वैशाख शुक्ल पौर्णिमेला कर्नाटकचा पोळा हा सण असतो. बैलपोळ्यासारखाच हा सण. या कर्नाटकी पोळ्याचे नाव आहे 'कारहुणवी'. पण आमच्याकडे 'कारवनी' म्हणतात. माझं गाव मराठवाड्याच्या टोकाला कर्नाटक राज्याच्या सीमेजवळ आहे. आमच्या भागात काही गावात पोळा तर काही गावात कारवनी साजरी करतात. उमरगा या तालुक्याच्या शहरातही निम्मे शेतकरी पोळा, निम्मे कारवनी करतात.
गावातले नुकतेच कुणबिकीत पडलेले शेतकरी कुणबिकीतून निवृत्त झालेल्या म्हाताऱ्यांकडे यायचे आणि अंबाड्याचे साज करून घ्यायचे. आमच्या आजोबांकडे चापे, घाणे, लिंबोळ्या, लागबंद हे बैलांचे साज करून घ्यायला रीघ लागायची. आप्पा वैतागायचे. 'तुमी कवा शिकनार?' असं म्हणायचे. पण कुण्या बापड्याला ते नाउमेद करत नसत. आप्पांचाही दुपारचा वकत चांगला गुजरत असे. उरलेल्या अंबाड्यापासून आप्पा आम्हाला चाबकं करून द्यायचे. आम्ही दिवसभर चाबकाचे आवाज काढत हिंडायचो. लाकडाचा दांडा तासून त्याला चाबूक बांधायचो आणि रंगाऱ्याजवळ तीन रंगात रंगवून घ्यायचो. रंग हडकेपर्यंतही दम पडायचा नाही.
कारवनीचा आदला दिवस म्हणजे 'खंडमळण्या'. त्या दिवशी वडलांबरोबर मी रानात जायचो. नदीवर बैलांना घासूनपुसून अंघोळ घालायचो. थंडगार पाणी बैलांच्या पाठीवर उडवल्यावर तिथली कातडी थरथरायची. मारका 'इंग्रज्या' नावाचा बैल सतवायचा. बैलांची लख्ख अंघोळ झाल्यावर गाय, म्हैस, वासरं, कारवडी, वागारी यांचीही अंघोळ व्हायची. घरून आईनं दिलेल्या हळद व लोण्यानं बैलांच्या माना चोळायचो. नांगराचा, कुळवाचा, गाडीचा 'जू' घेऊन घट्टे पडलेल्या माना बघून वाईट वाटायचं. लोण्यानं चोळल्यावर मान गुळगुळीत मऊ पडायची. मग वडील बैलांचे शिंग घासून घासून गुळगुळीत करायचे. वारनेसनं रंगवल्यावर शिंगं कशी ऐटदार वाटत.
कारवनी दिवशी बैलांना गावात आणलं जाई. माने-मंडळीच्ये सगळ्या बैलांची एकत्र मिरवणूक निघे. रंगीत शिंगांना चमकीचे पट्टे लावलेले. फुगे बांधलेले. पाठीवर झूल, गळ्यात घुंगुरमाळा, दृष्टमण्यांच्या माळा, शिंगांच्या टोकांना पितळेच्या शिंगोट्या, रंगीबेरंबी माटाट्या, बाशिंग, पायात काळे कंडे, कातरून आकार दिलेली गोंडेदार शेपटं, अंगावर पिवडी... बैलं नवरदेवापेक्षा देखणे दिसायचे.वाटायचं जणु आज बैलांचं लगीनच हाय. मिरवणुकीपुढं बाजा, धनगराचे ढोल, झांजा. सुतळीबाँबच्या आवाजानं बैल बिचकायचे.बुजायचे. बारके पोरं भिऊन लांब पळायचे. म्हारतीपुढं पूजा होऊन वाजतगाजत मिरवणूक घराकडे येई. सर्वात पुढे रहायचा मान पाटलाच्या बैलांचा बाकीचे सगळे मागे. दिवसभर मिरवणूका. बैलांवर उधळलेल्या चुरमुऱ्यांमुळे रस्ते पांढरेशिप्पट दिसायचे. जमादारांच्या बैलांच्या मिरवणूकीपुढं पोतराज व गुरगुंपांग वाजवणाऱ्या मरगम्मा (कडकलक्ष्मी) असल्यामुळे ही मिरवणूक बघायला गर्दी व्हायची.
मिरवणूक झाल्यावर दारापुढे बैलांची पूजा होई. वडील दोन्ही बैलांच्या म्होरक्या धरून मधी उभारायचे. आई पूजा करायची. मग बैलांना पूरणपोळी चारली जाई. एखादा बैल पोळी खाईना झाला की; सगळे 'बैल रूसला...बैल रूसला ' म्हणायचे. मग भजे घुगऱ्या, कोडबळ्यांचं गाडगं बैलांच्या तोंडाला लावलं जाई. वरून गुळवणी पाजलं जाई. शिंगात कोडबळे अडकवले जात. शेवटी घरातले सगळेजण बैलांच्या पाया पडायचे.
ज्यांच्याकडे पोळा असतो असे पाहुणे घरोघरी आल्याने कारवनीला गाव गजबज वाटायचा. आमच्याडे किल्लारीचे दादा आवर्जून यायचे. जाताना पोळ्याचं आवतन देऊन जायचे. ते रात्री आम्हा मुलांना चमत्कारिक गोष्टी सांगायचे. एक गोष्ट तीन-चार दिवस चालायची. त्यांना काल गोष्ट कुठपर्यंत आली होती ते आधी आम्ही सांगावं लागायचं. मगच पुढची गोष्ट ऐकायला मिळायची. एकदा त्यांनी घोरण्याचा विषय काढला. मी त्यांना विचारलं, 'दादा, घुरतात कसं ओ?' त्यांनी घोरण्याचं प्रात्यक्षिक मला साग्रसंगीत दाखवलं आणि माझ्याकडून करूनही घेतलं. तेव्हापासूनच मी रात्री झोपेत घोरायला लागलो म्हणे! पुन्हा दादा कधी आले की विचारायचे, 'कुटं गेला तो घुऱ्या?' माझं नावच त्यांनी घुऱ्या पाडलं.
कारवनीच्या दिवशी बैलांच्या खांद्यावर जू दिला जात नाही. अगदी महत्त्वाचं काम असलं तरी बैलांना गाडीला जुंपत नाहीत.
कारवनीचं वैशिष्ट्य हे आहे की; हा सण पोळ्यासारखं हंगामाच्या अधेमधे येत नाही; तर मृगाच्या सुरूवातीला येतो. बैलांची पूजा करून, कौतुक करून, कृतज्ञता व्यक्त करूनच त्यांना कामाला जुंपले जाते.
आता कारवनीची ती मजा राहिली नाही. उन्हाळ्यात बैलांचे साज तयार करणारे, दावे वळणारे बुजूर्ग आता दिसत नाहीत. सगळे साज आता बाजारात आयताळ मिळतात. सुताचे.
आता चाबुक वाजवणारे मुलं दिसत नाहीत तर बैलांसोबत सेल्फी घेणारे आहेत. एकूण लहानपणीचा तो आनंद उरला नाही.
प्रमोद माने सर आपण लिहिले विचार वाचून खुप छान वाटले. आपल्या कार्यासाठी शुभेच्छा.
उत्तर द्याहटवा����������