मंगळवार, १७ जुलै, २०१८

पाऊसझड

मला पाऊस आवडतो पण पावसाळ्यातली चिकचिक, चिखलराडा, ओंगळघाण आवडत नाही. जीव वैतागतो.
      उन्हाळ्यात अचानक अवकाळी पाऊस गाठतो. तापलेल्या मातीवर पडलेल्या पहिल्या सरींनी मातीला सुटलेला खमंग वास छाती भरून घ्यावासा वाटतो. अनेक फुलांचे, अत्तरांचे सुगंध घेतले पण पहिल्या पावसानं मातीला सुटलेला गंध सर्वांत श्रेष्ठ वाटतो.
    अवकाळी(वळवाचा) पाऊस, आषाढातला पाऊस, श्रावणातला पाऊस, भादातला पाऊस... किती वेगळेवेगळे...
   अवकाळी पाऊस मनाची मरगळ धुवून काढतो. मिरगाचा पाऊस मनात उल्हास, स्वप्नं पेरतो. झडीचा पाऊस अंतर्मुख करतो. अंगात आळस भरतो.
   पाऊस कधी नुसताच पहावा. कधी अंगभर गोंदून घ्यावा. पाऊस एकसारखा नसतो. तसं पावसाचे आवाजही एकसारखे नसतात. कोरड्या रानावर पडताना होणारा टपटप्....नंतर सडडड्...असा आवाज. पत्र्यावर पडताना होणारा हलगी वाजवल्यासारखा आवाज, पाऊस थांबल्यावर ओघळणाऱ्या थेंबांचा होणारा टिबुक...थिबुक असा आवाज. ओढ्यानाल्यातून वाहताना होणारा खळखळाट...
      पाऊस ढगांचा गडगडाट, विजांचा चमचमाट करत येऊन दिपवून जातो. दहशतही घालतो. पाऊसच इंद्रधनुष्याची किमया करतो. इंद्रधनुष्य हा फारच पुस्तकी शब्द झाला. आम्ही त्याला धामीनकाठी म्हणायचो.
       दारापुढील वळचणीच्या सोन्याचांदीच्या धारा पुढं बोरकरांच्या कवितेत सापडल्या. उन्हात पाऊस आला की आम्ही कोल्ह्याचं लगीन लागलं म्हणून नाचायचो.
   ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा
   पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा
 असं म्हणत अंगणात गिरक्या घेत आपण मोठे झालो.
     उन्हाळ्यात भरपूर आंबे खाऊन कोया उंकड्यावर टाकल्यामुळे पावसाळ्यात उकंड्यावर आंब्याची भरपूर रोपं यायची. कोवळी चाॅकलेटी पान असलेली रोपं उपसून खालच्या मऊ पडलेल्या कोया दगडावर घासून आम्ही त्याच्या पुंग्या करून वाजवत फिरायचो. गोगलगाईच्या चंदेरी रस्त्यांचा शोध घेत फिरायचो.
      पाऊस कधी पिकाला आंजारत गोंजारत येतो तर कधी पिकाला आडवं पडेपर्यंत तुडवतो.. प्रत्येक नक्षत्राचा पाऊस वेगळा...त्यानुसार म्हणीही तयार झाल्या.
 वानगीदाखल-
पडला हस्त तर कुणबी झाला मगरमस्त.
पडल्या चित्ती तर उतरतीला भीती.
पडतील सायीसाती तर पिकतील माणिकमोती.
पडल्या मघा तर चुलीपुढी हगा,
नाही पडल्या मघा तर आभाळाकड बघा.
    झडीचा पाऊस तर अंतच बघतो. झड लागल्यावर बाहेर कामच नसेल तर मज्जा वाटते. वाकळ पांघरून, पाय पोटात घेऊन पडून रहावं. चुलीवरच्या भुगण्यात चहाचं आधण ठेवलेलं असावं... पण असं होत नाही. झडीतच जास्त कामं निघतात. बाहेर पडावंच लागतं.. टपरीवच्या उकळणाऱ्या चहाचा सुगंध थेट नाकात घुसतो..
    जळण, गवऱ्या भिजल्यानं आईची चुल पेटायला सळायची. वल्ल्या गवरीनं धुपन होऊन घर धुरानं भरून जायचं. मोठ्या पावसातही न गळणारं घर भिजपावसात गळायचं. भिंतीना वलगरा चढून पोपडे पडायचे. दाराला पोत्याचं घोंगतं अडवलेलं असायचं. बाहेर जाणाऱ्याने ते पांघरून जायचं आणि बाहेर गेलेला येईपर्यंत बाकीच्यांनी त्याची वाट बघायचं. झडीत लघवीला जोर. चिखलात संडासला जायचं तर जीवावरच येई.
    झडीतही जनावरांना वैरणपाणी करायला बापाला शेतात जावंच लागायचं. बाप काकडून जायचा.
     बालपणी ढगाच्या गडगडाटाला मी घाबरायचो तेव्हा आजी म्हणायची, 'भिऊ नकू! आबाळात म्हातारी दळलाल्याय. तिच्या जात्याचा आवाज हाय.' मी विचार करायचो: म्हातारी दळत असेल तर खाली पीठ पडलं पाहिजे. मग पाणी कसं पडतंय? मग वाटायचं: म्हातारी बर्फाचे खडे दळत असेल. आज या गोष्टीचं हसू येतं.
       शेतातल्या कोट्यात जनावरांसोबत बसून शेणामूताचा वास घेत रानावरची झड बघण्यातला आनंदच निराळा...
      झडीत काॅलेजला जाताना वह्या शर्टखाली पोटात खुपसून जायचो. स्लीपरमुळे पाठीमागे पँटशर्टवर चिखलाचे शितोडे उडालेले असायचे.
         सहवासाने पाऊस संगीत वाटतो तर विरहात विद्ध करतो. छत्री नेल्यावर पाऊस येत नाही. विसरली की हमखास येतो. हे आधीच एका लेखकानं नोंदवून ठेवलंय. खरंय.
   पाऊस कधी बाजिंदा वाटतो. कधी हेक्काडी, कधी धटिंगन तर कधी अवचिंद वाटतो.
    पाऊस आवडतो तरी मी त्याच्या गुणदोषांसकट त्याला स्वीकारत नाही.

सोमवार, ९ जुलै, २०१८

गाव



गावात काय? गाव तो गाव. माझा गाव नक्की कुठून सुरू होतो, नक्की ठरवता येत नाही. गावाची वेस पडकी. हरेक गावच्या वेशी पडक्याच का? हे मला न सुटलेलं कोडं आहे. माझं गाव पांढऱ्या मातीचं म्हणून 'गावपांढरी'. (गावपंढरी नव्हे) आता आमचे गावकरी म्हणजे एक नंबर इर्रसाल! त्यांच्याच नजरेतून गावाची समीक्षा: 'ह्या पांढरीत कोण उबदऱ्या आलंय गा?' खरंच आमच्या गावात आजवर कोणीच वर आलं नाही. चुकून वर आला रे आला, थोड्या दिसातच पार रसातळाला गेलाच म्हणून समजा. पायली भरायला उशीरच लागतनी. असं ह्ये नंबरी खेक्कड गाव.
      माझं गाव एका लहानशा वळणदार नदीकाठी वसलंय. पण नदीला नावच नाही. अनेक नामकरण विधी होतात; पण नदीचं नामकरण करायला कुणीच तयार नाही. मीच नदीचं बारसं केलं: 'चंद्रगंगा' अजून हे नाव मी कुणालाच सांगितलं नाही. ही गोष्ट नदी आणि मी दोघातच आहे. का? बापरे! लोकांना हा प्रकार कळला तर तेच माझं 'येडं भास्कऱ्या' असं नामकरण करतील हो!
     माझा गाव अर्धा उमाटावर अर्धा गारीत वसलेला. वरली आळी. खाल्ली आळी अशी गल्ल्यांना नावं त्यामुळेच पडलीत. माझ्याही गावात बक्कळ देवळात बक्कळ देव निवास करतात.माझ्या गावातही नियमाप्रमाणे म्हारूतीचं देऊळ वेशीबाहेरच आहे. शिवारात हिराई, सटवाई आदि महान देव्या निवसन्ति। गावात एक मशीद व एक बौद्धविहारही आहे.
    माझ्या गावात उत्खननात सापडलेल्या अनेक सुंदर मूर्त्या आहेत. मूर्त्यांना काव कुत्र्यांचा. कारण त्या उघड्यावरच आहेत. गावतील या प्राचीन अवशेषांवर लातूरच्या एका (हुशार) प्राध्यापकानं पीएचडी केल्याचंही ऐकिवात आहे. त्याने पुरातत्व खात्याला पत्र पाठवून या सांस्कृतिक ठेव्याची माहितीही दिली होती म्हणे! मूर्त्या न्यायला गावात ट्रक आले; पण काय बिशाद आहे त्यांची मूर्त्या न्यायची? सारा गाव एक झाला. हात नाही लावू दिला. हे एक बरं झालं. मूर्त्या वस्तूसंग्रहालयात ठेवायला पळवल्या असत्या; तर आमच्या गालफुग्या कशा नीट झाल्या असत्या? मूर्तीच्या तोंडाला काव फासून, देवाचं तोंड लाल करून; गालफुगीवर तो काव लावला की रोग दुरूस्त. माझी गालफुगीही एकदा याच प्रकारानं ठीक झाली. आता गुण दगडाचा, देवाचा की कावाचा? एक त्या मूर्तीला अन् दुसरं त्या गालफुगीलाच ठावं.
      गावापासून एक-दीड किमी अंतरावर एक दर्गा आहे. त्याला हिंदू-मुस्लिम सगळे भंजतात. मुस्लिम त्याला 'राजाबक्सार' म्हणतात, तर हिंदू 'राजेभास्कर' म्हणतात. मुस्लिमांचं मत की तो त्यांचा 'पीर' आहे. हिंदूंचं मत की, कबरीखाली शिवलिंग आहे. तरी यावरून कधीच मोठा वाद झाला नाही. मला वाटतं की, ती सूफी संताची कबर असावी. पूर्वी दर्ग्याच्या भोवती बारा एकरांवर घनगर्द झाडी होती. हे आमचं 'मिनी जंगल'. माझ्या लहाणपणी भर दिवसाही दर्ग्यात जायला भीती वाटायची. तरी साताठ पोरं मिळून कवठं, सिताफळं आणायला जायचोच. आता दर्गा ओसाड दिसतो. लोकांनी सरपणासाठी झाडं तोडून दर्ग्याची वाट लावली. दर्ग्यात दर गुरूवारी कंदुरीचा नवस फेडण्यासाठी अफाट गर्दी असते. आधीच माल मारून आलेले काही लोक कंदुरीचं जेवण करून वाटेवरच्या आमच्या शेतातल्या आंब्याखाली येऊन लुडकतात. शाकाहारी लोक दर्ग्यात मलिदा-भाताचा निवद दाखवतात.
       पहाटे मशिदीतील अजाँने उठणारा माझा गाव रात्री देवळातल्या भजनानंतर झोपी जातो.
         गावाला एक पाणंद आहे. लोक परसाकडला तिकडंच जातात. बायका अलिकडे. पुरूष थोडं पलिकडे. येणाऱ्या-जाणाऱ्या पुरूषांमुळे बायकांना अवघडंन उठून उभारावं लागतं. प्रत्येक गावात ही ठरलेली गैरसोय. माझा गावही याला अपवाद नाही. आताशा शासनाच्या 'हगणदरीमुक्त गाव' धोरणामुळे पाणंदीकडची वर्दळ बरीच कमी झालीय.
  पूर्वी गावात एकच जिल्हा परिषदेची शाळा होती. आता एक खासगी माध्यमिक शाळा आणि एक आश्रमशाळाही सुरू झालीय. आता गावची मुलं गावातच शालेय शिक्षण घेतात. आम्ही आठवीला   एसटीनं उमरग्याला जायचो. कुणी सायकलवरून जायचं.
      गावेत पूर्वी इस्पट चालायचं पण चोरून. रानारानानं. मध्यंतरी ते हाॅटेल-कम-क्लबातून चालायचं. आता हा प्रकार कमी झालाय. आमच्या लहानपणी सोंगट्यांचा (सारीपाट) खेळ रात्ररात्रभर चालायचा. तोडी होईपर्यंत.
      पूर्वी गावात एकच पक्ष होता. आता बरेच पक्ष आलेत. प्रत्येकाची कार्यालयं वेगळी. गावाबाहेर कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्या तशा पक्ष व संघटनांच्या पाट्यांची गर्दी आहे. उलट कुत्र्याच्या छत्र्या उगवायचं आता कमी झालंय.
    गावात इतर कंपलसरी सणांसोबतच काही वेगळे सण-समारंभही परंपरेने साजरे केले जातात. उदाहरणार्थ हरिनाम सप्ताह, मोहरमचे पीर बसवणे. यानिमित्त फैतरा हा खेळ खेळणे, कारवनी (बैलांचा सण), येळवस, दर्ग्याची जत्रा, बिरूदेवाची जत्रा इत्यादी. गावात जयंत्यामयंत्याही उत्साहात साजऱ्या होतात. पूर्वी शिवजयंती व भीमजयंतीला हमखास मारामाऱ्या व्हायच्या. वातावरण तंग असायचं. आता लोक शहाणे झालेत. एकमेकांच्या जयंतीत  सहभागी होतात. शिक्षणाची किमया.
     पूर्वी गावात हातभट्टी काढली जायची. गावातले लोक गोळा करून सहज खडा मारला तर तो बेवड्यालाच लागावा, इतके प्रमाण होते. एक दक्ष फौजदारामुळे गावातून हातभट्टी निर्मूलन झाले. तरी बेवडे आजूबाजूला जावून भागवतात; पण प्रमाण कमी झालंय.
    गावातून राष्ट्रीय महामार्ग जातो. सडकेला पानटपऱ्या व हाॅटेलांची संख्या वाढलीय. प्रत्येक टपरीवर बेकार पोरांचा एकेक ग्रूप मावा चघळत व थूंकत कायम पडीक असतो. गावात चांगलं शैक्षणिक वातावरणच नाही, त्यामुळं बेकार जास्त. मग पोट भरायचे तीनच पर्याय एक पुणे- मुंबई, दुसरा पानटपरी लावणे, तिसरा ऑटोरिक्षा चालवणे. हे तीनही न जमणाऱ्याला गावात बेकार म्हणतात. गावाला सुपीक जमीन असूनही अनेकांना करणं होत नाही. तालुक्याचा गाव जवळ. रोजच दौरा.
      घरोघरी रंगीत टिव्ही आले. मोबाईल आले. वाटलं गावचा विकास झाला. कशाच काय न् फाटक्यात पाय. गाव आतून बकाल आणि दरिद्रीच आहे. गावच्या आरोग्याबद्दल तर बोलायलाच नको. विकास हा शब्द तर काहीच्या नावापुरता आहे. असो. माझा गाव शेवटी माझा आहे. मला तो प्रिय वाटतो.


रविवार, २४ जून, २०१८

मराठी गझल


आठवणींची धास्ती कशाला
रोजच असते रात्र उशाला

हाडवैरी झोप ही असली
बोलत बसतो रामोशाला

चांदण्यांची संगत होते
लटकत डोळे आकाशाला

अजून संयम आहे बाकी
वाटेतच जरि मधुशाला

आता कुठे लागले कळाया
किंमत नसते भरवशाला

------------------------------

तुझ्या गोऱ्या उन्हात मला जळू दे
कुंतलांच्या सावलीला निथळू दे

हरिणकाळीज तू सैरभैरशी
हिर्व्या रानालाही जरा कळू दे

डोळ्यात तुझ्या मी उगवलो होतो
आता तिथेच मला मावळू दे

बांधून तुला नजरेने केवळ
तुझ्या नाजूक ओठांना छळू दे

तू मिठीत माझ्या सावळी झालेली
रंग जरासा आता निवळू दे
---------------------------------------


डोळ्यात चंद्र आणि हातात फूल होते
होशील तूच माझी डोक्यात खूळ होते

ती प्रीत चांदण्यात होती विरून गेली
ते चांदणेच तेव्हा झाले गढूळ होते

श्वासात श्वास जावा मिसळून एकदा
ही कल्पनाच खोटी हेही कबूल होते

मागे तुझ्या स्वरांच्या कैफात धावलो मी
 वाटेवरी फुलांचे नाजूक सूळ होते

स्वप्नात रंगण्याचे सरले दिवस हळवे
आकाशवेड आणि मातीत मूळ होते
--------------------------------------------


साहतो आहे सुना वनवास आता
झाला ना माझाही देवदास आता

विसरलो मी मोगरीचे रूपही ते
शुभ्र, कोमल, गंधित आभास आता

तू नको त्या पैंजणांनी जाग आणू
होईल नशाच सारी खलास आता

संपले तारे कसे गगनातले
चंद्र एकट हिंडतो भकास आता

कोड घेऊन चांदण्यांची रात्र येते
वाहतो आहेच वारा उदास आता

------------------------------------
        प्रमोद कमलाकर माने.

सूचना: परवानगीशिवाय काॅपी अथवा शेअर करू नये.

गुरुवार, ७ जून, २०१८

कारवनी


वैशाख शुक्ल पौर्णिमेला कर्नाटकचा पोळा हा सण असतो. बैलपोळ्यासारखाच हा सण.  या कर्नाटकी पोळ्याचे नाव आहे 'कारहुणवी'. पण आमच्याकडे 'कारवनी' म्हणतात. माझं गाव मराठवाड्याच्या टोकाला कर्नाटक राज्याच्या सीमेजवळ आहे. आमच्या भागात काही गावात पोळा तर काही गावात कारवनी साजरी करतात. उमरगा या तालुक्याच्या शहरातही निम्मे शेतकरी पोळा, निम्मे कारवनी करतात.
    कारवनी मृगात येत असल्याने उन्हाळ्यापासूनच कारवनीची तयारी सुरू व्हायची. ओढ्यात भिजायला टाकलेल्या अंबाडीच्या सलमकाड्यांपासून अंबाडा सोलण्याची जणू स्पर्धाच चाले. मला अजून याद आहे: वैशाखातल्या रणरणत्या उन्हात चावडीतल्या थंडगार सावलीला बसून वृद्ध मंडळी बैलांसाठी अंबाड्यापासून मुंगसे, बाशिंग, कान्या, कासरे, म्होरक्या, वेसणी, कंडे, माटाट्या असे साज तयार करायचे. बैठक मारून, हाताला थुंकी लावून मांडीवर दावे वळायचे. चावडीम्होरं गोट्या खेळणाऱ्या आम्हा पोरांना बोलावून घोडा नाचवायला सांगायचे. म्हणजे दाव्याचे दोन टोक हातात धरून पिळ्या द्यायचं काम.
     गावातले नुकतेच कुणबिकीत पडलेले शेतकरी कुणबिकीतून निवृत्त झालेल्या म्हाताऱ्यांकडे यायचे आणि अंबाड्याचे साज करून घ्यायचे. आमच्या आजोबांकडे चापे, घाणे, लिंबोळ्या, लागबंद हे बैलांचे साज करून घ्यायला रीघ लागायची. आप्पा वैतागायचे. 'तुमी कवा शिकनार?' असं म्हणायचे. पण कुण्या बापड्याला ते नाउमेद करत नसत. आप्पांचाही दुपारचा वकत चांगला गुजरत असे. उरलेल्या अंबाड्यापासून आप्पा आम्हाला चाबकं करून द्यायचे. आम्ही दिवसभर चाबकाचे आवाज काढत हिंडायचो. लाकडाचा दांडा तासून त्याला चाबूक बांधायचो आणि रंगाऱ्याजवळ तीन रंगात रंगवून घ्यायचो. रंग हडकेपर्यंतही दम पडायचा नाही.
      कारवनीचा आदला दिवस म्हणजे 'खंडमळण्या'. त्या दिवशी वडलांबरोबर मी रानात जायचो. नदीवर बैलांना घासूनपुसून अंघोळ घालायचो. थंडगार पाणी बैलांच्या पाठीवर उडवल्यावर तिथली कातडी थरथरायची. मारका 'इंग्रज्या' नावाचा बैल सतवायचा. बैलांची लख्ख अंघोळ झाल्यावर गाय, म्हैस, वासरं, कारवडी, वागारी यांचीही अंघोळ व्हायची. घरून आईनं दिलेल्या हळद व लोण्यानं बैलांच्या माना चोळायचो. नांगराचा, कुळवाचा, गाडीचा 'जू' घेऊन घट्टे पडलेल्या माना बघून वाईट वाटायचं. लोण्यानं चोळल्यावर मान गुळगुळीत मऊ पडायची. मग वडील बैलांचे शिंग घासून घासून गुळगुळीत करायचे. वारनेसनं रंगवल्यावर शिंगं कशी ऐटदार वाटत.
      कारवनी दिवशी बैलांना गावात आणलं जाई. माने-मंडळीच्ये सगळ्या बैलांची एकत्र मिरवणूक निघे. रंगीत शिंगांना चमकीचे पट्टे लावलेले. फुगे बांधलेले. पाठीवर झूल, गळ्यात घुंगुरमाळा, दृष्टमण्यांच्या माळा, शिंगांच्या टोकांना पितळेच्या शिंगोट्या, रंगीबेरंबी माटाट्या, बाशिंग, पायात काळे कंडे, कातरून आकार दिलेली गोंडेदार शेपटं, अंगावर पिवडी... बैलं नवरदेवापेक्षा देखणे दिसायचे.वाटायचं जणु आज बैलांचं लगीनच हाय. मिरवणुकीपुढं बाजा, धनगराचे ढोल, झांजा. सुतळीबाँबच्या आवाजानं बैल बिचकायचे.बुजायचे. बारके पोरं भिऊन लांब पळायचे. म्हारतीपुढं पूजा होऊन वाजतगाजत मिरवणूक घराकडे येई. सर्वात पुढे रहायचा मान पाटलाच्या बैलांचा बाकीचे सगळे मागे. दिवसभर मिरवणूका. बैलांवर उधळलेल्या चुरमुऱ्यांमुळे रस्ते पांढरेशिप्पट दिसायचे. जमादारांच्या बैलांच्या मिरवणूकीपुढं पोतराज व गुरगुंपांग वाजवणाऱ्या मरगम्मा (कडकलक्ष्मी) असल्यामुळे ही मिरवणूक बघायला गर्दी व्हायची.
           मिरवणूक झाल्यावर दारापुढे बैलांची पूजा होई. वडील दोन्ही बैलांच्या म्होरक्या धरून मधी उभारायचे. आई पूजा करायची. मग बैलांना पूरणपोळी चारली जाई. एखादा बैल पोळी खाईना झाला की; सगळे 'बैल रूसला...बैल रूसला ' म्हणायचे. मग भजे घुगऱ्या, कोडबळ्यांचं गाडगं बैलांच्या तोंडाला लावलं जाई. वरून गुळवणी पाजलं जाई. शिंगात कोडबळे अडकवले जात. शेवटी घरातले सगळेजण बैलांच्या पाया पडायचे.
    ज्यांच्याकडे पोळा असतो असे पाहुणे घरोघरी आल्याने कारवनीला गाव गजबज वाटायचा. आमच्याडे किल्लारीचे दादा आवर्जून यायचे. जाताना पोळ्याचं आवतन देऊन जायचे. ते रात्री आम्हा मुलांना चमत्कारिक गोष्टी सांगायचे. एक गोष्ट तीन-चार दिवस चालायची. त्यांना काल गोष्ट कुठपर्यंत आली होती ते आधी आम्ही सांगावं लागायचं. मगच पुढची गोष्ट ऐकायला मिळायची. एकदा त्यांनी घोरण्याचा विषय काढला. मी त्यांना विचारलं, 'दादा, घुरतात कसं ओ?' त्यांनी घोरण्याचं प्रात्यक्षिक मला साग्रसंगीत दाखवलं आणि माझ्याकडून करूनही घेतलं. तेव्हापासूनच मी रात्री झोपेत घोरायला लागलो म्हणे! पुन्हा दादा कधी आले की विचारायचे, 'कुटं गेला तो घुऱ्या?' माझं नावच त्यांनी घुऱ्या पाडलं.
      कारवनीच्या दिवशी बैलांच्या खांद्यावर जू दिला जात नाही. अगदी महत्त्वाचं काम असलं तरी बैलांना गाडीला जुंपत नाहीत.
    कारवनीचं वैशिष्ट्य हे आहे की; हा सण पोळ्यासारखं हंगामाच्या अधेमधे येत नाही; तर मृगाच्या सुरूवातीला येतो. बैलांची पूजा करून, कौतुक करून, कृतज्ञता व्यक्त करूनच त्यांना कामाला जुंपले जाते.
       आता कारवनीची ती मजा राहिली नाही. उन्हाळ्यात बैलांचे साज तयार करणारे, दावे वळणारे बुजूर्ग आता दिसत नाहीत. सगळे साज आता बाजारात आयताळ मिळतात. सुताचे.
        आता चाबुक वाजवणारे मुलं दिसत नाहीत तर बैलांसोबत सेल्फी घेणारे आहेत. एकूण लहानपणीचा तो आनंद उरला नाही.

सोमवार, ४ जून, २०१८

गेंद्या

   मी लहान असताना आमच्या घरी एक बैलजोडी होती. गेंद्या व घरड्या. त्यातला गेंद्या हा घरच्या गाईचा खोंड होता. दरबारी नावाच्या गाईला झालेला हा खोंड. आईसारखाच बांडा होता. गोल टोकदार शिंगं. नंदीबैल वाटावा असा हा बैल. हा खोंड लहान असतानापासूनच त्याला आजोबांनी म्हणजेच आप्पांनी लळा लावला. पुढे गेंद्या खूप प्रसिद्ध झाला.
     लहानपणी गुरांच्या वाड्यात गेंद्या आईला पिताना आप्पांनी ' हं, चल आता पुरं कर.' म्हटलं की; गेंद्या तोंडातलं थान सोडून वाड्याकड निघायचा. एरवी थान सोडेल ते वासरू कसलं? ओढून काढलं तरी आचळाखालून निघत नाहीत. शेताकडून येताना पुढं गेंद्याची माय. मागे गेंद्या. त्यामागे आप्पा. वाटेत कुणाला आप्पा बोलत थांबले की  गेंद्याही आप्पाचं बोलणं होईपर्यंत थांबायचा.
        थोरले काका आजीला चोरून हरभऱ्याची दाळ टोपीत आणून गेंद्याला चारायचे. वडील त्याला हरभऱ्याचा ढाळा चारायचे.  आजी भरडा, पेंड चारायची. साऱ्या घराचेच गेंद्याला लाड होते.
    पुढे आप्पांनी त्याला विहिरीत उडी मारायला शिकवले. पाठीवर हात थोपटून ' हं, मार हुडी.' म्हटल्याबरोबर गेंद्या थोडं मागं सरकून सुसाट धावत येऊन कठोकाठ विहिरीत उडी मारायचा. पोहत एक फेरी पूर्ण करूनच बाहेर यायचा. एकदा शेतात साळ खुरपणाऱ्या बायांनी विषय काढला, 'तुमचा गेंद्या हिरीत हुडी मारतोय मन ! खराय का?' आप्पांनी बांधावर चरणाऱ्या गेंद्याला हाक मारली. आप्पा म्हणाले, ' ही बाया तुला पवायला येतनी मनलालत्या. चल मार बर हुडी ' असं म्हटल्याबरोबर गेंद्यानं धावत जाऊन उडी मारली. बाया कौतुकानं चेकाळू लागल्या. बाहेर येऊन गेंद्या पुन्हा चरू लागला. आप्पांना अजून हुक्की आली. ते गेंद्याला म्हणाले, 'बाया तुला भेलं म्हनलालत्या. आरे मर्दासरका मर्द तू. यी. मारून दाव आजू एक हुडी.' गेंद्यानं कान टवकारले. तोंडातलं धाट टाकून सुसाट विहिरीकडं धावत आला आणि उडी मारली. एक फेरी घालून बाहेर आला. सगळ्या बाया अवाक.
     गेंद्या स्वतःच शिंगांनी जू खांद्यावर घ्यायचा. मग उचललेल्या जुवाखाली घरड्या मान घालायचा. आप्पांनी त्याला कधीच हातांनी जुंपले नाही. आमची दोन शेतं होती. दूरदूरवर. मळा आणि माळ. गेंद्या-घरड्या मळ्यात असायचे. आजोबा गावातून माळाकडे जायचे. मळ्यातून वडील बैलांना सोडून द्यायचे. दोन्ही बैल सोबत माणूस नसताना सरळ माळाला जाऊन आंब्याखाली उभारायचे. मग आप्पा येऊन पाळी मारून बैल मोकळे सोडून सांजच्यापारी घरी. दोन्ही बैल सरळ मळ्यात येऊन वडलांजवळ. माळाकडून मळ्याकडे बैल निघाले की; वाटेने जाणारे शेतकरी म्हणायचे, 'निघाले बघा नंदी !'
       एकदा आत्त्याच्या गावी(मंगरूळ) पोळ्याच्या आदल्या दिवशी (खंडमळण्या) वडील नदीवर गेंद्या-घरड्याला धूत होते. घरड्याला धूताना त्यांनी ' हं, कर पाय वरी.'  म्हल्याबरोबर घरड्यानं पाय वर उचलला. तो पाय धुवून 'आता ही पाय कर वरी' म्हटल्यावर त्यानं दुसरा पाय वर केला. त्या गावचे लोक आपापले बैल धुवायचे सोडून ही गंमत आश्चर्याने बघू लागले. घरड्याला आप्पांनीच हे शिकवलं होतं.
    एकदा नांगरताना घरड्याच्या खुरात तुराटीची कोयली घुसली. बैल लंगडू लागला. घरड्याला पाय वर करायला सांगितल्यावर त्याने पाय वर केला. घरड्याचा पाय मांडीवर घेऊन वडलांनी ते धस्कट मोठ्या सायासांनी काढलं. वेदना होत असूनही घरड्यानं लाथ झाडली नाही. त्याचं सारं अंग थरथरत होतं. तोंड वासलं होतं. पायाला रक्ताची धार लागलेली. वडलांचं धोतर लालबुंद. घरड्यानं सोसलं पण मालकाला त्रास दिला नाही.
     गेंद्या रात्री रानातून बरेचदा दावं तोडून सुटायचा. रात्रभर कुठं चरून यायचा, की काय करायचा देव जाणे! पहाटे आपल्याच जागेवर घरड्याशेजारी उभा असलेला दिसायचा. कधीच कुण्या शेतकऱ्याची 'आमचं पीक खाल्लं' म्हणून तक्रार आली नाही. रात्री गेंद्या सुटलेलं लक्षात आलं तरी वडील-चुलते त्याला शोधत नसत. त्यांना वाटायचं ' कुटं जातोय? पाट्टं यील की आपल्या जाग्याला.'

         गेंद्या म्हातारा झाला तरी त्याला आप्पांनी विकला नाही. एके दिवशी म्हातारा गेंद्या चरता चरता मागचे पाय निसटून तोल जाऊन आमच्या त्याच विहिरीत पडला. सात पुरूष खोल विहिरीत एकदीड पुरूषच पानी होतं. आपटल्याने जबरदस्त मार लागला. सगळ्यांनी त्याला बाहेर काढलं. चारपाच दिवसानंतर गेंद्यानं डोळे मिटले. आप्पा, वडील, चुलते धाय मोकलून रडले. सारं घर...सारा शिवार रडला. गेंद्याला शेतातच पुरलं.

बुधवार, ३० मे, २०१८

कुणब्याची शायरी



जुने दिवस आठवले की मनावर ढगं दाटतात. ते रानशिवारातले दिवस. पानझडीचे...खळ्यादळ्याचे दिवस..मोटनाड्यांचे दिवस...भुलईचे...जात्यावरच्या पहाटेच्या दळणाचे... ओव्यांचे..रात्रीच्या देवळातल्या भजनाचे...चावडीवरच्या गप्पांचे...हुरडापार्टीचे...मुराळ्याच्या मानाचे...सग्यासोयऱ्यांच्या वर्दळीचे...घुंगराच्या गाडीचे...कुणब्याच्या शायरीचे...सोन्यासारखे दिवस.
   तो जुन्या दिवसांच्या स्मृतीत हरवतो...
पहाटे दळताना जात्याच्या गुढगर्भ संगीताच्या ठेक्यावर वहिनीच्या मंजुळ आवाजात ओवी ऐकू यायची.
       पाट्टंच्या दळनाला
       आता उशीर झाला बाई
       नंदी गेल्यालं ठावं न्हाई
मग त्याला उत्साह वाटायचा...तो मनोमन ठरवायचा: 'उद्या वैनी उटायच्या आद्दी बैलं नाही सोडलो तर भाद्दर नाही.'
मध्येच ओवी बंद होऊन जात्याची वेगात घरघर व्हायची. थोड्या विरामानंतर पुन्हा ओवी ऐकू यायची.
       बारा बैलाचा नांगर
      चलतो वनमाळी
      ऐका भिवाची आरोळी
त्याला वाटायचं, म्याबी भिवा होईन. नांगराला जाईनच.मग खरोखरच तो वैनी उठायच्या आधी नांगराला जायचा.
       राजा गं नांगऱ्या
        सर्जा गं आगल्या
        दादा पालव्या लागल्या
असं कौतुक ऐकून त्याला हुरूप वाटायचा. माईनं केलेलं कौतुक तर   खूपच सुखद. ती गायची.
         आपट्याच्या झाडाखाली
         दोगं बसले बापल्योक
         आपली पेरनी झाली ठीक
पेरणीनंतर उभं कवळं पीक डुलायला लागे.
         तिपन्या बाईनं
         आता धरीलं उभं माळ
          रासन्याची का तारामाळ
त्याचे कष्ट त्याची होणारी तारांबळ या करूण ओवीतून ऐकल्यावर त्याचा सारा शीण ओसरून जाई.
     त्याची कवळ्या वयाची बायको भरगच्च पिकलेलं पीक पाहून हरखून जाई. तिचे ओठ गाऊ लागत
          आता शेता गं आड शेत
           कुण्या शेताला बाई जाऊ
           तिथं हेलाव्या देतो गहू
त्याची माय नव्या सुनेचं आणि आपल्या लेकीचं तोडीस तोड रूप पाहून हरखून जाई. जातं तिला गायला सांगे. मग ती नणंद भावजयीचं कौतुक जात्यावर गाऊ लागे.
           आता ननंद भावजयाs येsगं
           शिवंच्या शेता गेल्या
            इजंवनी का चमकल्या
तो पहाटे औताला जाई. त्यालाही शायरी सुचे.
          ढवळ्या रं पवळ्या चल बिगीबिगी....
मोटंच्या कुरकंए s कुरकुंए आवाजाचं संगीत त्याला आव्हान देई.
          हे s  ए  s ए s हा ss
          हो s ओ s ओ s हो ss
असं त्याचं अमूर्त गोड गाणं गळ्यातून ओसंडू लागे.
    बघता बघता पीक भराट्यात येतं. आता कापणी सुरू केली पाहिजे. बायागड्यांनी रान सजीव होतं. भल्लरी सुरू होते.
तो सवाल टाकतो.
तो: भलगडी दादा भला s रे भलगडी दादा
       ह्या वाटेनं राधा गेली का रे दादा
       तिच्या पायात तोडे होते का रे दादा
       भलगडी दादा भला s रे भलगडी दादा
साथी: मो नाही पाहिलो भले s हो भलगडी दादा

       मग कलगीतुरा रंगतो. तोड्याची वळख पटत नाही. तवा तो कमरेला माचपट्टा, गळ्यात वज्रटीक, दंडात वाक्या... अशा ओळखीच्या खुणा सांगतो. शेवटी साथीदार एखाद्या खुणेला ह्या शायरीतून वळख दाखवतो. काम ओसरत जातं. कल्पना, काव्य आणि गायन यात कामाचा त्रास वाटत नसे.
    शेवटी एकमेकांना शाबासकी दिली जाई.
       गबरूचं काम भले s हो भलगडी दादा
       जोंधळा राजा भले s हो भलगडी दादा
        लावावा पट्टा भले s हो भलगडी दादा
...... तो गतस्मृतीतून बाहेर येतो. डोळे ओले झालेले असतात. त्याची गतकाळातली मुशाफिरी संपते आणि हळूहळू तो भानावर येतो.


मंगळवार, १५ मे, २०१८

जोहार : समकालीन अस्वस्थ दैनंदिनीची पाने





'जोहार' ही सुशील धसकटे यांची पहिलीच कादंबरी! लेखकाने या कादंबरीद्वारे साहित्यविशावात दमदार पाऊल टाकले आहे.   
  या कादंबरीचा नायक मल्हार हा मराठवाड्यातल्या खेड्यातल्या एका शेतकरी कुटूंबातून एम.फिल. करण्यासाठी विद्येचे माहेरघर समजल्या जाणा-या पुण्यात येतो. पुण्यात आल्यावर त्याला सर्वप्रथम जाणवते ती गोष्ट म्हणजे, खेडे आणि शहर यामधील विषमतेची प्रचंड दरी!
  विद्यापीठातले राजकारण, जातकारण, कंपूशाही बघून तो चक्रावून जातो. एकीकडे तो मराठी परंपरांच्या मुळांचा शोध घेत राहतो. जातककथा, कथासरित्सागर, गाथासप्तशती, लीळाचरित्र, संतवाड्.मय, दलित-ग्रामीण-स्त्रीवादी साहित्यप्रवाह ते आजचे साहित्य अभ्यासत जातो.
  परंपरांमधील चांगल्या-वाईट गोष्टी व त्यांचा जगण्यावर झालेल्या परिणामांचा अन्वयार्थ लावू पाहतो. तो ज्या शेतकरी समाजातून आला, त्या समाजाच्या अधोगतीचे पुरावे शोधत जातो. दुसरीकडे त्याला येणारे अनुभव पचवत जातो. या अनुभवांची गाथा म्हणजेच जोहार ही कादंबरी होय.
   सध्याच्या अस्वस्थ महाराष्ट्राच्या दैनंदिनीची पानेच या कादंबरीत आलेली आहेत. अलीकडे ज्या घडामोडी झाल्या, एका विशाल समूहाकडून जो असंतोष प्रकट झाला, त्याची कारणे किंवा पार्श्वभूमी शोधायची असल्यास 'जोहार' ही कादंबरी वाचावी लागेल. या अस्वस्थ कालखंडाचे दस्तावेज म्हणून ही कादंबरी महत्त्वाची आहे.
  सांप्रतकाळी चहूबाजूंनी होत असलेली मूल्यांची पडझड, अंगावर येणारी विषमता, जातीय ध्रुवीकरण, टोकदार झालेल्या जातीय अस्मिता, बोकाळलेला चंगळवाद, समाजमनाला आलेले बधीरपण, भ्रष्ट व्यवस्था, कमालीचा स्वार्थभाव, भ्रष्ट साहित्यव्यवहार, खुज्यांची सर्वच क्षेत्रातली लुडबूड व त्यांना आलेले महत्त्व, शेतक-यांची सर्व बाजूंनी होत असलेली नाकेबंदी, गिळंकृत करू पाहणारा जागतिकीकरणाचा कराल जबडा इ. आस्थेच्या प्रश्नांविषयी ही कादंबरी बोलत राहते. या सा-या प्रश्नांनी भोवंडून गेलेला मल्हार मग आधुनिक लीळा रचत राहतो.
   विकासाच्या कुठल्याच संधी नसल्यानं मागे राहिलेल्या ज्या समाजातून मल्हार आलाय, त्या समाजाविषयी तो मूलभूत चिंतन करतो. मोठेपणाच्या चुकीच्या कल्पनांमध्ये अडकून पडलेला, कुप्रथांनी वेढला गेलेला, परंपरांच्या दुष्टचक्रात अडकलेला, व्यवस्थेने उपेक्षित ठेवलेला हा समाज, या समाजाला आलेले दलितत्व, या समाजातली सर्वात शोषित घटक स्त्री व तिचा वेदनेचा प्रवास, हे सर्व या कादंबरीत प्रभावीपणे आणण्यात लेखक यशस्वी झाला आहे.
   चार्वाक, बुद्ध, कबीर, तुकाराम,म. फुले,राजर्षी शाहू, डाॅ.आंबेडकर, महर्षी वि.रा. शिंदे, काॅ. शरद पाटील, आ.ह. साळुंखे ही प्रगल्भ वैचारिक परंपरा मानणारा हा तरुण लेखक हा समृद्ध वारसा घेऊन आजचे वास्तव डोळसपणे अधोरेखित करतो. ही कादंबरी आजच्या तरूणाला आत्मभान देण्यास सक्षम असून, खुसखुशीत नर्मविनोदी भाषा, बोलीचा योग्य वापर, उपरोधिक व तिरकस शैली ही या कादंबरीची आणखी काही वैशिष्ट्ये.
   या कादंबरीवर 'नेमाडपंथी' असा शिक्काही मारण्यात आला. पण कुठेच निव्वळ अनुकरण न करता ही कादंबरी स्वतंत्र भूमिका आणि विचार जोरकसपणे मांडते, हे कादंबरी पूर्ण वाचल्याशिवाय कळणार नाही. नेमाडे पचवून त्यापुढचा टप्पा
या कादंबरीने गाठला आहे.
 भाषेचा वापर, निवेदन, मांडणीचे तंत्र, रचना इ. सर्वच पातळ्यांवर 'जोहार' ही कादंबरी वेगळी आणि सरस ठरली आहे. यासाठी लेखकाचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

कथा

सुक ना दुक

गनामामाला सगळं गाव नेता म्हनायचं. गावात कुठला पुढारी आला, परचारसबा आसली की, गनामामा हार घालायला सगळ्यात पुडं. इस्टेजवर खुडचीत गनामामा ...

उपशीर्षक