बुधवार, ३० मे, २०१८

कुणब्याची शायरीजुने दिवस आठवले की मनावर ढगं दाटतात. ते रानशिवारातले दिवस. पानझडीचे...खळ्यादळ्याचे दिवस..मोटनाड्यांचे दिवस...भुलईचे...जात्यावरच्या पहाटेच्या दळणाचे... ओव्यांचे..रात्रीच्या देवळातल्या भजनाचे...चावडीवरच्या गप्पांचे...हुरडापार्टीचे...मुराळ्याच्या मानाचे...सग्यासोयऱ्यांच्या वर्दळीचे...घुंगराच्या गाडीचे...कुणब्याच्या शायरीचे...सोन्यासारखे दिवस.
   तो जुन्या दिवसांच्या स्मृतीत हरवतो...
पहाटे दळताना जात्याच्या गुढगर्भ संगीताच्या ठेक्यावर वहिनीच्या मंजुळ आवाजात ओवी ऐकू यायची.
       पाट्टंच्या दळनाला
       आता उशीर झाला बाई
       नंदी गेल्यालं ठावं न्हाई
मग त्याला उत्साह वाटायचा...तो मनोमन ठरवायचा: 'उद्या वैनी उटायच्या आद्दी बैलं नाही सोडलो तर भाद्दर नाही.'
मध्येच ओवी बंद होऊन जात्याची वेगात घरघर व्हायची. थोड्या विरामानंतर पुन्हा ओवी ऐकू यायची.
       बारा बैलाचा नांगर
      चलतो वनमाळी
      ऐका भिवाची आरोळी
त्याला वाटायचं, म्याबी भिवा होईन. नांगराला जाईनच.मग खरोखरच तो वैनी उठायच्या आधी नांगराला जायचा.
       राजा गं नांगऱ्या
        सर्जा गं आगल्या
        दादा पालव्या लागल्या
असं कौतुक ऐकून त्याला हुरूप वाटायचा. माईनं केलेलं कौतुक तर   खूपच सुखद. ती गायची.
         आपट्याच्या झाडाखाली
         दोगं बसले बापल्योक
         आपली पेरनी झाली ठीक
पेरणीनंतर उभं कवळं पीक डुलायला लागे.
         तिपन्या बाईनं
         आता धरीलं उभं माळ
          रासन्याची का तारामाळ
त्याचे कष्ट त्याची होणारी तारांबळ या करूण ओवीतून ऐकल्यावर त्याचा सारा शीण ओसरून जाई.
     त्याची कवळ्या वयाची बायको भरगच्च पिकलेलं पीक पाहून हरखून जाई. तिचे ओठ गाऊ लागत
          आता शेता गं आड शेत
           कुण्या शेताला बाई जाऊ
           तिथं हेलाव्या देतो गहू
त्याची माय नव्या सुनेचं आणि आपल्या लेकीचं तोडीस तोड रूप पाहून हरखून जाई. जातं तिला गायला सांगे. मग ती नणंद भावजयीचं कौतुक जात्यावर गाऊ लागे.
           आता ननंद भावजयाs येsगं
           शिवंच्या शेता गेल्या
            इजंवनी का चमकल्या
तो पहाटे औताला जाई. त्यालाही शायरी सुचे.
          ढवळ्या रं पवळ्या चल बिगीबिगी....
मोटंच्या कुरकंए s कुरकुंए आवाजाचं संगीत त्याला आव्हान देई.
          हे s  ए  s ए s हा ss
          हो s ओ s ओ s हो ss
असं त्याचं अमूर्त गोड गाणं गळ्यातून ओसंडू लागे.
    बघता बघता पीक भराट्यात येतं. आता कापणी सुरू केली पाहिजे. बायागड्यांनी रान सजीव होतं. भल्लरी सुरू होते.
तो सवाल टाकतो.
तो: भलगडी दादा भला s रे भलगडी दादा
       ह्या वाटेनं राधा गेली का रे दादा
       तिच्या पायात तोडे होते का रे दादा
       भलगडी दादा भला s रे भलगडी दादा
साथी: मो नाही पाहिलो भले s हो भलगडी दादा

       मग कलगीतुरा रंगतो. तोड्याची वळख पटत नाही. तवा तो कमरेला माचपट्टा, गळ्यात वज्रटीक, दंडात वाक्या... अशा ओळखीच्या खुणा सांगतो. शेवटी साथीदार एखाद्या खुणेला ह्या शायरीतून वळख दाखवतो. काम ओसरत जातं. कल्पना, काव्य आणि गायन यात कामाचा त्रास वाटत नसे.
    शेवटी एकमेकांना शाबासकी दिली जाई.
       गबरूचं काम भले s हो भलगडी दादा
       जोंधळा राजा भले s हो भलगडी दादा
        लावावा पट्टा भले s हो भलगडी दादा
...... तो गतस्मृतीतून बाहेर येतो. डोळे ओले झालेले असतात. त्याची गतकाळातली मुशाफिरी संपते आणि हळूहळू तो भानावर येतो.


३ टिप्पण्या:

शेतकऱ्यांच्या होरपळीची गाथा: ‘वीजेने चोरलेले दिवस’

       'वीजेने चोरलेले दिवस' ही संतोष जगताप यांची एका ज्वलंत आणि वेगळ्या विषयावरची कादंबरी नुकतीच दर्या प्रकाशन, पुणे यांच्याकडून आल...