॥१॥
आमच्या ह्यांनी आज दुपारी स्वतः किचनचा ताबा घेतला. स्वतःच्या हातांनी मस्त कांदाभजे बनवले. मला तर बाई खूप कौतुक वाटलं. ह्यांनी भजे बनवताना मोबाईलवर मला फोटोही घ्यायला लावले..
सगळ्यांना स्वतः प्लेटी लावल्या. माझ्यासाठी थोडे भजे आठवणीनं बाजूला काढून ठेवले बरं का! मग काय घरभर कौतुक. मला सासूचे टोमणे.
मग हे मोबाईल घेऊन बसले. फेसबुक, इन्स्टा, व्हाटसपवर भजे बनवतानाचे फोटो शेअर करत. मोठमोठ्याने काॅमेंटस् वाचून दाखवत. "अगं माहितंय का? कोण लाईक केलंय?" मी किचनमधूनच विचारलं, "कोण?"
"सचिन सुरवडकर! खूप मोठे फेसबुक सेलिब्रिटी आहेत!"
"होऽ क्का?" मी पहिल्यांदाच नाव ऐकलं होतं; पण ह्यांच्या उत्साहावर विरजण पडू द्यायचं नव्हतं. आता मला किचन आवरायचं होतं. बाहेर येऊन ऐकू वाटत होतं. कोणकोण कायकाय म्हणतंय. पण... खूप पसारा... सांडासांड, तेलाचे डाग, दुप्पट भांडी... किचनकडे पहावंस वाटत नव्हतं. एवढं घाणेरडं किचन पहिल्यांदाच बघतेय.
हुश्श! झालं एकदाचं. दोनतीन तास गेले आवरायला. पण हे आज खूपच खूष आहेत. एवढे दिवस सलग घरी बसायची सवय नाही ना! आम्ही बायका काय, नेहमीच घरी असतो. मोबाईलचा प्रकाश ह्यांच्या चेहऱ्यावर पडलाय. ह्यांचा चेहरा कसा प्रसन्न दिसतोय. वाढलेल्या केसादाढीमिश्यातही.
__________________________________________________
॥२॥
किश्याचा काॅल आला. चार्जिंगचा मोबाईल काढून काॅल घेतला.
"अबे! कुठं गडप झालास?"
"घरीच हाय बोल.."
"माझ्या पोस्ट बघत नाहीस. स्टेटस बघत नाहीस. लाईक नाही. काही शेअर नाही. हैस का गचकलास वाटलं. कधी फेसबुक,
वाटसपकड ढुंकूनबी न बघणारे टिकटाॅकवर स्वतःचे व्हिडिओ बनवून टाकायलेत. फेसबुक लाईव्हवर यायची तर चढावढ लागल्याय. रिकाम्यारानी वेळ हाय म्हनून. तू तर नेमानं हाजेरी लावनारा. कुठंच कसं दिसंनास म्हनून काळजी वाटली. म्हनून म्हंटलं बघावं. ह्ये बेणं करतंय तर काय? का दोन्ही टायमाचा सैपाक तूच करायलास. वैनींना आराम म्हनून?"
आता काय बोलावं ह्याला?
"आबे, टिव्ही बिघडलाय. अन् गाबडे मोबाईल सोडतच नाहीत. एक हिचा घेऊन बसतंय अन् एक माझा... आता का बोंबलावं?"
"आवघडाय मग टाएम कसा जातो बे?..." किश्या बोलतंच होता लांबणीखाली तर धाकलं मागून शर्टला ओढत होतं
'पप्पा झालं का? द्या की..' म्हणत.
________________________________________
॥३॥
आमचं चौकोनी कुटूंब. मस्त चाललं होतं. आईवडील गावाकडे आहेत. आम्ही नोकरीच्या गावात अडकलोय. घरात बसून- बसून कंटाळलो होतो. काहीतरी करायला पाहिजे.. मग.. मी आज स्वतःहून अंगण झाडलं. भांडी घासली. धुणं धुतलं. मुलांना आंघोळी घातल्या. हिचं "अहो राहू द्या..राहू द्या." सुरू होतं. मी ठाम होतो. पुरूष असल्यामुळे जरा जडच गेलं. दररोज असली कामं या बायका न कंटाळता कसं करतात कोण जाणे? थोडी चिडचिडही झाली. पण तोंड आवरतं घेतलं.
सगळं काम झाल्यावर हिचं बँडेज बदललं. काल भांडणात माझा तोल गेला. हिच्या हाताला चांगलीच जखम झाली. खूप रक्त गेलं. हिने सगळ्यांना 'चुकून विळी लागली' म्हणून मला तारलं. असो! आता दोनतीन आठवडे तर मलाच धुणीभांडी करावी लागणार! सुटका नाही.
____________________________________________
॥४॥
मयतीला किती माणसं होते? यावरून त्या मेलेल्या माणसाला समाजात काय मान होता? त्याने किती माणूसकी कमावली होती? हे ठरवलं जातं. त्याची खरी प्रतिष्ठा मेल्यावरच कळते. मयतीला आलेल्यांची संख्या त्या मेलेल्या माणसाच्या आणि कुटूंबाच्या प्रतिष्ठेची बाब असते. विशेषतः ग्रामीण भागात या संख्येला फार महत्त्व आहे.
या लॉकडाऊनच्या काळात आमच्या गावातले, गल्लीतले एक वयस्कर बाबा मरण पावले. खूप दिवसांपासून आजारी होते. त्यांची वयस्कर पत्नीच त्यांचं सगळं करायची. घरात ते दोघंच राहत होते. त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त परराज्यात राहतो. तिकडंच अडकून पडलाय. मुलगी पुण्यात राहते. शेजारी भावकीतली एकदोन घरं आहेत. भावकीतल्यांनी मुलाला व मुलीला फोनवरून कळवले. ग्रामपंचायतीसही कळवले. मुलगा येऊ शकत नव्हता. मुलीला परवानगी मिळाली तरी आजच्या आज येणं शक्य नव्हतं. रात्रीच अंत्यविधी उरकण्याचं ठरलं. प्रेताला अंघोळ नाही. काही नाही. शेजारच्या तालुक्यातल्या एका गावात राहणारी बहीणही पोहचू शकली नाही. एक पॅजो (टमटम) आला. दोघांनी अंथरूणासह उचलून मागे मृतदेह टाकला. भावकीचे दोनतीन माणसं मोटारसायकलवरून निघाले. पॅजोत फक्त म्हातारी आणि एक भावकीतली बाई. पॅजो हलला. अंत्यविधी उरकला गेला. व्हिडिओ काॅलवर चुलत भावानं त्या अभागी बहीणभावाला अंत्यविधी दाखवला. इच्छा असूनही नियमांमुळे गावातल्या, गल्लीतल्या कुणालाच मातीला जाता आलं नाही.
दुसऱ्या दिवशी राख सावडायला तर पोहचू या आशेनं मुलीनं परवानगी मिळवली. गाडी करून निघाली. पुणे जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांनी अडवलं. 'अंत्यविधी तर कालच झाला ना? आता जाऊन तरी काय उपयोग? मी माझ्या आईच्या मातीला जाऊ शकलो नाही. सीमाबंदी आहे.' असं म्हणून वाहन परत पाठवले.
मेलेल्या बाबांची सख्खी बहीण कशीबशी राखंला पोहचली. तिचा आक्रोश ऐकून वाईट वाटलं.
मेलेल्या मायबापाचं शेवटी तोंडही पहायला मिळू नये अशा या वाईट काळात मृत्यू येऊच नये.
___________________________________
॥५॥
दररोज कामावर जाताना आजुबाजूच्या शेतात कामं चाललेली असत. जमिनीची मशागत ते पीक काढणीला येईपर्यंत काय उस्तवारी करावी लागते, ते शेतकऱ्याचा मुलगा असल्याने माहीत आहे. दररोजची झटाझोंबी रोडच्या आजुबाजूच्या शेतातून चाललेली दिसे. कधी सरी सोडायचं काम. कधी लावण. कधी खुरपणी. कधी आधारासाठी रोपांना काठ्या रोवणं, तारेचा मांडव करणं. कधी फवारणी. तर कधी पाणी सोडणं. शेतातली कामं हनुमानाच्या शेपटीसारखी संपतच नाहीत. कुणाची केळी लावण तर कुणाची भाजीपाला लागवड. कुणाची धानपेर तर कुणाची ऊसलावण. एकतर पाण्याची बोंबाबोंब. शेतात शाश्वत पाणी व्हावं म्हणून शेतकरी अनेक दिव्यातून जात असतो. ब्लास्टिंग करून विहिर खोल घाल. क्रेन आणून गाळ काढ. ऐन मोसमात पाण्यानं चट्टा दिला तर काढाकाढी करून बोअर घे. असे नाना उद्योग सोबतीनं करावे लागतात.
आलेल्या मालाच्या पट्टीतून खर्च वजा जाता काहीच उरत नाही. उरलंच तर शेतातच गुंतवणूक करावी लागते. स्प्रिंकलर सेट घ्या. नाहीत पाईपलाईन करा. लेकरं हिंडेनात का लक्तरं घालून. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोडून आधुनिक शेती केली तर चांगलं ऊत्पन्न मिळू शकतं. मग त्यासाठी लागणारं भांडवल काय चोरी करून आणायचं का? शेतकऱ्याला सल्ले देणं खूप सोपं आहे. पण शेतीच्या चरकातून पिळून निघणं वेगळं. ते शेतकरीच सोसू जाणो!
तर असे हे आजुबाजूचे शेतातले कामं बघत ये-जा सुरू असायची. लॉकडाउनमुळे काही दिवस घरीच होतो. खूप दिवसांनी कामानिमित्त त्या रोडने निघालो. बघतोय तर काय? काम करणाऱ्या माणसांनी गजबजलेल्या शेतात टोमॅटो झाडालाच पिकून सुकून गेलेत. खाली टोमॅटोचा सडा पडलाय. शेतात माणूसच नव्हतं. कसं असेल? समोरचं चित्र पाहून वेड लागेल. बाजूच्या एका शेतात केळीची बाग मोडायचं काम सुरूय. ऐन काढणीला हे विषाणूचं इघीन आलं. मग गारपीट झाली. कसंबसं उरलंसुरलं झोडपून गेलेलं कुणी काढून घरी आणलं. कुणाचं रानावरच सडतंय. कोण घेणार माल? आणि किती घेणार लहान खेड्यात? कुणी सडकेलगत माल घेऊन बसलंय. कुणी द्राक्षं, कुणी कलिंगडं. अशी कितीशी वाहनं जाणारायत त्या आडमार्गाच्या सडकेनं या लॉकडाउनच्या काळात? पण माल फेकून द्यायची हिंमत सगळ्यांकडे नसते. कुणी माल गावात फुकट वाटून टाकतंय. कुणी पिकात जनावरं सोडतंय. काही शेतकरी व्हाटस्अपवर ऑर्डर घेतायत. अशी किती ऑर्डर मिळेल? किती माल कटेल? बाकीच्या मालाचं काय?
रबीचा हरभरा घरात पडून आहे. कधी आडतबाजार सुरू होईल? कधी वाहन मिळेल? कधी नंबर लागेल? याची काही शाश्वती नाही.
किती शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरलं? किती स्वप्नांची धूळधाण झाली? किती कंबरडे कायमचे मोडले? गणती नाही.
_______________________________________________
(Image created with metaAI)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा