रविवार, १८ नोव्हेंबर, २०१८

गावरान

 


सध्या बाजारात 'गावरान' म्हणून जे खपवलं जातं; त्यातलं कितपत गावरान असतं, हा संशोधनाचाच विषय आहे. लोकांना गावरान भाजीपाला, गावरान धान्य हवं आहे; हे व्यापाऱ्यांनी अचूक हेरलंय. गावरान म्हणून विकत घेतलेला भाजीपाला फक्त दिसायला गावरान असतो. चव मात्र नसते.

   पूर्वी शेतात कायकाय असायचं. दुपारची भाकरी खाण्याआधी बाया खुरपता-खुरपता पातरंची, तांदुळजाची, करडईची भाजी गोळा करून आणायच्या. तोंडी लावायला कच्च्या भाज्या असल्याने व्हिटॅमिन कमतरतेची प्रश्नच नसायचा. 

    आम्ही शेतात कायकाय चरत फिरायचो. बोरं, जांबं, सिताफळं, जांभळं, आंबे इ. सिझनल फळे तर खायचोच; रानातल्या पिकातही रानमेवा पेरलेला असायचा. शेता आल्याबरोबर ज्वारीतल्या पिकलेल्या छिन्न्या आणि वाळकांचा घमघमाट नाकात शिरायचा. वानरासारखं वाळकं, छन्न्या खात हिंडायचो. पट्ट्यात वाट्याण्याच्या शेंगा खात फिरायचो. हरभऱ्याचे ढाळे तर आताही मिळतात; पण पूर्वी प्रत्येक शेतकरी घरी लागणारे सगळे जिन्नस पेरायचे. तीळ, जवस, मोहरी, वाटाणा, कारळे, भगर, भेंडी यांचे पिकात पट्टे असायचे. माळव्याच्या वाफ्यात कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर, मेथी, पालक, चुका असा भरगच्च मेळा असायचा. तेलासाठी भुईमूग, सूर्यफूल, कुरडई, अंबाडी इ. वाण पेरले जायचे. मटकी, मसूर, बाजरी, जोडगहू, पिवळा(ज्वारी), मका, साळ इ. सगळं कुद्रू-मुद्रू पेरलं जायचं. संक्रांत, नागदिवे आणि येळवस या सणांना बाजरीच्या भाकरी, उंडे केले जातात. खिरीसाठी जोडगहू लागायचे. बाळंतिणीला आणि आजारी माणसाला लवकर ताकत यावी म्हणून काळी साळ आणि काटीजवा हमखास पेरत. काटीजवा हा गव्हाचा एक गावरान वाण आहे. याला कांडून तुपात लाडू बांधून खायला दिले की माणूस लवकर घोड्यासारखा व्हायचा. कारळ्याचं पीठ(कूट) प्रत्येक कालवणात असायचं. त्यामुळे चव यायची. आता सर्रास शेंगदाण्याचं कूट वापरलं जात. त्यामुळे भाज्या चवीला मस्सड लागतात. आता मस्सड म्हणजे काय विचारू नका! माझ्याकडे यासाठी दुसरा शब्द उपलब्ध नाही. असो.

     घरातले वर्षानुवर्षे जतन केलेले बियाणेच वापरले जायचे. माळवदाच्या हलकडीला ज्वारीचे सर्वात मोठे कणसं शेतकऱ्यांच्या घरोघरी अडकवलेले दिसत. तेच पुढच्या वर्षीचे बियाणे असे. प्रत्येकाच्या घरी लाकडी काठीच्या वळणीवर लसूण वाळत घातलेला दिसायचा. गाडग्याच्या उतरंडीत, गुम्म्यात बियाणे वाळवून राख लावून जतन केले जाई. बियाण्यांच्या गुम्म्याला वरून पाचट किंवा चगळ घालून मातीचा लेप दिला जाई. त्याला आमच्याकडे  लिपण म्हणतात. बायाच हे काम करायच्या. आमची आजी कितव्या उतरंडीला कितव्या गाडग्यात कारल्याचं किंवा भोपळ्याचं बी आहे, ते बिनचूक सांगायची. शेतातल्या कोट्यावर किंवा घरांपुढे अंगणात लाकडाचा मांडव करून त्यावर कारले, भोपळ्याच्या वेली सोडल्या जायच्या.

    गुम्मे, सलदं आणि कणग्या, दुरड्या, पाट्या गावातले किंवा फिरस्ते कैकाडी, बुरूड समाजाचे लोक तयार करून देत. यासाठी हे लोक शिंदीच्या झाडाचे फाटे कोयत्यानं सवाळून आणत. घराच्या अंगणात बसून त्यांचे हे विणकाम चाले. कणगी मोठ्या पिंपाच्या आकाराची, गुम्मे मोठ्या डब्ब्याच्या आकाराचे तर सलदं टोपलीच्या आकाराचे असायचे. सलदावर शंक्वाकार झाकण असे. सलदाचा उपयोग पापडं, खारूड्या, कुरूड्या ठेवण्यासाठीच केला जाई. नवीन गुम्मे, कणग्या, सलदं आतून बाहेरून शेणानं सारवून त्यांची छिद्रं बुजवली जात.

     आजोबा शेतावरून येताना धोतराच्या सोग्यात बांधून दररोज काहीतरी रानमेवा आणायचेच. एकदा तर काहीच नवीन नाही म्हणून त्यांनी ज्वारीचे धाटं सोलून आणले होते. ते धाट ऊसासारखे गोड लागले होते. गावरान ज्वारीची किमया. घरी खाण्यासाठी एकदोन पट्टे  गावरान ऊसाची लावणही केली जायची. एकदम मऊ आणि गोड असायचा हा ऊस. दुधाच्या दातांच्या लेकरांनो सोलून खावा असा.

    आमच्या परिसरात त्र्याण्णव साली भूकंप झाला आणि त्यात सगळं मातीत मिळालं. उतरंडी फुटल्या, गुम्मे गडप झाले. गावं नुसते मातीचे ढिगारे झाले. लोकांसोबत त्यांचे बियाणेही मातीत गडप झाले. नवीन घरातून उतरंडी, कणग्याही हद्दपार झाल्या. ते तयार करणारेही उरले नाहीत.

  हरितक्रांतीची पावलं पडत गेली तशी पारंपारिक शेती ही संपुष्टात आली. जमिनीचे तुकडीकरण झाल्याने अल्पभूधारक आणी सीमांत शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. जगण्यासाठी   क्वालिटीपेक्षा क्वांटिटी महत्त्वाची वाटू लागली. जागतिकीकरणामुळे  शेतीवर आणि शेतकऱ्यावरच अरिष्ट आलं. दारिद्र्यातून बाहेर पडण्यासाठी शेतकरी नगदी पिकांच्या मागे लागला आणि शेतातलं बाराजिनसी कुद्रू-मुद्रू अडचणीचं ठरू लागलं आणि पर्यायाने हद्दपार झालं.  कांग्रेस म्हणजेच गाजरगवतासारखे नवनवे तणं शेतात माजू लागले. या तणांनी जुने तणं कुरघोडी करून नष्ट केले. यातच रानभाज्यांचाही अंत झाला. जास्त उतारा देणाऱ्या नव्या संकरित बियाण्यांचा सुळसुळाट झाला आणि गावरान बियाणे कुजून नष्ट झाले.

    कोंभाळणे ता.अकोले जि.अहमदनगर येथील राहीबाई पोपेरे यांनी त्यांच्या घरीच जवळपास 53 पिकांच्या 114 गावरान बियाण्यांचे जतन केले आहे. त्या अशिक्षित आहेत, हे विशेष. तर याच गावातील ममताबाई भिंगारे यांनी सुमारे 100 वाणांच्या बियाण्यांचे जतन व संवर्धन  केले आहे. त्यांचा गावरान बियाणे संवर्धनाचा प्रकल्प खूप महत्वाचा आहे. त्यांची ही गावरान बियाणे बँक पाहण्यासाठी व काही बियाणे विकत घेण्यासाठी  कोंभाळणेला जायची खूप इच्छा आहे.  राहीबाई यांच्या बियाणे संकलनामध्ये बायफ संस्थेचे मोठे योगदान आहे, असे समजते. बीबीसी मराठीने यावर स्टोरी केली आहे. युट्यूबवरही या प्रकल्पाची माहिती मिळेल.  राहीबाई, ममताबाईंच्या या धडपडीचे स्वागत तर करायलाच हवे; पण ज्याला 'गावरान' मेवा पाहिजे त्यांनीही असे प्रयत्न करायला हरकत नाही.

सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१८

Innovation List | Teachers As Transformers - IIMa

Innovation List | Teachers As Transformers - IIMa

'Teachers As Transformers' या IIM Ahamadabad ने विकसित केलेल्या वेबसाईटवर माझे तीन नवोपक्रम प्रकाशित झाले आहेत. इथे अनेक उपक्रमशील शिक्षकांचे उत्तम नवोपक्रम आपल्याला वाचायला मिळतील. यासाठी वरील लिंकला टच करा.

मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१८

सुक ना दुक


गनामामाला सगळं गाव नेता म्हनायचं. गावात कुठला पुढारी आला, परचारसबा आसली की, गनामामा हार घालायला सगळ्यात पुडं. इस्टेजवर खुडचीत गनामामा दिम्माकात बसायचा. गनामामा आडानी  फाटका मानूस, पर कोनी 'नेते' म्हनलं, की ह्याचं आंग फुगायचं. टोप्या घालायला गनामामा वस्ताद. पैशे घेऊन कोर्टात खोट्या साक्शी द्याचं कामबी करायचा. एकदा साक्श द्यायला गेल्यावर गनामामानं पानाची पिचकारी मारली. ती नेमकं बघितलं जजनं. हूं का हूं. टाकलं बसवून. हिकडं आशील हुडकून बेजार. शेवट त्येनं दुसरा साक्शीदार हुडकून भागिवलं. येताना गनामामा दिसला. गरीबावनी तोंड करून बसलेला. दंड भरून सोडवून आनावं लागलं. पावनेरावळे हुडकत नाही तितं जायाचा. खाऊन पिऊन निगताना तिकिटाला मनून धा-पंदरा रूपय मागायचा, लईबी नाही. ह्येच्या शेतात तुरीचं धाटबी नसलं तरबी, जुन्या वळकीवर आडत्याकून तुरीवर उच्चल आनायचा.
     थोरली शकुंतला. तिला समदे 'छकी'च मनायचे. तिच्या पाठीवरचा राजा. गनामामाचं खटलं काय जास्त नव्हतं. बायकू तर गायीवनी गरीब. छकीचं लगीन झालतं. राजाचं लगीन करून गनामामानं त्येला खात-बी-बियान्याच्या दुकानात चिटकावलता. समदं मार्गी लावून गनामामा एक्या दिवशी आंगावर ईज पडून मेला.
     राजा बापाच्या वरचं निगालं. एक आवतन सोडायचंनी. आवतन नसलं तरबी खूत मारून जेऊनच निगायचं. रईवारी सुट्टीच्या दिवशी  मैस घिऊन लोकाचे बंधारे तुडवत हिंडायचं. मैस चारून तैट करायचं. कामाला जातानाबी कुनाची  फुगटची गाडी मिळत्याय का बगायचं. बाप मेल्यावर सरकारी ईमा मिळाला. कोन गाठ पडलं का त्या पैशांचंच बोलायचं. शेवटला 'माजा बाप लई चांगला  होता गा!' मनून रडायचं.
     फुटकं नशीब घेऊनच छकी जन्माला आली. छकीचा सोभाव  सुतासारका सरळ. तिला आचपेच कळतनी. भोळंभाबडं छकी. बिनमळी. सासू कजाग. भांडन केल्याबिगर तिला भाकरच गोड लागतनी. नवरा ट्रकडायवर. बेवडा. मायीचं आयकून छकीला गुरासरकं बडवायचा. जाच सोसत का व्हयना छकी नांदलालती. दोन सोन्यासरके लेकरं झाले. लेकरावाकड बगून रोजगार करत, शिव्या खात, मार खात तिनं संवसार करलालती. नवरा एडसनं धरनीला पडला. छकीनं त्येचं समदं केलं. माय मननारीबी नाकाला पदर लावून लांब बसायची. इळबर वदरायची. 'हिनंच पांडऱ्या पायाची हाय. इवशी घरात शिरली मनून तर माज्या  लेकराची कड लागली.' मनायची.
     नवरा मरून गेला. दोन लेकरं घेऊन छकी माहेरच्या आसऱ्याला आली. ह्या कडू राजाच्या जीवाला घोर लागला संबाळायचा.
वरल्या वाड्यातली सरूआत्या आलती गिरनीला दळन घेऊन. तिला बगून छकी गडबडीनं बाहीर आली.

छकी मनली,
"लई चांगलं लगीन झालं मन की ये तुझ्या पुरीचं."

" हूं! का करावं? चिट्टी दिऊनबी तू आलनीसच की लगनाला."

"लई  जीव वडलालता ये आत्या, पर ह्येन्ला  लईच  झालतं बग. हालायलाबी येना झालतं. कसं यिऊ सांग  ह्येन्ला टाकून?"

"काय बाई तुझं दैव छकी! शाऊ लेकराचं वाटूळं  झालं. रांडा सुकानं नांदलालत्या. सासू आसली. यी गं कळी न बस पाटकुळी. जाच सोसूनबी तू नांदायला नगं म्हनलनीस. कसला का आसना नवरा बिचारा, पर तुला आर्द्या हिरीत सोडून निगून गेला. म्हायेरच्या आसऱ्याला आल्यायस पर बापबी मरून गेला. राजाबी लई हावलाखोर हाय कडू भाड्या. बाईचा जलमच वंगळा बग. दुबत्या जनवारावनी जन्माला आल्याबरूबर गळ्याला दावं..."
सरूआत्या भडभडा बोललाली. छकी उगू गप आइकुलालं खाली बगत.

"म्हायेर, सासर, कोनचं आपलं की काय की? तुला बगितल्यावर पोटात चर्र करतंय बग." सरूआत्याला दुक दाटंना. पदर डोळ्याला  लावून बसली.

छकी हासंतच मनली,
"उगूच आवगड वाटून घिवलालीस माय. नशिबात आसल्यालं  का चुकतंय? माय-आन्नानं चांगलं घर हाय मनूनच दिलते की तितं. ती काय की मनतनीते गोम कुटं हाय तर...."

दोघी सुकदुक उकलत बसल्या. जरा वेळानं सरूआत्या गेली. छकी  तसंच बसलं. सुक ना दुक आसं.
     छकी आधीच काळी. त्येच्यात भुंडं कपाळ. गालं बसलेले. डोळे खोल. तोंड लईच वटवट दिसलालतं. वरचीवर बारीकबी दिसलालती. राजाचं ध्यान कुठं ऱ्हातंय घरात? त्येला बायकूकड बगायला फुरसत नाही. भैन तर लांबच ऱ्हायली.
    राजाची बायकू रंगी. तिच्या बापानं तिला वटी यिऊन वरीसबी लोटू दिलनी. हाडं भाजून मोकळा झाला. एकाम्हागं एक लेकरं हून रंगीबी पार चिपाड झालती. नवरा आसला माकडावनी.
     रात्री उशीरा मटरेल तोंडात धरून राजा आला. रंगीनं ताट वाडलं.

"ती थुका आता तोंडातलं. आन चुळ भरून जेवा."

राजा तोबरा धरून 'हूं ' मनला. चूळ भरून जेवाया बसला. वचवच वान्न्यारावनी जेवलाला. रंगीचं बोलनं चालूच होतं. आसं झालं. तसं झालं. हेचं ना जेवल्यावर ध्यान, ना बोलन्यावर.

"आवोऽ ताई लई वंगळं दिसलालत्या."

"हूं. " मचमच मच...

"त्येंचे मालक एडसनं मेलते जून की ओऽ"

"तुज्या मायला." राजा.

"तुमी काय बी मना. मला तर तीच संवशय यिवलालाय. कमीपना वाटाया का झालंय? उगवू संवशय तर काडा. लव्हाऱ्याला न्हिवून दावा. सरकारी दवाखान्यात रगत तपासल्यावर कळतंय मन ओऽ"

राजा गप हात धिऊन उटला. लक्षुमीच्या कट्ट्यावर आला. समोरच्या टपरीत एक छिटा सुपारी सांगून रामतात्याजवळ येऊन बसला.

 " आज केलो बगा एक नोट खडी तात्या."

आसलंच बोलनं कडूच्या तोंडात. हावरं मुलकाचं. सदा डोस्क्यात  पैशाचं येड. आसा मनात इचार करत तात्या मनले,
 "छकीला का झालंय रे? लई वंगाळ दिसलाल्याय. जरा दावावं का न्हाई डाक्टरला. काय तर टानिकबिनीक दिल्यावर फरक पडतंय."

" अय! का होतंय तात्या? आसं झालंय मनून दोसरा काडल्याय जून. कायबी झालनी."

" तसं नव्हं रे, दावायचं दाव बर!" जोर देऊन तात्या मनले

"हूं! बगू."  राजा.

        शेवट राजानं शकूताईला लोहाऱ्याच्या सरकारी दवाखान्यात न्हेला. रगत तपासलं. डाक्टरनं राजाला बोलवून घेऊन रिपोट दिला. एड्स हाय मनून सांगितलं. भाऊ बाहीर आल्याआल्या छकीनं  इचारलं,

"का मन ये भाऊ डाकटर?"

"कायबी नाही चल."
मनत राजा  छकीला घेऊन स्ट्यांडवर आला.
यसटीत बसून राजानं पक्का इचार केला. उद्या शकूताईला रानातल्या कोट्यात हालवायचं.
    छकीला  कोट्यात टाकल्यापसून सोयरे, गावातले लोकं रोज बगायला याचा सपाटा सुरू झाला. येवस्ता करायला मायीशिवाय कोन ऱ्हातंय? रंगीला तर घर सोडाया कसं जमतंय? तिचे दोन, छकीचे दोन लेकरं, नवरा, सासू-नंदंचा डब्बा... छकी मयाळू. त्येच्यात तिच्या आयुश्याचं आसं मातरं  झाल्यानं लोकबी लईच सुटलं तिला बगाया  कोट्यावर. गावकरीच शेत होतं. काय आवगडबी नाही. रोज सकाळी घरला येताना माय कोट्यातले बिस्कुटपुडे आनायची. रंगीच्या, छकीच्या लेकरावाला रोज च्यासंगं बिस्कुटं खायाला मिळलाले. राजाबी मागायचाच दोन बिस्कुटं.

    उनासंगं छकीचं दुकनंबी वाडत चाललं होतं...........

      उनाचं जिजाक्का छकीला बगाया आलती. जिजाक्काची छकीवर बारकी आसल्यापसूनच मया. 'बाजंवर पडल्याली छकी हातरूनात दिसना सुद्द्या झाल्याय की माय!' वाटलं जिजाक्काला.

आक्काला बगून छकी उल्लास आनून मनलं,
"यी ये! ह्यवडं उनाचं का आल्यायस आक्का? जरा तवरून येवं का न्हाई ये?"

 आक्का बाजंवर बसत मनली,
"आले माय. घरातबी रकरक करलालतं. तुजीच याद यिवलालती. आले सरसर. का लई लांब हाय?"

जिजाक्कानं पुडा हातात दिल्यावर छकी रागानं मनली,
"मी का नेनती हाव का ये? कशाला आनल्यायस? उगू बोलून जायाचं दोन गोश्टी."

कोरड्या व्हटावर जीब फिरवत छकी बोललाली.
" आक्का, मायच करलाल्याय बग माजं समदं. आता हामी मायीचं करायचं, तर आजूबी मायीकूनच करून घेवं का ये? मी मेल्यावर आता कुटं जातेव ये? पुन्ना मला आसली माय मिळंल का ये?"

 छकीचे डोळे डबडब भरले. मायनं रडायचा सूरच काडला. जिजाक्का दोगीलाबी समजावलाली. आपूनबी रडलाली.

"माय, आक्काला शरबत तर कर ये. लिंबू हाय जून की. " छकी.

" गप्प. रोज तुला बगाया ढिगारा लोकं यितीते. का सगळ्याला शरबत पाजवत बसाया जमतंय?" आक्का कळवळून मनली.

    छकीनं डोळे झाकल्यावनी केली. पुना डोळे उगडून मनली,
" बग माय, तुला अक्काच्या पुडं सांगलालेव. मी मेल्यावर पंडूचं ट्याकटर सांगून न्ही ट्याकटरमदी. कुनाच्या तोंडाकड बगत बसनूक. लोकं कायबी बोलतीते. ध्यान दिवनूक. तुला बोलनं सोसतनी आदीच. लोकाचे तोंडं का धराया येतंय, व्हय ये आक्का?"

मधीच छकी आक्काकड वळली.
"बग ये आक्का, माजंमाजं ताट, वाटी येगळं ठीव मनलं तर आयकंना माय. त्येच्यातच जेवत्याय आपूनबी. आपलापून जपून ऱ्हावं का नाही बर? तू तर सांग ये!"

जिजाक्का चमकून मनली,
"व्हय वो, लेकराचं खरंच हाय की!"

"....आनी का माय, माजी पोरगी तू संबाळ. आजू नेनती हाय. पोराला सासूकड सोडून यी. तिला तर दुसरं कोन हाय? आनी दोनीबी लेकरं तुज्याच गळ्यात नकू माय..."

बोलत बोलत छकीची नजर कोट्याबाहीर गेली. उनानं एकदम तिचे डोळे बांदल्यावनी झालं. बोडक्या रानावर चिटपाखरू दिसत नव्हतं. उनाच्या झळानं शिवार करपल्यावनी झालतं. व्हावटळीनं कडब्याचा पाचोळा गरगरत वर वर आबाळाला जावलालता.
------------------------------------------------------------------------
पूर्वप्रसिध्दी: मिळून साऱ्याजणी (डिसेंबर 2010) साभार
 चित्रे साभार- सुयोग कांबळे
टिप- कथेचे पुनर्लेखन केलेले आहे.

गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८

घर

आमचं मातीचं घर होतं. मागं सात खण इमला. पुढे पत्र्याची ओढणी. मोठं अंगण. एका बाजूला गुरांचा गोठा. वाड्याच्या बाहेरच्या भिंती शेणानं सारवलेल्या. खोल्यांमध्ये फक्त पांढऱ्या मातीचं पोतरं. खाली धूम्मस केलेल्या जमिनीवर शेणाचं सारवण. अंगणात शेणाचा सडा. सडा-रांगोळ्या झाल्यावर घर कसं लख्ख व निर्मळ वाटे.
    देव्हाऱ्यावर ज्ञानेश्वरी. तुकाराम गाथा, एकनाथी भागवत, हरिपाठ, शिवलीलामृत आदि ग्रंथ बासनात व्यवस्थित बांधून ठेवलेले असायचे. देव्हाऱ्यात दोन लंगडे बाळकृष्ण, घोड्यावरचा सिद्धनाथ, विठ्ठल-रखुमाई, अंबाबाई, गणपती...अशी देवांची वर्दळ. अंगणात तुळशीचा कट्टा. तुळशीबुडी महादेवाची पिंड.
    इमल्याच्या दोन खोल्यांना लागून एक जुनी अंधारी खोली होती. या खोलीत फासा, कुऱ्हाडी, चाडे, नळे, कुदळी...अशी इकनं, गठुडे, घुंगुरमाळा, दृष्टमण्यांच्या माळा, मुंगसे, जुनी गंजाटलेली तलवार, पाळणा, मोठमोठ्या रव्या, हंडे, गाडग्याच्या उतरंडी, कनगी, गुम्मे....असे बरेच अडगळीचे सामान असे. त्या खोलीची मला फार भीती वाटायची. मी रूसल्यावर आजी मला भीती घालायची, "गप्प बैस, न्हायतर जुन्या खोलीत कोंडवीन."
मी शहारून गप्प बसायचो. हळूहळू या खोलीची भीती कमी झाली. आईच्या पदराला घट्ट धरून कधीमधी खोलीत जाऊ लागलो. सुट्ट्याला आत्याचे लेकरं आल्यावर मी त्यांना दहशत घालू लागलो, " जुन्या खोलीत बावा हाय." ते मानायचे नाहीत. मग मी त्यांना दारापाशी थांबायला सांगून; आत अंधारात जाऊन खुंटीवरच्या घुंगुरमाळा वाजवायचो. बाहेर येईपर्यंत सगळे आवाज ऐकून पसार झालेले असायचे. नंतर ते मला विचारायचे, "भावजी, तुला तो बावा कसा खात नाही रे?"
मी सांगायचो, " त्येनं माजा दोस्त हाय."
घरात कुणी रागावलं की, मी जुन्या खोलीत आतून कडी घालून, अंधारात दिवसभर उपाशी बसायचो." बाहेरून कुणी कित्ती विणवलं तरी बाहेर यायचो नाही. आजोबांची प्रेमळ हाक ऐकल्यावर मात्र नाईलाज व्हायचा.
      चौथीच्या इतिहासातील शिवराय व मावळ्यांचा प्रताप भान विसरून वाचायचो. अन् त्या जोशात जुन्या खोलीत जाऊन; ती काळी जड तलवार कशीबशी हातात घेऊन हात फिरवायचो. शिंक्यावरच्या मोठ्या सलदाला शत्रू समजून घाव घालायचो.
      वाड्यात एका बाजूला अर्धवट बांधकाम झालेला गोबरगॅस होता. दोन्ही बाजूंच्या हौदांमधून आत उतरायचो. आतील भाग मंदिरासारखा. वर गोलाकार घुमट. उन्हाळ्यात तिथं थंडगार वाटायचं. हीच आमची खेळायची जागा.
       मी चौथीला गेल्यावर शेजारच्या मनामायनं अभ्यासासाठी तिनं स्वतः तयार केलेली चिमणी दिली होती. माझ्या शिक्षणाला मिळालेली ही पहिली प्रेरणा! त्या दिव्याउजेडी बसून मी कवाबवा घटकाभर पुस्तकातली चित्रं बघायचो. चिमणीचा धूर नाकात जाऊन नाक काळंभोर झालेलं सकाळी दिसायचं.
     पडवीला वडील, चुलते, बामणाचा पबाकाका, हबीबचाचा यांच्या रामायण, महाभारत, पुराण, संत, भक्ती, शेती या विषयांवरच्या गप्पा चालत. आम्ही भावंडं शांत बसून या गोष्टी ऐकायचो. काही कळायचं. काही कळायचं नाही.
      आप्पांची बाज अंगणात. मी त्यांच्याजवळ झोपायचो. ते चांदण्या रात्री आकाशातील तिफण, इच्चू, ध्रुव अशा नक्षत्रांची ओळख करून द्यायचे. मला चांदण्या मोजून दाखव म्हणायचे. थोडावेळ माझी मज्जा बघायचे. आप्पांनी मला बाजेवर पडल्या-पडल्या अनेक अभंग शिकवले. नाटी शिकवल्या. मी त्यांच्या मागे म्हणायचो.
    'आम्ही कुणबियांची मुलं।
     आम्हा सार्थक विठ्ठल ॥
     धरिला द्रव्याचा नांगर ।
     काशा काढितो सागर ॥
     रामनामाची कुऱ्हाडी ।
     प्रपंचाच्या पालव्या तोडी ॥
  मी अभंग म्हणत होतो. वडील आप्पांना म्हणाले, " उगू कायबी शिकवनूक त्येला. ही अभंग गाथ्यात नाही. मनानं जोडलेला हाय."
आप्पा म्हणाले, " हाय गा ! नामदेवाच्या गाथ्यात हाय." मग वडील निरूत्तर होत.
      जनावरांचा गोठा साफ करून वाड्याचं सडासारवण करता-करता आई मेताकुटीला यायची. घरात दारिद्र्य असूनही सडासारवण, रांगोळ्या अशा नीटनेटकेपणामुळेच या घरच्या लेकी म्हणजे आमच्या आत्या चांगल्या घरी गेल्या. अडीनडीला, दुष्काळानं गांजून एकेक जनावर विकून टाकल्यानं गोठा रिकामा झाला. काही दिवसांनी गोठाही काढून टाकण्यात आला.
       खोल्यातली भूई खडबडीत झाल्यावर धूम्मस केली जाई. जमीन खोदून, पाणी-माती कालवून, सपाट करून, पुन्हा बडवून सपई केली जाई. उन्हाळ्याच्या दिवसांत धूम्मस केलेल्या घरात थंडगार वाटे. वर लाकडी फळ्यांचा इमला (माळवद). इमल्याच्या खोलीत उन्हाळ्यात थंडगार तर हिवाळ्यात उबदार वाटे. हा इमला वडिलांनी माळाला सात पोते तुरी झाल्यावर घातला. पाच पोत्यांना  तेराशे रूपये पट्टी आली आणि वडलांचं 'इमल्याचं' स्वप्न पूर्ण झालं. इमला घातला त्यावेळी मी रांगत होतो म्हणे!
      मोठ्या माणसांचा डोळा चुकवून  न्हाणीघराच्या आखूड भिंतीवरून उडी मारून मी पाटलाच्यात टीव्ही पहायला जाई. तेव्हा गावात तेवढाच एक टीव्ही होता. एकदा टीव्ही बघत पाटलाच्या सोप्यात बसलो होतो. बाहेर खूप अंधार पडलेला. दारातून हाळी ऐकू आली, "बाग्याऽव" मी तटकन उठून बाहेर आलो. बाहेर मुसळधार पाऊस. वडील पोत्याचं घोंगतं पांघरून आलेले. वारं-वावधान. ईजा चमकत होत्या. वडलांच्या पुढंपुढं घरी आलो. मोठ्या दारातून आत आलो. समोरची सोप्याची भिंत ढासळून पत्रे खाली आले होते. वडलांनी शिव्या-मन-शिव्या दिल्या. पोटभर शिव्या खावून झोपी गेलो. नशीब! मार मिळाला नाही. वडलांनी कधी पाची बोटांनी शिवलं नाही. आईचा मार मात्र उठता-बसता खायचो. कामाच्या दगदगीनं आणि घरातल्या लोकांच्या बोलाला वैतागून सगळा राग ती माझ्यावर काढायची.
     पुढं भूकंप झाला. तेव्हा अंगणात पत्र्याच्या खोपी घातल्या गेल्या. तेव्हा साऱ्या गावात खोपीच खोपी. माणसांना या खोलीत वाकूनच वावरावं लागे. या त्रासाला कंटाळून शेवटी आम्ही बैलगाडीनं वढ्यातले बेशरमाचे सोट कापून आणले. त्यांचं कूड गुंफून अंगणात पत्र्याच्या दोन वढण्या घातल्या. बरीच वर्षं त्या बेशरमाच्या कुडाच्या घरात राहिलो. कधी स्वप्नातही असं रहायचा विचार केला नव्हता.
       पुढं काही वर्षांनी भूकंप पूनर्वसन अनुदान म्हणून एक खोलीच्या बांधकामाचे साहित्य आणि थोडे पैसे मिळाले. त्यात काही पैसे घालून आम्ही पक्क्या विटांचा वाडा बांधला. खोल्यांना दारं, भिंतींना गिलावा, फरशी....काहीच करू शकलो नाही. या पक्क्या इटकुराच्या लाल घरातही बरीच वर्षं काढली. पुढे दहाबारा वर्षांनी उरलेली कामं माझ्या हातानं झाली. घराला घरपण आलं. आता तर आरसीसी घरही बांधून झालं. पण वडलांनी हौसेनं बांधलेलं मातीचं, इमल्याचं, धूम्मस केलेलं, सडा-सारवण-रांगोळ्यांचं, गोठ्यासहित मोठ्या अंगणाचं ऐटदार घर; 'घर' या नावाला शोभणारं होतं.

    (पूर्वप्रकाशित : तिफण)

शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१८

बाईपणातून जाणाऱ्या बाईचा प्रवास: झिम पोरी झिम



  बालाजी मदन इंगळे यांची 'झिम पोरी झिम' ही पहिलीच कादंबरी.  यापूर्वी त्यांचा 'मातरं' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे.  या संग्रहाने त्यांना ग्रामीण कवी म्हणून मान्यता मिळवून दिली. त्यांच्या काही कवितांमधून  स्त्रीचे भावविश्व साकारले आहे. ग्रामीण स्त्रीचे समग्र भावजीवन त्यांना नेहमीच खुणावत असावे. या अस्वस्थतेतूनच त्यांनी कादंबरी हा जास्त अवकाश असणारा वाङ्मयप्रकार जाणीवपूर्वक निवडलेला दिसतो.

       या कादंबरीतील मध्यवर्ती पात्र असलेल्या जनीचे प्रथमपुरुषी निवेदन वाचकाला सरळ तिच्या गावात, तिच्या घरी नेऊन सोडते. जनी ही कुठल्याही खेड्यातली, कुठल्याही सामान्य कुटुंबातली एक सामान्य मुलगी आहे. ती तिच्या जीवनातल्या वरवर सामान्य वाटणार्‍या गोष्टी सांगत एक असामान्य अनुभव देते. मुलगी म्हणून जन्माला आल्यामुळे तिचे त्या घरातले दुय्यम स्थान तिला शंकर या तिच्या भावाच्या जन्मानंतर प्रकर्षाने जाणवते. तिच्या जन्माच्या वेळी 'दुसऱ्या वेळीही मुलगीच झाली' हा मायबापाचा असंतोष तिच्या वाट्याला आलेला असतो. मात्र जनी आजारी पडते तेव्हा हेच मायबाप तिची काळजी घेतात, हा विरोधाभासही तिला जाणवतो. यातून लेखक खेड्यातल्या माणसांच्या स्वभावातील सूक्ष्म बारकावेही किती नेमकेपणाने मांडतो आहे, हे कळून येते.

       घरातल्या कामाचा भोगवटा ग्रामीण भागातल्या मुलींच्या वाट्याला अगदी कोवळ्या वयापासूनच येतो. जनीही त्याला अपवाद नाही. हे शेतकरी कुटुंब या घरातल्या मुलीच्या लग्नपाई सावकाराच्या पाशात सापडते व त्याच्या शोषणामुळेच भूमिहीन होऊन उघड्यावर येते. जनीचे माय, बाप, बहीण या साऱ्यांनाच लोकांच्या शेतात मजुरीने कामाला जावे लागते. जनीला अपरिहार्यपणे घरातल्या कामाचा बोजा पडतो. तिला तिची शाळा सांभाळून घरातली कामं करावी लागतात. जरा सवड मिळाली की हळूच ती मैत्रिणींसोबत खेळायला सटकते. हे सर्व अत्यंत चित्रमय पद्धतीने लेखकाने सजीव केले आहे.

       जनीचे घरातल्या प्रत्येकासोबत असलेले नैसर्गिक भावबंध लेखकाने अत्यंत कारागिरीने विणले आहेत. खेड्यातल्या चालीरीती, हुंडाप्रथेमुळे मुलीच्या लग्नाची मायबापाच्या मनातली धास्ती, या लोकांच्या जगण्यावर पडलेल्या मर्यादा अचूकपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे. आजच्या टीव्ही चॅनल्सच्या युगात लोप पावत चाललेली खेळगाणी, लोकगीते या मुलीच्या जगण्याचा एक भाग बनून येतात.  ही गीते वजा केली तर तिच्या या गोष्टीला अर्थच उरणार नाही, इतकी ती तिच्या व्यक्तिमत्त्वाशी, जीवनाशी एकरूप होऊन येतात.

      ग्रामीण बोलीच्या सहजतेसह कादंबरीचा ओघवतेपणाही लक्षात येतो. या कादंबरीच्या भाषेचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही केवळ मराठवाड्यातील उमरगा परिसराची बोली नसून; ती या प्रदेशातील ग्रामीण स्त्रीची अस्सल बोली आहे. ग्रामीण बोलीचा जिवंतपणा पुरुषांपेक्षाही स्त्रीच्या बोलण्यातचं अधिक शिल्लक आहे. सुरुवातीला वाचताना शहरी पांढरपेशा वाचकाला काहीसं अडखळल्यासारखं झालं तरी, पुढे वाचक या भाषेला सरावतो. 'करलालतं',  'वाटलालं',  'काढलालेव',  'यिवलालतं',  'दिसलालतं', 'दुखलालंय' यासारखी क्रियापदं ह्या भाषेला सुलभ व गोड बनवतात, तसेच लयही प्राप्त करून देतात. या भाषेसह या प्रदेशातील म्हणींचाही वापर व्हायला हवा होता, असं मात्र जाणवतं.  'येळवस' या सणाचे, लग्नाचे वर्णन वाचताना आपल्याला या प्रदेशाच्या ग्रामीण कृषिनिष्ठ संस्कृतीचीही ओळख व्हायला मदत होते.

        या कादंबरीतून प्रकट झालेले ग्रामीण वास्तव हे पांढरपेशी शहरी वाचकांसाठी निश्चितच धक्कादायक आहे. तालुक्यापासून जवळचे गाव असूनही या मुलींना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. साठ-सत्तरच्या दशकातल्या कादंबरीत चित्रित झालेले ग्रामीण वास्तव व आजची परिस्थिती यात फारसा फरक नसल्याचे ही कादंबरी वाचताना लक्षात येते. यावरून स्वातंत्र्योत्तर पाच-दहा दशकांतली ग्रामीण विकासाची कल्पना करता येईल. त्यासाठी पंचवार्षिक योजनांचे आराखडे, आकडे, राष्ट्रीय/दरडोई उत्पन्नातील वाढ अशा गोष्टींकडे पाहण्याची गरज उरत नाही. गावात कॉइनबॉक्स आला हा वरकरणी किरकोळ वाटणारा बदलही लेखकाने टिपला आहे. गावात मोबाईल फोन, टीव्ही आले तरी जनीच्या जीवनाशी या वस्तूंचा संबंध येत नसल्याने त्यांचा उल्लेख नसावा.

    तिच्या मैत्रिणींचं वयात येणं, तिचं वयात येणं, पौगंडावस्थेत शारीरिक बदलांमुळे गोंधळलेली मानसिकता, तिच्या तईचे पाटलाच्या पोराबरोबरचे शारीरिक संबंध, बन्याचं तिच्या मागं लागणं, धोंडुरामच्या पोरांनं तिला मिठी मारणं, ती घरी एकटी असताना नात्यातला मुलगा घरी आल्यावर निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना, कावळे मास्तराचा लोचट व विकृत स्पर्श, स्वतःच्या शरीरावयवांची चीड, मैत्रिणींचे अनुभव, तिच्या अपेक्षा, शेवटी तिच्या वाट्याला आलेलं भीषण वास्तव, अशा साऱ्यातून लेखकाने जनीचे जे लैंगिक भावजीवन उभे केले आहे ते चकित करणारे आहे. स्वतः पुरुष असूनही त्यांनी आपल्या नायिकेला चांगला न्याय दिला आहे. लैंगिक बाबीवर लिहिताना त्यांच्या लेखणीचा कुठेही तोल ढळला नाही.

त्यामुळेच हे वाचताना कधीही लैंगिक भावना चाळवल्या जात नाहीत.
       जनीनं तिच्या शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाचा तपशीलही या कादंबरीचे महत्त्वाचे अंग आहे. तिच्या लग्नाचे बापाच्या डोक्यावरचे ओझेही त्यामुळे कमी झाले असले तरी; लग्नानंतर समाजमान्य चौकट लाभल्यानंतरच खऱ्या अर्थाने तिचे लैंगिक व आर्थिक शोषण सुरू होते, हे वाचताना स्त्रीला केवळ माणूस म्हणून नव्हे तर स्त्री म्हणून समजून घेता येण्याची गरज अधोरेखित होते.                                                                                                              कादंबरीचे कथानक सुरुवातीला काहीशा संथ गतीने पुढे सरकते. नंतर जनीची दहावी, बारावी, डीएड, लग्न असा थोडा वेग घेते. लेखकाला या कथानकावरची पकड ढिली होऊ द्यायची नसल्याने असे झाले असावे. मात्र त्यामुळे मूळ विषयापासून भरकटत जाण्याची व निरर्थक, अनावश्यक तपशिलांचा भरणा होण्याची भीती कमी झाली आहे हेही जाणवते. लेखकाने कथानक व पात्रांचे नैसर्गिक विकसन यांवरच भर दिला असल्याने आपोआपच अन्य गोष्टींकडे काहीसे दुर्लक्ष झाले असावे. उदाहरणार्थ, या कथानकाच्या विकासक्रमात कुठेही प्रतिमांचा वापर लेखकाने केला नाही. पण यामुळे हे कथानक कुठेही लंगडे पडले आहे, असेही म्हणता येत नाही. उलट रांगडी व जिवंत अनलंकृत बोलीभाषा तसेच वास्तवाची थेट मांडणी यामुळे ते अधिक प्रत्ययकारी झाले आहे. जगण्यातील वास्तव कलात्मकता सांभाळूनही थेटपणे मांडण्याचे आव्हान लेखकाने येथे सांभाळले आहे. वाचकाला चकित करण्यासाठी भुलवण्यासाठी अन्य कोणतीही क्लृप्ती लेखकाने वापरलेली नाही.

         कादंबरीचा शेवट करतानाही लेखक वास्तवाची कास सोडत नाही. 'आजपसून निवड मंडळाच्या परीक्षेचा अभ्यास चालू करू आसं ठरविले. वतलापुढून उठले. करकचून केस बांधले अन् आंघोळीला आले.'  या शेवटच्या ओळी जनीचा संघर्ष लग्नानंतरही सुरूच आहे, हे सूचित करतात. बाया खंबीरपणे वास्तवाला तोंड देतात. जीवन थांबत नसतं ही लेखकाची जाण इथे प्रकट होते.               
थोडक्यात, ग्रामीण स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण शिक्षणामुळे सकारात्मकपणे बदलणारी तिची मानसिकता, बाईपणातून जाणाऱ्या कुठल्याही बाईच्या मानसिक, भावनिक, लैंगिक व बौद्धिक गुंतागुंतीचे अनेक पदर त्या गुंतागुंतीच्या नैसर्गिक बंधासह प्रभावीपणे लेखकाने मांडले आहेत.

(साभार : नवाक्षर दर्शन, जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर 2009)

सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

आमराईतले दिवस


  शाळेच्या परीक्षा संपल्या की, कोंडलेलं मांजर धूम पळावं तसं मी आमराई गाठायचो. मला बघितल्यावर गुरं सोडून आमराईत धिंगाणा घालणारे गुराखी लगोलग गुरं वळवायचे.
    आख्खं शिवार जळताना आमराईतली सावली थंडगार वाटायची. दिवसभर आमराई हलू द्यायची नाही. आमराई साऱ्या शिवाराला साद घालायची. सकाळची कुळवपाळी आटपून आजूबाजूचे कुळवकरी दुपारी आमराईत टेकायचे; अन् बापाचा गप्पांचा फड रंगायचा. आम्ही पोरं इळभर सुरपारंब्या खेळण्यात दंग. माकडासारखं ह्या फाट्यावरून त्या फाट्यावर. आमचा गलका वाढला की बाप वरडायचा. मग आम्हाला गुपचूप ओळीनं झोपावं लागायचं. खेळून, दमून गडद झोप लागायची. ऊनाचा एखादा चुकार ठिपका तोंडावर आला की, झोपमोड व्हायची. बाप जागा बदलून झोपायला सांगायचा. आमराईत ऊनाच्या झळाही लागत नसत. थंडगार! झिरपणाऱ्या खापरातल्या बिंदगीतलं पाणीही थंडगार!
    मग झोप मारून झाल्यावर पडल्या-पडल्या नजर इकडून तिकडं पळणाऱ्या खारींवर जायची. तुरूतुरू एखादी खारूताई वर-वर जायची. माझ्या नजरेचा पाठलागही सुरूच असायचा. एक नेमक्या आंब्याजवळ जाऊन खारूताई त्याला टोकरायची. त्या टोकरलेल्या ठिकाणी लालबुंद दिसायचं. मी एकदम आनंदानं उठून; सरसर चढून तो पहिला पाड तोडून आणायचो. पडलेल्या पाडांवरून आम्हा पोरांची भांडणं लागायची. मग वाटणी. मला फक्त कोय!
     पहिल्या पाडाचा शोध खारूताईनं लावल्यापासून, आमराईची राखण करायची एक नवी जिम्मेदारी आमच्यावर न सांगता पडायची. मग दररोज सकाळी जल्दी उठून, भाकर घेऊन आमची टोळी आमराईत दाखल व्हायची. गेल्याबरोबर पाड हुडकायची स्पर्धा लागायची. दुपारपर्यंत पडलेले पाड तोंडी लावायला घेऊन आम्ही जेवायचो. साधंच जेवण अगदी गोड लागायचं.
       आमराईतलं प्रत्येक झाड वेगळं. एक गुठली आंबा. त्याचे आंबे फारच लहान. साखरआंबा खूप गोड. शेपूच्या भाजीच्या चवीचा शेपूआंबा.  केसरआंब्याच्या कोयीला केसरच जास्त. एक खाराचा (लोणचं) आंबा. रसाचा आंबा. या गावरान आंब्यांच्या जाती आता नामशेष होत आहेत. आमच्या साखरआंब्याच्या चवीपुढे तर हापूस सुद्धा झक मारतो. साखरआंब्याचा एक तरी आंबा खाल्ला तरच मला आंबा खाल्ल्यासारखं वाटतं. या आंब्याच्या कोया मी लावल्या होत्या. दोन उन्हाळे जमादाराच्या डुबीचं पाणी खांद्यावर आणून झाड जगवले. तरी झाडं पुढं जगले नाहीत. बारक्या बंधूनेही अशीच खटपट करून पाहिली; पण यश आलं नाही. असो.
     पाड पडल्यानंतर आम्ही पोरं एकमेकांना चोरून आंब्याची अढी घालायचो. एकमेकांच्या अढ्या शोधून काढायचो. दुसऱ्याच्या अढीतले आंबे बिनपत्त्यानं फस्त करताना मजा वाटायची. पुन्हा बघतो तर माझ्या अढीचाही कुणीतरी चोरून फडशा पाडलेला असायचा.
  उन्हाळ्याचे रखरखीत दिवस आमराईच्या संगतीनं सुखात जायचे. आंबे उतरवताना हातांना, तोंडाला चीक उतून दुखं पडायचे, तरी त्याचा तेव्हा गुमानच नसायचा. आंबे उतरून झाल्यावर आमराई सुनी-सुनी वाटायची.
  माणसांना, गुरांना, पशुपाखरांना, भर उनात मायेची सावली देणारी आमराई...पुरणपोळीला मधुर आमरस देणारी आमराई... मधमाशांना पोळं करायला आसरा देणारी आमराई... ती आमराई आता उध्वस्त झालीय. त्यातलं एक आंब्याचं झाड वाढत्या वयाच्या खुणा अंगावर वागवत कसंबसं तग धरून उभं आहे. तेही बिचारं एकटेपणानं कावून गेलंय. जास्त दिवस टिकेल असं वाटत नाही.

बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८

नांदून केलं नाव

माझ्या आईच माहेर गावातलंच. तिचं घर भजनाचा वाडा म्हणून ओळखलं जातं. तिच्या ढेळजंला दररोज रात्री पंचपदीचं भजन व्हायचं. तिचे वडील हरिभाऊ हे मृदंग वाजवायचे. प्रसंगी कमरेला पंचा बांधून कीर्तनही करायचे. तिचे चुलते रामभाऊ हे उत्कृष्ट गायक. प्रचंड पाठांतर. माझ्या आजोळच्या घरासमोरच सप्ता व्हायचा. आईचं नाव चमाबाई. ती थोरली. तिला दोन बहिणी, दोन भाऊ. मी माझ्या आजीला पाहिलं नाही. आईच्या लग्नाआधीच ती वारली. ती अतिशय सुंदर होती. नाकेली आणि गोरीपान होती, असं आई सांगते. आमच्या शेजारचं 'व्हंताळ' हे आजीचं माहेर. आजी कॅन्सरनं गेली. तिच्या थानाला गाठ आली होती. आपरेशन करून एक थान काढून टाकला होता. आईच्या लग्नाची सगळी तयारी आजीनं करून ठेवली होती. घरचा खपली-गहू, दाळी इ.तिनं कनगी, गुम्मे भरून लिपन लावून ठेवले होते, असं आई सांगते.
   आमचं वडिलांचं घरही वारकरी. आजोबा, वडील, चुलते तिच्या घरी भजनाला जायचे. आजी आमच्या वडिलांना (भाऊंना) जावईबापू म्हणायची. आज्याला मळा-माळ- बरड अशी  तीस एकर शेती होती. त्यातली सोळा एकर पुढे एमआयडीसीत गेली. असो. शेताला बघून आणि पोरगं वारकरी म्हणून माझ्या आईच माहेर गावातलंच. तिचं घर भजनाचा वाडा म्हणून ओळखलं जातं. तिच्या ढेळजंला दररोज रात्री पंचपदीचं भजन व्हायचं. तिचे वडील हरिभाऊ हे मृदंग वाजवायचे. प्रसंगी कमरेला पंचा बांधून कीर्तनही करायचे. तिचे चुलते रामभाऊ हे उत्कृष्ट गायक. प्रचंड पाठांतर. माझ्या आजोळच्या घरासमोरच सप्ता व्हायचा. आईच नाव चमाबाई. ती थोरली. तिला दोन बहिणी, दोन भाऊ. मी माझ्या आजीला पाहिलं नाही. आईच्या लग्नाआधीच ती वारली. ती अतिशय सुंदर होती नाकेली आणि गोरीपान होती, असं आई सांगते. आमच्या शेजारचे व्हंताळ हे आजीचं माहेर. आजी कॅन्सरनं गेली. तिच्या थानाला गाठ आली होती. आपरेशन करून एक थान काढून टाकला होता. आईच्या लग्नाची सगळी तयारी आजीने करून ठेवली होती. घरचा खपली-गहू, डाळी इ. तिनं कनगी गुम्मे भरून लिपण लावून ठेवले होते, असं आई सांगते.
  आमच्या वडिलांचं घर वारकरी. आजोबा, वडील, चुलते तिच्या घरी भजनाला जायचे. आजी आमच्या वडिलांना (भाऊंना) जावईबापू म्हणायची. आज्याला मळा-माळ-बरड अशी तीस एकर शेती होती. त्यातली सोळा एकर पुढे एमआयडीसीत गेली. असो. शेताला बघून आणि पोरगं वारकरी म्हणून आमच्या घरी आईला द्यावं, असं आजीला वाटायचं. पण कधीकधी इथं द्यायला तिला नकोही वाटायचं. एवढी शेती असूनही हे लोक जवारीसाठी पिशवी घेऊन हिंडतेत. लई गरीबी हाय म्हणून ती विचार झटकून टाकायची.
    आईला मुरूमचं स्थळ सांगून आलं होतं. आजोबा पाहुण्यांकडे निघाले होते. पण त्यांना कीर्तनकार महाराजांनी अडवलं. कमलाकर चांगला आहे. शेत चांगलं आहे.आज ना उद्या गरीबी हाटंल. पोराच्या वाट्याला दहा एकर शेत येतंय, असं म्हणून आजोबांची समजूत काढली. इकडच्या आज्यालाही महाराजांनी थाटवलं. अन एकोणेऐंशीच्या मार्च महिन्यात दारातल्या सप्त्याच्या मांडवातच आई-भाऊंचं लगीन झालं.
  माय गेल्यावर आई खूप खचली होती. सतत आजारी पडायची. तिच्या चुलतीनं तिला सावरलं होतं. आईचं लग्न होईपर्यंत आईच त्या घरची माय झाली होती. आजोबांनी आईला व तिच्या भावंडांना कधीच शेतातली काम लावली नाहीत. खाऊन-पिऊन सुखी असं घर होतं. प्रसंगी आजोबांनी पिठाच्या गिरणीवर, खताच्या दुकानात काम केली. पण लेकरांना सुखात ठेवले. पण आजोबांमध्ये एक अवगुण होता. ते फारच तर्कटी व हेक्काडी होते. थोडं जरी मनासारखं नाही झालं तरी ते ताट भिरकावून द्यायचे. अबोला धरायचे. आठ-आठ दिवस जेवायचे नाहीत. या स्वभावामुळे आईसकट सगळे त्यांना खूपच घाबरायचे.
      लग्न होऊन आई खोपटवजा घरात आली तेव्हा लग्नाच्या दोन नणंदा, दोन दीर होते. दोन नणंदा लग्न होऊन गेलेल्या. सात-आठ माणसांच्या खटल्यात ती दाखल झाली.
     आईला पांढऱ्या मातीची अॅलर्जी होती. तिला सतत खोकला यायचा. भाऊंना हे लग्नाआधी माहीत होतं तरी त्यांनी या 'खोकल्याम्माला' स्वीकारलं होतं. आम्ही मुलं भाऊंना चिडवतो 'तुमचं आईवर प्रेम होतं का नाही? खरं सांगा!' म्हटल्यावर ते खुलतात. मान्य करतात. तिच्याचसाठी भजनाला जायचो म्हणतात. आईही लाजून हसते. 'व्हय! खरं वाटलं बघा. लेकरावाला उगू कायबी सांगनूका. मी तर तुमाला बगायलाबी नव्हते.'  म्हणते.
 मग भाऊ छेडतात, 'चोरून बघत नव्हतीस का? तुझ्या मायला, खरं सांग.' आम्ही पोट धरुधरु हसू लागतो.
   आईचं सासरमध्ये खूप शोषण झालं. आजी तिला पहाटे चान्नी निघायला उठवायची. अन स्वतः पुन्हा झोपायची. तिला मोठा वाडा, जनावराचा वाडा झाडून, शेण काढून, दुरडीभर भाकरी बडवून, धुणं-भांडे करूनच शेताकड कामाला जावं लागे. वडील पहाटेच बैलं सोडून माळाला जायचे. पुन्हा घरी आलं की, स्वयंपाकपानी, चूलपोतरा.... त्यात आत्यांची खोचक बोलणी. आजी चुलत्यांचा लाड करायची. 'त्येंचे लेकरं का बाळं? तुमी दोघंच काम करावं लागतंय.' म्हणायची.
   आईला काम सोसायचं पण बोलणं सोसायचं नाही. आजही तिचा हाच स्वभाव आहे. घालून-पाडून बोलल्यावर ती जीव द्यायला तळ्याकडे धावत गेली होती. आजी मागं पळत गेली. 'आगंs परमुद्या... परमुद्या... रडलालंय. दूद पाजीव. फिर म्हागारी.'  एवढंच कसं तिच्या कानावर पडलं की? ती थबकली आणि पुलावरून धावत माघारी आली. आई हे खूप रंगवून सांगते.
      खोकला लागला की आईला माहेरी लावून द्यायचे. कारण दवाखान्याला न्यायची ह्या घराची ऐपत नव्हती. तिकडचे आजोबा तिला घेऊन फिरायचे पण गुण यायचा नाही. शेवटी त्यांनी जुजबी ओळखीमुळे डॉ. होगाडे यांच्याकडे सोलापूरला नेले. त्यांनी आईला इंजेक्शनचा कोर्स दिला. रात्ररात्र खोकून तिचा आवाज बसायचा. हे चार-पाच इंजेक्शन दिल्यावर खोकला हळूहळू कमी व्हायचा. नंतर कळले की ते पेनिसिलिन सारखे घातक स्टेरॉईड होते. तिच्या ओठात मुंग्या यायच्या. डोळ्यावर झापड यायची आणि पुढे कामांचा डोंगर! पुढे आजोबाच हे इंजेक्शन विकत घेऊन गावातल्या काही काळ कंपाउंडरकी केलेल्या गुंडूमामाला द्यायला लावायचे. मरताना आजोबांनी गुंडूमामाला बोलावून सांगितलं होतं की, 'माझ्या माघारी तुझ्या बहिणीला तूच वाचून शकतोस. तिच्याकडून एक रुपयाचीही अपेक्षा करू नको.' असं वचन घेऊन दहा व्हायल त्यांच्याकडे दिल्या होत्या. गुंडूमामांनी ते जिवंत असेपर्यंत हे वचन पाळले. त्यांची बायको आईला दाळ-जवारी मागायची. आई गुंडूमामाला कळू न देता तिला धान्य द्यायची.
   तर ह्या खोकल्यानं, कामाच्या रगाड्यानं आधीच लहानखुरी असलेली आई अगदीच काटकुळी दिसायची. तिचे गालफडं बसलेले. वडील शेतात राबून असेच गालफडं बसलेले. पण त्यांचा मूळ बांधा मध्यम व सशक्त आहे. आईची मला फार कीव यायची. तिला आम्ही तीन लेकरं. मी थोरला. पाठीवर भाऊ. मग बहिण. माझे पितृघराने खूप लाड केले. माझ्या लाडाइतकाच आईचा दुस्वास केला. दमेली, रोगेल अशा शब्दांनीच तिचा उल्लेख व्हायचा. आम्हा भावंडासमोरही. आईने साधी भांडी आपटली तरी सगळे भाऊंपुढे किरकिर करत. मग भाऊ वैतागून तिला जनावरासारखं मारायचे. घरच्या जिव्हारी लागणाऱ्या बोलण्याला वैतागून आई मला जनावरासारखं मारायची. इकडचे आजोबा (आप्पा) म्हणजे देवमाणूस. ते माझी आईच्या तावडीतून सुटका करत. 'चमी, जीव घेतीस का लेकराचा?  सोड नाहीतर काठीच घालीन पाठीत.' असं आप्पांनी म्हटल्यावर मी रडत असतानाही मला आनंदानं हसू यायचं. असा सगळा देखावा.
       माझ्या भावाच्या जन्मानंतर खूपच बंडाळ सुरू झाली.एका आत्याचं लग्न झालेलं. लेकराला दुधही मिळेना. आईचा जीव अर्धाअर्धा व्हायचा. मग आईने भीतभीत 'मी कामाला जाऊ का?' असं भाऊंना विचारलं भाऊ भडकले. "इज्जत घालवायचाय का घराची? आज्याबात जायचं नाही.' असं म्हणून तिला गप्प केलं. तरी ती न जुमानता एके दिवशी आयाबायांसोबत कामाला गेलीच. बाप  बिघडून बसला. घरात येऊ नको वगैरे रामायण झालं. हळूहळू विरोध मावळत गेला. टोमणे खात आई काम करून घर भागवू लागली. शेतमालक आईला कामाला आलेली बघून हळहळायचे, 'आरेआरे! चांगल्या घरचं लेकरू हाय. बापानं ऊन बघू दिलनी. येतंय का बाई तुला काम?' म्हणायचे. आईनं आम्हा लेकरांसाठी मान-अपमान सोडून दिला. मी शिकून मला नोकरी लागेपर्यंत आईची मजुरी सुरूच राहिली. घरालाही सवय झाली.
        आई केटी बंधाऱ्याच्या कामावर होती. मी आठवीत असेन. आत्याकडे शिकायला होतो. सुट्टीत गावाकड आलतो. तिची भाकर घेऊन गेलो. गाळाचे जड टोपले उचलून वरच्या बाईकडे द्यायचं तिचं काम. तेही अवघड, ओल्या निसरड्या जागेत उभारून. खोकत-खोकत तिचं काम सुरू.  ओझ्यानं पोटातली गाठ सरकून तिला परसाकड लागलेली. अधून-मधून परसाकडला जात काम करत होती. तिच्या मैत्रिणी तिची अवस्था बघून स्वतः अवघड जागेत थांबून तिला सोप्या जागेत थांबवायच्या. मला बघून तिच्या केविलवाण्या डोळ्यात आनंद. मला माझीच लाज वाटली. नंतर आई आणि भाऊ दोघंही वीटभट्टीच्या कामावर जाऊ लागले. भाऊंची मजुरीची ती पहिलीच वेळ. आधी कुळवून पेरून द्यायचे. भाडे मारायचे. पण दुष्काळी परिस्थितीने ते दोघे एक झाले. पुढे भाऊ विहीर फोडायच्या कामावरही गेले. बहात्तरच्या दुष्काळात भाऊंनी काम केले होते. खूप वर्षांनी त्यांना ही वेळ आली पण आई रूळून गेली होती. आईचं कामावरून कौतुक केलं की भाऊंना राग येतो. त्यांचा स्वाभिमान दुखावतो. 'मीबी लई काम केलाव गा! काम करून माझे हाडं कुट्ट झालते.' असं म्हणतात.
      आईनं कितीही मारलं तरी मला तिचा कधीच राग आला नाही. ती कामाला गेल्यावर तिच्या मागे कूट खाणाऱ्या घरातल्यांचा यायचा. आप्पा सोडून.
    ती निरक्षर आहे तरी तिला पैशांचा हिशेब जमतो. घड्याळातली वेळ जवळपास ओळखते. आता तर मोबाईलही वापरते. तिचा गळा गोड आहे. बुद्धी तल्लख आहे. मी म्हणतो, 'तू शिकली असतीस तर निदान मास्तरीन तर झाली असतीस.'  ती खूश होते. भाऊ हुशार आहेत. दोघांची स्मरणशक्ती तल्लख आहे. त्या स्मरणाधारे त्यांच्या जुन्या उखाळ्यापाखाळ्या निघतात. भांडण पेटते. आम्ही मजा घेतो. घरात तीन नोकरदार आहेत. भाऊंना त्यांच्या गेलेल्या शेताचे पैसे आलेत. तिची हाऊस आता तेच फेडतात.
     बाप मेल्यावर माहेर तुटलं. एक जीव लावणारा नागूमामा त्याच्या लग्नाआधीच करेंट लागून मेला. माय, भाऊ, बाप मेल्याचं दु:ख तिनं पेललं. आता एक भाऊ आहे पण नावालाच. कोरडा. माया नाही. तरी आई बळंनच जाऊन त्याला राखी बांधून येते. कुठलीही अपेक्षा ठेवत नाही. नणंदांची बाळंतपणं केली. सासू पडून असताना तीन वर्षे तिची सेवा केली. हगणं-मुतणं-आंघोळ-खाऊ घालणं सारं केलं. राग ठेवला नाही. सासऱ्याची अशीच तीन वर्षे सेवा केली. घर-शेत-मजूरी करत हे सारं केलं. आता म्हणते, 'त्येंचाच अशीर्वाद हाय. मनून माझं समदं चांगलं झालं.'
       तिला खोटेपणाची भयंकर चीड आहे. कुणी खोटेपणा केला की, ती शिव्याश्राप द्यायची. म्हणून तिला बरेचजण वचकून असत. समदं गाव तिचं कौतुक करतं. 'लई खट्टे खाल्ल्याय. तिला संबाळा.' असं कुणीबी म्हणतं.
 'आशिलाचं होतं म्हून
नांदून केलं नाव
माय नवाजतं तुला
सारं जकेकूर गाव'
     आजीही मूळची वाईट नव्हती पन कानानं जरा हलकी होती, असं ती सांगते. मी नोकरीला लागल्यावर तिची मजुरी बंद केली. चुलते आधीच वायलं निघाले होते. घरच्या शेतात ती अजूनही राबते. मी रागावलो की म्हणते, 'काम केल्यावरच आन गोड लागतंय. काम केल्यानं मरतनी. आंग हाळू होतंय.'  तिचा खोकला वेळच्या वेळी आधुनिक उपचार केल्याने कमी होतो. तरी ती अधूनमधून येतो. मी विचारल्यावर म्हणते, 'पैलंसरका तर नाही की! रातरात झोपू द्यायचा नाही.'
      मी नोकरीला लागल्यामुळे भाऊही शिकून नोकरीला लागला. सगळ्यांची लग्नं झाली. घर सावरलं. सुनाही समजूतदार आहेत. तिला समजून घेतात. काळजी घेतात. गावाकड भाऊ, धाकटा ल्योक, सून, नातू यात ती रमून गेलीय. मी नोकरीनिमित्त जरा दूरच्या गावी राहतो....
      गावाकडून शेवटची बस येते. चौकातल्या हाटेलाच्या बाकड्यावर बसून वेड्यासारखं मी उतरणारे प्रवासी निरखीत राहतो. उतरणार्‍या बायांमध्ये आई दिसल्याचा भास होतो. ती येईल अचानक न सांगता. सप्राईज देण्यासाठी. असं वाटत राहतं. पण आईसारखी दिसणारी बाई उतरून वेगळ्याच दिशेनं चालू लागते.             
    गेल्या खेपेला ती अशीच आली होती. पाट फुटून वाहणाऱ्या पाण्यासारखं. दावं तोडून येवं गाईनं तशी आली. 'नातीला बघू वाटलालतं म्हणून आलेव.'  म्हणाली. आनंदलो. दोन दिवस घरात सणासारखं गजगज वाटलं. ती बाहेर गेली असताना पोरीला म्हणालो, 'आज्जी गेली गावाकड.' दोन वर्षांची लेक धावत आतल्या खोलीत गेली. तिची अडकवलेली पिशवी बघून पळत येऊन मला म्हणाली, 'आज्जी गेलनी... आज्जीची पिशवी हाय तित्तं.'
     तिचं मन दोनचार दिवसात उच्चाट खातं. खळेदळे, कामंधामं उरकते. येईन पुन्हा अजून चार दिवस म्हणून ती जाते. पण काय खरं नसतं. आतल्या खोलीतल्या मोळ्याला आता तिची पिशवी नसते पण लेक रोज तिच्याचविषयी बोलत राहते.
                   ---------------------------

 पूर्वप्रकाशित- वाघूर 2017  (दिवाळीअंक) आभार: नामदेव कोळी
चित्र साभार: श्रीधर अंभोरे.

कथा

सुक ना दुक

गनामामाला सगळं गाव नेता म्हनायचं. गावात कुठला पुढारी आला, परचारसबा आसली की, गनामामा हार घालायला सगळ्यात पुडं. इस्टेजवर खुडचीत गनामामा ...

उपशीर्षक