शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

काही कविता


इरजोड

ठकलेला एक बैल अखेर त्यानं
खसगीच्या बाजारात इकला
अन येताना घेऊन आला
बाब्याला पाटी , म्हराटीचं पुस्तक, मांजरपाटाचं कापड, धोतर, चिवडा वगैरे

मिरगाचा पाऊस पडला
रानानं हिरवी साय धरली
तवा हाल्याला तिफनीला जुपून
त्यानं इरजोड पेरनी येडीवाकडी पार पाडली

आन् पोळ्याच्या दिवशी एकच बैल घेऊन
अवगुण्यासारखं
गावभर मिरवून आला.
        ...........

          'कोरडवाहू'मधून
___________________________________
   
  नामानिराळा
 
शेतकरी एकवेळ आपला संसार मोडील
पण बैलबारदाना मोडत नाही
तरीही
कर्जात शेताचं एक तुकडं आणि बैलबारदाना विकून
नामानिराळा झालेला बाप
कुणबिक आणि कुणबीपण मोडीत निघून
चावडीचा मेंबर झालेला बाप

विकलेल्या तुकड्यात पाय टाकत नाही
डोळे उचलून तिकडं पहात नाही
पोळ्याच्या दिवशी घराबाहेर पडत नाही
पुरणपोळीचा घास मोडत नाही

अशावेळी
बापाच्या नावाला कुणीही जात नाही
      ....
    याद
माय निवद दावते
बैल मातीचे करून
बाप पहातच नाही
खोट्या बैलांना फिरूनघ

येळवशीच्या सणाला
पाच पांडव करून
माय घरीच पूजते
बाप हिंडतो दुरून

माय जागविते याद
सण साजरे करून
याद शेताची बापाच्या
खोल मनात पुरून
..........

    -प्रमोद कमलाकर माने
       पूर्वप्रकाशित : कवितारती

६ टिप्पण्या:

  1. ग्रामीण भाषेतील भावस्पर्शी शब्द नेमक्या मर्मावर आघात करतात.ग्रामीण भाषेत भावनांना गुंफण्याची तुमची कला मनाला नेहमीच भावते गुरुजी.

    उत्तर द्याहटवा

गझल

   ये शहर मुझे रास न आया यूँ जिने का अहसास न आया क्या पाया क्या खोया मैने कोई भी तो पास न आया सबकुछ था फिर भी मुझ को  रहनसहन का मिजास न आया ...