सोमवार, ९ जुलै, २०१८

गाव



गावात काय? गाव तो गाव. माझा गाव नक्की कुठून सुरू होतो, नक्की ठरवता येत नाही. गावाची वेस पडकी. हरेक गावच्या वेशी पडक्याच का? हे मला न सुटलेलं कोडं आहे. माझं गाव पांढऱ्या मातीचं म्हणून 'गावपांढरी'. (गावपंढरी नव्हे) आता आमचे गावकरी म्हणजे एक नंबर इर्रसाल! त्यांच्याच नजरेतून गावाची समीक्षा: 'ह्या पांढरीत कोण उबदऱ्या आलंय गा?' खरंच आमच्या गावात आजवर कोणीच वर आलं नाही. चुकून वर आला रे आला, थोड्या दिसातच पार रसातळाला गेलाच म्हणून समजा. पायली भरायला उशीरच लागतनी. असं ह्ये नंबरी खेक्कड गाव.
      माझं गाव एका लहानशा वळणदार नदीकाठी वसलंय. पण नदीला नावच नाही. अनेक नामकरण विधी होतात; पण नदीचं नामकरण करायला कुणीच तयार नाही. मीच नदीचं बारसं केलं: 'चंद्रगंगा' अजून हे नाव मी कुणालाच सांगितलं नाही. ही गोष्ट नदी आणि मी दोघातच आहे. का? बापरे! लोकांना हा प्रकार कळला तर तेच माझं 'येडं भास्कऱ्या' असं नामकरण करतील हो!
     माझा गाव अर्धा उमाटावर अर्धा गारीत वसलेला. वरली आळी. खाल्ली आळी अशी गल्ल्यांना नावं त्यामुळेच पडलीत. माझ्याही गावात बक्कळ देवळात बक्कळ देव निवास करतात.माझ्या गावातही नियमाप्रमाणे म्हारूतीचं देऊळ वेशीबाहेरच आहे. शिवारात हिराई, सटवाई आदि महान देव्या निवसन्ति। गावात एक मशीद व एक बौद्धविहारही आहे.
    माझ्या गावात उत्खननात सापडलेल्या अनेक सुंदर मूर्त्या आहेत. मूर्त्यांना काव कुत्र्यांचा. कारण त्या उघड्यावरच आहेत. गावतील या प्राचीन अवशेषांवर लातूरच्या एका (हुशार) प्राध्यापकानं पीएचडी केल्याचंही ऐकिवात आहे. त्याने पुरातत्व खात्याला पत्र पाठवून या सांस्कृतिक ठेव्याची माहितीही दिली होती म्हणे! मूर्त्या न्यायला गावात ट्रक आले; पण काय बिशाद आहे त्यांची मूर्त्या न्यायची? सारा गाव एक झाला. हात नाही लावू दिला. हे एक बरं झालं. मूर्त्या वस्तूसंग्रहालयात ठेवायला पळवल्या असत्या; तर आमच्या गालफुग्या कशा नीट झाल्या असत्या? मूर्तीच्या तोंडाला काव फासून, देवाचं तोंड लाल करून; गालफुगीवर तो काव लावला की रोग दुरूस्त. माझी गालफुगीही एकदा याच प्रकारानं ठीक झाली. आता गुण दगडाचा, देवाचा की कावाचा? एक त्या मूर्तीला अन् दुसरं त्या गालफुगीलाच ठावं.
      गावापासून एक-दीड किमी अंतरावर एक दर्गा आहे. त्याला हिंदू-मुस्लिम सगळे भंजतात. मुस्लिम त्याला 'राजाबक्सार' म्हणतात, तर हिंदू 'राजेभास्कर' म्हणतात. मुस्लिमांचं मत की तो त्यांचा 'पीर' आहे. हिंदूंचं मत की, कबरीखाली शिवलिंग आहे. तरी यावरून कधीच मोठा वाद झाला नाही. मला वाटतं की, ती सूफी संताची कबर असावी. पूर्वी दर्ग्याच्या भोवती बारा एकरांवर घनगर्द झाडी होती. हे आमचं 'मिनी जंगल'. माझ्या लहाणपणी भर दिवसाही दर्ग्यात जायला भीती वाटायची. तरी साताठ पोरं मिळून कवठं, सिताफळं आणायला जायचोच. आता दर्गा ओसाड दिसतो. लोकांनी सरपणासाठी झाडं तोडून दर्ग्याची वाट लावली. दर्ग्यात दर गुरूवारी कंदुरीचा नवस फेडण्यासाठी अफाट गर्दी असते. आधीच माल मारून आलेले काही लोक कंदुरीचं जेवण करून वाटेवरच्या आमच्या शेतातल्या आंब्याखाली येऊन लुडकतात. शाकाहारी लोक दर्ग्यात मलिदा-भाताचा निवद दाखवतात.
       पहाटे मशिदीतील अजाँने उठणारा माझा गाव रात्री देवळातल्या भजनानंतर झोपी जातो.
         गावाला एक पाणंद आहे. लोक परसाकडला तिकडंच जातात. बायका अलिकडे. पुरूष थोडं पलिकडे. येणाऱ्या-जाणाऱ्या पुरूषांमुळे बायकांना अवघडंन उठून उभारावं लागतं. प्रत्येक गावात ही ठरलेली गैरसोय. माझा गावही याला अपवाद नाही. आताशा शासनाच्या 'हगणदरीमुक्त गाव' धोरणामुळे पाणंदीकडची वर्दळ बरीच कमी झालीय.
  पूर्वी गावात एकच जिल्हा परिषदेची शाळा होती. आता एक खासगी माध्यमिक शाळा आणि एक आश्रमशाळाही सुरू झालीय. आता गावची मुलं गावातच शालेय शिक्षण घेतात. आम्ही आठवीला   एसटीनं उमरग्याला जायचो. कुणी सायकलवरून जायचं.
      गावेत पूर्वी इस्पट चालायचं पण चोरून. रानारानानं. मध्यंतरी ते हाॅटेल-कम-क्लबातून चालायचं. आता हा प्रकार कमी झालाय. आमच्या लहानपणी सोंगट्यांचा (सारीपाट) खेळ रात्ररात्रभर चालायचा. तोडी होईपर्यंत.
      पूर्वी गावात एकच पक्ष होता. आता बरेच पक्ष आलेत. प्रत्येकाची कार्यालयं वेगळी. गावाबाहेर कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्या तशा पक्ष व संघटनांच्या पाट्यांची गर्दी आहे. उलट कुत्र्याच्या छत्र्या उगवायचं आता कमी झालंय.
    गावात इतर कंपलसरी सणांसोबतच काही वेगळे सण-समारंभही परंपरेने साजरे केले जातात. उदाहरणार्थ हरिनाम सप्ताह, मोहरमचे पीर बसवणे. यानिमित्त फैतरा हा खेळ खेळणे, कारवनी (बैलांचा सण), येळवस, दर्ग्याची जत्रा, बिरूदेवाची जत्रा इत्यादी. गावात जयंत्यामयंत्याही उत्साहात साजऱ्या होतात. पूर्वी शिवजयंती व भीमजयंतीला हमखास मारामाऱ्या व्हायच्या. वातावरण तंग असायचं. आता लोक शहाणे झालेत. एकमेकांच्या जयंतीत  सहभागी होतात. शिक्षणाची किमया.
     पूर्वी गावात हातभट्टी काढली जायची. गावातले लोक गोळा करून सहज खडा मारला तर तो बेवड्यालाच लागावा, इतके प्रमाण होते. एक दक्ष फौजदारामुळे गावातून हातभट्टी निर्मूलन झाले. तरी बेवडे आजूबाजूला जावून भागवतात; पण प्रमाण कमी झालंय.
    गावातून राष्ट्रीय महामार्ग जातो. सडकेला पानटपऱ्या व हाॅटेलांची संख्या वाढलीय. प्रत्येक टपरीवर बेकार पोरांचा एकेक ग्रूप मावा चघळत व थूंकत कायम पडीक असतो. गावात चांगलं शैक्षणिक वातावरणच नाही, त्यामुळं बेकार जास्त. मग पोट भरायचे तीनच पर्याय एक पुणे- मुंबई, दुसरा पानटपरी लावणे, तिसरा ऑटोरिक्षा चालवणे. हे तीनही न जमणाऱ्याला गावात बेकार म्हणतात. गावाला सुपीक जमीन असूनही अनेकांना करणं होत नाही. तालुक्याचा गाव जवळ. रोजच दौरा.
      घरोघरी रंगीत टिव्ही आले. मोबाईल आले. वाटलं गावचा विकास झाला. कशाच काय न् फाटक्यात पाय. गाव आतून बकाल आणि दरिद्रीच आहे. गावच्या आरोग्याबद्दल तर बोलायलाच नको. विकास हा शब्द तर काहीच्या नावापुरता आहे. असो. माझा गाव शेवटी माझा आहे. मला तो प्रिय वाटतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गझल

   ये शहर मुझे रास न आया यूँ जिने का अहसास न आया क्या पाया क्या खोया मैने कोई भी तो पास न आया सबकुछ था फिर भी मुझ को  रहनसहन का मिजास न आया ...