शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

येस्टी

येस्टीत बसलो की लगेच झोप लागायची. बाळ होऊन पाळण्यात झोपायचो. आता डोळे खिडकीशी टक्क उघडे. येस्टीत काय चाललंय याकडे पूर्ण दुर्लक्ष. कंडक्टरने हटकल्यावर तेवढं तिकीट घ्यायचं.
   डोक्यात भिरभिरणारे असंख्य विचार. ब्याकग्राउंडला खिडक्यांचा खडखडाट, इंजीनचा, गियरचा लयबद्ध आवाज. त्यात मिसळलेला लोकांच्या बोलण्याचा, भांडणांचा हेलकावे खाणारा आवाज.
   ओळखीचीच चित्रपट्टी डोळ्यांसमोरून सरकतेय. फक्त या चित्रांमध्ये थोडेसे बदल झालेत. म्हणजे पूर्वी नांगरलेल्या रानांमध्ये आता भरगच्च हिरवं पीक आहे. काही दिवसांनी पुन्हा हा रंग बदललेला दिसेल. पिवळसर छटा दिसतील. पुन्हा काही दिवसांनी ही चित्रपट्टी काळसर दिसेल.
    आपलं लक्ष खरंतर या दृश्यांवरही नाही.
आजिबात एकांत मिळालाय. कायकाय आठवत राहतं रँडमली. आपण त्या जुन्या, कालपरवाच्या आठवणी उगीच कशाकशाशी जोडतोय. त्यात तेव्हा करता न आलेल्या, विसरलेल्या गोष्टी एडिट करत राहतो. मुकपणे स्वतःशी बडबडत राहतो आपण. मध्येच एखादी चमकदार ओळ येते ओठांवर. कोट करावी अशी. अशा कितीतरी ओळी आपण सोडून दिलेल्या. जे सोडावं वाटतंय ते हात धुवून पाठीमागे लागलेलं(व्हाईसव्हर्सा)
   खूप वेळाने लक्षात येतं की आपल्या शेजारी
एक सुंदर स्त्री बसलीय. आपण चोपून बसतो. तिच्या मांडीवरचं बाळ तर खूपच सुंदर आहे. ही आपलीच बायको आणि लेकरूही आपलंच. तिला माहीतंय म्हणूनच तिनं डिस्टर्ब केलं नाही. इतकं पुरेसंय आपल्यासाठी. मी तिच्या मांडीवर झोपलेल्या बाळाकडे पाहतोय. यस्टीत बसल्यावर पाळण्यात घातल्यासारखं वाटून झोपी गेलंय...
 ( फोटो सौजन्य: इंटरनेट)

रविवार, २४ डिसेंबर, २०१७

इंधन : समृद्ध करणारी कादंबरी

हमीद दलवाई यांच्या 'इंधन' या कादंबरीत कोकणातल्या तत्कालीन समाजजीवनाचे अतिशय कलात्मक आणि वास्तव चित्रण येते. स्वतःच्याच समाजातल्या वाईट प्रवृत्ती आणि चालीरितींच्या विरोधात नायक ठामपणे उभा राहतो; यातून लेखकाचं विवेकीपण अधोरेखित होतं.
     अनेकवेळा नायकाला गावाच्या बिघडलेल्या वातावरणात काहीच हस्तक्षेप करता येत नाही. नायक खूप वर्षांनी गावात आल्याने येतानाच एक अपराधीपणा मनात घेऊन येतो. नायकाने मधल्या काळातला आयुष्यकाल समाजसुधारणा आणि प्रबोधनाच्या चळवळीत घालवेला आहे. गावापासून तुटल्यानंतर गाव कुठल्याच गोष्टीत नायकाला आणि त्याच्या विचारांनाही स्वीकारत नाही. त्याच्या शब्दालाही किंमत देत नाही. स्वतःच्या समाजाचा तर नायकावर हा धर्म बुडवतोय म्हणून रागच आहे. वडील आणि भाऊ या घरातल्या व्यक्तींचाही या गोष्टींमुळे रागच आहे पण एकीकडे नायकाच्या प्रकृतीची काळजीही आहे.
     जीवनातल्या व गावातल्या घटनांवरून नायक नैतिक-अनैतिक संकल्पना, प्रेमभाव, वैर, इत्यादी अनेक मानवी भावभावनांविषयी अनेक अंगांनी विचार करत राहतो. स्वतःलाच तपासत जातो.
      या कादंबरीत कोकणातला निसर्गही एक स्वतंत्र पात्र म्हणूनच येतो. निसर्गाची आणि भवतालाची लेखकाने सजगपणे सूक्ष्म दखल घेतली आहे.
     अनेक हादरवून टाकणाऱ्या घटनाक्रमानंतर नायक मुंबईला निघून जातो तरी त्याचे मन गावातच अडकून पडलेले आहे. गावातल्या भयानक घटनेनंतर गावात काय काय होईल याचा अंदाज नायक बांधत राहतो. पुढील घटनाक्रम तो जुळवत राहतो आणि गाव हळुहळू पूर्वपदावर कसे येत जाईल हे सांगत असतानाच ही कादंबरी संपते.
   भाषेचा योग्य वापर , मनाचा ठाव घेणारे निवेदन, कथावस्तूची कलात्मक बांधणी, निसर्गाचा पार्वभूमीसारखा वापर इत्यादी गोष्टींनी कादंबरी परिपूर्ण झाली आहे.
     या कादंबरीने मला खूप समृद्ध अनुभव दिला. जीवनाविषयीचे माझे आकलन वाढावयास मदत झाली. इतक्या उशीरा मला ही कादंबरी वाचायला मिळाली याची हळहळ वाटत आहे.

बुधवार, २९ नोव्हेंबर, २०१७

दुकान

मी पाचवीला आसताना हामच्या चुलत्यानं काकूची लग्नातली बोरमाळ इकून किराना मालाचं दुकान लावलता. माल भरल्यावर हौसंनं लावू लागलो. मी मनलो ह्यवडाच माल? चुलता मनला बक्कळ मालाला लई पैसा लागताय. माजा हिरमोड झाला.बाप शेताकड जायचा. चुलता दुकानदार झाला. मला लईच भारी वाटायचं. शाळंतल्या पोरावाला हामी दुकान लावलाव मनून रूबाबात सांगिटलो. पोरं मनले हामाला दाकीव तुजं दुकान. शाळा सुटल्यावर न्हेलो. चुलता मनला दोस्तावाला गोळ्या दी. मी परसाद वाटल्यावनी बच्चक बच्चक गोळ्या दिलो. दोस्तं खूश हून पळाले. चुलता मनला आबे! एक एक गोळी देवं का नाही? खिरापत हाय का वाटाया? आशानं फळ्या लागतील्या दुकानाला.
  मग हाळूहळू मीबी गिराईक करलालो. चुलता बाहीर गेलता.एक गिराईक आलं. एक छटाक साखर दी मनल्यावर तराजूत आंदाज्यानं वजनाचा एक धोंडा टाकून साकर जोकून दिलो. आल्यावर चुलत्याला सांगिटलो. चुलता मनला कोनचं माप टाकलतास? मी दावलो. चुलत्यानं कपाळावर हात मारून घेटला. आशानं दुकानाला फळ्या लावावं लागंल मनला. शंबर ग्रॅम दिलतो. मग समजावून सांगिटला. मग हाळूहाळू शिकलो.
  आई घरातून साकर, च्यापत्ती, गोडंतेल,निरमा आनाया धाडायची. चुलता काळभोर तोंड करून शिव्या द्याचा. घर दुकान गिळतंय मनायचा. आशानं फळ्या लागतीत्या सा म्हैन्यात मनायचा. आद्दी दुकानापुडचं झाडाया लावायचा. मला लाज वाटायची. शाळतले पोरं बगायचे.घरला जाताना मला कट मारून थोडं थोडं सामान द्याचा.
  पुडंपुडं बाहीरचं गिराईक कम आन घरचं गिराईक ज्यास्त झालं आन पास्सा म्हैन्यात दुकानाला खरंच फळ्या लागल्या. चुलत्यानं रानाची वाट धरला. मला लई लई बेक्कार वाटलं.
(फोटो सौजन्य: इंटरनेट)

मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

गुत्तं

बापूनं तूर कापायचं गुत्तं तीन हाजाराला सुमामावशीला दिल्तं. रास झाली. कापायचे गुत्त्याचे पैशे, तीन गड्याचा सहाशे रूपय तूर बडवायचा रोजगार, मिशनीचे चारशे रूपय, माल घाटल्यावर देतो मन्ला समद्याला..

  मुरूमच्या आडत्याकून उच्चलबी आणलता बापूनं. शंबर रुपय टमटमचं भाडं ठरवून मुरमाला निगाला. तूर घालून आडत, हमाली, मापाई, तोलाई कटून तेरा हजार नऊशे पंचेचाळीस रूपय पट्टी आली. उच्चल दोन हाजार आडत्यानं काटून घेटला. येत येत फवारायच्या आवशिवादाची उदारी साडेचार हाजार सारून आला. बायकूचे कानातले फुलं सोनाराकड गहान ठिवल्याले सोडीवनं हुईना, ही स्टँडवर बसल्या बसल्या ध्यानात आलं. सोनाराकड गेला. मुद्दल दोन हाजार आन पाच म्हैन्याचं याज तीनशे सारून फुलं ताब्यात घेटला. भूक लागलती  कायतर नाश्टा करावं वाटलं पन बायकू, माय, बाप, पोरगं पोरी सम्दे डोळ्यापुडं हूबे राह्यले. मग एक डजन केळं घेटला. चाळीस रूपय डजन ही काय भाव झाला? आसं बडबडत स्टँडला आला.
...............

पोराला रव्याला तायपाईड झालाय. डाक्टरनं आडमीट करून घेटलंय. पैशे तर न्हायते. का करावं मनत आडत्याची याद आली. नीट आडत्याकड आला. रामाराम केला. 'बोला जाधव! काय आनलाव माल?'
  बापूनं  बारीक आवाजात लाजत सारं सांगिटलं. आडत्यानं पैशे दिलनी. इचाराच्या नादात बापूचे पाये  बापूला कुटं न्हीवलालते ती तेलाबी कळना.

   रातच्याला गावाकड आल्यावर सुमामावशीकड गेला. व्हय नगं करत सुमामावशीनं तीन रूपय शेकड्यानं पाच हाजार दिली. सुमामावशी तू देवासरकं गाट पडलीस बग मनत बापू उटला. बाहीर जावून बाहीनं डोळे पुसला. आंदारात मिसळला.....

रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

ऊन

माघातलं ऊन जवारीवर चपचप पडलेलं. थंडीनं काकडून गेलेलं शिवार ऊनात डोळे मिटून समाधी लागल्यागत पडलेलं. ऊन रानावर मनावर स्वार झालेलं
   जुन्या इमल्याच्या घरात सोबन्यातून सारवलेल्या भुईवर पडलेला ऊनाचा पांढरालख्ख डाग मनावर गडद उमटलाय. तो ऊनाचा डाग पकडण्याचा मी फार प्रयत्न करायचो पण मूठ झाकली की तो डाग मुठीतून निसटून
वर यायचा.
   शेजारच्या शिव्यानं बोचकरल्यावर मला आजी म्हणाली होती, " त्येचं घर आपून ऊनात बांधू." मला आठवतं तेव्हाच मी पहिल्यांदा ऊनाचा गांभिर्यानं विचार केलेला.
  शाळेत अजून नाव घातलं होतं का नाही; ते आठवत नाही. सकाळचं काम आटपून पाटीत भाकरी घेऊन आई शेताकड निघालती. मीही भरदुपारी अनवानी पायानं आईच्या मागंमागं चालत होतो. पाय पोळलेलंही तवा कळायचं नाही. ऊनाचा चपकारा सोसत नव्हता. अचानक मागून सावली पळत आली. पुढच्या ऊनालाही तान पळवून लावली. "ऊन पळालं.. ऊन पळालं.." म्हणत मी टाळ्या वाजवू लागलो. आईनं कौतुकानं वळून बघितलं आणि म्हणाली, " पम्या ऊन पळालनी. शिराळ पडल्याय."
  ऊन-शिराळ-पुन्हा ऊन हा अनुभवच अद्भूत. सकाळचं कवळं ऊन, शाळा सुटल्यावर मधल्या सुट्टीत घरी जाताना भेटणारं दुपारचं कडक ऊन, शेतात झाडाखाली झोपल्यावर झाडाच्या पानांच्या सांदीतून निसटून येऊन तोंडावर पडलेलं ऊन, विहिरीतल्या नितळ पाण्यावर पडलेलं ऊन, पाण्यावरून परावर्तीत होऊन डोळे दिपवणारं ऊन, विहिरीतल्या डुचमळत्या पाण्यात अनेक सूर्य दाखवून नजरबंदी करणारं ऊन, हिरव्या पिकाला चमकवणारं ऊन, आरशानं सावलीला दळण करणाऱ्या आईच्या डोळ्यावर चमकवलेलं ऊन, उन्हाळ्यातलं 'मी' म्हणणारं ऊन, प्रत्येक ऊन निराळं. उन्हाळ्यात दिवसभर अंगाची लाही करणारं आगाव ऊन सांजच्यापारी कसं मलूल होतं. त्याचा तांबूस रंग मनाला उदासी आणतो.
   बालपणापासून उन्हाळा आवडायचा कारण एकतर सुट्टी. दुसरं ऊनात बोंबलत भटकायला मोकळं रान..
 हसरत मोहानीची गझल मला खूप आवडते.
    " दोपहर की धूप में मेरे बुलाने के लिए
      वो तेरा कोठेपर नंगे पाँव आना याद है " हा शेर ऐकला की मनालाही ऊनाचा कडक तरी सुखद चटका बसल्यासारखं होतं.
   बऱ्याच दिवसापासून...वर्षांपासून म्हणा एक निसर्गचित्र काढतोय. चित्रात बोडखं रान आहे. लालभडक फुलांनी वाकलेलं पळसाचं झाड, आकाश... पण चित्रच पूर्ण होईना कारण मला ऊनच रंगवता येत नाहीये. अनेक रंग मिसळले. पांढरट, पिवळा, करडा. मनातल्या ऊनाचा रंगच सापडत नाहीये. झाडांच्या सावल्यांवरून, प्रकाशमान पांढऱ्या भागावरूनच काय ते ऊन समजून घायची नामुष्की आलीय.
   सकाळचं कवळं ऊन गावातून जाणाऱ्या काळ्या डांबरी सडकेवर पडल्यावर सडक कशी नागासारखी सळसळते.
  हळुहळू प्रौढ होणारं ऊन सूर्यफुलांच्या शेतात घुटमळतं. फुलांना मस्त फिरवतं. भर दुपारच्या वेळी सूर्य माथ्यावर येतो तेव्हा लांबलेली स्वतःची सावली संकोचून  पायाजवळ  घुटमळते. जणू सावली ऊनाला शरण येते.
दुपारी आईनं अंगणात घातलेलं धान्याचं वाळवण, वाळू घातलेलं धुणं ऊनाशी एकरूप होतात. ऊनाला सोबत देतात.
    मी सदानंद रेग्यांची कविता गाऊ लागतो-

   " माथ्यावरती ऊन्हे चढावी
     पावलात सावल्या विराव्या
     घाटावरती शुभ्र धुण्यांच्या
     पाकोळ्या अन मंद झुलाव्या

     डोंगर व्हावे पेंगुळलेले
     पोफळबागा सुस्त निजाव्या
     अंगणातल्या हौदावरती
    तहानलेल्या मैना याव्या"

यानंतर कवितेतलं ऊन आठवू लागतं. महानोरांच्या कवितेतलं 'तिपीतिपी ऊन', कुसुमाग्रजांच्या कवितेतलं 'पिवळे तांबूस कोवळे' ऊन...

   पाऊस लांबल्यावर ऊनानं पिकं दुपार धरू लागतात. त्यांच्याकडं बघवत नाही तेव्हा ऊनाचा राग-राग येतो. मी हात जोडून विनवणी करतो. ऊन नुसतं बघत असतं.

           -  प्रमोद कमलाकर माने

शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

काही कविता


इरजोड

ठकलेला एक बैल अखेर त्यानं
खसगीच्या बाजारात इकला
अन येताना घेऊन आला
बाब्याला पाटी , म्हराटीचं पुस्तक, मांजरपाटाचं कापड, धोतर, चिवडा वगैरे

मिरगाचा पाऊस पडला
रानानं हिरवी साय धरली
तवा हाल्याला तिफनीला जुपून
त्यानं इरजोड पेरनी येडीवाकडी पार पाडली

आन् पोळ्याच्या दिवशी एकच बैल घेऊन
अवगुण्यासारखं
गावभर मिरवून आला.
        ...........

          'कोरडवाहू'मधून
___________________________________
   
  नामानिराळा
 
शेतकरी एकवेळ आपला संसार मोडील
पण बैलबारदाना मोडत नाही
तरीही
कर्जात शेताचं एक तुकडं आणि बैलबारदाना विकून
नामानिराळा झालेला बाप
कुणबिक आणि कुणबीपण मोडीत निघून
चावडीचा मेंबर झालेला बाप

विकलेल्या तुकड्यात पाय टाकत नाही
डोळे उचलून तिकडं पहात नाही
पोळ्याच्या दिवशी घराबाहेर पडत नाही
पुरणपोळीचा घास मोडत नाही

अशावेळी
बापाच्या नावाला कुणीही जात नाही
      ....
    याद
माय निवद दावते
बैल मातीचे करून
बाप पहातच नाही
खोट्या बैलांना फिरूनघ

येळवशीच्या सणाला
पाच पांडव करून
माय घरीच पूजते
बाप हिंडतो दुरून

माय जागविते याद
सण साजरे करून
याद शेताची बापाच्या
खोल मनात पुरून
..........

    -प्रमोद कमलाकर माने
       पूर्वप्रकाशित : कवितारती

गझल

  गझल ये शहर मुझे रास न आया यूँ जिने का अहसास न आया क्या पाया क्या खोया मैने कोई भी तो पास न आया सबकुछ था फिर भी मुझ को  रहनसहन का मिजास न आ...