शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१८

बाईपणातून जाणाऱ्या बाईचा प्रवास: झिम पोरी झिम  बालाजी मदन इंगळे यांची 'झिम पोरी झिम' ही पहिलीच कादंबरी.  यापूर्वी त्यांचा 'मातरं' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे.  या संग्रहाने त्यांना ग्रामीण कवी म्हणून मान्यता मिळवून दिली. त्यांच्या काही कवितांमधून  स्त्रीचे भावविश्व साकारले आहे. ग्रामीण स्त्रीचे समग्र भावजीवन त्यांना नेहमीच खुणावत असावे. या अस्वस्थतेतूनच त्यांनी कादंबरी हा जास्त अवकाश असणारा वाङ्मयप्रकार जाणीवपूर्वक निवडलेला दिसतो.

       या कादंबरीतील मध्यवर्ती पात्र असलेल्या जनीचे प्रथमपुरुषी निवेदन वाचकाला सरळ तिच्या गावात, तिच्या घरी नेऊन सोडते. जनी ही कुठल्याही खेड्यातली, कुठल्याही सामान्य कुटुंबातली एक सामान्य मुलगी आहे. ती तिच्या जीवनातल्या वरवर सामान्य वाटणार्‍या गोष्टी सांगत एक असामान्य अनुभव देते. मुलगी म्हणून जन्माला आल्यामुळे तिचे त्या घरातले दुय्यम स्थान तिला शंकर या तिच्या भावाच्या जन्मानंतर प्रकर्षाने जाणवते. तिच्या जन्माच्या वेळी 'दुसऱ्या वेळीही मुलगीच झाली' हा मायबापाचा असंतोष तिच्या वाट्याला आलेला असतो. मात्र जनी आजारी पडते तेव्हा हेच मायबाप तिची काळजी घेतात, हा विरोधाभासही तिला जाणवतो. यातून लेखक खेड्यातल्या माणसांच्या स्वभावातील सूक्ष्म बारकावेही किती नेमकेपणाने मांडतो आहे, हे कळून येते.

       घरातल्या कामाचा भोगवटा ग्रामीण भागातल्या मुलींच्या वाट्याला अगदी कोवळ्या वयापासूनच येतो. जनीही त्याला अपवाद नाही. हे शेतकरी कुटुंब या घरातल्या मुलीच्या लग्नपाई सावकाराच्या पाशात सापडते व त्याच्या शोषणामुळेच भूमिहीन होऊन उघड्यावर येते. जनीचे माय, बाप, बहीण या साऱ्यांनाच लोकांच्या शेतात मजुरीने कामाला जावे लागते. जनीला अपरिहार्यपणे घरातल्या कामाचा बोजा पडतो. तिला तिची शाळा सांभाळून घरातली कामं करावी लागतात. जरा सवड मिळाली की हळूच ती मैत्रिणींसोबत खेळायला सटकते. हे सर्व अत्यंत चित्रमय पद्धतीने लेखकाने सजीव केले आहे.

       जनीचे घरातल्या प्रत्येकासोबत असलेले नैसर्गिक भावबंध लेखकाने अत्यंत कारागिरीने विणले आहेत. खेड्यातल्या चालीरीती, हुंडाप्रथेमुळे मुलीच्या लग्नाची मायबापाच्या मनातली धास्ती, या लोकांच्या जगण्यावर पडलेल्या मर्यादा अचूकपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे. आजच्या टीव्ही चॅनल्सच्या युगात लोप पावत चाललेली खेळगाणी, लोकगीते या मुलीच्या जगण्याचा एक भाग बनून येतात.  ही गीते वजा केली तर तिच्या या गोष्टीला अर्थच उरणार नाही, इतकी ती तिच्या व्यक्तिमत्त्वाशी, जीवनाशी एकरूप होऊन येतात.

      ग्रामीण बोलीच्या सहजतेसह कादंबरीचा ओघवतेपणाही लक्षात येतो. या कादंबरीच्या भाषेचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही केवळ मराठवाड्यातील उमरगा परिसराची बोली नसून; ती या प्रदेशातील ग्रामीण स्त्रीची अस्सल बोली आहे. ग्रामीण बोलीचा जिवंतपणा पुरुषांपेक्षाही स्त्रीच्या बोलण्यातचं अधिक शिल्लक आहे. सुरुवातीला वाचताना शहरी पांढरपेशा वाचकाला काहीसं अडखळल्यासारखं झालं तरी, पुढे वाचक या भाषेला सरावतो. 'करलालतं',  'वाटलालं',  'काढलालेव',  'यिवलालतं',  'दिसलालतं', 'दुखलालंय' यासारखी क्रियापदं ह्या भाषेला सुलभ व गोड बनवतात, तसेच लयही प्राप्त करून देतात. या भाषेसह या प्रदेशातील म्हणींचाही वापर व्हायला हवा होता, असं मात्र जाणवतं.  'येळवस' या सणाचे, लग्नाचे वर्णन वाचताना आपल्याला या प्रदेशाच्या ग्रामीण कृषिनिष्ठ संस्कृतीचीही ओळख व्हायला मदत होते.

        या कादंबरीतून प्रकट झालेले ग्रामीण वास्तव हे पांढरपेशी शहरी वाचकांसाठी निश्चितच धक्कादायक आहे. तालुक्यापासून जवळचे गाव असूनही या मुलींना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. साठ-सत्तरच्या दशकातल्या कादंबरीत चित्रित झालेले ग्रामीण वास्तव व आजची परिस्थिती यात फारसा फरक नसल्याचे ही कादंबरी वाचताना लक्षात येते. यावरून स्वातंत्र्योत्तर पाच-दहा दशकांतली ग्रामीण विकासाची कल्पना करता येईल. त्यासाठी पंचवार्षिक योजनांचे आराखडे, आकडे, राष्ट्रीय/दरडोई उत्पन्नातील वाढ अशा गोष्टींकडे पाहण्याची गरज उरत नाही. गावात कॉइनबॉक्स आला हा वरकरणी किरकोळ वाटणारा बदलही लेखकाने टिपला आहे. गावात मोबाईल फोन, टीव्ही आले तरी जनीच्या जीवनाशी या वस्तूंचा संबंध येत नसल्याने त्यांचा उल्लेख नसावा.

    तिच्या मैत्रिणींचं वयात येणं, तिचं वयात येणं, पौगंडावस्थेत शारीरिक बदलांमुळे गोंधळलेली मानसिकता, तिच्या तईचे पाटलाच्या पोराबरोबरचे शारीरिक संबंध, बन्याचं तिच्या मागं लागणं, धोंडुरामच्या पोरांनं तिला मिठी मारणं, ती घरी एकटी असताना नात्यातला मुलगा घरी आल्यावर निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना, कावळे मास्तराचा लोचट व विकृत स्पर्श, स्वतःच्या शरीरावयवांची चीड, मैत्रिणींचे अनुभव, तिच्या अपेक्षा, शेवटी तिच्या वाट्याला आलेलं भीषण वास्तव, अशा साऱ्यातून लेखकाने जनीचे जे लैंगिक भावजीवन उभे केले आहे ते चकित करणारे आहे. स्वतः पुरुष असूनही त्यांनी आपल्या नायिकेला चांगला न्याय दिला आहे. लैंगिक बाबीवर लिहिताना त्यांच्या लेखणीचा कुठेही तोल ढळला नाही.

त्यामुळेच हे वाचताना कधीही लैंगिक भावना चाळवल्या जात नाहीत.
       जनीनं तिच्या शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाचा तपशीलही या कादंबरीचे महत्त्वाचे अंग आहे. तिच्या लग्नाचे बापाच्या डोक्यावरचे ओझेही त्यामुळे कमी झाले असले तरी; लग्नानंतर समाजमान्य चौकट लाभल्यानंतरच खऱ्या अर्थाने तिचे लैंगिक व आर्थिक शोषण सुरू होते, हे वाचताना स्त्रीला केवळ माणूस म्हणून नव्हे तर स्त्री म्हणून समजून घेता येण्याची गरज अधोरेखित होते.                                                                                                              कादंबरीचे कथानक सुरुवातीला काहीशा संथ गतीने पुढे सरकते. नंतर जनीची दहावी, बारावी, डीएड, लग्न असा थोडा वेग घेते. लेखकाला या कथानकावरची पकड ढिली होऊ द्यायची नसल्याने असे झाले असावे. मात्र त्यामुळे मूळ विषयापासून भरकटत जाण्याची व निरर्थक, अनावश्यक तपशिलांचा भरणा होण्याची भीती कमी झाली आहे हेही जाणवते. लेखकाने कथानक व पात्रांचे नैसर्गिक विकसन यांवरच भर दिला असल्याने आपोआपच अन्य गोष्टींकडे काहीसे दुर्लक्ष झाले असावे. उदाहरणार्थ, या कथानकाच्या विकासक्रमात कुठेही प्रतिमांचा वापर लेखकाने केला नाही. पण यामुळे हे कथानक कुठेही लंगडे पडले आहे, असेही म्हणता येत नाही. उलट रांगडी व जिवंत अनलंकृत बोलीभाषा तसेच वास्तवाची थेट मांडणी यामुळे ते अधिक प्रत्ययकारी झाले आहे. जगण्यातील वास्तव कलात्मकता सांभाळूनही थेटपणे मांडण्याचे आव्हान लेखकाने येथे सांभाळले आहे. वाचकाला चकित करण्यासाठी भुलवण्यासाठी अन्य कोणतीही क्लृप्ती लेखकाने वापरलेली नाही.

         कादंबरीचा शेवट करतानाही लेखक वास्तवाची कास सोडत नाही. 'आजपसून निवड मंडळाच्या परीक्षेचा अभ्यास चालू करू आसं ठरविले. वतलापुढून उठले. करकचून केस बांधले अन् आंघोळीला आले.'  या शेवटच्या ओळी जनीचा संघर्ष लग्नानंतरही सुरूच आहे, हे सूचित करतात. बाया खंबीरपणे वास्तवाला तोंड देतात. जीवन थांबत नसतं ही लेखकाची जाण इथे प्रकट होते.               
थोडक्यात, ग्रामीण स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण शिक्षणामुळे सकारात्मकपणे बदलणारी तिची मानसिकता, बाईपणातून जाणाऱ्या कुठल्याही बाईच्या मानसिक, भावनिक, लैंगिक व बौद्धिक गुंतागुंतीचे अनेक पदर त्या गुंतागुंतीच्या नैसर्गिक बंधासह प्रभावीपणे लेखकाने मांडले आहेत.

(साभार : नवाक्षर दर्शन, जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर 2009)

३ टिप्पण्या:

शेतकऱ्यांच्या होरपळीची गाथा: ‘वीजेने चोरलेले दिवस’

       'वीजेने चोरलेले दिवस' ही संतोष जगताप यांची एका ज्वलंत आणि वेगळ्या विषयावरची कादंबरी नुकतीच दर्या प्रकाशन, पुणे यांच्याकडून आल...