रविवार, १८ नोव्हेंबर, २०१८

गावरान

सध्या बाजारात 'गावरान' म्हणून जे खपवलं जातं; त्यातलं कितपत गावरान असतं, हा संशोधनाचाच विषय आहे. लोकांना गावरान भाजीपाला, गावरान धान्य हवं आहे; हे व्यापाऱ्यांनी अचूक हेरलंय. गावरान म्हणून विकत घेतलेला भाजीपाला फक्त दिसायला गावरान असतो. चव मात्र नसते.

   पूर्वी शेतात कायकाय असायचं. दुपारची भाकरी खाण्याआधी बाया खुरपता-खुरपता पातरंची, तांदुळजाची, करडईची भाजी गोळा करून आणायच्या. तोंडी लावायला कच्च्या भाज्या असल्याने व्हिटॅमिन कमतरतेची प्रश्नच नसायचा. 

    आम्ही शेतात कायकाय चरत फिरायचो. बोरं, जांबं, सिताफळं, जांभळं, आंबे इ. सिझनल फळे तर खायचोच; रानातल्या पिकातही रानमेवा पेरलेला असायचा. शेता आल्याबरोबर ज्वारीतल्या पिकलेल्या छिन्न्या आणि वाळकांचा घमघमाट नाकात शिरायचा. वानरासारखं वाळकं, छन्न्या खात हिंडायचो. पट्ट्यात वाट्याण्याच्या शेंगा खात फिरायचो. हरभऱ्याचे ढाळे तर आताही मिळतात; पण पूर्वी प्रत्येक शेतकरी घरी लागणारे सगळे जिन्नस पेरायचे. तीळ, जवस, मोहरी, वाटाणा, कारळे, भगर, भेंडी यांचे पिकात पट्टे असायचे. माळव्याच्या वाफ्यात कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर, मेथी, पालक, चुका असा भरगच्च मेळा असायचा. तेलासाठी भुईमूग, सूर्यफूल, कुरडई, अंबाडी इ. वाण पेरले जायचे. मटकी, मसूर, बाजरी, जोडगहू, पिवळा(ज्वारी), मका, साळ इ. सगळं कुद्रू-मुद्रू पेरलं जायचं. संक्रांत, नागदिवे आणि येळवस या सणांना बाजरीच्या भाकरी, उंडे केले जातात. खिरीसाठी जोडगहू लागायचे. बाळंतिणीला आणि आजारी माणसाला लवकर ताकत यावी म्हणून काळी साळ आणि काटीजवा हमखास पेरत. काटीजवा हा गव्हाचा एक गावरान वाण आहे. याला कांडून तुपात लाडू बांधून खायला दिले की माणूस लवकर घोड्यासारखा व्हायचा. कारळ्याचं पीठ(कूट) प्रत्येक कालवणात असायचं. त्यामुळे चव यायची. आता सर्रास शेंगदाण्याचं कूट वापरलं जात. त्यामुळे भाज्या चवीला मस्सड लागतात. आता मस्सड म्हणजे काय विचारू नका! माझ्याकडे यासाठी दुसरा शब्द उपलब्ध नाही. असो.

     घरातले वर्षानुवर्षे जतन केलेले बियाणेच वापरले जायचे. माळवदाच्या हलकडीला ज्वारीचे सर्वात मोठे कणसं शेतकऱ्यांच्या घरोघरी अडकवलेले दिसत. तेच पुढच्या वर्षीचे बियाणे असे. प्रत्येकाच्या घरी लाकडी काठीच्या वळणीवर लसूण वाळत घातलेला दिसायचा. गाडग्याच्या उतरंडीत, गुम्म्यात बियाणे वाळवून राख लावून जतन केले जाई. बियाण्यांच्या गुम्म्याला वरून पाचट किंवा चगळ घालून मातीचा लेप दिला जाई. त्याला आमच्याकडे  लिपण म्हणतात. बायाच हे काम करायच्या. आमची आजी कितव्या उतरंडीला कितव्या गाडग्यात कारल्याचं किंवा भोपळ्याचं बी आहे, ते बिनचूक सांगायची. शेतातल्या कोट्यावर किंवा घरांपुढे अंगणात लाकडाचा मांडव करून त्यावर कारले, भोपळ्याच्या वेली सोडल्या जायच्या.

    गुम्मे, सलदं आणि कणग्या, दुरड्या, पाट्या गावातले किंवा फिरस्ते कैकाडी, बुरूड समाजाचे लोक तयार करून देत. यासाठी हे लोक शिंदीच्या झाडाचे फाटे कोयत्यानं सवाळून आणत. घराच्या अंगणात बसून त्यांचे हे विणकाम चाले. कणगी मोठ्या पिंपाच्या आकाराची, गुम्मे मोठ्या डब्ब्याच्या आकाराचे तर सलदं टोपलीच्या आकाराचे असायचे. सलदावर शंक्वाकार झाकण असे. सलदाचा उपयोग पापडं, खारूड्या, कुरूड्या ठेवण्यासाठीच केला जाई. नवीन गुम्मे, कणग्या, सलदं आतून बाहेरून शेणानं सारवून त्यांची छिद्रं बुजवली जात.

     आजोबा शेतावरून येताना धोतराच्या सोग्यात बांधून दररोज काहीतरी रानमेवा आणायचेच. एकदा तर काहीच नवीन नाही म्हणून त्यांनी ज्वारीचे धाटं सोलून आणले होते. ते धाट ऊसासारखे गोड लागले होते. गावरान ज्वारीची किमया. घरी खाण्यासाठी एकदोन पट्टे  गावरान ऊसाची लावणही केली जायची. एकदम मऊ आणि गोड असायचा हा ऊस. दुधाच्या दातांच्या लेकरांनो सोलून खावा असा.

    आमच्या परिसरात त्र्याण्णव साली भूकंप झाला आणि त्यात सगळं मातीत मिळालं. उतरंडी फुटल्या, गुम्मे गडप झाले. गावं नुसते मातीचे ढिगारे झाले. लोकांसोबत त्यांचे बियाणेही मातीत गडप झाले. नवीन घरातून उतरंडी, कणग्याही हद्दपार झाल्या. ते तयार करणारेही उरले नाहीत.

  हरितक्रांतीची पावलं पडत गेली तशी पारंपारिक शेती ही संपुष्टात आली. जमिनीचे तुकडीकरण झाल्याने अल्पभूधारक आणी सीमांत शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. जगण्यासाठी   क्वालिटीपेक्षा क्वांटिटी महत्त्वाची वाटू लागली. जागतिकीकरणामुळे  शेतीवर आणि शेतकऱ्यावरच अरिष्ट आलं. दारिद्र्यातून बाहेर पडण्यासाठी शेतकरी नगदी पिकांच्या मागे लागला आणि शेतातलं बाराजिनसी कुद्रू-मुद्रू अडचणीचं ठरू लागलं आणि पर्यायाने हद्दपार झालं.  कांग्रेस म्हणजेच गाजरगवतासारखे नवनवे तणं शेतात माजू लागले. या तणांनी जुने तणं कुरघोडी करून नष्ट केले. यातच रानभाज्यांचाही अंत झाला. जास्त उतारा देणाऱ्या नव्या संकरित बियाण्यांचा सुळसुळाट झाला आणि गावरान बियाणे कुजून नष्ट झाले.

    कोंभाळणे ता.अकोले जि.अहमदनगर येथील राहीबाई पोपेरे यांनी त्यांच्या घरीच जवळपास 53 पिकांच्या 114 गावरान बियाण्यांचे जतन केले आहे. त्या अशिक्षित आहेत, हे विशेष. तर याच गावातील ममताबाई भिंगारे यांनी सुमारे 100 वाणांच्या बियाण्यांचे जतन व संवर्धन  केले आहे. त्यांचा गावरान बियाणे संवर्धनाचा प्रकल्प खूप महत्वाचा आहे. त्यांची ही गावरान बियाणे बँक पाहण्यासाठी व काही बियाणे विकत घेण्यासाठी  कोंभाळणेला जायची खूप इच्छा आहे.  राहीबाई यांच्या बियाणे संकलनामध्ये बायफ संस्थेचे मोठे योगदान आहे, असे समजते. बीबीसी मराठीने यावर स्टोरी केली आहे. युट्यूबवरही या प्रकल्पाची माहिती मिळेल.  राहीबाई, ममताबाईंच्या या धडपडीचे स्वागत तर करायलाच हवे; पण ज्याला 'गावरान' मेवा पाहिजे त्यांनीही असे प्रयत्न करायला हरकत नाही.

२ टिप्पण्या:

  1. खूप सुंदर लेख. गावरान बियाणे जतन करणे ही काळाची गरज आहे. कारण हे बियाणे सकस, रोगप्रतिकारक असते. भविष्यात आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आहाराचा महत्वाचा वाटा असेल. अभिनंदन!

    उत्तर द्याहटवा

गझल

   ये शहर मुझे रास न आया यूँ जिने का अहसास न आया क्या पाया क्या खोया मैने कोई भी तो पास न आया सबकुछ था फिर भी मुझ को  रहनसहन का मिजास न आया ...