गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

मराठी भाषेला समृद्ध करणारा कवितासंग्रह: पुन्हा फुटतो भादवा
  कवी अमृत तेलंग यांचा ‘पुन्हा फुटतो भादवा’ हा कवितासंग्रह पुण्याच्या ‘दर्या’ प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. समग्र ग्रामजीवन कवेत घेणाऱ्या या संग्रहास महाराष्ट्र शासनाच्या 'बहिणाबाई चौधरी' पुरस्कारासह लोककवी विठ्ठल वाघ पुरस्कार, पद्मश्री नामदेव ढसाळ पुरस्कार असे मानाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

   मराठवाड्याच्या मातीतली ही कविता आपले सत्त्व आणि स्वत्व जपणारी आहे. ही कविता कुणब्याच्या ‘ढोरकष्टाचा अभ्यासक्रम’ आपल्यापुढे ठेवते आणि कुणब्याच्या पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्याची क्षमताही बाळगते.

    ग्रामीण कवितेवर असा आरोप होतो की, ही कविता माती, बाप, ढेकूळ, बुक्का,  काळी माय, हिरवा शालू अशा टिपिकल साच्यातून बाहेर पडायला तयार नाही. ग्रामीण कवी भाबडेपणानेच व्यक्त होतो. त्याचा कृषीसंबंधित राजकीय-अर्थशास्त्रीय धोरणे, जागतिकीकरणाचे परिणाम इत्यादी बाबींचा अभ्यास नाही. आवाका नाही. वगैरे.  अमृत तेलंग यांची कविता शेती आणि खेड्याच्या अवनतीचा चौकसपणे वेध घेते.

     ही कविता व्यापक आशय कवेत घेणारी आणि नैसर्गिक प्रसरणशील आहे. या कविता वाचताना तिच्यातल्या काव्यतत्त्वाचे वारंवार दर्शन होते. ह्या काव्यदर्शनामुळे  रसिकाला होणारा आनंद शब्दातीत असतो. हल्ली मराठी कवितेतून हे काव्यतत्त्वच लुप्त झाले आहे. अलिकडची कविता वाचताना, कविता वाचतोय की वैचारिक ललितगद्य वाचतोय अशी शंका वारंवार येते. पण ही कविता वाचताना निखळ कविताच भेटते.

    शेतकरी सोडून गावगाड्यातील इतर उपेक्षित, वंचित घटकांविषयी ही कविता बोलत नाही; असाही आरोप मराठी ग्रामीण कवितेवर होतो. अमृत तेलंग यांची कविता  कुणबी, मजूर, बलुतेदार, गावकुसाबाहेरील कष्टकरी ह्या साऱ्यांविषयी आस्थेने बोलत राहते. ‘महादू कुंभार’,  ‘किसन लोहार,’  ‘सटवा सुतार’ इत्यादी कवितांमधून मोडलेल्या गावगाड्याविषयीचे मूलभूत चिंतन प्रकट होते.

    मराठवाड्याच्या अस्सल बोलीभाषेचं लेणंच या कवितेत गवसतं. कोरड्यास, जागल, बिदीशी, खवंद, चेलमा, आऊत, परतपाळ, वाकाण, चलिंत्र, येसन, व्हाटोळ, रवंदळ, कुंधा, आरकट, जळतन, उकंडा.... इत्यादी अनेक अस्सल मराठवाडी शब्द या कवितेत सहजपणे आले आहेत. या शब्दांचा सुगंध या कवितेला आहे.
 ‘पोटाला पाय लावून निजलेली रात’ कुणब्याच्या वाट्याला नेहमीच येते; हे कवी ताकदीने मांडतो. मायबापावरील त्यांच्या कविता तर हलवून टाकणाऱ्याच आहेत.

‘तापलेल्या वाळूत ज्वारीच्या लाह्या
 फुटाव्यात
 तसे फटफट फुटत जातात तुझे दुखरे शब्द’ (माय तू घोकत आलीस) किंवा
‘भाकरीचा पापोडा करपत जावा
तशी करपत गेलीस माळरानात’ अशा ओळींमधून आलेल्या अस्सल प्रतिमा कवितेला उंची प्राप्त करून देतात.

   ‘इपरीत’, ‘खंगत गेला गाव’ अशा कवितांमधून बदलत चाललेले ग्रामवास्तव अचूकपणे मांडण्यात कवी यशस्वी झाला आहे. उद्ध्वस्त होत चाललेल्या गावाचे अवशेष कवीने आपल्यासमोर आणून ठेवले आहेत. केवळ स्मरणरंजनातच न रमता कवी कृषीव्यवस्थेच्या दुखण्यापाशी पोहोचतो आणि आजच्या अस्वस्थ करणाऱ्या वर्तमानाची नोंदही घेतो.

     ग्रामीण स्त्रीजीवन हे कष्टांनी, दुःखांनी किती व्यापलेलं आहे; हे कवी प्रभावीपणे आपल्या कवितांमधून मांडतो.

‘तुझा जलम गं बाई
जशी धुपती गवरी
ऊन पाऊस झेलून
चाले डोंगराची वारी’ (कृष्णाई)

 अशा ओळींमधून या उपेक्षित जगाकडे कवीने लक्ष वेधले आहे. ‘चिमा’ ही कविता आख्यानकाव्याचा एक उत्तम नमुना आहे. ‘कृष्णाई’ ही कविता गावकुसाबाहेरील तांड्यावरच्या एका बंजारा स्त्रीच्या कष्टप्रद जीवनाचे कारूण्यगीतच आहे.

    कवीने मुक्तछंदाबरोबरच मराठीतले अभंग, ओवी, अष्टाक्षरी हे छंदही ताकदीने वापरले आहेत. ‘रानाचा वाली गेला’, ‘धीट आंधळा जलम’, ‘पोरा’, ‘त्याला भेटायचा सूर्य’, ‘खंदारवाट’, ‘इपरीत’, ‘खंगत गेला गाव ‘, ‘माय तू घोकत आलीस’, इत्यादी अनेक उत्कृष्ट कविता या संग्रहात आहेत. ‘गावरान ‘सारख्या कवितांमधून कवीचा उपरोध तीव्रपणे प्रकट झाला आहे.

      पहिल्याच संग्रहात पूर्वसुरींचे कुठेही अनुकरण न करता कवीने स्वतःची पायवाट शोधली आहे. ही कविता आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे केवळ दुःखच न मांडता ‘पुन्हा फुटतो भादवा’ असा आशावादही पेरते.

‘कुणबी पेरावा
कुणबी उगावा
कुणबी विकावा । बाजारात

कुणं बी चोळावा
कुणं बी पिळावा
कुणं बी दळावा । पाळूखाली’  ( कुणबी )

 अशी स्तिमित करणारी दमदार कविता लिहिणाऱ्या या तरूण कवीची कविता अशीच फुलत राहो. तिने नवनव्या शक्यतांचा मागोवा घेत राहून अधिकाधिक विकसित होवो; यासाठी सदिच्छा!

     कवी आणि चित्रकार विष्णू थोरे यांचे अर्थवाही मुखपृष्ठ व आशयाला गडद करणारी सुंदर रेखाटने, कलात्मक मांडणी, सुबक आकार यामुळे हा संग्रह देखणा झाला आहे. मलपृष्ठावरील कवी अजय कांडर यांचे ब्लर्ब कवितेचा आशय आणि बलस्थाने यांना अधोरेखित करणारे आहे.
       


२ टिप्पण्या:

  1. भाऊ ,आपलं विशेष लक्ष आमच्या कवितेवर व आमच्यावर नेहमी राहिले आहे .. माझ्या कवितेच्या मुळांचा आपण आपल्या शोधकवृत्तीने अत्यंत प्रभावीपणे वेध घेतलात , आपले मनापासून आभार !

    उत्तर द्याहटवा

 ये शहर मुझे रास न आया यूँ जिने का अहसास न आया क्या पाया क्या खोया मैने कोई भी तो पास न आया सबकुछ था फिर भी मुझ को  रहनसहन का मिजास न आया बु...