रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

ऊन

माघातलं ऊन जवारीवर चपचप पडलेलं. थंडीनं काकडून गेलेलं शिवार ऊनात डोळे मिटून समाधी लागल्यागत पडलेलं. ऊन रानावर मनावर स्वार झालेलं
   जुन्या इमल्याच्या घरात सोबन्यातून सारवलेल्या भुईवर पडलेला ऊनाचा पांढरालख्ख डाग मनावर गडद उमटलाय. तो ऊनाचा डाग पकडण्याचा मी फार प्रयत्न करायचो पण मूठ झाकली की तो डाग मुठीतून निसटून
वर यायचा.
   शेजारच्या शिव्यानं बोचकरल्यावर मला आजी म्हणाली होती, " त्येचं घर आपून ऊनात बांधू." मला आठवतं तेव्हाच मी पहिल्यांदा ऊनाचा गांभिर्यानं विचार केलेला.
  शाळेत अजून नाव घातलं होतं का नाही; ते आठवत नाही. सकाळचं काम आटपून पाटीत भाकरी घेऊन आई शेताकड निघालती. मीही भरदुपारी अनवानी पायानं आईच्या मागंमागं चालत होतो. पाय पोळलेलंही तवा कळायचं नाही. ऊनाचा चपकारा सोसत नव्हता. अचानक मागून सावली पळत आली. पुढच्या ऊनालाही तान पळवून लावली. "ऊन पळालं.. ऊन पळालं.." म्हणत मी टाळ्या वाजवू लागलो. आईनं कौतुकानं वळून बघितलं आणि म्हणाली, " पम्या ऊन पळालनी. शिराळ पडल्याय."
  ऊन-शिराळ-पुन्हा ऊन हा अनुभवच अद्भूत. सकाळचं कवळं ऊन, शाळा सुटल्यावर मधल्या सुट्टीत घरी जाताना भेटणारं दुपारचं कडक ऊन, शेतात झाडाखाली झोपल्यावर झाडाच्या पानांच्या सांदीतून निसटून येऊन तोंडावर पडलेलं ऊन, विहिरीतल्या नितळ पाण्यावर पडलेलं ऊन, पाण्यावरून परावर्तीत होऊन डोळे दिपवणारं ऊन, विहिरीतल्या डुचमळत्या पाण्यात अनेक सूर्य दाखवून नजरबंदी करणारं ऊन, हिरव्या पिकाला चमकवणारं ऊन, आरशानं सावलीला दळण करणाऱ्या आईच्या डोळ्यावर चमकवलेलं ऊन, उन्हाळ्यातलं 'मी' म्हणणारं ऊन, प्रत्येक ऊन निराळं. उन्हाळ्यात दिवसभर अंगाची लाही करणारं आगाव ऊन सांजच्यापारी कसं मलूल होतं. त्याचा तांबूस रंग मनाला उदासी आणतो.
   बालपणापासून उन्हाळा आवडायचा कारण एकतर सुट्टी. दुसरं ऊनात बोंबलत भटकायला मोकळं रान..
 हसरत मोहानीची गझल मला खूप आवडते.
    " दोपहर की धूप में मेरे बुलाने के लिए
      वो तेरा कोठेपर नंगे पाँव आना याद है " हा शेर ऐकला की मनालाही ऊनाचा कडक तरी सुखद चटका बसल्यासारखं होतं.
   बऱ्याच दिवसापासून...वर्षांपासून म्हणा एक निसर्गचित्र काढतोय. चित्रात बोडखं रान आहे. लालभडक फुलांनी वाकलेलं पळसाचं झाड, आकाश... पण चित्रच पूर्ण होईना कारण मला ऊनच रंगवता येत नाहीये. अनेक रंग मिसळले. पांढरट, पिवळा, करडा. मनातल्या ऊनाचा रंगच सापडत नाहीये. झाडांच्या सावल्यांवरून, प्रकाशमान पांढऱ्या भागावरूनच काय ते ऊन समजून घायची नामुष्की आलीय.
   सकाळचं कवळं ऊन गावातून जाणाऱ्या काळ्या डांबरी सडकेवर पडल्यावर सडक कशी नागासारखी सळसळते.
  हळुहळू प्रौढ होणारं ऊन सूर्यफुलांच्या शेतात घुटमळतं. फुलांना मस्त फिरवतं. भर दुपारच्या वेळी सूर्य माथ्यावर येतो तेव्हा लांबलेली स्वतःची सावली संकोचून  पायाजवळ  घुटमळते. जणू सावली ऊनाला शरण येते.
दुपारी आईनं अंगणात घातलेलं धान्याचं वाळवण, वाळू घातलेलं धुणं ऊनाशी एकरूप होतात. ऊनाला सोबत देतात.
    मी सदानंद रेग्यांची कविता गाऊ लागतो-

   " माथ्यावरती ऊन्हे चढावी
     पावलात सावल्या विराव्या
     घाटावरती शुभ्र धुण्यांच्या
     पाकोळ्या अन मंद झुलाव्या

     डोंगर व्हावे पेंगुळलेले
     पोफळबागा सुस्त निजाव्या
     अंगणातल्या हौदावरती
    तहानलेल्या मैना याव्या"

यानंतर कवितेतलं ऊन आठवू लागतं. महानोरांच्या कवितेतलं 'तिपीतिपी ऊन', कुसुमाग्रजांच्या कवितेतलं 'पिवळे तांबूस कोवळे' ऊन...

   पाऊस लांबल्यावर ऊनानं पिकं दुपार धरू लागतात. त्यांच्याकडं बघवत नाही तेव्हा ऊनाचा राग-राग येतो. मी हात जोडून विनवणी करतो. ऊन नुसतं बघत असतं.

           -  प्रमोद कमलाकर माने

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गझल

  गझल ये शहर मुझे रास न आया यूँ जिने का अहसास न आया क्या पाया क्या खोया मैने कोई भी तो पास न आया सबकुछ था फिर भी मुझ को  रहनसहन का मिजास न आ...