गुरुवार, १४ मार्च, २०१९

सप्ता

माझं घर वारकरी संप्रदायाचा वारसा नेटानं आणि निष्ठेनं  चालवणारं. गावातले जवळपास निम्मे लोक माळकरी. माझंही घर वारकरी घराणं म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द होतं; आणि आजही आहे. आमच्या घरी एकूण तेरा माणसं. सर्वांच्या गळ्यात तुळशीच्या माळा. आजोबा लहानपणापासूनच भजनाला जात. मोडकळीला आलेला संप्रदाय आजोबांनी पुन्हा सावरला आणि संप्रदायाचा चांगलाच जम बसला. आजोबांनी पोरं गोळा केले. त्यांना भजन शिकवलं. गोडी लावली. मोडलेलं भजन सुरू झालं; तेव्हापासून गावकरी आजोबांना मास्तर म्हणू लागले.
        मीही इयत्ता पहिलीला असल्यापासून टाळ घेऊन भजनाला उभारायचो. सगळं गाव माझ्या न चुकणाऱ्या टाळंच्या ठेक्याचं कौतुक करायचं. मला लहान टाळ होती पण मी मोठीच टाळ घ्यायचो. मोठी टाळ आवरायची नाही. हात भरून यायचे. कधीकधी बोटही ठेसून निघायचे. आज्जा, बाप, चुलता आणि मी असे एकाच घरातले चौघं भजनाला उभारायचो. आजोबा विणेकरी होते; आणि आम्ही तिघं टाळकरी. चुलता पट्टीचा गायक होता. चाल म्हणायला पटाईत. वडलांचा आवाज गायकीला  साजेसा नव्हता; पण पाठांतर प्रचंड होतं. किर्तनकारानं प्रमाण म्हणून कुठलाही अभंग दिला तरी वडील तो उचलून पूर्ण करायचे. प्रमाण आलं की सगळे वडलाकडच बघायचे. आजोळ गावातलं होतं. तिकडचे सख्खे- चुलत आजोबा, मामालोकही भजनात असायचे. पखवाज वाजवायला तिकडच्या दोन आजोबापैकीच एक असायचे. अशाप्रकारे दोन्हीकडच्या लोकांना माझं कौतुक होतं.
       आजोबा थकले; वय ऐंशीच्या घरात गेलं. भजनात तीनचार तास उभं राहणं जड जाऊ लागलं. ते ओळखून वारकऱ्यांनी मास्तरांना बळजबरीनं भजनातून रिटायर केलं. आजोबानंतर घराणेशाहीमुळे नाही तर पाठांतरामुळे विणा वडलांकड आला. विणेकरी हा हुशार, वारकरी परंपरेचं काटेकोरपणे पालन करणारा आणि आचरण चांगले असणारा असावा लागतो. ह्या कसोटीवर वडीलच टिकले. विणा गळ्यात येणं ही मोठीच जबाबदारी असते. भजनाला चकल्या, बुट्ट्या मारता येत नाहीत. आता आजोबा आणि वडीलांची विण्याची परंपरा आम्ही भाऊ सांभाळू की नाही याची शंका वाटते.
     गावात सप्त्याची परंपरा कधीपासून सुरू झाली हे कुणालाच खात्रीनं सांगता येत नाही; इतकी ती जुनी आहे. आजोबांना त्यांचे आजोबा सांगायचे की, “ मला कळतंय तसं गावात सप्ता होतोच.”
    सप्त्याच्या आधी गावात पट्टी गोळा केली जाते. पूर्वी सप्त्याच्या आधी लोक घरं सारवून घ्यायचे. आता एवढा उत्साह नसतो. आदल्या दिवशीच मंडप उभारला जातो. दर्शनी भागात विठ्ठल आणि संतांच्या प्रतिमा लावून त्यांना सजवले जाते. सप्त्याच्या पहिल्या दिवशी प्रतिपदेला विणा उभा राहतो. हा विणा सात दिवस (रात्रीसह) जमिनीला टेकवायचा नसतो. हातोहात हा विणा सात दिवस अधांतरी झंकारत ठेवायचा. रात्री, अपरात्री, पहाटे विण्याच्या पहाऱ्यासाठी उत्स्फूर्त स्वयंसेवकांची कधीच कमी पडत नाही. पंढरपूरच्या श्री.ह.भ.प. धोंडोपंत दादांच्या फडात तर ह्या फडाच्या स्थापनेपासून आजतागायत विणा उभा आहे. पुढेही विण्याचा पहारा सुरूच राहील. हा विणा टेकवलाच जाणार नाही. कधीच.
        सप्त्यात तुकाराम बीज आणि एकनाथ षष्ठीला गुलाल पडतो. शेवटच्या अष्टमीच्या दिवशी काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फुटते. काल्याचा प्रसाद वाटला जातो. त्यानंतर गावातून नगरप्रदक्षिणेसाठी दिंडी निघते. वाटेने वारकरी पाऊल खेळतात. फुगड्या खेळतात. मनोरे रचतात. सगळा गाव ही दिंडी बघायला लोटतो. वारकरी घामेघूम होतात. आनंद. केवळ आनंद असतो.
       सप्त्याचे सात दिवस भल्या पहाटे गावातील मुले-मुली ज्ञानेश्वरीचे वाचन करतात. याला ‘पारायण’ म्हणतात. यातही काही मुलं नुसतीच बोटं फिरवतात. तर काही मुलींशी सूत जुळवू पाहतात. हरेक नमुना सापडतो. पारायणानंतर थोड्या वेळाने सकाळचे तुकाराम गाथ्याचे भजन होते. थोडा ब्रेक. त्यानंतर दुपारी गुलालाचे कीर्तन. पुन्हा प्रवचन. पुन्हा लगेच सायंकाळी हरिपाठाचे भजन होते. पुन्हा थोड्या विरामानंतर रात्रीचे कीर्तन उभे राहते. असा भरगच्च कार्यक्रम असतो.
          दुसरीला असल्यापासून मी सप्त्यात भाग घ्यायचो. पहाटेच्या पारायणापासून रात्रीच्या कीर्तनापर्यंतच्या सर्व शिफ्टमध्ये भाग घ्यायचो. कुठली ऊर्जा अंगात संचरायची कोण जाणे!
        त्या शालेय वयात माझे सदरे पोटावर छिद्र पडलेले असायचे. कारण भजन करताना टाळ आवरायची नाही. त्यामुळे पोटाच्या आधारानं टाळ पेलून वाजवायची. त्यात सदरा सापडून कुटून जायचा.
       माझ्या लहानपणी सगळा मंडप गच्च भरलेला असायचा. लोक मंडपाबाहेर बसून, आपापल्या दारापुढं बसून कीर्तन ऐकायचे. आता लहान मंडपही अर्ध्याहून अधिक रिकामाच असतो. पूर्वी मनोरंजनाची साधनं नव्हती. लोक श्रद्धाळू आणि परंपराप्रिय होते. आता ऐन काल्याच्या कीर्तनाच्या वेळी वर्ल्ड कपची मॅच सुरू असते. किंवा रात्रीच्या कीर्तनाच्या वेळी आयपीएलची मॅच सुरू असते. किंवा नवा चित्रपट सुरू असतो. गावात टिव्ही नव्हता तेव्हा सप्ता सणासारखा वाटायचा. लेकीबाळींना सप्त्यासाठी मुराळी धाडला जायचा. पाहुण्यारावळ्यांना बोलावलं जायचं. वर्षभराच्या ब्रेकनंतर भारत पाच एकदिवसीय मालिका खेळावा इतकं सप्त्याचं अप्रुप असायचं आणि मंडपाचं स्टेडियम तुडुंब भरायचं.
       अनेक वारकरी, कीर्तनकार सप्त्याला यायचे. घरोघरी त्यांची आंघोळीची, राहण्याची व्यवस्था केली जायची. ते म्हणायचे, “ अहो, तुमच्या गावच्या सप्त्याची गोडीच न्यारी बुवा! भलेमोठे सप्ते बघितले पन असा सप्ता कुठंच रंगत नाही बघा..”
   वारकरी संप्रदायाचा एक वैशिष्ट्य म्हणजे वारकरी लोक एकमेकांच्या पाया पडतात. बालक, लहान, मोठा, स्त्री, पुरूष असा भेद नसतो. तुकारामांनी लिहून ठेवलेलं तंतोतंत पाळलं जातं.
‘पंढरीस नाही।कोणा अभिमान॥पाया पडती जन।एकमेका॥‘
गाव, घर या पाहुण्या वारकऱ्यांच्या वर्दळीनं गजबजून जायचं. अनेकांचे दर्शन व आशिर्वाद मिळायचे; यातच समाधान वाटायचं. एखाद्या वर्षी एखादा परगावचा वारकरी सप्त्याला आला नाही तर गावातले लोक त्याची आठवण काढायचे. विचारपूस करायचे. तेव्हाचे वारकरीही असे जीव लावण्यासारखेच होते. निर्मोही. प्रेमळ. संतत्वाच्या जवळ गेलेले.
       आम्हाला कधी शाळेचा गणवेश फाटला तर लवकर मिळायचा नाही. कधी सणावाराला कपडे मिळायचे नाहीत पण सप्त्याचा निमित्तानं बहुधा नवे कपडे मिळायचे आणि तोही शाळेचा गणवेशच.
    अलिकडे गावोगावी सप्ते होतायत, ही आशादायक गोष्ट आहे पण कुठेच पूर्वीसारखा उत्साह दिसत नाही. ‘अखंड हरिनाम सप्ताह’ हे शब्द जरी उच्चारले तरी मनात विण्याचा षड्ज झंकारतो. पखवाजाच्या धुमाळ्या, सरपट्या घुमतात. टाळांची गाज कानात व्यापते.
     अलिकडे जातीजातीत वाढलेली दरी कमी करायची असेल तर सप्त्यासारखा सुंदर पर्याय नाही.
           





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गझल

   ये शहर मुझे रास न आया यूँ जिने का अहसास न आया क्या पाया क्या खोया मैने कोई भी तो पास न आया सबकुछ था फिर भी मुझ को  रहनसहन का मिजास न आया ...