बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४

गझल

  


ये शहर मुझे रास न आया

यूँ जिने का अहसास न आया


क्या पाया क्या खोया मैने

कोई भी तो पास न आया


सबकुछ था फिर भी मुझ को 

रहनसहन का मिजास न आया


बुत बनकर यूँ बैठे हैं कि

दिल में उम्मीद-ओ-यास न आया


हाल बयाँ करने का जुनूँ था

लफ्जों में कुछ खास न आया


     - प्रमोद माने 

        १४|०२|२०२४


 बुत= पुतळा

उम्मीद-ओ-यास = आशा आणि निराशा

शुक्रवार, ७ मे, २०२१

शेतकऱ्यांच्या होरपळीची गाथा: ‘वीजेने चोरलेले दिवस’


       'वीजेने चोरलेले दिवस' ही संतोष जगताप यांची एका ज्वलंत आणि वेगळ्या विषयावरची कादंबरी नुकतीच दर्या प्रकाशन, पुणे यांच्याकडून आलेली आहे. ही कादंबरी आशय, विषय, भाषा, निवेदन अशा अनेक अंगांनी महत्त्वाची आहे. शेतीसाठी भारनियमन हा अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना छळणारा विषय झाला आहे. रात्री उशिराची वीज सोडणे, डीपीवर जास्त लोड असल्याने ट्रान्सफॉर्मर जळणे, तो दुरुस्त होऊन न मिळणे, त्यासाठी शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करावी लागणे अशा अनेक समस्यांना शेतकरी तोंड देत आहेत. मराठी साहित्यात प्रथमच हे सर्व बारकाव्यांनिशी आलेले आहे. लाईनमन, वायरमन, झिरो वायरमन, डीपीची दररोज देखभाल करणारा लोम्या म्हणजेच लोकल म्यानेजर, साहेब, सरकारी धोरणे या सिस्टीममध्ये शेतकरी कसा हतबल होऊन अडकलेला असतो ते खूप छान मांडलेले आहे. लेखकाने हे सगळं जीवन स्वतः जगल्यामुळेच प्रत्ययकारीपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे. जगू हा या कादंबरीचा नायक असून तो ग्रॅज्युएट आहे. तरी मायबापासोबत रानात दिवस-रात्र खपतो आहे. मध्यरात्री उठून बापासोबत शेतात पाणी द्यायला जायचं. बंद पडणाऱ्या स्टार्टरचं बटण दाबायला विहिरीजवळ बापानं थांबायचं आणि स्वतः दारं धरायचं. ह्या जागरणानं बिघडणाऱ्या तब्येतीचा विचार न करता पीक जगवण्यासाठी दररोज तुकोबाकथित ‘युद्धाच्या प्रसंगाला’ तोंड द्यायचं. ह्या जगण्यासोबतच रानातली त्यांची वस्ती, ते शिवार, तो परिसर लेखकाने  सेंद्रियतेने आपल्यापुढे उभा केला आहे.

    या कादंबरीत प्रथमपुरुषी निवेदन असून ते अतिशय रोखठोक अशा लोकभाषेत आलेले आहे. सांगोला परिसरातील लोकभाषेची सगळी वैशिष्ट्ये, लोकम्हणी, वाक्प्रचार, शब्द यांचा वापर लेखकाने खुबीने केलेला आहे. या निवेदनात कुठेही एकसुरीपणा आलेला नाही. पट्टीच्या गोष्ट सांगणाऱ्याकडे ज्या-ज्या क्लृप्त्या  असतात त्या सर्व लेखकाच्या निवेदनात येतात. अर्थातच हे ओढून ताणून आणलेले नाही; तर नैसर्गीकपणे  आलेले आहे. हे निवेदन शेवटपर्यंत वाचकाला पकडून ठेवते. निवेदनामध्ये लोककथांचा वापर दृष्टांतासारखा केलेला आहे. नायक कधी तिरकसपणे, कधी विनोदी पद्धतीने, कधी उपरोधाने गोष्ट सांगत राहतो. 

      कादंबरीची भाषा खूपच समृद्ध आहे. या भाषेमुळेच कादंबरीला एक जिवंतपणा आला आहे. या दृष्टीने कादंबरीची सुरुवात पाहण्यासारखी आहे-

 ‘होल कंट्रीत आपणच भारी. आपल्या लेकराबाळांसकट, म्हाताऱ्याकोताऱ्या  समद्यांला  दर एक-दोन तासांनी व-वरडून आनंद साजरा करता येतो. लाइट आली... लाइट आली... आली... आली... लाइट आली... असं मुसळानं टिऱ्या बडवत. गुड नाईट!’

   ‘आमची माणसं आमच्याच मातीत घालत अर्थातच रेडिओचा आवाज कमी केला तरी कडू ना हालिंग ना डुलिंग ओन्ली गपगार पडिंग.’ असं उपरोधिक, विनोदी अंगानं येणारं निवेदन अस्सल आहे.

  एखाद्या  विषयावर ठरवून कादंबरी लिहिताना ती एकांगी होण्याची शक्यता अधिक असते; पण लेखकाने या कादंबरीत तोही तोल छान सांभाळला आहे. जगण्याचाच एक भाग बनून हा विषय समोर येतो व त्याच सोबत इतर पातळ्यांवरचे जगणेही सोबतीने येते.  या कादंबरीतील भाषा ही जिवंत व रसरशीत आहे. ही त्या परिसराची लोकभाषा आहे. लेखकाने ती पुरेपूर सामर्थ्यानिशी वापरली आहे. आजवर्दी, कडू, घांगऱ्याघोळ, रातचंइंदारचं, नादीखुट, येरवाळी, बुरंगाट, डोक्यालिटी असे परिसरातील बोलीतील अस्सल शब्द या कादंबरीत सहजतेने येतात. 

    टाळक्यात वाळकं, बाळंतपण निस्तारणं, आभाळ हेपलणं, व्हरा हाणणं, कासुट्यात जाळ होणं, भेडं होणं, मधल्यामधे गाळा हाणणं, बेंबटाला वढ बसणं, खिरीत सराटा निघणं,  गांडीवर काटं उभा राहणं, अशा अस्सल वाक्प्रचारांमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त झाले आहे. 

   आपण धड तर जग ग्वाड, फुकटचं खाणं न् हागवणीला कार, म्हातारीनं पंजाण घातलं म्हणून ती पोरगी होईल का, लाडका किडा न गावाला पिडा, भिणाऱ्याच्या मागं म्हसोबा, घराचा उंबरा दारालाच म्हायती, दिवा जळं, पिडा टळं अशा म्हणींच्या उचित वापरामुळे कादंबरीतील भाषा संपृक्त झाली आहे.

      शेतकऱ्यांचे वीजेने चोरलेले दिवस ह्या कादंबरीत धरून ठेवण्यात लेखक यशस्वी झाला आहे. ह्या कादंबरीत आलेले भीषण वास्तव हे अपवादात्मक नसून सार्वत्रिक व सर्वकालिक असल्याने ही कादंबरी महत्त्वाची ठरते. आधीच अस्मानी, सुलतानी समस्यांनी मेटाकुटीला आलेला शेतकरी वीजेच्या भारनियमनामुळे आणि भ्रष्ट व्यवस्थेतील ढिसाळपणामुळे कसा कोलमडून पडतो; याचे प्रत्ययकारी चित्रण या कादंबरीत आलेले आहे. 

       लेखकाची ही पहिलीच कादंबरी असूनही लेखकाने ताकदीने हा वाङमयप्रकार हाताळला आहे. त्यांच्या पुढील लेखकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

पुस्तकाचे नाव- वीजेने चोरलेले दिवस (कादंबरी)

लेखक- संतोष जगताप

प्रकाशक- दर्या प्रकाशन, पुणे 

पृष्ठे-  १५६

मूल्य- ₹ २२०

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

मराठी भाषेला समृद्ध करणारा कवितासंग्रह: पुन्हा फुटतो भादवा




  कवी अमृत तेलंग यांचा ‘पुन्हा फुटतो भादवा’ हा कवितासंग्रह पुण्याच्या ‘दर्या’ प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. समग्र ग्रामजीवन कवेत घेणाऱ्या या संग्रहास महाराष्ट्र शासनाच्या 'बहिणाबाई चौधरी' पुरस्कारासह लोककवी विठ्ठल वाघ पुरस्कार, पद्मश्री नामदेव ढसाळ पुरस्कार असे मानाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

   मराठवाड्याच्या मातीतली ही कविता आपले सत्त्व आणि स्वत्व जपणारी आहे. ही कविता कुणब्याच्या ‘ढोरकष्टाचा अभ्यासक्रम’ आपल्यापुढे ठेवते आणि कुणब्याच्या पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्याची क्षमताही बाळगते.

    ग्रामीण कवितेवर असा आरोप होतो की, ही कविता माती, बाप, ढेकूळ, बुक्का,  काळी माय, हिरवा शालू अशा टिपिकल साच्यातून बाहेर पडायला तयार नाही. ग्रामीण कवी भाबडेपणानेच व्यक्त होतो. त्याचा कृषीसंबंधित राजकीय-अर्थशास्त्रीय धोरणे, जागतिकीकरणाचे परिणाम इत्यादी बाबींचा अभ्यास नाही. आवाका नाही. वगैरे.  अमृत तेलंग यांची कविता शेती आणि खेड्याच्या अवनतीचा चौकसपणे वेध घेते.

     ही कविता व्यापक आशय कवेत घेणारी आणि नैसर्गिक प्रसरणशील आहे. या कविता वाचताना तिच्यातल्या काव्यतत्त्वाचे वारंवार दर्शन होते. ह्या काव्यदर्शनामुळे  रसिकाला होणारा आनंद शब्दातीत असतो. हल्ली मराठी कवितेतून हे काव्यतत्त्वच लुप्त झाले आहे. अलिकडची कविता वाचताना, कविता वाचतोय की वैचारिक ललितगद्य वाचतोय अशी शंका वारंवार येते. पण ही कविता वाचताना निखळ कविताच भेटते.

    शेतकरी सोडून गावगाड्यातील इतर उपेक्षित, वंचित घटकांविषयी ही कविता बोलत नाही; असाही आरोप मराठी ग्रामीण कवितेवर होतो. अमृत तेलंग यांची कविता  कुणबी, मजूर, बलुतेदार, गावकुसाबाहेरील कष्टकरी ह्या साऱ्यांविषयी आस्थेने बोलत राहते. ‘महादू कुंभार’,  ‘किसन लोहार,’  ‘सटवा सुतार’ इत्यादी कवितांमधून मोडलेल्या गावगाड्याविषयीचे मूलभूत चिंतन प्रकट होते.

    मराठवाड्याच्या अस्सल बोलीभाषेचं लेणंच या कवितेत गवसतं. कोरड्यास, जागल, बिदीशी, खवंद, चेलमा, आऊत, परतपाळ, वाकाण, चलिंत्र, येसन, व्हाटोळ, रवंदळ, कुंधा, आरकट, जळतन, उकंडा.... इत्यादी अनेक अस्सल मराठवाडी शब्द या कवितेत सहजपणे आले आहेत. या शब्दांचा सुगंध या कवितेला आहे.
 ‘पोटाला पाय लावून निजलेली रात’ कुणब्याच्या वाट्याला नेहमीच येते; हे कवी ताकदीने मांडतो. मायबापावरील त्यांच्या कविता तर हलवून टाकणाऱ्याच आहेत.

‘तापलेल्या वाळूत ज्वारीच्या लाह्या
 फुटाव्यात
 तसे फटफट फुटत जातात तुझे दुखरे शब्द’ (माय तू घोकत आलीस) किंवा
‘भाकरीचा पापोडा करपत जावा
तशी करपत गेलीस माळरानात’ अशा ओळींमधून आलेल्या अस्सल प्रतिमा कवितेला उंची प्राप्त करून देतात.

   ‘इपरीत’, ‘खंगत गेला गाव’ अशा कवितांमधून बदलत चाललेले ग्रामवास्तव अचूकपणे मांडण्यात कवी यशस्वी झाला आहे. उद्ध्वस्त होत चाललेल्या गावाचे अवशेष कवीने आपल्यासमोर आणून ठेवले आहेत. केवळ स्मरणरंजनातच न रमता कवी कृषीव्यवस्थेच्या दुखण्यापाशी पोहोचतो आणि आजच्या अस्वस्थ करणाऱ्या वर्तमानाची नोंदही घेतो.

     ग्रामीण स्त्रीजीवन हे कष्टांनी, दुःखांनी किती व्यापलेलं आहे; हे कवी प्रभावीपणे आपल्या कवितांमधून मांडतो.

‘तुझा जलम गं बाई
जशी धुपती गवरी
ऊन पाऊस झेलून
चाले डोंगराची वारी’ (कृष्णाई)

 अशा ओळींमधून या उपेक्षित जगाकडे कवीने लक्ष वेधले आहे. ‘चिमा’ ही कविता आख्यानकाव्याचा एक उत्तम नमुना आहे. ‘कृष्णाई’ ही कविता गावकुसाबाहेरील तांड्यावरच्या एका बंजारा स्त्रीच्या कष्टप्रद जीवनाचे कारूण्यगीतच आहे.

    कवीने मुक्तछंदाबरोबरच मराठीतले अभंग, ओवी, अष्टाक्षरी हे छंदही ताकदीने वापरले आहेत. ‘रानाचा वाली गेला’, ‘धीट आंधळा जलम’, ‘पोरा’, ‘त्याला भेटायचा सूर्य’, ‘खंदारवाट’, ‘इपरीत’, ‘खंगत गेला गाव ‘, ‘माय तू घोकत आलीस’, इत्यादी अनेक उत्कृष्ट कविता या संग्रहात आहेत. ‘गावरान ‘सारख्या कवितांमधून कवीचा उपरोध तीव्रपणे प्रकट झाला आहे.

      पहिल्याच संग्रहात पूर्वसुरींचे कुठेही अनुकरण न करता कवीने स्वतःची पायवाट शोधली आहे. ही कविता आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे केवळ दुःखच न मांडता ‘पुन्हा फुटतो भादवा’ असा आशावादही पेरते.

‘कुणबी पेरावा
कुणबी उगावा
कुणबी विकावा । बाजारात

कुणं बी चोळावा
कुणं बी पिळावा
कुणं बी दळावा । पाळूखाली’  ( कुणबी )

 अशी स्तिमित करणारी दमदार कविता लिहिणाऱ्या या तरूण कवीची कविता अशीच फुलत राहो. तिने नवनव्या शक्यतांचा मागोवा घेत राहून अधिकाधिक विकसित होवो; यासाठी सदिच्छा!

     कवी आणि चित्रकार विष्णू थोरे यांचे अर्थवाही मुखपृष्ठ व आशयाला गडद करणारी सुंदर रेखाटने, कलात्मक मांडणी, सुबक आकार यामुळे हा संग्रह देखणा झाला आहे. मलपृष्ठावरील कवी अजय कांडर यांचे ब्लर्ब कवितेचा आशय आणि बलस्थाने यांना अधोरेखित करणारे आहे.
       


बुधवार, ६ मे, २०२०

लाॅकडाउन स्टोरीज

                  ॥१॥

आमच्या ह्यांनी आज दुपारी स्वतः किचनचा ताबा घेतला. स्वतःच्या हातांनी मस्त कांदाभजे बनवले. मला तर बाई खूप कौतुक वाटलं. ह्यांनी भजे बनवताना मोबाईलवर मला फोटोही घ्यायला लावले..
सगळ्यांना स्वतः प्लेटी लावल्या. माझ्यासाठी थोडे भजे आठवणीनं बाजूला काढून ठेवले बरं का! मग काय घरभर कौतुक. मला सासूचे टोमणे. 

    मग हे मोबाईल घेऊन बसले. फेसबुक, इन्स्टा, व्हाटसपवर भजे बनवतानाचे फोटो शेअर करत. मोठमोठ्याने काॅमेंटस् वाचून दाखवत. "अगं माहितंय का? कोण लाईक केलंय?"  मी किचनमधूनच विचारलं, "कोण?" 
"सचिन सुरवडकर! खूप मोठे फेसबुक सेलिब्रिटी आहेत!"
"होऽ क्का?"  मी पहिल्यांदाच नाव ऐकलं होतं; पण ह्यांच्या उत्साहावर विरजण पडू द्यायचं नव्हतं. आता मला किचन आवरायचं होतं. बाहेर येऊन ऐकू वाटत होतं. कोणकोण कायकाय म्हणतंय. पण... खूप पसारा... सांडासांड, तेलाचे डाग, दुप्पट भांडी... किचनकडे पहावंस वाटत नव्हतं. एवढं घाणेरडं किचन पहिल्यांदाच बघतेय.

   हुश्श! झालं एकदाचं. दोनतीन तास गेले आवरायला. पण हे आज खूपच खूष आहेत. एवढे दिवस सलग घरी बसायची सवय नाही ना! आम्ही बायका काय, नेहमीच घरी असतो. मोबाईलचा प्रकाश ह्यांच्या चेहऱ्यावर पडलाय.  ह्यांचा चेहरा कसा प्रसन्न दिसतोय. वाढलेल्या केसादाढीमिश्यातही. 

__________________________________________________

             ॥२॥

किश्याचा काॅल आला. चार्जिंगचा मोबाईल काढून काॅल घेतला.

"अबे! कुठं गडप झालास?"

"घरीच हाय बोल.."

"माझ्या पोस्ट बघत नाहीस. स्टेटस बघत नाहीस. लाईक नाही. काही शेअर नाही. हैस का गचकलास वाटलं. कधी फेसबुक,
वाटसपकड ढुंकूनबी न बघणारे टिकटाॅकवर स्वतःचे व्हिडिओ बनवून टाकायलेत. फेसबुक लाईव्हवर यायची तर चढावढ लागल्याय. रिकाम्यारानी वेळ हाय म्हनून.  तू तर नेमानं हाजेरी लावनारा. कुठंच कसं दिसंनास म्हनून काळजी वाटली. म्हनून म्हंटलं बघावं. ह्ये बेणं करतंय तर काय? का दोन्ही टायमाचा सैपाक तूच करायलास. वैनींना आराम म्हनून?"

   आता काय बोलावं ह्याला?

"आबे, टिव्ही बिघडलाय. अन् गाबडे मोबाईल सोडतच नाहीत. एक हिचा घेऊन बसतंय अन् एक माझा... आता का बोंबलावं?"

"आवघडाय मग टाएम कसा जातो बे?..." किश्या बोलतंच होता लांबणीखाली तर धाकलं मागून शर्टला ओढत होतं
'पप्पा झालं का? द्या की..' म्हणत.

________________________________________
           
                ॥३॥

आमचं चौकोनी कुटूंब. मस्त चाललं होतं. आईवडील गावाकडे आहेत. आम्ही नोकरीच्या गावात अडकलोय. घरात बसून- बसून कंटाळलो होतो. काहीतरी करायला पाहिजे.. मग.. मी आज स्वतःहून अंगण झाडलं. भांडी घासली. धुणं धुतलं. मुलांना आंघोळी घातल्या. हिचं "अहो राहू द्या..राहू द्या." सुरू होतं. मी ठाम होतो. पुरूष असल्यामुळे जरा जडच गेलं. दररोज असली कामं या बायका न कंटाळता कसं करतात कोण जाणे? थोडी चिडचिडही झाली. पण तोंड आवरतं घेतलं.

       सगळं काम झाल्यावर हिचं बँडेज बदललं. काल भांडणात माझा तोल गेला. हिच्या हाताला चांगलीच जखम झाली. खूप रक्त गेलं. हिने सगळ्यांना 'चुकून विळी लागली' म्हणून मला तारलं. असो! आता दोनतीन आठवडे तर मलाच धुणीभांडी करावी लागणार! सुटका नाही.

____________________________________________
         
                ॥४॥

मयतीला किती माणसं होते? यावरून त्या मेलेल्या माणसाला समाजात काय मान होता? त्याने किती माणूसकी कमावली होती? हे ठरवलं जातं. त्याची खरी प्रतिष्ठा मेल्यावरच कळते. मयतीला आलेल्यांची संख्या त्या मेलेल्या माणसाच्या आणि कुटूंबाच्या प्रतिष्ठेची बाब असते. विशेषतः ग्रामीण भागात या संख्येला फार महत्त्व आहे.

      या लॉकडाऊनच्या काळात आमच्या गावातले, गल्लीतले एक वयस्कर बाबा मरण पावले. खूप दिवसांपासून आजारी होते. त्यांची वयस्कर पत्नीच त्यांचं सगळं करायची. घरात ते दोघंच राहत होते. त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त परराज्यात राहतो. तिकडंच अडकून पडलाय. मुलगी पुण्यात राहते. शेजारी भावकीतली एकदोन घरं आहेत. भावकीतल्यांनी मुलाला व मुलीला फोनवरून कळवले. ग्रामपंचायतीसही कळवले. मुलगा येऊ शकत नव्हता. मुलीला परवानगी मिळाली तरी आजच्या आज येणं शक्य नव्हतं. रात्रीच अंत्यविधी उरकण्याचं ठरलं. प्रेताला अंघोळ नाही. काही नाही. शेजारच्या तालुक्यातल्या एका गावात राहणारी बहीणही पोहचू शकली नाही. एक पॅजो (टमटम) आला. दोघांनी अंथरूणासह उचलून मागे मृतदेह टाकला. भावकीचे दोनतीन माणसं मोटारसायकलवरून निघाले. पॅजोत फक्त म्हातारी आणि एक भावकीतली बाई. पॅजो हलला. अंत्यविधी उरकला गेला. व्हिडिओ काॅलवर चुलत भावानं त्या अभागी बहीणभावाला अंत्यविधी दाखवला. इच्छा असूनही नियमांमुळे गावातल्या, गल्लीतल्या कुणालाच मातीला जाता आलं नाही.

          दुसऱ्या दिवशी राख सावडायला तर पोहचू या आशेनं मुलीनं परवानगी मिळवली. गाडी करून निघाली. पुणे जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांनी अडवलं. 'अंत्यविधी तर कालच झाला ना? आता जाऊन तरी काय उपयोग? मी माझ्या आईच्या मातीला जाऊ शकलो नाही. सीमाबंदी आहे.' असं म्हणून वाहन परत पाठवले.

           मेलेल्या बाबांची सख्खी बहीण कशीबशी राखंला पोहचली. तिचा आक्रोश ऐकून वाईट वाटलं.
   
         मेलेल्या मायबापाचं शेवटी तोंडही पहायला मिळू नये अशा या वाईट काळात मृत्यू येऊच नये.

___________________________________

               ॥५॥

             
दररोज कामावर जाताना आजुबाजूच्या शेतात कामं चाललेली असत. जमिनीची मशागत ते पीक काढणीला येईपर्यंत काय उस्तवारी करावी लागते, ते शेतकऱ्याचा मुलगा असल्याने माहीत आहे. दररोजची झटाझोंबी रोडच्या आजुबाजूच्या शेतातून चाललेली दिसे. कधी सरी सोडायचं काम. कधी लावण. कधी खुरपणी. कधी आधारासाठी रोपांना काठ्या रोवणं, तारेचा मांडव करणं. कधी फवारणी. तर कधी पाणी सोडणं. शेतातली कामं हनुमानाच्या शेपटीसारखी संपतच नाहीत. कुणाची केळी लावण तर कुणाची भाजीपाला लागवड. कुणाची धानपेर तर कुणाची ऊसलावण. एकतर पाण्याची बोंबाबोंब. शेतात शाश्वत पाणी व्हावं म्हणून शेतकरी अनेक दिव्यातून जात असतो. ब्लास्टिंग करून विहिर खोल घाल. क्रेन आणून गाळ काढ. ऐन मोसमात पाण्यानं चट्टा दिला तर काढाकाढी करून बोअर घे. असे नाना उद्योग सोबतीनं करावे लागतात.
     आलेल्या मालाच्या पट्टीतून खर्च वजा जाता काहीच उरत नाही. उरलंच तर शेतातच गुंतवणूक करावी लागते. स्प्रिंकलर सेट घ्या. नाहीत पाईपलाईन करा. लेकरं हिंडेनात का लक्तरं घालून. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोडून आधुनिक शेती केली तर चांगलं ऊत्पन्न मिळू शकतं. मग त्यासाठी लागणारं भांडवल काय चोरी करून आणायचं का? शेतकऱ्याला सल्ले देणं खूप सोपं आहे. पण शेतीच्या चरकातून पिळून निघणं वेगळं. ते शेतकरीच सोसू जाणो!
        तर असे हे आजुबाजूचे शेतातले कामं बघत ये-जा सुरू असायची. लॉकडाउनमुळे काही दिवस घरीच होतो. खूप दिवसांनी कामानिमित्त त्या रोडने निघालो. बघतोय तर काय? काम करणाऱ्या माणसांनी गजबजलेल्या शेतात टोमॅटो झाडालाच पिकून सुकून गेलेत. खाली टोमॅटोचा सडा पडलाय. शेतात माणूसच नव्हतं. कसं असेल? समोरचं चित्र पाहून वेड लागेल. बाजूच्या एका शेतात केळीची बाग मोडायचं काम सुरूय. ऐन काढणीला हे विषाणूचं इघीन आलं. मग गारपीट झाली. कसंबसं उरलंसुरलं झोडपून गेलेलं कुणी काढून घरी आणलं. कुणाचं रानावरच सडतंय. कोण घेणार माल? आणि किती घेणार लहान खेड्यात? कुणी सडकेलगत माल घेऊन बसलंय. कुणी द्राक्षं, कुणी कलिंगडं. अशी कितीशी वाहनं जाणारायत त्या आडमार्गाच्या सडकेनं या लॉकडाउनच्या काळात? पण माल फेकून द्यायची हिंमत सगळ्यांकडे नसते. कुणी माल गावात फुकट वाटून टाकतंय. कुणी पिकात जनावरं सोडतंय. काही शेतकरी व्हाटस्अपवर ऑर्डर घेतायत. अशी किती ऑर्डर मिळेल? किती माल कटेल? बाकीच्या मालाचं काय?
     रबीचा हरभरा घरात पडून आहे. कधी आडतबाजार सुरू होईल? कधी वाहन मिळेल? कधी नंबर लागेल? याची काही शाश्वती नाही.
    किती शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरलं? किती स्वप्नांची धूळधाण झाली? किती कंबरडे कायमचे मोडले? गणती नाही.

_______________________________________________

बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

आटलेल्या पावसाची फाटलेल्या शेताची कविता




-केशव सखाराम देशमुख

   शेतकऱ्यांच्या लेकरांना कविता लिहायचा ‘सराव’ करावा लागत नाही. शब्दांच्या बुडबुड्याशी खेळून कवितांचे छूमंतर करण्याचा नाद मग जडत नाही. खरे म्हणजे, कविता उदंड झाली. ऊठसूट, जो तो उठतो तो कविताच लिहितो.

     शेती म्हणजे आतबट्ट्यांचा धंदा! व्यथा पुष्कळ. कथाही पुष्कळ. पावलोपावली होरपळ. शेतीच्या धंद्यात पडणं म्हणजे होरपळीची हमी. होलपटीचे वाटेकरी. दुष्काळाशी सामना आणि शोषणाचे कायम मानकरी! अशा दुष्कृत्याची कारूणिक व्यथा शेतकऱ्यांची ‘कवी’ झालेली लेकरं मांडत आहेत. प्रमोद कमलाकर माने हे असंच कवितेमधलं गुणी लेकरू आहे!!

   ‘कोरडवाहू’ शीर्षकाचा प्रमोदचा ६४ पानांचा प्रामाणिक अनुभवांनी व्यापलेला आणि शेतकऱ्यांची पावसाबिगर सुरू असणारी कुत्तरओढ मांडणारा हा कवितासंग्रह आहे.

     प्रमोदची आरंभीची पावलं या त्याच्या कवितेत उमटतात. रचनेचा त्याला फारसा सराव नाही. साधेपणाचे लावण्य लेवूनच तो कविता लिहितो. त्याच्या कवितेच्या जन्मकळा पुष्कळ इमानी आहेत. अनुभव घट्ट मांडण्यात तो कमी पडतो. तरीही; कविता लिहिताना विषयांची उसनेगिरी वा उचलेगिरी करायचे त्याला काम पडत नाही. जगणे व भोगणे हे प्रमोदच्या कवितेचे प्रमुख मैदान आहे! भुकेच्या अवकळा हा त्याच्या कवितेचा प्रांत ठरतो. जमिनीच्या भेगा व न बरसणारे ढग: हे प्रमोदच्या कवितेची निर्मितीप्रक्रिया होय. प्रमोदला दुःखातून फुटून व्यक्त झाल्याशिवाय आनंद मिळत नाही.

     ‘रवंथ’ या कवितेत दुष्काळ आणि ढोरवासरांच्या दैना प्रमोदने नेमक्या शब्दांतून मांडल्यात. कुणब्याच्या घरातली गरीबी ‘बळीराजा’ कवितेतून मुखरीत होते. उपासमारी व अवहेलनेचे करूण चित्र ‘दुस्काळ’ कवितेतून उमटते. ‘रंगारी’ या कवितेतून अवर्षण आणि शेतीपाणीवर गुदरलेले संकट फार प्रभावीपणे येते. ‘जुवाखाली’ कवितेत शिवाराची सावली, लक्ष्मी असलेल्या बैलांचे शब्दचित्र आले आहे. ‘कुठवर’ या कवितेत गरीबीचे दाह सोसून आकार पावणारे बंड येते!! थोडक्यात काय तर, ‘कोरडवाहू’ कविता ही करपलेल्या शिवारांची आणि होरपळलेल्या कष्टकऱ्यांची कविता आहे. या अवघ्या होरपळीचा प्रमोद हा कवी साक्षीदार आहे.  ही अवघी कविता लिहिताना प्रमोदला कुणाची नक्कल करावी लागत नाही. त्याला कवितांचे क्षेत्र शोधावे लागत नाही. जगणे, भोगणे,  आठवणे आणि  लिहिणे ही क्रियापदं प्रमोदच्या कवितेची उगमांची स्थळे आहेत.

शनिवार, २७ एप्रिल, २०१९

सुरेंद्र पाटील यांची दमदार कादंबरी: झुलीच्या खाली



    'झुलीच्या खाली' ही सुरेंद्र पाटील यांची 'चिखलवाटा' नंतरची दुसरी कादंबरी मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने काढलीय. त्यांनी आंतरभेगा या कथासंग्रहाने साहित्यविश्वात पदार्पण केले .
 या कादंबरीत श्रीशैल्य बिराजदार या शिक्षकाच्या जीवनाचा एक वर्षाचा पट लेखकाने दैनंदिनीतून उभा केलाय.
    या कादंबरीचा नायक नोकरीत येणाऱ्या वाईट अनुभवांवर चिंतन करतो.' गर्व से कहो हम गांडू है' असं उपहासाने म्हणत तो संताप व्यक्त करतो. संस्थेतलं भ्रष्ट वातावरण, राजकारण आणि गळचेपीने तो व्यथित होतो. तरीही तो आशावादी आहे. आपले काम इमानेइतबारे करत राहतो.
   त्याने गावाकडची नाळही तुटू दिली नाही. शेतीत पैसा घालणं परवडत नसतानाही तो शेतीला पैसे पुरवतोय. गावाकडे यव्वा (आई), आप्पा (वडील), अण्णा (भाऊ), वहिणी, त्यांची तीन लेकरं हा गोतावळा आहे. भावाला शेतीत साथ देऊन घराला उभं करण्यासाठी तो झटतो आहे. त्यात अण्णाला दारूचं व्यसन लागून शेतीची दुरवस्था झालीय. भावाला,शेतीला आणि दोन घरांना सावरताना त्याची दमछाक होतेय. हे सारं प्रत्ययकारीपणे या कादंबरीत आलं आहे.
    नायकाने दोन झुली पांघरल्या आहेत. एक मास्तरकीची. दुसरी गावाकडच्या जबाबदारीची. बैलाला झूल पांघरली जाते. पण त्याने पाठीवरचे वळच झाकले जातात. त्याला फक्त राबवून घेतले जाते. वरून रंगीत झूल पांघरलेला श्रीशैल्य झुलीखाली किती दबून गेलाय ते या कादंबरीतून जाणवत राहतं.
    या कादंबरीत आलेले लिंगायत समाजाचे चित्रण; हे या कादंबरीचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल. या समाजाचे चित्रण करणारी ही पहिलीच कादंबरी म्हणावी लागेल.
   श्रीशैल्यच्या शाळेतील सहकाऱ्यांची व्यक्तिमत्त्वं त्यांच्या गुणवैशिष्ट्यांसह खूपच कमी शब्दात आणि ठसठशीतपणे उभी करण्यात लेखकाला यश आले आहे.
    मराठवाडा-कर्नाटक सीमावर्ती भागातील बोलीभाषा कन्नडभाषेच्या प्रभावासह या कादंबरीत छान आली आहे. नायकाची आई यव्वा हिचे माहेर कर्नाटकातील असल्याने ती अधूनमधून कन्नडमध्ये बोलते. शेवटी लेखकाने अर्थाचे कोष्टक जोडल्यामुळे अर्थ समजण्यास मदत होते.
    पकड घेणारे निवेदन आणि गोळीबंद कथासूत्र असलेली ही कादंबरी नायकाच्या जगण्याचे सर्व ताणेबाणे समर्थपणे  कवेत घेते.
    सतीश भावसार यांनी कादंबरीचं मुखपृष्ठ सुंदर केलंय.

--------------------------------------------------

कादंबरीचे नाव- झुलीच्या खाली

लेखक- सुरेंद्र पाटील

प्रकाशक- मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

पृष्ठे- 114

मूल्य- ₹120

गुरुवार, १४ मार्च, २०१९

सप्ता

माझं घर वारकरी संप्रदायाचा वारसा नेटानं आणि निष्ठेनं  चालवणारं. गावातले जवळपास निम्मे लोक माळकरी. माझंही घर वारकरी घराणं म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द होतं; आणि आजही आहे. आमच्या घरी एकूण तेरा माणसं. सर्वांच्या गळ्यात तुळशीच्या माळा. आजोबा लहानपणापासूनच भजनाला जात. मोडकळीला आलेला संप्रदाय आजोबांनी पुन्हा सावरला आणि संप्रदायाचा चांगलाच जम बसला. आजोबांनी पोरं गोळा केले. त्यांना भजन शिकवलं. गोडी लावली. मोडलेलं भजन सुरू झालं; तेव्हापासून गावकरी आजोबांना मास्तर म्हणू लागले.
        मीही इयत्ता पहिलीला असल्यापासून टाळ घेऊन भजनाला उभारायचो. सगळं गाव माझ्या न चुकणाऱ्या टाळंच्या ठेक्याचं कौतुक करायचं. मला लहान टाळ होती पण मी मोठीच टाळ घ्यायचो. मोठी टाळ आवरायची नाही. हात भरून यायचे. कधीकधी बोटही ठेसून निघायचे. आज्जा, बाप, चुलता आणि मी असे एकाच घरातले चौघं भजनाला उभारायचो. आजोबा विणेकरी होते; आणि आम्ही तिघं टाळकरी. चुलता पट्टीचा गायक होता. चाल म्हणायला पटाईत. वडलांचा आवाज गायकीला  साजेसा नव्हता; पण पाठांतर प्रचंड होतं. किर्तनकारानं प्रमाण म्हणून कुठलाही अभंग दिला तरी वडील तो उचलून पूर्ण करायचे. प्रमाण आलं की सगळे वडलाकडच बघायचे. आजोळ गावातलं होतं. तिकडचे सख्खे- चुलत आजोबा, मामालोकही भजनात असायचे. पखवाज वाजवायला तिकडच्या दोन आजोबापैकीच एक असायचे. अशाप्रकारे दोन्हीकडच्या लोकांना माझं कौतुक होतं.
       आजोबा थकले; वय ऐंशीच्या घरात गेलं. भजनात तीनचार तास उभं राहणं जड जाऊ लागलं. ते ओळखून वारकऱ्यांनी मास्तरांना बळजबरीनं भजनातून रिटायर केलं. आजोबानंतर घराणेशाहीमुळे नाही तर पाठांतरामुळे विणा वडलांकड आला. विणेकरी हा हुशार, वारकरी परंपरेचं काटेकोरपणे पालन करणारा आणि आचरण चांगले असणारा असावा लागतो. ह्या कसोटीवर वडीलच टिकले. विणा गळ्यात येणं ही मोठीच जबाबदारी असते. भजनाला चकल्या, बुट्ट्या मारता येत नाहीत. आता आजोबा आणि वडीलांची विण्याची परंपरा आम्ही भाऊ सांभाळू की नाही याची शंका वाटते.
     गावात सप्त्याची परंपरा कधीपासून सुरू झाली हे कुणालाच खात्रीनं सांगता येत नाही; इतकी ती जुनी आहे. आजोबांना त्यांचे आजोबा सांगायचे की, “ मला कळतंय तसं गावात सप्ता होतोच.”
    सप्त्याच्या आधी गावात पट्टी गोळा केली जाते. पूर्वी सप्त्याच्या आधी लोक घरं सारवून घ्यायचे. आता एवढा उत्साह नसतो. आदल्या दिवशीच मंडप उभारला जातो. दर्शनी भागात विठ्ठल आणि संतांच्या प्रतिमा लावून त्यांना सजवले जाते. सप्त्याच्या पहिल्या दिवशी प्रतिपदेला विणा उभा राहतो. हा विणा सात दिवस (रात्रीसह) जमिनीला टेकवायचा नसतो. हातोहात हा विणा सात दिवस अधांतरी झंकारत ठेवायचा. रात्री, अपरात्री, पहाटे विण्याच्या पहाऱ्यासाठी उत्स्फूर्त स्वयंसेवकांची कधीच कमी पडत नाही. पंढरपूरच्या श्री.ह.भ.प. धोंडोपंत दादांच्या फडात तर ह्या फडाच्या स्थापनेपासून आजतागायत विणा उभा आहे. पुढेही विण्याचा पहारा सुरूच राहील. हा विणा टेकवलाच जाणार नाही. कधीच.
        सप्त्यात तुकाराम बीज आणि एकनाथ षष्ठीला गुलाल पडतो. शेवटच्या अष्टमीच्या दिवशी काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फुटते. काल्याचा प्रसाद वाटला जातो. त्यानंतर गावातून नगरप्रदक्षिणेसाठी दिंडी निघते. वाटेने वारकरी पाऊल खेळतात. फुगड्या खेळतात. मनोरे रचतात. सगळा गाव ही दिंडी बघायला लोटतो. वारकरी घामेघूम होतात. आनंद. केवळ आनंद असतो.
       सप्त्याचे सात दिवस भल्या पहाटे गावातील मुले-मुली ज्ञानेश्वरीचे वाचन करतात. याला ‘पारायण’ म्हणतात. यातही काही मुलं नुसतीच बोटं फिरवतात. तर काही मुलींशी सूत जुळवू पाहतात. हरेक नमुना सापडतो. पारायणानंतर थोड्या वेळाने सकाळचे तुकाराम गाथ्याचे भजन होते. थोडा ब्रेक. त्यानंतर दुपारी गुलालाचे कीर्तन. पुन्हा प्रवचन. पुन्हा लगेच सायंकाळी हरिपाठाचे भजन होते. पुन्हा थोड्या विरामानंतर रात्रीचे कीर्तन उभे राहते. असा भरगच्च कार्यक्रम असतो.
          दुसरीला असल्यापासून मी सप्त्यात भाग घ्यायचो. पहाटेच्या पारायणापासून रात्रीच्या कीर्तनापर्यंतच्या सर्व शिफ्टमध्ये भाग घ्यायचो. कुठली ऊर्जा अंगात संचरायची कोण जाणे!
        त्या शालेय वयात माझे सदरे पोटावर छिद्र पडलेले असायचे. कारण भजन करताना टाळ आवरायची नाही. त्यामुळे पोटाच्या आधारानं टाळ पेलून वाजवायची. त्यात सदरा सापडून कुटून जायचा.
       माझ्या लहानपणी सगळा मंडप गच्च भरलेला असायचा. लोक मंडपाबाहेर बसून, आपापल्या दारापुढं बसून कीर्तन ऐकायचे. आता लहान मंडपही अर्ध्याहून अधिक रिकामाच असतो. पूर्वी मनोरंजनाची साधनं नव्हती. लोक श्रद्धाळू आणि परंपराप्रिय होते. आता ऐन काल्याच्या कीर्तनाच्या वेळी वर्ल्ड कपची मॅच सुरू असते. किंवा रात्रीच्या कीर्तनाच्या वेळी आयपीएलची मॅच सुरू असते. किंवा नवा चित्रपट सुरू असतो. गावात टिव्ही नव्हता तेव्हा सप्ता सणासारखा वाटायचा. लेकीबाळींना सप्त्यासाठी मुराळी धाडला जायचा. पाहुण्यारावळ्यांना बोलावलं जायचं. वर्षभराच्या ब्रेकनंतर भारत पाच एकदिवसीय मालिका खेळावा इतकं सप्त्याचं अप्रुप असायचं आणि मंडपाचं स्टेडियम तुडुंब भरायचं.
       अनेक वारकरी, कीर्तनकार सप्त्याला यायचे. घरोघरी त्यांची आंघोळीची, राहण्याची व्यवस्था केली जायची. ते म्हणायचे, “ अहो, तुमच्या गावच्या सप्त्याची गोडीच न्यारी बुवा! भलेमोठे सप्ते बघितले पन असा सप्ता कुठंच रंगत नाही बघा..”
   वारकरी संप्रदायाचा एक वैशिष्ट्य म्हणजे वारकरी लोक एकमेकांच्या पाया पडतात. बालक, लहान, मोठा, स्त्री, पुरूष असा भेद नसतो. तुकारामांनी लिहून ठेवलेलं तंतोतंत पाळलं जातं.
‘पंढरीस नाही।कोणा अभिमान॥पाया पडती जन।एकमेका॥‘
गाव, घर या पाहुण्या वारकऱ्यांच्या वर्दळीनं गजबजून जायचं. अनेकांचे दर्शन व आशिर्वाद मिळायचे; यातच समाधान वाटायचं. एखाद्या वर्षी एखादा परगावचा वारकरी सप्त्याला आला नाही तर गावातले लोक त्याची आठवण काढायचे. विचारपूस करायचे. तेव्हाचे वारकरीही असे जीव लावण्यासारखेच होते. निर्मोही. प्रेमळ. संतत्वाच्या जवळ गेलेले.
       आम्हाला कधी शाळेचा गणवेश फाटला तर लवकर मिळायचा नाही. कधी सणावाराला कपडे मिळायचे नाहीत पण सप्त्याचा निमित्तानं बहुधा नवे कपडे मिळायचे आणि तोही शाळेचा गणवेशच.
    अलिकडे गावोगावी सप्ते होतायत, ही आशादायक गोष्ट आहे पण कुठेच पूर्वीसारखा उत्साह दिसत नाही. ‘अखंड हरिनाम सप्ताह’ हे शब्द जरी उच्चारले तरी मनात विण्याचा षड्ज झंकारतो. पखवाजाच्या धुमाळ्या, सरपट्या घुमतात. टाळांची गाज कानात व्यापते.
     अलिकडे जातीजातीत वाढलेली दरी कमी करायची असेल तर सप्त्यासारखा सुंदर पर्याय नाही.
           





गझल

   ये शहर मुझे रास न आया यूँ जिने का अहसास न आया क्या पाया क्या खोया मैने कोई भी तो पास न आया सबकुछ था फिर भी मुझ को  रहनसहन का मिजास न आया ...