शुक्रवार, ७ मे, २०२१

शेतकऱ्यांच्या होरपळीची गाथा: ‘वीजेने चोरलेले दिवस’


       'वीजेने चोरलेले दिवस' ही संतोष जगताप यांची एका ज्वलंत आणि वेगळ्या विषयावरची कादंबरी नुकतीच दर्या प्रकाशन, पुणे यांच्याकडून आलेली आहे. ही कादंबरी आशय, विषय, भाषा, निवेदन अशा अनेक अंगांनी महत्त्वाची आहे. शेतीसाठी भारनियमन हा अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना छळणारा विषय झाला आहे. रात्री उशिराची वीज सोडणे, डीपीवर जास्त लोड असल्याने ट्रान्सफॉर्मर जळणे, तो दुरुस्त होऊन न मिळणे, त्यासाठी शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करावी लागणे अशा अनेक समस्यांना शेतकरी तोंड देत आहेत. मराठी साहित्यात प्रथमच हे सर्व बारकाव्यांनिशी आलेले आहे. लाईनमन, वायरमन, झिरो वायरमन, डीपीची दररोज देखभाल करणारा लोम्या म्हणजेच लोकल म्यानेजर, साहेब, सरकारी धोरणे या सिस्टीममध्ये शेतकरी कसा हतबल होऊन अडकलेला असतो ते खूप छान मांडलेले आहे. लेखकाने हे सगळं जीवन स्वतः जगल्यामुळेच प्रत्ययकारीपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे. जगू हा या कादंबरीचा नायक असून तो ग्रॅज्युएट आहे. तरी मायबापासोबत रानात दिवस-रात्र खपतो आहे. मध्यरात्री उठून बापासोबत शेतात पाणी द्यायला जायचं. बंद पडणाऱ्या स्टार्टरचं बटण दाबायला विहिरीजवळ बापानं थांबायचं आणि स्वतः दारं धरायचं. ह्या जागरणानं बिघडणाऱ्या तब्येतीचा विचार न करता पीक जगवण्यासाठी दररोज तुकोबाकथित ‘युद्धाच्या प्रसंगाला’ तोंड द्यायचं. ह्या जगण्यासोबतच रानातली त्यांची वस्ती, ते शिवार, तो परिसर लेखकाने  सेंद्रियतेने आपल्यापुढे उभा केला आहे.

    या कादंबरीत प्रथमपुरुषी निवेदन असून ते अतिशय रोखठोक अशा लोकभाषेत आलेले आहे. सांगोला परिसरातील लोकभाषेची सगळी वैशिष्ट्ये, लोकम्हणी, वाक्प्रचार, शब्द यांचा वापर लेखकाने खुबीने केलेला आहे. या निवेदनात कुठेही एकसुरीपणा आलेला नाही. पट्टीच्या गोष्ट सांगणाऱ्याकडे ज्या-ज्या क्लृप्त्या  असतात त्या सर्व लेखकाच्या निवेदनात येतात. अर्थातच हे ओढून ताणून आणलेले नाही; तर नैसर्गीकपणे  आलेले आहे. हे निवेदन शेवटपर्यंत वाचकाला पकडून ठेवते. निवेदनामध्ये लोककथांचा वापर दृष्टांतासारखा केलेला आहे. नायक कधी तिरकसपणे, कधी विनोदी पद्धतीने, कधी उपरोधाने गोष्ट सांगत राहतो. 

      कादंबरीची भाषा खूपच समृद्ध आहे. या भाषेमुळेच कादंबरीला एक जिवंतपणा आला आहे. या दृष्टीने कादंबरीची सुरुवात पाहण्यासारखी आहे-

 ‘होल कंट्रीत आपणच भारी. आपल्या लेकराबाळांसकट, म्हाताऱ्याकोताऱ्या  समद्यांला  दर एक-दोन तासांनी व-वरडून आनंद साजरा करता येतो. लाइट आली... लाइट आली... आली... आली... लाइट आली... असं मुसळानं टिऱ्या बडवत. गुड नाईट!’

   ‘आमची माणसं आमच्याच मातीत घालत अर्थातच रेडिओचा आवाज कमी केला तरी कडू ना हालिंग ना डुलिंग ओन्ली गपगार पडिंग.’ असं उपरोधिक, विनोदी अंगानं येणारं निवेदन अस्सल आहे.

  एखाद्या  विषयावर ठरवून कादंबरी लिहिताना ती एकांगी होण्याची शक्यता अधिक असते; पण लेखकाने या कादंबरीत तोही तोल छान सांभाळला आहे. जगण्याचाच एक भाग बनून हा विषय समोर येतो व त्याच सोबत इतर पातळ्यांवरचे जगणेही सोबतीने येते.  या कादंबरीतील भाषा ही जिवंत व रसरशीत आहे. ही त्या परिसराची लोकभाषा आहे. लेखकाने ती पुरेपूर सामर्थ्यानिशी वापरली आहे. आजवर्दी, कडू, घांगऱ्याघोळ, रातचंइंदारचं, नादीखुट, येरवाळी, बुरंगाट, डोक्यालिटी असे परिसरातील बोलीतील अस्सल शब्द या कादंबरीत सहजतेने येतात. 

    टाळक्यात वाळकं, बाळंतपण निस्तारणं, आभाळ हेपलणं, व्हरा हाणणं, कासुट्यात जाळ होणं, भेडं होणं, मधल्यामधे गाळा हाणणं, बेंबटाला वढ बसणं, खिरीत सराटा निघणं,  गांडीवर काटं उभा राहणं, अशा अस्सल वाक्प्रचारांमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त झाले आहे. 

   आपण धड तर जग ग्वाड, फुकटचं खाणं न् हागवणीला कार, म्हातारीनं पंजाण घातलं म्हणून ती पोरगी होईल का, लाडका किडा न गावाला पिडा, भिणाऱ्याच्या मागं म्हसोबा, घराचा उंबरा दारालाच म्हायती, दिवा जळं, पिडा टळं अशा म्हणींच्या उचित वापरामुळे कादंबरीतील भाषा संपृक्त झाली आहे.

      शेतकऱ्यांचे वीजेने चोरलेले दिवस ह्या कादंबरीत धरून ठेवण्यात लेखक यशस्वी झाला आहे. ह्या कादंबरीत आलेले भीषण वास्तव हे अपवादात्मक नसून सार्वत्रिक व सर्वकालिक असल्याने ही कादंबरी महत्त्वाची ठरते. आधीच अस्मानी, सुलतानी समस्यांनी मेटाकुटीला आलेला शेतकरी वीजेच्या भारनियमनामुळे आणि भ्रष्ट व्यवस्थेतील ढिसाळपणामुळे कसा कोलमडून पडतो; याचे प्रत्ययकारी चित्रण या कादंबरीत आलेले आहे. 

       लेखकाची ही पहिलीच कादंबरी असूनही लेखकाने ताकदीने हा वाङमयप्रकार हाताळला आहे. त्यांच्या पुढील लेखकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

पुस्तकाचे नाव- वीजेने चोरलेले दिवस (कादंबरी)

लेखक- संतोष जगताप

प्रकाशक- दर्या प्रकाशन, पुणे 

पृष्ठे-  १५६

मूल्य- ₹ २२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गझल

  गझल ये शहर मुझे रास न आया यूँ जिने का अहसास न आया क्या पाया क्या खोया मैने कोई भी तो पास न आया सबकुछ था फिर भी मुझ को  रहनसहन का मिजास न आ...