बुधवार, २१ मे, २०२५

सारजामाय




सारजामायला शेताकून यायला उशीर झालता. शेताकून आईसंगं ती घरी आली. च्यापानी झालं. आईनं कायतर बांधून दिली. अंधार पडलता. सारजामाय निघाली तिच्या घरला. बौद्धवाडा हायवेच्या पलीकडं. मी म्हनलो, "जातो. सोडून येतो तिला पलीकड."

आई म्हनली, "जा बाबा! आधीच एक्या कानाला ऐकू येतनी तिला." सारजामायसंग निघालो. सडक आल्यावर तिच्या काटकुळ्या वाळलेल्या बाभळीच्या लाकडासारख्या हाताला धरलो. दोन्हीकडं बघत गाड्या जाऊ दिलो. पलीकडं सोडलो. मान हलवून इशाऱ्यानंच ‘जातो आता’ म्हनलो. सारजा मायनं हसतमुख चेहऱ्यानं परवानगी दिली. मी घरी आलो. आल्यावर भाऊ म्हनले, "आसंच काळजी घेवं गा!"

मी म्हनलो, "माणुसकीनं तर वागावंच पण आपण जपून राहिलेलंच बरं! आपल्यावर बला नको."

      आधी सारजामाय शेतातल्या कामाला यायची. तिचा एक ल्योक देशावर करून खायला गेलेला. एक ल्योक-सून तिच्याजवळ. नवराबी बसून पडलेला. सारजामाय साठी पार झालेली आज्जीबाई. काळी-सावळी नीट नाकाची, काळी, काटकुळी, सदा हसतमुख. तिचा एक भाऊ चांगला नोकरदार आहे. तो तिला दर महिन्याला हजार रुपये मनिऑर्डर पाठवायचा. सारजामाय आईला कौतुकानं सांगायची. ल्योक कधी तर ट्रकवर जायचा. घर भागवायची खरी जिम्मेदारी सरजामायवरच. बहुदा कारभाऱ्याच्या शेतातच ती मजुरी करायची. कारभाऱ्याचं शेतही बक्कळ आहे. सालभर काय ना काय कामं राहतातच. आम्ही सांगितल्यावर कधी सवड बघून आमच्याही शेतात यायची. आईला सारजामायचं काम लई पटायचं. आईसारखंच तीही काम चांगलं करायची. इतर रोजगारी करतात तसं, वरवरचं आणि वेळकाढू काम ती करायची नाही. स्वतःचं शेत समजून शेतमालकीनीसारखं काळजीनं करायची. कधीकधी  आईला सल्लाही द्यायची. बांधाच्या कडंचा हराळीचा दाढवा कापून बांध स्वच्छ करायची. 

         माझं लग्न जमल्यावर बांधकामाच्या, शेतातल्या आणि घरच्या कामानं आईची पाठ दुखायला लागली. डॉक्टरनं विश्रांतीचा सल्ला दिला. पण दिवस कामाचे. आईनं सारजामायला 'लग्नाचं काम करशील का?' असं विचारलं. तिनं होकार दिला. काही हजार रुपये आणि इरकल लुगडं-चोळी असं ठरलं. सारजामायनं आधार दिला आणि लग्न पार पडलं. तिनं लुगडं-चोळीऐवजी पैसे द्या म्हटल्यामुळे तिला पैसे दिले. आहेर राहिला तो राहिला. पुन्हा कधीतरी सारजामायच्या घरी कार्यक्रम होता; तेव्हा मात्र इरकल लुगडं, चोळीचा खण असा आहेर घेऊन आई तिच्या घरी गेली होती. माझी बायकोही शिक्षिका. तिला दररोज पस्तीस किलोमीटर अंतरावर नोकरीच्या गावी बसने प्रवास करावा लागे. ती सकाळी साडेसातच्या बसने जायची आणि रात्री सातला घरी परतायची.  लग्नानंतर खरी तारांबळ सुरू झाली. आम्ही दोघं आणि भाऊ असे तिघांचे डबे सकाळी करावे लागायचे. आईचे हाल बघून बहिणीने एकदा सारजामायला 'धुणीभांडी करशील का?' म्हणून विचारलं. सारजामायला कामाची गरज होती म्हणून तिनं 'व्हय' म्हटलं. 'किती पैसे देऊ?' असं विचारल्यावर तिनं दोन बोटं करून 'दोनशे द्या. आणि 'हिकडूनच कामाला जाईन. सकाळची भाकर तेवढी द्या.' असं ती म्हणाली. तरी आम्हाला तिनं कमीच मागणी केली असं वाटलं; म्हणून पुढे दोन-तीन महिन्यांनी मीच तिला महिन्याला पाचशे रुपये देऊ लागलो. सारजामाय सकाळी आली की, आई तिला स्वयंपाक घरात बोलावून घट्ट दुधाचा चहा द्यायची. आधी सारजामाय संकोचायची; पण तिला आम्ही हट्टाने स्वयंपाक घरात बसवायचो. हळूहळू ती सरावली. मी जेवताना चहा प्यायला आलेली सारजामाय आड व्हायची. मी इशाऱ्याने तिला बोलावून घ्यायचो. 'कायबी होतनी. तू घरातलीच हाय्स. यी!' मनलो की हासायची. सदा हसतमुख आणि प्रसन्न. 

       पाठदुखीमुळे मी आईला शेतातल्या कामाला जाऊ देत नव्हतो. सारजामाय एकटी जाऊन शेतातली कामं करायची. भाऊ म्हणायचे, "बायला! म्हातारी लई इमानदार हाय. बस कर आता म्हनलं तरबी दिवस मावळजोपाना उटतच नाही. आनी येताना जळनाचं वज्जं आनत्याय डोस्क्यावर."

      मध्यंतरी बहिण आजारी पडली म्हणून आईला पुण्याला जावं लागलं. माझी पत्नी पहाटे चारला उठून स्वयंपाक करायची. भावाचा डबा द्यायची. आमचे दोघांचे डब्बे तयार करून, सात वाजता सारजामाय आल्यावर तिला चहा करून द्यायची. तिची भाकर बांधून ठेवायची. सारजामाय 'राहू द्या. राहू द्या...' म्हणायची. बायको इशाऱ्यानं समजवायची. आई दहा-बारा दिवसांनी परत आली. येताना आईला कारभाऱ्याच्या घरातील बायकांनी थांबवून घेऊन सांगितलं, "सारजामाय तुमच्या सुनंचं लई कौतुक करलालती. बिचारीला डिवटी असूनबी सासूचा नेम चुकू दिलनी. मला कवा बिनच्याचं, बिन भाकरीचं यिऊ दिलनी, असं सांगत्याय. चमाला लई चांगली सून मिळाली, आसं म्हनत्याय."

          शेतातल्या कामावरून सारजामाय घरी आल्यावर तिनं आणि आई बोलत बसल्या की, मी रागवायचो. तिला अंधार पडतोय. घरी सोडून यावं लागेल म्हणायचो. म्हातारी रविवारचा बाजार उमरग्याला जाऊन स्वतः आणायची. कधी पैसे साठवून नातीला नथनी कर. कधी लेकीला आहेर कर. अशा काहीबाही उठाठेवी करायची.

        सांच्यापारी शेतातल्या कामावरून आल्यावर चहा पेलेला कप तिनं धुवायला नेताना, आई तो हिसकावून घ्यायची. तिला कप धुवू द्यायची नाही. स्वतः धुवायची. रास झाल्यावर गहू, ज्वारी, हरभऱ्याचे चुंगडे बांधून द्यायची. मला गाडीवर तिच्या घरी टाकायला सांगायची. तिचं घर साधंच होतं; पण स्वच्छ आणि टापटीप. मध्यंतरी सारजामायनं घरचं काम सोडलं. "पुण्यातला ल्योक नको म्हनतोय. लोकं लावतीते त्येला." म्हनली. आईनं हसतमुखानं होकार दिला. तरी अधूनमधून शेताच्या कामाला ती यायची. एके दिवशी आई नळाचं पाणी भरताना पडली. हात फ्रॅक्चर झाला. घरात काम करायचं अवघड झालं. माझी बायको होईल तेवढं करून शाळेला जायची. पण बाकीची कामं आईला एका हातानं करावी लागत. एके दिवशी सकाळी उठल्यावर आई बाहेर येऊन बघते तर काय! सारजामाय दारात भांडी घासत बसलेली. आई म्हनली, "सारजामाय! कसं काय आलीस? 

"तुमचा हात मोडल्यालं कळालं कारभाऱ्याच्या घरातून. कसं करताव आता? मनून आले."

म्हातारी पुन्हा धुणीभांडी स्वेच्छेनं करू लागली. दोघी पुन्हा सुख-दुख उकलू लागल्या. आई तिची मैत्रीण झाली होती. म्हातारी खाल्ल्या मिठाला जागली. आताच्या काळात अशी माणसं भेटतील का? आईनं तिला कधीच शिळंपाकं दिलं नाही. तिचं पोट सांभाळलं. तिच्या गरजा भागवल्या. तिचं सुख-दुख आत्मीयतेनं ऐकून घेतलं. म्हातारीनंही कधीच उपकार राहू दिला नाही. रक्त-घाम आटवून उतराई केली. खरंतर तिनंच आमच्यावर उपकार केले. दरम्यान भावाचं लग्न झालं. म्हातारीनं तेही लग्न पार पाडलं. धुणीभांडी केली. भाकर तुकडा खाऊन रानात कामं केली. शेजारी-पाजारी जळायचे. म्हातारीला 'त्यांचं काम सोड. आमचं कर. शंभर-दोनशे जास्त देतो.' म्हणायचे. पण म्हातारी माणसं ओळखायची. तिच्या शेतातल्या कामावरही शेजारचे शेतकरी जळायचे. मालकीन नसतानाही ही म्हातारी काम करते. बाकीच्या रोजगारी बायांच्या दुप्पट काम करते, हे त्यांनाही कळायचं. कुणी तिला बळंबळं हातात हजार रुपये टेकवून आमच्या कामावरून पळवायला बघायचे. म्हातारी हतबल होऊन आईला सांगायची, 'आसं केले ओ! का करू सांगा!' तरी म्हातारी भिडंखातर ते काम करत-करत आमचंही काम करायचीच. 

         याच दरम्यान तिच्या मुलाचा अपघात झाला. थोडक्यात बचावला. पुण्याला राहणाऱ्या ल्योकांनं ऐपत नसूनही भावाचा दवाखाना केला. ल्योकाला सारजामायनं आता घरी आणलं होतं. आता ल्योक कायमचा अधू झाला होता. औषध-गोळ्यांचा खर्च वाढला होता. सुनंचं आणि ल्योकांचं आधीच पटत नव्हतं. भांडणं व्हायची. तरी सारजामाय घरातलं समदं काम, सैपाकपानी, ल्योकांचं, नवऱ्याचं जेवणखानं करून कामाला यायची. दरम्यान हिचं अबोर्शन झाल्यामुळे मी तिच्या नोकरीच्या गावी घर केलं. तिच्याऐवजी मीच प्रवास करू लागलो. कधी सणावाराला आम्ही आलो की, म्हातारी आस्थेनं विचारपूस करायची. 'बरे हाव का?' म्हणून विचारायची. वर्षभर तिनं आमच्या घरचं काम केलं. नंतर तिनं घरची काम बंद केली; तरी रानात राबत होती. एकदा गावाकड आल्यावर मी आईला विचारलं, "सारजामाय कशी हाय?"

आई म्हनली, "लई खचल्याय की रे म्हातारी!" 

"का बरं? चांगली होती की परवापर्यंत तर."

"तुला माहीत झालनी? तिच्या ल्योकानं फाशी घेतला की रे"

"कोणत्या ल्योकानं?"

"अक्सिजेंटनं आधू झालेल्या. त्येचं बायकूसंगंबी भांडन झालतं. तिनं माहेरला निघून गेलती. त्येला तरासबी व्हायचा मन." मी विचारलं, "कधी झालं ह्ये?" आई म्हनली, "आजून आपलं काम करत हुती बाबा. तवाच झालं." मी हळहळलो.

        एकदा सारजामाय शेतात कामाला आली होती. रानातून आईसंगं घरी आल्यावर मला काय बोलावं तेच सुचेना. तिच्या चेहऱ्यावरचं भाबडं हसू गेलं होतं. तिच्या भाबड्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. मी म्हणालो, "मला आत्ता कळालं ये" 

ती मला म्हनली, "म्या जित्ती आसजोपाना त्येला संबाळले आसते. पर आसं करायचा नव्हता." ती रडू लागली. माझ्या पोटात कालवलं.

       पुन्हा आम्ही आमच्या व्यापात अडकून गेलो. दिवाळीच्या सुट्टीला घरी आलो. पडवीत गरम होत होतं. आईला विचारलं, "खालचा फॅन कुठं हाय?" आईनं सांगितलं, "सारजामायला दिले मी."

'कसं काय?' असं विचारल्यावर तिनं सांगितलं, "सारजामाय पडून हाय की रे. अरे, लई दिवस झाले. ल्योक गेल्यापसून लई खचली बघ म्हातारी. मी बघायला गेलते एक्या दिवशी शिरा घिऊन तर मला म्हनली, 'लई उकडलालंय. आंगात धग हाय निसती.' म्हनून मी भाऊला फॅन न्हिऊन द्याला सांगितले."

"मग दवाखाना ते केलनी कोन?"

"पुण्यातल्या ल्योकानं दाखिवला चांगल्या दवाखान्यात. थोडे दिवस ठिवूनबी घेतला. म्हातारी ऱ्हावं का? आता गावाकडच सोड मला म्हनली मन. आनून सोडला घरी."

"भाकर कोण घालतंय मग आता तिला?"

"गावातली लेक बघत्याय. म्हातारीला तर कायबी जाईना. ऱ्हायला म्हातारा. त्येला तर आन कुटं गोड लागतंय?"

        पुढच्या एका खेपंला आल्यावर आईनं सारजामाय गेल्याचं सांगितलं. अरेरे! मन भरून आलं. डोळे ओले झाले. सारजामाय आमच्या आयुष्यातून कधीच जाणार नव्हती. 

      परवा एकदा मी लग्नाचा अल्‍बम बघत बसलो होतो. दोन-तीनदा निरखून अल्बम बघितला. तो काळ. ते लोकं. दहा वर्षांनी पुन्हा बघत होतो. अचानक एका फोटोत सारजामाय दिसली. गुडघे वर घेऊन, दोन्ही हाताचा गुडघ्याला वेढा घालून, चष्म्यातून समोरचा सोहळा पाहत बसलेली. मी तटकन उठून बसलो आणि आईला जोरात हाका मारू लागलो. 'काय?' म्हणत आई आली. मी म्हनलो, "हे बघ." आईला दिसलं नाही. तिनं चष्मा आणला. चष्मा लावून आईनं फोटो बघितला. मी फोटोतल्या बायांच्या गर्दीतल्या तिच्या चेहऱ्यावर बोट ठेवलं. आईचा चेहरा उजळून निघाला. आई म्हनली, "सारजामाय हाय की रे. कसं बसल्याय बघ. लग्नाला आलती. मला याद हाय."

अन् आईच्या डोळ्यात डबडब पाणी.


          - प्रमोद कमलाकर माने

पूर्वप्रकाशित: अक्षरदान दिवाळी २०२०

आभार: मोतीराम पौळ

रेखाटने साभार: दिलीप दारव्हेकर

बुधवार, १४ मे, २०२५

दौरा


 सोयाबीनचं पीक पाण्यावाचून सुकत चाललं होतं. बांधा-धुर्‍यावरचं गवत वाळून कोळ झालतं. उडीद-मूग तर वाळूनच गेलते. अनेकांनी कुळव फिरवून मोडून टाकले होते. अशातही एखादी झड पडून गेली, तर सोयाबीन थोडंफार हाताला लागेल; अशी सगळ्यांनाच आशा होती. सोयाबीन पेरल्यावर चार-पाच पानांवर असताना एक मामुली झड पडून गेली होती. लोकांनी आशेनं खुरपणी-फवारणीचा खर्च केला होता. पण अख्खा ऑगस्ट कोरडा गेला. सोयाबीनचा फुलोरा गळून पडत होता. 

        आंब्याच्या झाडाखाली बसून माऊली काडीनं मातीत उगाचच रेघोट्या ओढत होता. माऊलीनं खुरपणासाठी लग्नातली अंगठी उमरग्याच्या सोनाराकडे गहाण ठेवून महिना तीन टक्क्यानं पाच हजार आणले होते. अंगठी नसलेल्या बोटावर अंगठीचा पांढरा वण दिसत होता. माऊलीच लक्ष त्या पांढऱ्या वणाकडे गेलं. फवारणीचं औषध उधारीवर आणलं होतं. फवारणीचा पंप भाड्यानं आणून दोघा बापल्योकानंच दोनदा फवारणी केली. रघुतात्या पाणी आणायला आणि मावल्या फवारायला. पलीकडं भावकीच्या सोयाबीनमध्ये स्प्रिंकलर चालू होतं. माऊली उदास डोळ्यांनी ते दृश्य पाहत होता. शेतात पाणी व्हावं यासाठी रघुतात्यानं खाल्लेल्या खस्तांचा इतिहास त्याच्या डोळ्यांपुढून सरकू लागला. पाण्याच्या नादानं घर कर्जबाजारी झालं. कडूसं पडल्यावर माऊली उठला. तोंडातली तंबाखू थुंकून गाडीवाटेला आला. मागून नबी येत होता. त्यांनं हाक मारली. माऊली थांबला. दोघं बोलत गावाकडं आले. घरी आल्यावर वसरीवर रांजणातल्या पाण्यानं पाय धुतले. बाहेर पत्र्याच्या शेडमध्ये त्याची बायको भाकरी थापत होती. चुलीच्या उजेडात ती देखणी दिसत होती. घरात आला. मायबाप टीव्हीवर देवाची मालिका बघत बसले होते. माऊली पलंगावर आडवा झाला. बायकोनं लग्नातल्या फुलांच्या कुंड्या, तोरणं यांनी खोली सजवली होती. वर लक्ष गेलं. मोजून साडेचार पत्रे. तेही जागोजागी एमसील लावून अंगावर गाठी झाल्यासारखे. माऊली चौकात आला. गणूच्या टपरीवर एक सुपारी सांगितली. गणू म्हणाला, 

 “उधारी लई झाल्याय. कवा देतूस गा?”

 “देतो, जरा दम धर.” -माऊली.

 “नाही गा, माल भरायचाय. बग काय तर हाय का? उदार दिऊन पार कड लागली.”

 “हंऽ पर माजं तसं नाही. देतो म्हंजी देतो.” – माऊली. गणू सुपारी घासू लागला. सुगंधी छिटा सुपारी तोंडात टाकून माऊली सटकला. डोकं फ्रेश झाल्यासारखं वाटलं. कट्ट्यावर बसून एक पिचकारी मारली. पुन्हा डोळ्यापुढं सुकलेलं सोयाबीन दिसू लागलं.

 माऊली शेतात. शेतातून घरात. चौकात. शेतात...

 पाऊस कुठं बेपत्ता झालता कुणाला ठावं? रात्री पलंगावर डोळे उघडे ठेवून नुसतं पडून राहू लागला. आधीच्यासारखं हा तिची वाट न पाहता आपल्याच तंद्रीत पडलेला. ती बिचारी शेजारी गुपचूप झोपायची. कामानं थकल्यामुळे लगेच झोपी जायची. हा दीड-दोन वाजेपर्यंत जागायचा. सकाळी आठला उठायचा. सोयाबीन चक्क गेलं होतं. लोकांनी सोयाबीनमध्ये कुळव घातले होते. जनावरं सोडली होती. पण माऊलीला तसं करू वाटत नव्हतं. लागलेल्या चार-चार शेंगा एखादा झडगा आला तर फुगतील, पदरात पडतील- असं वाटायचं.

 माऊलीची माय शारदा कामाला जात होती, म्हणून घर भागत होतं. रघुतात्याही भाड्यानं कुळवपाळ्या करत होता. पण काम कवातरच मिळायचं. भावकीतला नारायण आबा एके दिवशी माऊलीकडं आला. त्याचं सोयाबीन स्प्रिंकलरच्या पाण्यावर छान आलं होतं. फवारणीसाठी त्याला माणूस मिळत नव्हता. माऊली मोबाईलवर गेम खेळत बसला होता. त्याचं लक्ष वर गेलं. दारात आबा. 

 “या आबा.”

 “तुला फोनच करनार होतो, पन समक्ष बोलावं मनून आलो.”

 “बोला.”

 “सोयाबीनवर लई आळी झाल्याय गा. आवशीद आनून ठिवलाव. यितूस का उद्या फवारायला?”

 “पानी कोन देतंय?” -माऊली

 “तात्याला घि मग संगं. आर्दा रोजगार देतो तात्याचा. बारा-तेरा घागरीच पानी पडतंय की. तुजा डब्बा पार होजूकना बसायचंच हाय.” -आबा.

 “तात्यालाच इचारा. माजं काय नाही, म्या येतो.”

 “कुटं गेलते तात्या?" 

 “भजनाला गेल्यासतील."

 “मग गाठतो त्येला देवळाकडंच.” म्हणत आबा उठला, तर शारदानं चहा आणला. म्हणाली,

 “दाजी, च्या तर पिऊन जावा गरिबाचा.”

 “आसं का वैनी? द्या पेतो की!” म्हणत आबानं हात पुढे केला. 

“च्याला म्या कदी नगं म्हनतनी.” म्हणत फुरका मारला. आबाचा ल्योक मिलिट्रीत आहे. त्याच्या आधारानं आबानं मळा फुलवला. बोरला पाणी भरपूर लागलं. आबाची कोरडवाहू शेती पाण्याची झाली. शारदानं आबाच्या ल्योका-सुना-नातवाची विचारपूस केली. आबानंही माऊलीच्या बायकोला दिवस गेलेत की नाही ते खूबीनं काढून घेतलं. ऐसपैस गप्पा मारून आबा गेला. दिवसभर फवारून अंग पिळवटून गेलतं. माऊली सुपारी खायला चौकात आला. तिथं दुष्काळाची चर्चा सुरू होती. माऊली पिचकार्‍या मारत बसला. जाधवाच्या रामनं सांगितलं की, उद्या आपल्या शिवारात केंद्रीय पथकाचा दुष्काळ पाहणी दौरा आहे. माऊलीनं विचारलं,

 “कोन-कोन हाय गा पथकात?”

 “अधिकारी आस्तेत मोठे.” -गणेश.

 “मग तेन्ला काय झाट्टा कळतंय?” माऊलीनं असं म्हटल्यावर सगळे हसायला लागले. सकाळी माऊली ग्रामपंचायतीपुढं आला. तिथं त्याला माहिती मिळाली की, पथक तळ्याकडच्या इनामाच्या शिवारात आलंय. माऊली सरसर इनामाकडं निघाला. या शिवारात बागायत जास्त आहे. विहिरींना, बोअरना पाणी आहे. त्यामुळं इनाम शिवार हिरवागार दिसतो. माऊली घामाघूम झाला होता. बघतो तर रोडला गाड्यांची भली मोठी रांग. लाल दिव्याच्या गाड्या, कारा, पोलीसगाडी. गर्दीतून माऊली पुढे आला. पथकासोबत तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी, आमदारही होते. सगळे शिवाप्पा सावकाराच्या ऊसाकडं गेले. त्यातल्या पंजाबी घातलेल्या एका बाईनं विचारलं, 

 “ये क्या है?” 

 “ये ऊस है. कारखाने में इसकी शक्कर बनती है.” आमदारांनी माहिती पुरवली. 

 “इसे कैसे खाते है?" म्हटल्यावर सावकारानं दोन-तीन चांगले ऊस काढून आणले. त्यातला एक मोडून आमदाराला, एक तुकडा त्या गोऱ्यापान बाईला दिला. आमदारांनी ऊस सोलून खाऊन दाखवला. सावकारानं सगळ्या साहेबांना एक-एक कांडकं दिलं. हास्यविनोदात ऊसपान कार्यक्रम रंगला होता. माऊलीचं डोकं सटकलं. तो पुढं होऊन आमदारांना म्हणाला,

 “सायेब, हेन्ला तिकडं खाल्लाकडल्या शिवारात घिऊन चला. हितं इनामाच्या मळ्यावात कशाला आनलाव?” 

आमदार तुच्छतेनं म्हणाले, 

 “तिकडं पक्का रोड नाही. गाड्या कशा जाणार? व्हय रं?” 

 “मग हे लोक ऊस बघून काय शेट्टाची भरपाई देणार?” माऊली तापला. त्याला उत्तर न देता आमदार अधिकाऱ्यांना घेऊन पुढं पाटलाच्या शेताकडं निघाले. दोन्ही बाजूंना मशीनगन घेतलेले सिक्युरिटी गार्ड. मागे पोलीस. एकाएकी माऊली गर्दीतून पुढे घुसला. अधिकाऱ्याजवळ जाणार तोच गार्डनं अडवलं. तरी माऊलीनं मुसंडी मारून एका अधिकाऱ्याचा हात धरलाच. अधिकारी घाबरला. माऊली त्याला ओढत ओरडू लागला,

 “हितं कशाला टायमपास करलालाव, मायघाल्यांनोऽऽ तिकडं हामच्या शिवारात चलाऽऽ करपल्याली पिकं बघा.” पोलिसांनी माऊलीला गच्च पकडलं. ते माऊलीला बाजूला ओढू लागले. त्या अधिकाऱ्याचा हात माऊलीच्या हातातून निसटला, तरी पथकातले सगळे सदस्य घाबरून माऊलीकडेच बघत स्तब्ध उभे राहिले. 

 “चला, माजं शेत बगाऽ चला सायेब! चलो, देखो मेरा खेत. पूरा जल गया. काटा निकल्या ओऽऽ” पथकाकडं बघत माऊली ओरडत होता. रडत होता. पोलीस त्याला धरून गाडीकडे नेत होते. माऊलीला पोलीसगाडीत घातलं. गाडी निघून गेली. आमदार भेदरलेल्या अधिकाऱ्यांना घेऊन धीर देत पुढे निघाले. गर्दीला चेव आला. रामनं घोषणा दिली,

 “केंद्रीय पथकऽऽ” 

लोक ओरडले, “मुर्दाबादऽऽ” लोक खवळले. ‘आमचा सर्वे - नीट करा’, ‘केंद्रीय पथक -मुर्दाबाद’ अशा घोषणा सुरू झाल्या. केंद्रीय पथकाने पाहणी आवरती घेतली. पोलीस बंदोबस्तात गाड्यांमध्ये बसून पथक पसार झालं.

          - प्रमोद कमलाकर माने

          •••

(पूर्वप्रकाशित: अक्षरलिपी दिवाळी विशेषांक २०२१)

रेखाटने साभार: जितेंद्र साळुंके 


कथा

सुक ना दुक

गनामामाला सगळं गाव नेता म्हनायचं. गावात कुठला पुढारी आला, परचारसबा आसली की, गनामामा हार घालायला सगळ्यात पुडं. इस्टेजवर खुडचीत गनामामा ...

उपशीर्षक