मंगळवार, १७ जुलै, २०१८

पाऊसझड

मला पाऊस आवडतो पण पावसाळ्यातली चिकचिक, चिखलराडा, ओंगळघाण आवडत नाही. जीव वैतागतो.
      उन्हाळ्यात अचानक अवकाळी पाऊस गाठतो. तापलेल्या मातीवर पडलेल्या पहिल्या सरींनी मातीला सुटलेला खमंग वास छाती भरून घ्यावासा वाटतो. अनेक फुलांचे, अत्तरांचे सुगंध घेतले पण पहिल्या पावसानं मातीला सुटलेला गंध सर्वांत श्रेष्ठ वाटतो.
    अवकाळी(वळवाचा) पाऊस, आषाढातला पाऊस, श्रावणातला पाऊस, भादातला पाऊस... किती वेगळेवेगळे...
   अवकाळी पाऊस मनाची मरगळ धुवून काढतो. मिरगाचा पाऊस मनात उल्हास, स्वप्नं पेरतो. झडीचा पाऊस अंतर्मुख करतो. अंगात आळस भरतो.
   पाऊस कधी नुसताच पहावा. कधी अंगभर गोंदून घ्यावा. पाऊस एकसारखा नसतो. तसं पावसाचे आवाजही एकसारखे नसतात. कोरड्या रानावर पडताना होणारा टपटप्....नंतर सडडड्...असा आवाज. पत्र्यावर पडताना होणारा हलगी वाजवल्यासारखा आवाज, पाऊस थांबल्यावर ओघळणाऱ्या थेंबांचा होणारा टिबुक...थिबुक असा आवाज. ओढ्यानाल्यातून वाहताना होणारा खळखळाट...
      पाऊस ढगांचा गडगडाट, विजांचा चमचमाट करत येऊन दिपवून जातो. दहशतही घालतो. पाऊसच इंद्रधनुष्याची किमया करतो. इंद्रधनुष्य हा फारच पुस्तकी शब्द झाला. आम्ही त्याला धामीनकाठी म्हणायचो.
       दारापुढील वळचणीच्या सोन्याचांदीच्या धारा पुढं बोरकरांच्या कवितेत सापडल्या. उन्हात पाऊस आला की आम्ही कोल्ह्याचं लगीन लागलं म्हणून नाचायचो.
   ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा
   पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा
 असं म्हणत अंगणात गिरक्या घेत आपण मोठे झालो.
     उन्हाळ्यात भरपूर आंबे खाऊन कोया उंकड्यावर टाकल्यामुळे पावसाळ्यात उकंड्यावर आंब्याची भरपूर रोपं यायची. कोवळी चाॅकलेटी पान असलेली रोपं उपसून खालच्या मऊ पडलेल्या कोया दगडावर घासून आम्ही त्याच्या पुंग्या करून वाजवत फिरायचो. गोगलगाईच्या चंदेरी रस्त्यांचा शोध घेत फिरायचो.
      पाऊस कधी पिकाला आंजारत गोंजारत येतो तर कधी पिकाला आडवं पडेपर्यंत तुडवतो.. प्रत्येक नक्षत्राचा पाऊस वेगळा...त्यानुसार म्हणीही तयार झाल्या.
 वानगीदाखल-
पडला हस्त तर कुणबी झाला मगरमस्त.
पडल्या चित्ती तर उतरतीला भीती.
पडतील सायीसाती तर पिकतील माणिकमोती.
पडल्या मघा तर चुलीपुढी हगा,
नाही पडल्या मघा तर आभाळाकड बघा.
    झडीचा पाऊस तर अंतच बघतो. झड लागल्यावर बाहेर कामच नसेल तर मज्जा वाटते. वाकळ पांघरून, पाय पोटात घेऊन पडून रहावं. चुलीवरच्या भुगण्यात चहाचं आधण ठेवलेलं असावं... पण असं होत नाही. झडीतच जास्त कामं निघतात. बाहेर पडावंच लागतं.. टपरीवच्या उकळणाऱ्या चहाचा सुगंध थेट नाकात घुसतो..
    जळण, गवऱ्या भिजल्यानं आईची चुल पेटायला सळायची. वल्ल्या गवरीनं धुपन होऊन घर धुरानं भरून जायचं. मोठ्या पावसातही न गळणारं घर भिजपावसात गळायचं. भिंतीना वलगरा चढून पोपडे पडायचे. दाराला पोत्याचं घोंगतं अडवलेलं असायचं. बाहेर जाणाऱ्याने ते पांघरून जायचं आणि बाहेर गेलेला येईपर्यंत बाकीच्यांनी त्याची वाट बघायचं. झडीत लघवीला जोर. चिखलात संडासला जायचं तर जीवावरच येई.
    झडीतही जनावरांना वैरणपाणी करायला बापाला शेतात जावंच लागायचं. बाप काकडून जायचा.
     बालपणी ढगाच्या गडगडाटाला मी घाबरायचो तेव्हा आजी म्हणायची, 'भिऊ नकू! आबाळात म्हातारी दळलाल्याय. तिच्या जात्याचा आवाज हाय.' मी विचार करायचो: म्हातारी दळत असेल तर खाली पीठ पडलं पाहिजे. मग पाणी कसं पडतंय? मग वाटायचं: म्हातारी बर्फाचे खडे दळत असेल. आज या गोष्टीचं हसू येतं.
       शेतातल्या कोट्यात जनावरांसोबत बसून शेणामूताचा वास घेत रानावरची झड बघण्यातला आनंदच निराळा...
      झडीत काॅलेजला जाताना वह्या शर्टखाली पोटात खुपसून जायचो. स्लीपरमुळे पाठीमागे पँटशर्टवर चिखलाचे शितोडे उडालेले असायचे.
         सहवासाने पाऊस संगीत वाटतो तर विरहात विद्ध करतो. छत्री नेल्यावर पाऊस येत नाही. विसरली की हमखास येतो. हे आधीच एका लेखकानं नोंदवून ठेवलंय. खरंय.
   पाऊस कधी बाजिंदा वाटतो. कधी हेक्काडी, कधी धटिंगन तर कधी अवचिंद वाटतो.
    पाऊस आवडतो तरी मी त्याच्या गुणदोषांसकट त्याला स्वीकारत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्यांच्या होरपळीची गाथा: ‘वीजेने चोरलेले दिवस’

       'वीजेने चोरलेले दिवस' ही संतोष जगताप यांची एका ज्वलंत आणि वेगळ्या विषयावरची कादंबरी नुकतीच दर्या प्रकाशन, पुणे यांच्याकडून आल...