शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८

अनिकेत पाहुणे



 आम्हाला तिसरीला 'वासुदेव' ही कविता होती.
  'मोरपिसांचा टोप घालुनी
   टिल्लिम टिल्लिम टाळ वाजवित
   वासुदेव आला...
   मुखी हरीचे नाम गर्जितो...
   प्रभातकाळी थयथय नाचत स्वारी आली' अशा काही ओळी आठवतात. माझ्या बालपणीही वासुदेव कधीतरीच यायचा. उशीरा उठायचो त्यामुळे त्याची गाठ पडायची नाही. एकदा तो योग आलाच. मग मीही लहान टाळ एका हाताला त्याच्यासारखं गुंडाळून, डोक्यावर टोपी घालून घरी नक्कल करू लागलो. अभंग तर हुबेहूब त्याच्याच ठेक्यात म्हणायचो. कौतुक करून घ्यायचो.
      मरगम्मा (कडकलक्ष्मी) आणि पोतराजांची खूप भीती वाटायची. आत लपून बसायचो. मरगम्माच्या ढोलकीचं गुरगुंsपांग  गुरगुंsपांग ऐकू आलं की पोटात भीतीनं गोळा यायचा, आणि तो आवाज आपल्याच पोटातून येतोय असं वाटायचं. पोतराजाचं चाबकानं स्वतःवर आसूड ओढणं आणि त्याच्या पायातल्या घुंगरांचा आवाज भयानक वाटायचा.
     मसणजोग्यांनाही खूप भ्यायचो. त्यांचा रंगीबेरंगी विचित्र पोषाख, हळदी कुंकवाच्या रेघोट्या ओढलेला भेसूर चेहरा. एका हातात काठी, एका हातात घंटा आणि काखेत झोळी असा अवतार! गावातली कुत्री यांना पाहून जोरजोराने भुंकत. काठी त्यासाठीच घेत असावेत. कुणीतरी सांगितलेलं की, मसणजोगी मंत्र मारून लहान मुलांना चिमणी किंवा कावळा करून झोळीत घालून घेऊन जातात. मग काय? घाबरगुंडी. नुसतं बघायलाही भ्यायचो. त्याच्या नजरेस पडू नये म्हणून आत सांदाडीला जाऊन बसायचो.
   पोपटवाले जोशी भविष्य सांगताना फार चटपटी बोलायचे. बाया तर फार लवकर यांच्यावर विश्वास ठेवायच्या.
  'तुझं मन लई मोठं हाय माय. मनानं लई चांगली हाईस. तुजं मन कळनाऱ्यालाच कळतं. दुसऱ्यासाटी तू लई करतीस पन तुजी कदर कुनालाच नाही. तुज्या हातचं मीट आळनी हाय माय' त्यानं असं म्हणलं की, बाया पदर डोळ्याला लावत.
 'खरं हाय बाबा' म्हणून पसापायली धान्य जास्तच वाढायच्या. हे जोशी मनकवडे असतात. त्यांना आपल्या मनातलं सम्दं कळतंय, असं बोललं जायचं. 'तुला तीन पोरं आनी दोन पोरी हायत' असं परफेक्ट सांगून ते थक्क करीत. एका जोश्यानं भविष्य सांगत सांगत आमच्या वडलांना 'तू तुजं रगत तुज्या डोळ्यानं बगून मरनार हायस' असं म्हटल्यामुळे वडील कुठं गावाला गेले की, माझ्या मनात   काहूर दाटून येई.
 काळा कोटवाले जोशी सनई फार छान वाजवित. ऐकत रहावंसं वाटे.
   गावात नंदीवाला आला की, आम्ही पोरं त्याच्या मागे गावभर फिरायचो. यामागे उत्सुकती अशी की, नंदीबैल गुबूगुबू मान हलवून सगळ्यांनाच होकार देतो की नाहीही म्हणतो, ते बघावं. असे दोन नंदीसारखे भव्य बैल आपल्याही शेतात असावेत असं वाटायचं.
   दरवेशीही वर्षातून एकदा न चुकता गावात यायचा. त्याचं ते केसाळ अस्वल तो सांगेल तसं वागताना पाहून त्याच्या धाडसाचं कौतुक वाटे. आजी दरवेशाला सूप भरून जवारी वाढायची. त्याचं अस्वलाची वेसण खेचणं, कायम दंडुक्यानं मारणं बघून अस्वलाची दया यायची. आजी दरवेशाकडून पेटी घेऊन आमच्या गळ्यात बांधायची. या बारक्या पेटीत दरवेशी अस्वलाचे केस मंतरून घालतो. त्यामुळे भीती वाटत नाही. भूतबाधा होत नाही. अशी लोकांची भाबडी कल्पना.
   गावात येणारे आणखी एक डेंजर पाहुणे म्हणजे गारूडी. आम्ही त्यांना सरपवाले म्हणतो. वेताच्या टोपलीतला साप बघून काळजाचा ठोका चुकायचा.
   बालपणी कशाकशाला भ्यायचो हे आठवून हसू येतं. पोलीसांना बघून आम्ही गांडीला पाय लावून पसार व्हायचो. ते पोलीस म्हणजे राईंदर! हे पोलीस हसवतात हे कळल्यावर त्यांचं बोलणं ऐकायला मज्जा येऊ लागली.
 'हं! चला काकू लग्नाला चला
  लेकरं बांधा खुट्टीला
   कुत्रे घ्या काखंला
चला चला लग्नाला चला'
  'कुटं हाय सायेब लगीन?' असं कुणी विचारलं की,
'खाली गेल्यावर वरीच हाय. एक्कावन वाजून बावन मिंटाला आक्षता हायत्या. नवरा नांदायला जायला नगं मनून रडलाला, पळून चालला तर गोळ्या घालायला हे पिस्तूल आनलाव.' असं काहीबाही  बोलून, घराबाराला हसवून, मूठपसा घेऊन हा राईंदर नावाचा खोटा पोलीस झोळीचं ओझं पेलत, काठी आपटत निघून जाई. दुसरीकडे आणि वेगळंच काहीतरी बोलून हसवत फिरत राही. विनोदाची चांगली जाण आणि हजरजवाबीपणा हे त्याचे विशेष गुण. आता टिव्हीवर विनोदी कार्यक्रमात विनोद करण्यासाठी साडी नेस, मुलीचा ड्रेस घाल असे कितीतरी सायास केले जातात तरी हसू येत नाही. राईंदर संवादातून विनोदाची पखरण करायचा.
   'सूयाsपिनाs केसाsवरsयss' अशी बोहारणींची विशिष्ट लयीतली आरोळी ऐकू आली की, आमची तायडी पळत येऊन आईला सांगायची. मग आई खिळपटात जमा केलेले केस देऊन टिकल्या, पिना इ. घ्यायची. मुलींनाच यात इंटरेस्ट! माझं लक्ष त्यांच्या पाठीला बांधलेल्या झोळीतल्या टुळटुळ बघणाऱ्या लेकरांकडे जायचं. आई त्यांना भाकरी कालवण खायला द्यायची. तिथंच खाऊन गटगट पाणी पिऊन या बाया पुढे जायच्या.
   गावात कधीकधी डोंबारी यायचे. ढोल वाजवणं, तारेवर चालणं, उलट्या उड्या मारणं. जाळ लावलेल्या गोल तारेतून माकड्याच्या उड्या मारणं, रचलेल्या बाटल्यांवर उभं राहणं, उभी मातीतली सुई पापण्यांनी उचलणं, केसांनी गाडी ओढणं अशा अचाट कसरती डोळे विस्फारून टाळ्या पिटत बघताना भान हरपून जाई. त्यांना काहीतरी द्यावं असं खूप वाटायचं पण चड्डीच्या खिशात पाच पैसेही नसायचे. फुकट खेळ बघून अपराधी मनानंच घरी परतायचो.
   दारावरच्या एका पाहुण्याला आमच्या घरी खूप मान होता. ते म्हणजे दत्तसंप्रदायी भगवी कफनी आणि हातात शेर घेऊन भिक्षा मागणारे संन्यासी. त्यांनी घरी बोलावून आजी चहा पाजायची. काही महाराज घरोघरी नावानं हाका मारायचे.
  ' कुठं गेले बाबाराव? आहेत का? ' म्हणतच दारात प्रकटायचे.
   झाडावर झोपणारा पांगूळ वगैरे मी बघितले नाहीत. ते आमच्याही पिढीआधीच अस्तंगत झाले. घिसाडी रबरी फुग्याचा भाता लावायचे. घिसाडणी कोळसा मागायला यायच्या. फासा खुरपे शेवटून द्यायचे. फुटके टोपले, घागरी नीट करून द्यायचे. घिसाडी, फासेपारधी यांची पालं तर आमच्या शाळेमागच्या मैदानातच पडायचे. त्यांचं पालातलं ऊन-वारा-पावसातलं जगणं बघून गरिबीतही आपण खूप सुखी आहोत, असं मनोमन वाटायचं. पालात चितरं, होले हीच मेजवानी असायची. मासाचे तुकडे उन्हात वाळत घातलेले असायचे. भूकेची बेगमी करून ठेवत.
   साच्यात मूर्त्या करून देणारे, गाढवावर दगडी खलबत्ते, उखळ विकणारे, लाकडी रव्या, चाटू, मुसळ करून देणारे, चिंध्यांचे दोर वळून देणारे, कात्री-विळा-खुरप्याला धार लावून देणारे, सुटकेस घेऊन मोती विकत फिरणारे मोतीवाले, एक हात कमरेवर ठेवून त्यावर चादरी-सतरंज्याचा भार पेलत विकणारे, तेलाच्या डब्याच्या कोठ्या तयार करून देणारे, स्टो रिपेरीवाले, असे कितीतरी फिरस्ते यायचे.
      मेंढ्यांचे कळप घेऊन धनगर यायचे. त्यांच्या बायका तीन दगडांच्या चुलीवर पातळ भाकरी सराईपणे करायच्या. खतासाठी रानात मेंढ्या बसवल्या जायच्या. धनगर किराना मालासाठी गावात यायचे. कैकाडी दुरड्या, सुपं, डाली आणायचे.
   असे अनेक अनिकेत पाहुणे वर्षानुवर्षे ठरलेल्या काळात न चुकता यायचे. गावोगावी त्यांच्या ओळखीही असायच्या. जुने लोक मायाळू होते. पसापायली द्यायला हात अखडत नसत. आता चुकून एखादा फिरस्ता मागायला आला तर अक्षरशः त्याला हाकलून दिले जाते. थोड्याफार भटक्या-विमुक्त जातीही आता स्थिरावल्या आहेत. त्यांच्यातही आता शिक्षणामुळे थोडीबहुत प्रगती झालीय. पण जी गावं त्यांना आधार द्यायची, तीच गावं आतून बकाल झाली आहेत. शेतकरी पार भिकेला लागलाय.
( फोटो: सौजन्य इंटरनेट)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गझल

   ये शहर मुझे रास न आया यूँ जिने का अहसास न आया क्या पाया क्या खोया मैने कोई भी तो पास न आया सबकुछ था फिर भी मुझ को  रहनसहन का मिजास न आया ...