं.
       आमराईतलं प्रत्येक झाड वेगळं. एक गुठली आंबा. त्याचे आंबे फारच लहान. साखरआंबा खूप गोड. शेपूच्या भाजीच्या चवीचा शेपूआंबा.  केसरआंब्याच्या कोयीला केसरच जास्त. एक खाराचा (लोणचं) आंबा. रसाचा आंबा. या गावरान आंब्यांच्या जाती आता नामशेष होत आहेत. आमच्या साखरआंब्याच्या चवीपुढे तर हापूस सुद्धा झक मारतो. साखरआंब्याचा एक तरी आंबा खाल्ला तरच मला आंबा खाल्ल्यासारखं वाटतं. या आंब्याच्या कोया मी लावल्या होत्या. दोन उन्हाळे जमादाराच्या डुबीचं पाणी खांद्यावर आणून झाड जगवले. तरी झाडं पुढं जगले नाहीत. बारक्या बंधूनेही अशीच खटपट करून पाहिली; पण यश आलं नाही. असो.
     पाड पडल्यानंतर आम्ही पोरं एकमेकांना चोरून आंब्याची अढी घालायचो. एकमेकांच्या अढ्या शोधून काढायचो. दुसऱ्याच्या अढीतले आंबे बिनपत्त्यानं फस्त करताना मजा वाटायची. पुन्हा बघतो तर माझ्या अढीचाही कुणीतरी चोरून फडशा पाडलेला असायचा.
  उन्हाळ्याचे रखरखीत दिवस आमराईच्या संगतीनं सुखात जायचे. आंबे उतरवताना हातांना, तोंडाला चीक उतून दुखं पडायचे, तरी त्याचा तेव्हा गुमानच नसायचा. आंबे उतरून झाल्यावर आमराई सुनी-सुनी वाटायची.
  माणसांना, गुरांना, पशुपाखरांना, भर उनात मायेची सावली देणारी आमराई...पुरणपोळीला मधुर आमरस देणारी आमराई... मधमाशांना पोळं करायला आसरा देणारी आमराई... ती आमराई आता उध्वस्त झालीय. त्यातलं एक आंब्याचं झाड वाढत्या वयाच्या खुणा अंगावर वागवत कसंबसं तग धरून उभं आहे. तेही बिचारं एकटेपणानं कावून गेलंय. जास्त दिवस टिकेल असं वाटत नाही.

शेतकऱ्यांच्या होरपळीची गाथा: ‘वीजेने चोरलेले दिवस’

       'वीजेने चोरलेले दिवस' ही संतोष जगताप यांची एका ज्वलंत आणि वेगळ्या विषयावरची कादंबरी नुकतीच दर्या प्रकाशन, पुणे यांच्याकडून आल...