बुधवार, २१ मे, २०२५

सारजामाय




सारजामायला शेताकून यायला उशीर झालता. शेताकून आईसंगं ती घरी आली. च्यापानी झालं. आईनं कायतर बांधून दिली. अंधार पडलता. सारजामाय निघाली तिच्या घरला. बौद्धवाडा हायवेच्या पलीकडं. मी म्हनलो, "जातो. सोडून येतो तिला पलीकड."

आई म्हनली, "जा बाबा! आधीच एक्या कानाला ऐकू येतनी तिला." सारजामायसंग निघालो. सडक आल्यावर तिच्या काटकुळ्या वाळलेल्या बाभळीच्या लाकडासारख्या हाताला धरलो. दोन्हीकडं बघत गाड्या जाऊ दिलो. पलीकडं सोडलो. मान हलवून इशाऱ्यानंच ‘जातो आता’ म्हनलो. सारजा मायनं हसतमुख चेहऱ्यानं परवानगी दिली. मी घरी आलो. आल्यावर भाऊ म्हनले, "आसंच काळजी घेवं गा!"

मी म्हनलो, "माणुसकीनं तर वागावंच पण आपण जपून राहिलेलंच बरं! आपल्यावर बला नको."

      आधी सारजामाय शेतातल्या कामाला यायची. तिचा एक ल्योक देशावर करून खायला गेलेला. एक ल्योक-सून तिच्याजवळ. नवराबी बसू पडलेला. सारजामाय साठी पार झालेली आज्जीबाई. काळी-सावळी नीट नाकाची, काळी, काटकुळी, सदा हसतमुख. तिचा एक भाऊ चांगला नोकरदार आहे. तो तिला दर महिन्याला हजार रुपये मनिऑर्डर पाठवायचा. सारजामाय आईला कौतुकानं सांगायची. ल्योक कधी तर ट्रकवर जायचा. घर भागवायची खरी जिम्मेदारी सरजामायवरच. बहुदा कारभाऱ्याच्या शेतातच ती मजुरी करायची. कारभाऱ्याचं शेतही बक्कळ आहे. सालभर काय ना काय कामं राहतातच. आम्ही सांगितल्यावर कधी सवड बघून आमच्याही शेतात यायची. आईला सारजामायचं काम लई पटायचं. आईसारखंच तीही काम चांगलं करायची. इतर रोजगारी करतात तसं, वरवरचं आणि वेळकाढू काम ती करायची नाही. स्वतःचं शेत समजून शेतमालकीनीसारखं काळजीनं करायची. कधीकधी  आईला सल्लाही द्यायची. बांधाच्या कडंचा हराळीचा दाढवा कापून बांध स्वच्छ करायची. 

         माझं लग्न जमल्यावर बांधकामाच्या, शेतातल्या आणि घरच्या कामानं आईची पाठ दुखायला लागली. डॉक्टरनं विश्रांतीचा सल्ला दिला. पण दिवस कामाचे. आईनं सारजामायला 'लग्नाचं काम करशील का?' असं विचारलं. तिनं होकार दिला. काही हजार रुपये आणि इरकल लुगडं-चोळी असं ठरलं. सारजामायनं आधार दिला आणि लग्न पार पडलं. तिनं लुगडं-चोळीऐवजी पैसे द्या म्हटल्यामुळे तिला पैसे दिले. आहेर राहिला तो राहिला. पुन्हा कधीतरी सारजामायच्या घरी कार्यक्रम होता; तेव्हा मात्र इरकल लुगडं, चोळीचा खण असा आहेर घेऊन आई तिच्या घरी गेली होती. माझी बायकोही शिक्षिका. तिला दररोज पस्तीस किलोमीटर अंतरावर नोकरीच्या गावी बसने प्रवास करावा लागे. ती सकाळी साडेसातच्या बसने जायची आणि रात्री सातला घरी परतायची.  लग्नानंतर खरी तारांबळ सुरू झाली. आम्ही दोघं आणि भाऊ असे तिघांचे डबे सकाळी करावे लागायचे. आईचे हाल बघून बहिणीने एकदा सारजामायला 'धुणीभांडी करशील का?' म्हणून विचारलं. सारजामायला कामाची गरज होती म्हणून तिनं 'व्हय' म्हटलं. 'किती पैसे देऊ?' असं विचारल्यावर तिनं दोन बोटं करून 'दोनशे द्या. आणि 'हिकडूनच कामाला जाईन. सकाळची भाकर तेवढी द्या.' असं ती म्हणाली. तरी आम्हाला तिनं कमीच मागणी केली असं वाटलं; म्हणून पुढे दोन-तीन महिन्यांनी मीच तिला महिन्याला पाचशे रुपये देऊ लागलो. सारजामाय सकाळी आली की, आई तिला स्वयंपाक घरात बोलावून घट्ट दुधाचा चहा द्यायची. आधी सारजामाय संकोचायची; पण तिला आम्ही हट्टाने स्वयंपाक घरात बसवायचो. हळूहळू ती सरावली. मी जेवताना चहा प्यायला आलेली सारजामाय आड व्हायची. मी इशाऱ्याने तिला बोलावून घ्यायचो. 'कायबी होतनी. तू घरातलीच हाय्स. यी!' मनलो की हासायची. सदा हसतमुख आणि प्रसन्न. 

       पाठदुखीमुळे मी आईला शेतातल्या कामाला जाऊ देत नव्हतो. सारजामाय एकटी जाऊन शेतातली कामं करायची. भाऊ म्हणायचे, "बायला! म्हातारी लई इमानदार हाय. बस कर आता म्हनलं तरबी दिवस मावळजोपाना उटतच नाही. आनी येताना जळनाचं वज्जं आनत्याय डोस्क्यावर."

      मध्यंतरी बहिण आजारी पडली म्हणून आईला पुण्याला जावं लागलं. माझी पत्नी पहाटे चारला उठून स्वयंपाक करायची. भावाचा डबा द्यायची. आमचे दोघांचे डब्बे तयार करून, सात वाजता सारजामाय आल्यावर तिला चहा करून द्यायची. तिची भाकर बांधून ठेवायची. सारजामाय 'राहू द्या. राहू द्या...' म्हणायची. बायको इशाऱ्यानं समजवायची. आई दहा-बारा दिवसांनी परत आली. येताना आईला कारभाऱ्याच्या घरातील बायकांनी थांबवून घेऊन सांगितलं, "सारजामाय तुमच्या सुनंचं लई कौतुक करलालती. बिचारीला डिवटी असूनबी सासूचा नेम चुकू दिलनी. मला कवा बिनच्याचं, बिन भाकरीचं यिऊ दिलनी, असं सांगत्याय. चमाला लई चांगली सून मिळाली, आसं म्हनत्याय."

          शेतातल्या कामावरून सारजामाय घरी आल्यावर तिनं आणि आई बोलत बसल्या की, मी रागवायचो. तिला अंधार पडतोय. घरी सोडून यावं लागेल म्हणायचो. म्हातारी रविवारचा बाजार उमरग्याला जाऊन स्वतः आणायची. कधी पैसे साठवून नातीला नथनी कर. कधी लेकीला आहेर कर. अशा काहीबाही उठाठेवी करायची.

        सांच्यापारी शेतातल्या कामावरून आल्यावर चहा पेलेला कप तिनं धुवायला नेताना, आई तो हिसकावून घ्यायची. तिला कप धुवू द्यायची नाही. स्वतः धुवायची. रास झाल्यावर गहू, ज्वारी, हरभऱ्याचे चुंगडे बांधून द्यायची. मला गाडीवर तिच्या घरी टाकायला सांगायची. तिचं घर साधंच होतं; पण स्वच्छ आणि टापटीप. मध्यंतरी सारजामायनं घरचं काम सोडलं. "पुण्यातला ल्योक नको म्हनतोय. लोकं लावतीते त्येला." म्हनली. आईनं हसतमुखानं होकार दिला. तरी अधूनमधून शेताच्या कामाला ती यायची. एके दिवशी आई नळाचं पाणी भरताना पडली. हात फ्रॅक्चर झाला. घरात काम करायचं अवघड झालं. माझी बायको होईल तेवढं करून शाळेला जायची. पण बाकीची कामं आईला एका हातानं करावी लागत. एके दिवशी सकाळी उठल्यावर आई बाहेर येऊन बघते तर काय! सारजामाय दारात भांडी घासत बसलेली. आई म्हनली, "सारजामाय! कसं काय आलीस? 

"तुमचा हात मोडल्यालं कळालं कारभाऱ्याच्या घरातून. कसं करताव आता? मनून आले."

म्हातारी पुन्हा धुणीभांडी स्वेच्छेनं करू लागली. दोघी पुन्हा सुख-दुख उकलू लागल्या. आई तिची मैत्रीण झाली होती. म्हातारी खाल्ल्या मिठाला जागली. आताच्या काळात अशी माणसं भेटतील का? आईनं तिला कधीच शिळंपाकं दिलं नाही. तिचं पोट सांभाळलं. तिच्या गरजा भागवल्या. तिचं सुख-दुख आत्मीयतेनं ऐकून घेतलं. म्हातारीनंही कधीच उपकार राहू दिला नाही. रक्त-घाम आटवून उतराई केली. खरंतर तिनंच आमच्यावर उपकार केले. दरम्यान भावाचं लग्न झालं. म्हातारीनं तेही लग्न पार पाडलं. धुणीभांडी केली. भाकर तुकडा खाऊन रानात कामं केली. शेजारी-पाजारी जळायचे. म्हातारीला 'त्यांचं काम सोड. आमचं कर. शंभर-दोनशे जास्त देतो.' म्हणायचे. पण म्हातारी माणसं ओळखायची. तिच्या शेतातल्या कामावरही शेजारचे शेतकरी जळायचे. मालकीन नसतानाही ही म्हातारी काम करते. बाकीच्या रोजगारी बायांच्या दुप्पट काम करते, हे त्यांनाही कळायचं. कुणी तिला बळंबळं हातात हजार रुपये टेकवून आमच्या कामावरून पळवायला बघायचे. म्हातारी हतबल होऊन आईला सांगायची, 'आसं केले ओ! का करू सांगा!' तरी म्हातारी भिडंखातर ते काम करत-करत आमचंही काम करायचीच. 

         याच दरम्यान तिच्या मुलाचा अपघात झाला. थोडक्यात बचावला. पुण्याला राहणाऱ्या ल्योकांनं ऐपत नसूनही भावाचा दवाखाना केला. ल्योकाला सारजामायनं आता घरी आणलं होतं. आता ल्योक कायमचा अधू झाला होता. औषध-गोळ्यांचा खर्च वाढला होता. सुनंचं आणि ल्योकांचं आधीच पटत नव्हतं. भांडणं व्हायची. तरी सारजामाय घरातलं समदं काम, सैपाकपानी, ल्योकांचं, नवऱ्याचं जेवणखानं करून कामाला यायची. दरम्यान हिचं अबोर्शन झाल्यामुळे मी तिच्या नोकरीच्या गावी घर केलं. तिच्याऐवजी मीच प्रवास करू लागलो. कधी सणावाराला आम्ही आलो की, म्हातारी आस्थेनं विचारपूस करायची. 'बरे हाव का?' म्हणून विचारायची. वर्षभर तिनं आमच्या घरचं काम केलं. नंतर तिनं घरची काम बंद केली; तरी रानात राबत होती. एकदा गावाकड आल्यावर मी आईला विचारलं, "सारजामाय कशी हाय?"

आई म्हनली, "लई खचल्याय की रे म्हातारी!" 

"का बरं? चांगली होती की परवापर्यंत तर."

"तुला माहीत झालनी? तिच्या ल्योकानं फाशी घेतला की रे"

"कोणत्या ल्योकानं?"

"अक्सिजेंटनं आधू झालेल्या. त्येचं बायकूसंगंबी भांडन झालतं. तिनं माहेरला निघून गेलती. त्येला तरासबी व्हायचा मन." मी विचारलं, "कधी झालं ह्ये?" आई म्हनली, "आजून आपलं काम करत हुती बाबा. तवाच झालं." मी हळहळलो.

        एकदा सारजामाय शेतात कामाला आली होती. रानातून आईसंगं घरी आल्यावर मला काय बोलावं तेच सुचेना. तिच्या चेहऱ्यावरचं भाबडं हसू गेलं होतं. तिच्या भाबड्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. मी म्हणालो, "मला आत्ता कळालं ये" 

ती मला म्हनली, "म्या जित्ती आसजोपाना त्येला संबाळले आसते. पर आसं करायचा नव्हता." ती रडू लागली. माझ्या पोटात कालवलं.

       पुन्हा आम्ही आमच्या व्यापात अडकून गेलो. दिवाळीच्या सुट्टीला घरी आलो. पडवीत गरम होत होतं. आईला विचारलं, "खालचा फॅन कुठं हाय?" आईनं सांगितलं, "सारजामायला दिले मी."

'कसं काय?' असं विचारल्यावर तिनं सांगितलं, "सारजामाय पडून हाय की रे. अरे, लई दिवस झाले. ल्योक गेल्यापसून लई खचली बघ म्हातारी. मी बघायला गेलते एक्या दिवशी शिरा घिऊन तर मला म्हनली, 'लई उकडलालंय. आंगात धग हाय निसती.' म्हनून मी भाऊला फॅन न्हिऊन द्याला सांगितले."

"मग दवाखाना ते केलनी कोन?"

"पुण्यातल्या ल्योकानं दाखिवला चांगल्या दवाखान्यात. थोडे दिवस ठिवूनबी घेतला. म्हातारी ऱ्हावं का? आता गावाकडच सोड मला म्हनली मन. आनून सोडला घरी."

"भाकर कोण घालतंय मग आता तिला?"

"गावातली लेक बघत्याय. म्हातारीला तर कायबी जाईना. ऱ्हायला म्हातारा. त्येला तर आन कुटं गोड लागतंय?"

        पुढच्या एका खेपंला आल्यावर आईनं सारजामाय गेल्याचं सांगितलं. अरेरे! मन भरून आलं. डोळे ओले झाले. सारजामाय आमच्या आयुष्यातून कधीच जाणार नव्हती. 

      परवा एकदा मी लग्नाचा अल्‍बम बघत बसलो होतो. दोन-तीनदा निरखून अल्बम बघितला. तो काळ. ते लोकं. दहा वर्षांनी पुन्हा बघत होतो. अचानक एका फोटोत सारजामाय दिसली. गुडघे वर घेऊन, दोन्ही हाताचा गुडघ्याला वेढा घालून, चष्म्यातून समोरचा सोहळा पाहत बसलेली. मी तटकन उठून बसलो आणि आईला जोरात हाका मारू लागलो. 'काय?' म्हणत आई आली. मी म्हनलो, "हे बघ." आईला दिसलं नाही. तिनं चष्मा आणला. चष्मा लावून आईनं फोटो बघितला. मी फोटोतल्या बायांच्या गर्दीतल्या तिच्या चेहऱ्यावर बोट ठेवलं. आईचा चेहरा उजळून निघाला. आई म्हनली, "सारजामाय हाय की रे. कसं बसल्याय बघ. लग्नाला आलती. मला याद हाय."

अन् आईच्या डोळ्यात डबडब पाणी.


          - प्रमोद कमलाकर माने

पूर्वप्रकाशित: अक्षरदान दिवाळी २०२०

आभार: मोतीराम पौळ

रेखाटने साभार: दिलीप दारव्हेकर

बुधवार, १४ मे, २०२५

दौरा


 सोयाबीनचं पीक पाण्यावाचून सुकत चाललं होतं. बांधा-धुर्‍यावरचं गवत वाळून कोळ झालतं. उडीद-मूग तर वाळूनच गेलते. अनेकांनी कुळव फिरवून मोडून टाकले होते. अशातही एखादी झड पडून गेली, तर सोयाबीन थोडंफार हाताला लागेल; अशी सगळ्यांनाच आशा होती. सोयाबीन पेरल्यावर चार-पाच पानांवर असताना एक मामुली झड पडून गेली होती. लोकांनी आशेनं खुरपणी-फवारणीचा खर्च केला होता. पण अख्खा ऑगस्ट कोरडा गेला. सोयाबीनचा फुलोरा गळून पडत होता. 

        आंब्याच्या झाडाखाली बसून माऊली काडीनं मातीत उगाचच रेघोट्या ओढत होता. माऊलीनं खुरपणासाठी लग्नातली अंगठी उमरग्याच्या सोनाराकडे गहाण ठेवून महिना तीन टक्क्यानं पाच हजार आणले होते. अंगठी नसलेल्या बोटावर अंगठीचा पांढरा वण दिसत होता. माऊलीच लक्ष त्या पांढऱ्या वणाकडे गेलं. फवारणीचं औषध उधारीवर आणलं होतं. फवारणीचा पंप भाड्यानं आणून दोघा बापल्योकानंच दोनदा फवारणी केली. रघुतात्या पाणी आणायला आणि मावल्या फवारायला. पलीकडं भावकीच्या सोयाबीनमध्ये स्प्रिंकलर चालू होतं. माऊली उदास डोळ्यांनी ते दृश्य पाहत होता. शेतात पाणी व्हावं यासाठी रघुतात्यानं खाल्लेल्या खस्तांचा इतिहास त्याच्या डोळ्यांपुढून सरकू लागला. पाण्याच्या नादानं घर कर्जबाजारी झालं. कडूसं पडल्यावर माऊली उठला. तोंडातली तंबाखू थुंकून गाडीवाटेला आला. मागून नबी येत होता. त्यांनं हाक मारली. माऊली थांबला. दोघं बोलत गावाकडं आले. घरी आल्यावर वसरीवर रांजणातल्या पाण्यानं पाय धुतले. बाहेर पत्र्याच्या शेडमध्ये त्याची बायको भाकरी थापत होती. चुलीच्या उजेडात ती देखणी दिसत होती. घरात आला. मायबाप टीव्हीवर देवाची मालिका बघत बसले होते. माऊली पलंगावर आडवा झाला. बायकोनं लग्नातल्या फुलांच्या कुंड्या, तोरणं यांनी खोली सजवली होती. वर लक्ष गेलं. मोजून साडेचार पत्रे. तेही जागोजागी एमसील लावून अंगावर गाठी झाल्यासारखे. माऊली चौकात आला. गणूच्या टपरीवर एक सुपारी सांगितली. गणू म्हणाला, 

 “उधारी लई झाल्याय. कवा देतूस गा?”

 “देतो, जरा दम धर.” -माऊली.

 “नाही गा, माल भरायचाय. बग काय तर हाय का? उदार दिऊन पार कड लागली.”

 “हंऽ पर माजं तसं नाही. देतो म्हंजी देतो.” – माऊली. गणू सुपारी घासू लागला. सुगंधी छिटा सुपारी तोंडात टाकून माऊली सटकला. डोकं फ्रेश झाल्यासारखं वाटलं. कट्ट्यावर बसून एक पिचकारी मारली. पुन्हा डोळ्यापुढं सुकलेलं सोयाबीन दिसू लागलं.

 माऊली शेतात. शेतातून घरात. चौकात. शेतात...

 पाऊस कुठं बेपत्ता झालता कुणाला ठावं? रात्री पलंगावर डोळे उघडे ठेवून नुसतं पडून राहू लागला. आधीच्यासारखं हा तिची वाट न पाहता आपल्याच तंद्रीत पडलेला. ती बिचारी शेजारी गुपचूप झोपायची. कामानं थकल्यामुळे लगेच झोपी जायची. हा दीड-दोन वाजेपर्यंत जागायचा. सकाळी आठला उठायचा. सोयाबीन चक्क गेलं होतं. लोकांनी सोयाबीनमध्ये कुळव घातले होते. जनावरं सोडली होती. पण माऊलीला तसं करू वाटत नव्हतं. लागलेल्या चार-चार शेंगा एखादा झडगा आला तर फुगतील, पदरात पडतील- असं वाटायचं.

 माऊलीची माय शारदा कामाला जात होती, म्हणून घर भागत होतं. रघुतात्याही भाड्यानं कुळवपाळ्या करत होता. पण काम कवातरच मिळायचं. भावकीतला नारायण आबा एके दिवशी माऊलीकडं आला. त्याचं सोयाबीन स्प्रिंकलरच्या पाण्यावर छान आलं होतं. फवारणीसाठी त्याला माणूस मिळत नव्हता. माऊली मोबाईलवर गेम खेळत बसला होता. त्याचं लक्ष वर गेलं. दारात आबा. 

 “या आबा.”

 “तुला फोनच करनार होतो, पन समक्ष बोलावं मनून आलो.”

 “बोला.”

 “सोयाबीनवर लई आळी झाल्याय गा. आवशीद आनून ठिवलाव. यितूस का उद्या फवारायला?”

 “पानी कोन देतंय?” -माऊली

 “तात्याला घि मग संगं. आर्दा रोजगार देतो तात्याचा. बारा-तेरा घागरीच पानी पडतंय की. तुजा डब्बा पार होजूकना बसायचंच हाय.” -आबा.

 “तात्यालाच इचारा. माजं काय नाही, म्या येतो.”

 “कुटं गेलते तात्या?" 

 “भजनाला गेल्यासतील."

 “मग गाठतो त्येला देवळाकडंच.” म्हणत आबा उठला, तर शारदानं चहा आणला. म्हणाली,

 “दाजी, च्या तर पिऊन जावा गरिबाचा.”

 “आसं का वैनी? द्या पेतो की!” म्हणत आबानं हात पुढे केला. 

“च्याला म्या कदी नगं म्हनतनी.” म्हणत फुरका मारला. आबाचा ल्योक मिलिट्रीत आहे. त्याच्या आधारानं आबानं मळा फुलवला. बोरला पाणी भरपूर लागलं. आबाची कोरडवाहू शेती पाण्याची झाली. शारदानं आबाच्या ल्योका-सुना-नातवाची विचारपूस केली. आबानंही माऊलीच्या बायकोला दिवस गेलेत की नाही ते खूबीनं काढून घेतलं. ऐसपैस गप्पा मारून आबा गेला. दिवसभर फवारून अंग पिळवटून गेलतं. माऊली सुपारी खायला चौकात आला. तिथं दुष्काळाची चर्चा सुरू होती. माऊली पिचकार्‍या मारत बसला. जाधवाच्या रामनं सांगितलं की, उद्या आपल्या शिवारात केंद्रीय पथकाचा दुष्काळ पाहणी दौरा आहे. माऊलीनं विचारलं,

 “कोन-कोन हाय गा पथकात?”

 “अधिकारी आस्तेत मोठे.” -गणेश.

 “मग तेन्ला काय झाट्टा कळतंय?” माऊलीनं असं म्हटल्यावर सगळे हसायला लागले. सकाळी माऊली ग्रामपंचायतीपुढं आला. तिथं त्याला माहिती मिळाली की, पथक तळ्याकडच्या इनामाच्या शिवारात आलंय. माऊली सरसर इनामाकडं निघाला. या शिवारात बागायत जास्त आहे. विहिरींना, बोअरना पाणी आहे. त्यामुळं इनाम शिवार हिरवागार दिसतो. माऊली घामाघूम झाला होता. बघतो तर रोडला गाड्यांची भली मोठी रांग. लाल दिव्याच्या गाड्या, कारा, पोलीसगाडी. गर्दीतून माऊली पुढे आला. पथकासोबत तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी, आमदारही होते. सगळे शिवाप्पा सावकाराच्या ऊसाकडं गेले. त्यातल्या पंजाबी घातलेल्या एका बाईनं विचारलं, 

 “ये क्या है?” 

 “ये ऊस है. कारखाने में इसकी शक्कर बनती है.” आमदारांनी माहिती पुरवली. 

 “इसे कैसे खाते है?" म्हटल्यावर सावकारानं दोन-तीन चांगले ऊस काढून आणले. त्यातला एक मोडून आमदाराला, एक तुकडा त्या गोऱ्यापान बाईला दिला. आमदारांनी ऊस सोलून खाऊन दाखवला. सावकारानं सगळ्या साहेबांना एक-एक कांडकं दिलं. हास्यविनोदात ऊसपान कार्यक्रम रंगला होता. माऊलीचं डोकं सटकलं. तो पुढं होऊन आमदारांना म्हणाला,

 “सायेब, हेन्ला तिकडं खाल्लाकडल्या शिवारात घिऊन चला. हितं इनामाच्या मळ्यावात कशाला आनलाव?” 

आमदार तुच्छतेनं म्हणाले, 

 “तिकडं पक्का रोड नाही. गाड्या कशा जाणार? व्हय रं?” 

 “मग हे लोक ऊस बघून काय शेट्टाची भरपाई देणार?” माऊली तापला. त्याला उत्तर न देता आमदार अधिकाऱ्यांना घेऊन पुढं पाटलाच्या शेताकडं निघाले. दोन्ही बाजूंना मशीनगन घेतलेले सिक्युरिटी गार्ड. मागे पोलीस. एकाएकी माऊली गर्दीतून पुढे घुसला. अधिकाऱ्याजवळ जाणार तोच गार्डनं अडवलं. तरी माऊलीनं मुसंडी मारून एका अधिकाऱ्याचा हात धरलाच. अधिकारी घाबरला. माऊली त्याला ओढत ओरडू लागला,

 “हितं कशाला टायमपास करलालाव, मायघाल्यांनोऽऽ तिकडं हामच्या शिवारात चलाऽऽ करपल्याली पिकं बघा.” पोलिसांनी माऊलीला गच्च पकडलं. ते माऊलीला बाजूला ओढू लागले. त्या अधिकाऱ्याचा हात माऊलीच्या हातातून निसटला, तरी पथकातले सगळे सदस्य घाबरून माऊलीकडेच बघत स्तब्ध उभे राहिले. 

 “चला, माजं शेत बगाऽ चला सायेब! चलो, देखो मेरा खेत. पूरा जल गया. काटा निकल्या ओऽऽ” पथकाकडं बघत माऊली ओरडत होता. रडत होता. पोलीस त्याला धरून गाडीकडे नेत होते. माऊलीला पोलीसगाडीत घातलं. गाडी निघून गेली. आमदार भेदरलेल्या अधिकाऱ्यांना घेऊन धीर देत पुढे निघाले. गर्दीला चेव आला. रामनं घोषणा दिली,

 “केंद्रीय पथकऽऽ” 

लोक ओरडले, “मुर्दाबादऽऽ” लोक खवळले. ‘आमचा सर्वे - नीट करा’, ‘केंद्रीय पथक -मुर्दाबाद’ अशा घोषणा सुरू झाल्या. केंद्रीय पथकाने पाहणी आवरती घेतली. पोलीस बंदोबस्तात गाड्यांमध्ये बसून पथक पसार झालं.

          - प्रमोद कमलाकर माने

          •••

(पूर्वप्रकाशित: अक्षरलिपी दिवाळी विशेषांक २०२१)

रेखाटने साभार: जितेंद्र साळुंके 


बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४

गझल


  


ये शहर मुझे रास न आया

यूँ जिने का अहसास न आया


क्या पाया क्या खोया मैने

कोई भी तो पास न आया


सबकुछ था फिर भी मुझ को 

रहनसहन का मिजास न आया


बुत बनकर यूँ बैठे हैं कि

दिल में उम्मीद-ओ-यास न आया


हाल बयाँ करने का जुनूँ था

लफ्जों में कुछ खास न आया


     - प्रमोद माने 

        १४|०२|२०२४


 बुत= पुतळा

उम्मीद-ओ-यास = आशा आणि निराशा

शुक्रवार, ७ मे, २०२१

शेतकऱ्यांच्या होरपळीची गाथा: ‘वीजेने चोरलेले दिवस’


       'वीजेने चोरलेले दिवस' ही संतोष जगताप यांची एका ज्वलंत आणि वेगळ्या विषयावरची कादंबरी नुकतीच दर्या प्रकाशन, पुणे यांच्याकडून आलेली आहे. ही कादंबरी आशय, विषय, भाषा, निवेदन अशा अनेक अंगांनी महत्त्वाची आहे. शेतीसाठी भारनियमन हा अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना छळणारा विषय झाला आहे. रात्री उशिराची वीज सोडणे, डीपीवर जास्त लोड असल्याने ट्रान्सफॉर्मर जळणे, तो दुरुस्त होऊन न मिळणे, त्यासाठी शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करावी लागणे अशा अनेक समस्यांना शेतकरी तोंड देत आहेत. मराठी साहित्यात प्रथमच हे सर्व बारकाव्यांनिशी आलेले आहे. लाईनमन, वायरमन, झिरो वायरमन, डीपीची दररोज देखभाल करणारा लोम्या म्हणजेच लोकल म्यानेजर, साहेब, सरकारी धोरणे या सिस्टीममध्ये शेतकरी कसा हतबल होऊन अडकलेला असतो ते खूप छान मांडलेले आहे. लेखकाने हे सगळं जीवन स्वतः जगल्यामुळेच प्रत्ययकारीपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे. जगू हा या कादंबरीचा नायक असून तो ग्रॅज्युएट आहे. तरी मायबापासोबत रानात दिवस-रात्र खपतो आहे. मध्यरात्री उठून बापासोबत शेतात पाणी द्यायला जायचं. बंद पडणाऱ्या स्टार्टरचं बटण दाबायला विहिरीजवळ बापानं थांबायचं आणि स्वतः दारं धरायचं. ह्या जागरणानं बिघडणाऱ्या तब्येतीचा विचार न करता पीक जगवण्यासाठी दररोज तुकोबाकथित ‘युद्धाच्या प्रसंगाला’ तोंड द्यायचं. ह्या जगण्यासोबतच रानातली त्यांची वस्ती, ते शिवार, तो परिसर लेखकाने  सेंद्रियतेने आपल्यापुढे उभा केला आहे.

    या कादंबरीत प्रथमपुरुषी निवेदन असून ते अतिशय रोखठोक अशा लोकभाषेत आलेले आहे. सांगोला परिसरातील लोकभाषेची सगळी वैशिष्ट्ये, लोकम्हणी, वाक्प्रचार, शब्द यांचा वापर लेखकाने खुबीने केलेला आहे. या निवेदनात कुठेही एकसुरीपणा आलेला नाही. पट्टीच्या गोष्ट सांगणाऱ्याकडे ज्या-ज्या क्लृप्त्या  असतात त्या सर्व लेखकाच्या निवेदनात येतात. अर्थातच हे ओढून ताणून आणलेले नाही; तर नैसर्गीकपणे  आलेले आहे. हे निवेदन शेवटपर्यंत वाचकाला पकडून ठेवते. निवेदनामध्ये लोककथांचा वापर दृष्टांतासारखा केलेला आहे. नायक कधी तिरकसपणे, कधी विनोदी पद्धतीने, कधी उपरोधाने गोष्ट सांगत राहतो. 

      कादंबरीची भाषा खूपच समृद्ध आहे. या भाषेमुळेच कादंबरीला एक जिवंतपणा आला आहे. या दृष्टीने कादंबरीची सुरुवात पाहण्यासारखी आहे-

 ‘होल कंट्रीत आपणच भारी. आपल्या लेकराबाळांसकट, म्हाताऱ्याकोताऱ्या  समद्यांला  दर एक-दोन तासांनी व-वरडून आनंद साजरा करता येतो. लाइट आली... लाइट आली... आली... आली... लाइट आली... असं मुसळानं टिऱ्या बडवत. गुड नाईट!’

   ‘आमची माणसं आमच्याच मातीत घालत अर्थातच रेडिओचा आवाज कमी केला तरी कडू ना हालिंग ना डुलिंग ओन्ली गपगार पडिंग.’ असं उपरोधिक, विनोदी अंगानं येणारं निवेदन अस्सल आहे.

  एखाद्या  विषयावर ठरवून कादंबरी लिहिताना ती एकांगी होण्याची शक्यता अधिक असते; पण लेखकाने या कादंबरीत तोही तोल छान सांभाळला आहे. जगण्याचाच एक भाग बनून हा विषय समोर येतो व त्याच सोबत इतर पातळ्यांवरचे जगणेही सोबतीने येते.  या कादंबरीतील भाषा ही जिवंत व रसरशीत आहे. ही त्या परिसराची लोकभाषा आहे. लेखकाने ती पुरेपूर सामर्थ्यानिशी वापरली आहे. आजवर्दी, कडू, घांगऱ्याघोळ, रातचंइंदारचं, नादीखुट, येरवाळी, बुरंगाट, डोक्यालिटी असे परिसरातील बोलीतील अस्सल शब्द या कादंबरीत सहजतेने येतात. 

    टाळक्यात वाळकं, बाळंतपण निस्तारणं, आभाळ हेपलणं, व्हरा हाणणं, कासुट्यात जाळ होणं, भेडं होणं, मधल्यामधे गाळा हाणणं, बेंबटाला वढ बसणं, खिरीत सराटा निघणं,  गांडीवर काटं उभा राहणं, अशा अस्सल वाक्प्रचारांमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त झाले आहे. 

   आपण धड तर जग ग्वाड, फुकटचं खाणं न् हागवणीला कार, म्हातारीनं पंजाण घातलं म्हणून ती पोरगी होईल का, लाडका किडा न गावाला पिडा, भिणाऱ्याच्या मागं म्हसोबा, घराचा उंबरा दारालाच म्हायती, दिवा जळं, पिडा टळं अशा म्हणींच्या उचित वापरामुळे कादंबरीतील भाषा संपृक्त झाली आहे.

      शेतकऱ्यांचे वीजेने चोरलेले दिवस ह्या कादंबरीत धरून ठेवण्यात लेखक यशस्वी झाला आहे. ह्या कादंबरीत आलेले भीषण वास्तव हे अपवादात्मक नसून सार्वत्रिक व सर्वकालिक असल्याने ही कादंबरी महत्त्वाची ठरते. आधीच अस्मानी, सुलतानी समस्यांनी मेटाकुटीला आलेला शेतकरी वीजेच्या भारनियमनामुळे आणि भ्रष्ट व्यवस्थेतील ढिसाळपणामुळे कसा कोलमडून पडतो; याचे प्रत्ययकारी चित्रण या कादंबरीत आलेले आहे. 

       लेखकाची ही पहिलीच कादंबरी असूनही लेखकाने ताकदीने हा वाङमयप्रकार हाताळला आहे. त्यांच्या पुढील लेखकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

पुस्तकाचे नाव- वीजेने चोरलेले दिवस (कादंबरी)

लेखक- संतोष जगताप

प्रकाशक- दर्या प्रकाशन, पुणे 

पृष्ठे-  १५६

मूल्य- ₹ २२०

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

मराठी भाषेला समृद्ध करणारा कवितासंग्रह: पुन्हा फुटतो भादवा




  कवी अमृत तेलंग यांचा ‘पुन्हा फुटतो भादवा’ हा कवितासंग्रह पुण्याच्या ‘दर्या’ प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. समग्र ग्रामजीवन कवेत घेणाऱ्या या संग्रहास महाराष्ट्र शासनाच्या 'बहिणाबाई चौधरी' पुरस्कारासह लोककवी विठ्ठल वाघ पुरस्कार, पद्मश्री नामदेव ढसाळ पुरस्कार असे मानाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

   मराठवाड्याच्या मातीतली ही कविता आपले सत्त्व आणि स्वत्व जपणारी आहे. ही कविता कुणब्याच्या ‘ढोरकष्टाचा अभ्यासक्रम’ आपल्यापुढे ठेवते आणि कुणब्याच्या पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्याची क्षमताही बाळगते.

    ग्रामीण कवितेवर असा आरोप होतो की, ही कविता माती, बाप, ढेकूळ, बुक्का,  काळी माय, हिरवा शालू अशा टिपिकल साच्यातून बाहेर पडायला तयार नाही. ग्रामीण कवी भाबडेपणानेच व्यक्त होतो. त्याचा कृषीसंबंधित राजकीय-अर्थशास्त्रीय धोरणे, जागतिकीकरणाचे परिणाम इत्यादी बाबींचा अभ्यास नाही. आवाका नाही. वगैरे.  अमृत तेलंग यांची कविता शेती आणि खेड्याच्या अवनतीचा चौकसपणे वेध घेते.

     ही कविता व्यापक आशय कवेत घेणारी आणि नैसर्गिक प्रसरणशील आहे. या कविता वाचताना तिच्यातल्या काव्यतत्त्वाचे वारंवार दर्शन होते. ह्या काव्यदर्शनामुळे  रसिकाला होणारा आनंद शब्दातीत असतो. हल्ली मराठी कवितेतून हे काव्यतत्त्वच लुप्त झाले आहे. अलिकडची कविता वाचताना, कविता वाचतोय की वैचारिक ललितगद्य वाचतोय अशी शंका वारंवार येते. पण ही कविता वाचताना निखळ कविताच भेटते.

    शेतकरी सोडून गावगाड्यातील इतर उपेक्षित, वंचित घटकांविषयी ही कविता बोलत नाही; असाही आरोप मराठी ग्रामीण कवितेवर होतो. अमृत तेलंग यांची कविता  कुणबी, मजूर, बलुतेदार, गावकुसाबाहेरील कष्टकरी ह्या साऱ्यांविषयी आस्थेने बोलत राहते. ‘महादू कुंभार’,  ‘किसन लोहार,’  ‘सटवा सुतार’ इत्यादी कवितांमधून मोडलेल्या गावगाड्याविषयीचे मूलभूत चिंतन प्रकट होते.

    मराठवाड्याच्या अस्सल बोलीभाषेचं लेणंच या कवितेत गवसतं. कोरड्यास, जागल, बिदीशी, खवंद, चेलमा, आऊत, परतपाळ, वाकाण, चलिंत्र, येसन, व्हाटोळ, रवंदळ, कुंधा, आरकट, जळतन, उकंडा.... इत्यादी अनेक अस्सल मराठवाडी शब्द या कवितेत सहजपणे आले आहेत. या शब्दांचा सुगंध या कवितेला आहे.
 ‘पोटाला पाय लावून निजलेली रात’ कुणब्याच्या वाट्याला नेहमीच येते; हे कवी ताकदीने मांडतो. मायबापावरील त्यांच्या कविता तर हलवून टाकणाऱ्याच आहेत.

‘तापलेल्या वाळूत ज्वारीच्या लाह्या
 फुटाव्यात
 तसे फटफट फुटत जातात तुझे दुखरे शब्द’ (माय तू घोकत आलीस) किंवा
‘भाकरीचा पापोडा करपत जावा
तशी करपत गेलीस माळरानात’ अशा ओळींमधून आलेल्या अस्सल प्रतिमा कवितेला उंची प्राप्त करून देतात.

   ‘इपरीत’, ‘खंगत गेला गाव’ अशा कवितांमधून बदलत चाललेले ग्रामवास्तव अचूकपणे मांडण्यात कवी यशस्वी झाला आहे. उद्ध्वस्त होत चाललेल्या गावाचे अवशेष कवीने आपल्यासमोर आणून ठेवले आहेत. केवळ स्मरणरंजनातच न रमता कवी कृषीव्यवस्थेच्या दुखण्यापाशी पोहोचतो आणि आजच्या अस्वस्थ करणाऱ्या वर्तमानाची नोंदही घेतो.

     ग्रामीण स्त्रीजीवन हे कष्टांनी, दुःखांनी किती व्यापलेलं आहे; हे कवी प्रभावीपणे आपल्या कवितांमधून मांडतो.

‘तुझा जलम गं बाई
जशी धुपती गवरी
ऊन पाऊस झेलून
चाले डोंगराची वारी’ (कृष्णाई)

 अशा ओळींमधून या उपेक्षित जगाकडे कवीने लक्ष वेधले आहे. ‘चिमा’ ही कविता आख्यानकाव्याचा एक उत्तम नमुना आहे. ‘कृष्णाई’ ही कविता गावकुसाबाहेरील तांड्यावरच्या एका बंजारा स्त्रीच्या कष्टप्रद जीवनाचे कारूण्यगीतच आहे.

    कवीने मुक्तछंदाबरोबरच मराठीतले अभंग, ओवी, अष्टाक्षरी हे छंदही ताकदीने वापरले आहेत. ‘रानाचा वाली गेला’, ‘धीट आंधळा जलम’, ‘पोरा’, ‘त्याला भेटायचा सूर्य’, ‘खंदारवाट’, ‘इपरीत’, ‘खंगत गेला गाव ‘, ‘माय तू घोकत आलीस’, इत्यादी अनेक उत्कृष्ट कविता या संग्रहात आहेत. ‘गावरान ‘सारख्या कवितांमधून कवीचा उपरोध तीव्रपणे प्रकट झाला आहे.

      पहिल्याच संग्रहात पूर्वसुरींचे कुठेही अनुकरण न करता कवीने स्वतःची पायवाट शोधली आहे. ही कविता आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे केवळ दुःखच न मांडता ‘पुन्हा फुटतो भादवा’ असा आशावादही पेरते.

‘कुणबी पेरावा
कुणबी उगावा
कुणबी विकावा । बाजारात

कुणं बी चोळावा
कुणं बी पिळावा
कुणं बी दळावा । पाळूखाली’  ( कुणबी )

 अशी स्तिमित करणारी दमदार कविता लिहिणाऱ्या या तरूण कवीची कविता अशीच फुलत राहो. तिने नवनव्या शक्यतांचा मागोवा घेत राहून अधिकाधिक विकसित होवो; यासाठी सदिच्छा!

     कवी आणि चित्रकार विष्णू थोरे यांचे अर्थवाही मुखपृष्ठ व आशयाला गडद करणारी सुंदर रेखाटने, कलात्मक मांडणी, सुबक आकार यामुळे हा संग्रह देखणा झाला आहे. मलपृष्ठावरील कवी अजय कांडर यांचे ब्लर्ब कवितेचा आशय आणि बलस्थाने यांना अधोरेखित करणारे आहे.
       


बुधवार, ६ मे, २०२०

लाॅकडाउन स्टोरीज

                  

 


                        ॥१॥

आमच्या ह्यांनी आज दुपारी स्वतः किचनचा ताबा घेतला. स्वतःच्या हातांनी मस्त कांदाभजे बनवले. मला तर बाई खूप कौतुक वाटलं. ह्यांनी भजे बनवताना मोबाईलवर मला फोटोही घ्यायला लावले..
सगळ्यांना स्वतः प्लेटी लावल्या. माझ्यासाठी थोडे भजे आठवणीनं बाजूला काढून ठेवले बरं का! मग काय घरभर कौतुक. मला सासूचे टोमणे. 

    मग हे मोबाईल घेऊन बसले. फेसबुक, इन्स्टा, व्हाटसपवर भजे बनवतानाचे फोटो शेअर करत. मोठमोठ्याने काॅमेंटस् वाचून दाखवत. "अगं माहितंय का? कोण लाईक केलंय?"  मी किचनमधूनच विचारलं, "कोण?" 
"सचिन सुरवडकर! खूप मोठे फेसबुक सेलिब्रिटी आहेत!"
"होऽ क्का?"  मी पहिल्यांदाच नाव ऐकलं होतं; पण ह्यांच्या उत्साहावर विरजण पडू द्यायचं नव्हतं. आता मला किचन आवरायचं होतं. बाहेर येऊन ऐकू वाटत होतं. कोणकोण कायकाय म्हणतंय. पण... खूप पसारा... सांडासांड, तेलाचे डाग, दुप्पट भांडी... किचनकडे पहावंस वाटत नव्हतं. एवढं घाणेरडं किचन पहिल्यांदाच बघतेय.

   हुश्श! झालं एकदाचं. दोनतीन तास गेले आवरायला. पण हे आज खूपच खूष आहेत. एवढे दिवस सलग घरी बसायची सवय नाही ना! आम्ही बायका काय, नेहमीच घरी असतो. मोबाईलचा प्रकाश ह्यांच्या चेहऱ्यावर पडलाय.  ह्यांचा चेहरा कसा प्रसन्न दिसतोय. वाढलेल्या केसादाढीमिश्यातही. 

__________________________________________________

             ॥२॥

किश्याचा काॅल आला. चार्जिंगचा मोबाईल काढून काॅल घेतला.

"अबे! कुठं गडप झालास?"

"घरीच हाय बोल.."

"माझ्या पोस्ट बघत नाहीस. स्टेटस बघत नाहीस. लाईक नाही. काही शेअर नाही. हैस का गचकलास वाटलं. कधी फेसबुक,
वाटसपकड ढुंकूनबी न बघणारे टिकटाॅकवर स्वतःचे व्हिडिओ बनवून टाकायलेत. फेसबुक लाईव्हवर यायची तर चढावढ लागल्याय. रिकाम्यारानी वेळ हाय म्हनून.  तू तर नेमानं हाजेरी लावनारा. कुठंच कसं दिसंनास म्हनून काळजी वाटली. म्हनून म्हंटलं बघावं. ह्ये बेणं करतंय तर काय? का दोन्ही टायमाचा सैपाक तूच करायलास. वैनींना आराम म्हनून?"

   आता काय बोलावं ह्याला?

"आबे, टिव्ही बिघडलाय. अन् गाबडे मोबाईल सोडतच नाहीत. एक हिचा घेऊन बसतंय अन् एक माझा... आता का बोंबलावं?"

"आवघडाय मग टाएम कसा जातो बे?..." किश्या बोलतंच होता लांबणीखाली तर धाकलं मागून शर्टला ओढत होतं
'पप्पा झालं का? द्या की..' म्हणत.

________________________________________
           
                ॥३॥

आमचं चौकोनी कुटूंब. मस्त चाललं होतं. आईवडील गावाकडे आहेत. आम्ही नोकरीच्या गावात अडकलोय. घरात बसून- बसून कंटाळलो होतो. काहीतरी करायला पाहिजे.. मग.. मी आज स्वतःहून अंगण झाडलं. भांडी घासली. धुणं धुतलं. मुलांना आंघोळी घातल्या. हिचं "अहो राहू द्या..राहू द्या." सुरू होतं. मी ठाम होतो. पुरूष असल्यामुळे जरा जडच गेलं. दररोज असली कामं या बायका न कंटाळता कसं करतात कोण जाणे? थोडी चिडचिडही झाली. पण तोंड आवरतं घेतलं.

       सगळं काम झाल्यावर हिचं बँडेज बदललं. काल भांडणात माझा तोल गेला. हिच्या हाताला चांगलीच जखम झाली. खूप रक्त गेलं. हिने सगळ्यांना 'चुकून विळी लागली' म्हणून मला तारलं. असो! आता दोनतीन आठवडे तर मलाच धुणीभांडी करावी लागणार! सुटका नाही.

____________________________________________
         
                ॥४॥

मयतीला किती माणसं होते? यावरून त्या मेलेल्या माणसाला समाजात काय मान होता? त्याने किती माणूसकी कमावली होती? हे ठरवलं जातं. त्याची खरी प्रतिष्ठा मेल्यावरच कळते. मयतीला आलेल्यांची संख्या त्या मेलेल्या माणसाच्या आणि कुटूंबाच्या प्रतिष्ठेची बाब असते. विशेषतः ग्रामीण भागात या संख्येला फार महत्त्व आहे.

      या लॉकडाऊनच्या काळात आमच्या गावातले, गल्लीतले एक वयस्कर बाबा मरण पावले. खूप दिवसांपासून आजारी होते. त्यांची वयस्कर पत्नीच त्यांचं सगळं करायची. घरात ते दोघंच राहत होते. त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त परराज्यात राहतो. तिकडंच अडकून पडलाय. मुलगी पुण्यात राहते. शेजारी भावकीतली एकदोन घरं आहेत. भावकीतल्यांनी मुलाला व मुलीला फोनवरून कळवले. ग्रामपंचायतीसही कळवले. मुलगा येऊ शकत नव्हता. मुलीला परवानगी मिळाली तरी आजच्या आज येणं शक्य नव्हतं. रात्रीच अंत्यविधी उरकण्याचं ठरलं. प्रेताला अंघोळ नाही. काही नाही. शेजारच्या तालुक्यातल्या एका गावात राहणारी बहीणही पोहचू शकली नाही. एक पॅजो (टमटम) आला. दोघांनी अंथरूणासह उचलून मागे मृतदेह टाकला. भावकीचे दोनतीन माणसं मोटारसायकलवरून निघाले. पॅजोत फक्त म्हातारी आणि एक भावकीतली बाई. पॅजो हलला. अंत्यविधी उरकला गेला. व्हिडिओ काॅलवर चुलत भावानं त्या अभागी बहीणभावाला अंत्यविधी दाखवला. इच्छा असूनही नियमांमुळे गावातल्या, गल्लीतल्या कुणालाच मातीला जाता आलं नाही.

          दुसऱ्या दिवशी राख सावडायला तर पोहचू या आशेनं मुलीनं परवानगी मिळवली. गाडी करून निघाली. पुणे जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांनी अडवलं. 'अंत्यविधी तर कालच झाला ना? आता जाऊन तरी काय उपयोग? मी माझ्या आईच्या मातीला जाऊ शकलो नाही. सीमाबंदी आहे.' असं म्हणून वाहन परत पाठवले.

           मेलेल्या बाबांची सख्खी बहीण कशीबशी राखंला पोहचली. तिचा आक्रोश ऐकून वाईट वाटलं.
   
         मेलेल्या मायबापाचं शेवटी तोंडही पहायला मिळू नये अशा या वाईट काळात मृत्यू येऊच नये.

___________________________________

               ॥५॥

             
दररोज कामावर जाताना आजुबाजूच्या शेतात कामं चाललेली असत. जमिनीची मशागत ते पीक काढणीला येईपर्यंत काय उस्तवारी करावी लागते, ते शेतकऱ्याचा मुलगा असल्याने माहीत आहे. दररोजची झटाझोंबी रोडच्या आजुबाजूच्या शेतातून चाललेली दिसे. कधी सरी सोडायचं काम. कधी लावण. कधी खुरपणी. कधी आधारासाठी रोपांना काठ्या रोवणं, तारेचा मांडव करणं. कधी फवारणी. तर कधी पाणी सोडणं. शेतातली कामं हनुमानाच्या शेपटीसारखी संपतच नाहीत. कुणाची केळी लावण तर कुणाची भाजीपाला लागवड. कुणाची धानपेर तर कुणाची ऊसलावण. एकतर पाण्याची बोंबाबोंब. शेतात शाश्वत पाणी व्हावं म्हणून शेतकरी अनेक दिव्यातून जात असतो. ब्लास्टिंग करून विहिर खोल घाल. क्रेन आणून गाळ काढ. ऐन मोसमात पाण्यानं चट्टा दिला तर काढाकाढी करून बोअर घे. असे नाना उद्योग सोबतीनं करावे लागतात.
     आलेल्या मालाच्या पट्टीतून खर्च वजा जाता काहीच उरत नाही. उरलंच तर शेतातच गुंतवणूक करावी लागते. स्प्रिंकलर सेट घ्या. नाहीत पाईपलाईन करा. लेकरं हिंडेनात का लक्तरं घालून. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोडून आधुनिक शेती केली तर चांगलं ऊत्पन्न मिळू शकतं. मग त्यासाठी लागणारं भांडवल काय चोरी करून आणायचं का? शेतकऱ्याला सल्ले देणं खूप सोपं आहे. पण शेतीच्या चरकातून पिळून निघणं वेगळं. ते शेतकरीच सोसू जाणो!
        तर असे हे आजुबाजूचे शेतातले कामं बघत ये-जा सुरू असायची. लॉकडाउनमुळे काही दिवस घरीच होतो. खूप दिवसांनी कामानिमित्त त्या रोडने निघालो. बघतोय तर काय? काम करणाऱ्या माणसांनी गजबजलेल्या शेतात टोमॅटो झाडालाच पिकून सुकून गेलेत. खाली टोमॅटोचा सडा पडलाय. शेतात माणूसच नव्हतं. कसं असेल? समोरचं चित्र पाहून वेड लागेल. बाजूच्या एका शेतात केळीची बाग मोडायचं काम सुरूय. ऐन काढणीला हे विषाणूचं इघीन आलं. मग गारपीट झाली. कसंबसं उरलंसुरलं झोडपून गेलेलं कुणी काढून घरी आणलं. कुणाचं रानावरच सडतंय. कोण घेणार माल? आणि किती घेणार लहान खेड्यात? कुणी सडकेलगत माल घेऊन बसलंय. कुणी द्राक्षं, कुणी कलिंगडं. अशी कितीशी वाहनं जाणारायत त्या आडमार्गाच्या सडकेनं या लॉकडाउनच्या काळात? पण माल फेकून द्यायची हिंमत सगळ्यांकडे नसते. कुणी माल गावात फुकट वाटून टाकतंय. कुणी पिकात जनावरं सोडतंय. काही शेतकरी व्हाटस्अपवर ऑर्डर घेतायत. अशी किती ऑर्डर मिळेल? किती माल कटेल? बाकीच्या मालाचं काय?
     रबीचा हरभरा घरात पडून आहे. कधी आडतबाजार सुरू होईल? कधी वाहन मिळेल? कधी नंबर लागेल? याची काही शाश्वती नाही.
    किती शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरलं? किती स्वप्नांची धूळधाण झाली? किती कंबरडे कायमचे मोडले? गणती नाही.

_______________________________________________
(Image created with metaAI) 


बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

आटलेल्या पावसाची फाटलेल्या शेताची कविता




-केशव सखाराम देशमुख

   शेतकऱ्यांच्या लेकरांना कविता लिहायचा ‘सराव’ करावा लागत नाही. शब्दांच्या बुडबुड्याशी खेळून कवितांचे छूमंतर करण्याचा नाद मग जडत नाही. खरे म्हणजे, कविता उदंड झाली. ऊठसूट, जो तो उठतो तो कविताच लिहितो.

     शेती म्हणजे आतबट्ट्यांचा धंदा! व्यथा पुष्कळ. कथाही पुष्कळ. पावलोपावली होरपळ. शेतीच्या धंद्यात पडणं म्हणजे होरपळीची हमी. होलपटीचे वाटेकरी. दुष्काळाशी सामना आणि शोषणाचे कायम मानकरी! अशा दुष्कृत्याची कारूणिक व्यथा शेतकऱ्यांची ‘कवी’ झालेली लेकरं मांडत आहेत. प्रमोद कमलाकर माने हे असंच कवितेमधलं गुणी लेकरू आहे!!

   ‘कोरडवाहू’ शीर्षकाचा प्रमोदचा ६४ पानांचा प्रामाणिक अनुभवांनी व्यापलेला आणि शेतकऱ्यांची पावसाबिगर सुरू असणारी कुत्तरओढ मांडणारा हा कवितासंग्रह आहे.

     प्रमोदची आरंभीची पावलं या त्याच्या कवितेत उमटतात. रचनेचा त्याला फारसा सराव नाही. साधेपणाचे लावण्य लेवूनच तो कविता लिहितो. त्याच्या कवितेच्या जन्मकळा पुष्कळ इमानी आहेत. अनुभव घट्ट मांडण्यात तो कमी पडतो. तरीही; कविता लिहिताना विषयांची उसनेगिरी वा उचलेगिरी करायचे त्याला काम पडत नाही. जगणे व भोगणे हे प्रमोदच्या कवितेचे प्रमुख मैदान आहे! भुकेच्या अवकळा हा त्याच्या कवितेचा प्रांत ठरतो. जमिनीच्या भेगा व न बरसणारे ढग: हे प्रमोदच्या कवितेची निर्मितीप्रक्रिया होय. प्रमोदला दुःखातून फुटून व्यक्त झाल्याशिवाय आनंद मिळत नाही.

     ‘रवंथ’ या कवितेत दुष्काळ आणि ढोरवासरांच्या दैना प्रमोदने नेमक्या शब्दांतून मांडल्यात. कुणब्याच्या घरातली गरीबी ‘बळीराजा’ कवितेतून मुखरीत होते. उपासमारी व अवहेलनेचे करूण चित्र ‘दुस्काळ’ कवितेतून उमटते. ‘रंगारी’ या कवितेतून अवर्षण आणि शेतीपाणीवर गुदरलेले संकट फार प्रभावीपणे येते. ‘जुवाखाली’ कवितेत शिवाराची सावली, लक्ष्मी असलेल्या बैलांचे शब्दचित्र आले आहे. ‘कुठवर’ या कवितेत गरीबीचे दाह सोसून आकार पावणारे बंड येते!! थोडक्यात काय तर, ‘कोरडवाहू’ कविता ही करपलेल्या शिवारांची आणि होरपळलेल्या कष्टकऱ्यांची कविता आहे. या अवघ्या होरपळीचा प्रमोद हा कवी साक्षीदार आहे.  ही अवघी कविता लिहिताना प्रमोदला कुणाची नक्कल करावी लागत नाही. त्याला कवितांचे क्षेत्र शोधावे लागत नाही. जगणे, भोगणे,  आठवणे आणि  लिहिणे ही क्रियापदं प्रमोदच्या कवितेची उगमांची स्थळे आहेत.

शनिवार, २७ एप्रिल, २०१९

सुरेंद्र पाटील यांची दमदार कादंबरी: झुलीच्या खाली



    'झुलीच्या खाली' ही सुरेंद्र पाटील यांची 'चिखलवाटा' नंतरची दुसरी कादंबरी मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने काढलीय. त्यांनी आंतरभेगा या कथासंग्रहाने साहित्यविश्वात पदार्पण केले .
 या कादंबरीत श्रीशैल्य बिराजदार या शिक्षकाच्या जीवनाचा एक वर्षाचा पट लेखकाने दैनंदिनीतून उभा केलाय.
    या कादंबरीचा नायक नोकरीत येणाऱ्या वाईट अनुभवांवर चिंतन करतो.' गर्व से कहो हम गांडू है' असं उपहासाने म्हणत तो संताप व्यक्त करतो. संस्थेतलं भ्रष्ट वातावरण, राजकारण आणि गळचेपीने तो व्यथित होतो. तरीही तो आशावादी आहे. आपले काम इमानेइतबारे करत राहतो.
   त्याने गावाकडची नाळही तुटू दिली नाही. शेतीत पैसा घालणं परवडत नसतानाही तो शेतीला पैसे पुरवतोय. गावाकडे यव्वा (आई), आप्पा (वडील), अण्णा (भाऊ), वहिणी, त्यांची तीन लेकरं हा गोतावळा आहे. भावाला शेतीत साथ देऊन घराला उभं करण्यासाठी तो झटतो आहे. त्यात अण्णाला दारूचं व्यसन लागून शेतीची दुरवस्था झालीय. भावाला,शेतीला आणि दोन घरांना सावरताना त्याची दमछाक होतेय. हे सारं प्रत्ययकारीपणे या कादंबरीत आलं आहे.
    नायकाने दोन झुली पांघरल्या आहेत. एक मास्तरकीची. दुसरी गावाकडच्या जबाबदारीची. बैलाला झूल पांघरली जाते. पण त्याने पाठीवरचे वळच झाकले जातात. त्याला फक्त राबवून घेतले जाते. वरून रंगीत झूल पांघरलेला श्रीशैल्य झुलीखाली किती दबून गेलाय ते या कादंबरीतून जाणवत राहतं.
    या कादंबरीत आलेले लिंगायत समाजाचे चित्रण; हे या कादंबरीचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल. या समाजाचे चित्रण करणारी ही पहिलीच कादंबरी म्हणावी लागेल.
   श्रीशैल्यच्या शाळेतील सहकाऱ्यांची व्यक्तिमत्त्वं त्यांच्या गुणवैशिष्ट्यांसह खूपच कमी शब्दात आणि ठसठशीतपणे उभी करण्यात लेखकाला यश आले आहे.
    मराठवाडा-कर्नाटक सीमावर्ती भागातील बोलीभाषा कन्नडभाषेच्या प्रभावासह या कादंबरीत छान आली आहे. नायकाची आई यव्वा हिचे माहेर कर्नाटकातील असल्याने ती अधूनमधून कन्नडमध्ये बोलते. शेवटी लेखकाने अर्थाचे कोष्टक जोडल्यामुळे अर्थ समजण्यास मदत होते.
    पकड घेणारे निवेदन आणि गोळीबंद कथासूत्र असलेली ही कादंबरी नायकाच्या जगण्याचे सर्व ताणेबाणे समर्थपणे  कवेत घेते.
    सतीश भावसार यांनी कादंबरीचं मुखपृष्ठ सुंदर केलंय.

--------------------------------------------------

कादंबरीचे नाव- झुलीच्या खाली

लेखक- सुरेंद्र पाटील

प्रकाशक- मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

पृष्ठे- 114

मूल्य- ₹120

गुरुवार, १४ मार्च, २०१९

सप्ता

माझं घर वारकरी संप्रदायाचा वारसा नेटानं आणि निष्ठेनं  चालवणारं. गावातले जवळपास निम्मे लोक माळकरी. माझंही घर वारकरी घराणं म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द होतं; आणि आजही आहे. आमच्या घरी एकूण तेरा माणसं. सर्वांच्या गळ्यात तुळशीच्या माळा. आजोबा लहानपणापासूनच भजनाला जात. मोडकळीला आलेला संप्रदाय आजोबांनी पुन्हा सावरला आणि संप्रदायाचा चांगलाच जम बसला. आजोबांनी पोरं गोळा केले. त्यांना भजन शिकवलं. गोडी लावली. मोडलेलं भजन सुरू झालं; तेव्हापासून गावकरी आजोबांना मास्तर म्हणू लागले.
        मीही इयत्ता पहिलीला असल्यापासून टाळ घेऊन भजनाला उभारायचो. सगळं गाव माझ्या न चुकणाऱ्या टाळंच्या ठेक्याचं कौतुक करायचं. मला लहान टाळ होती पण मी मोठीच टाळ घ्यायचो. मोठी टाळ आवरायची नाही. हात भरून यायचे. कधीकधी बोटही ठेसून निघायचे. आज्जा, बाप, चुलता आणि मी असे एकाच घरातले चौघं भजनाला उभारायचो. आजोबा विणेकरी होते; आणि आम्ही तिघं टाळकरी. चुलता पट्टीचा गायक होता. चाल म्हणायला पटाईत. वडलांचा आवाज गायकीला  साजेसा नव्हता; पण पाठांतर प्रचंड होतं. किर्तनकारानं प्रमाण म्हणून कुठलाही अभंग दिला तरी वडील तो उचलून पूर्ण करायचे. प्रमाण आलं की सगळे वडलाकडच बघायचे. आजोळ गावातलं होतं. तिकडचे सख्खे- चुलत आजोबा, मामालोकही भजनात असायचे. पखवाज वाजवायला तिकडच्या दोन आजोबापैकीच एक असायचे. अशाप्रकारे दोन्हीकडच्या लोकांना माझं कौतुक होतं.
       आजोबा थकले; वय ऐंशीच्या घरात गेलं. भजनात तीनचार तास उभं राहणं जड जाऊ लागलं. ते ओळखून वारकऱ्यांनी मास्तरांना बळजबरीनं भजनातून रिटायर केलं. आजोबानंतर घराणेशाहीमुळे नाही तर पाठांतरामुळे विणा वडलांकड आला. विणेकरी हा हुशार, वारकरी परंपरेचं काटेकोरपणे पालन करणारा आणि आचरण चांगले असणारा असावा लागतो. ह्या कसोटीवर वडीलच टिकले. विणा गळ्यात येणं ही मोठीच जबाबदारी असते. भजनाला चकल्या, बुट्ट्या मारता येत नाहीत. आता आजोबा आणि वडीलांची विण्याची परंपरा आम्ही भाऊ सांभाळू की नाही याची शंका वाटते.
     गावात सप्त्याची परंपरा कधीपासून सुरू झाली हे कुणालाच खात्रीनं सांगता येत नाही; इतकी ती जुनी आहे. आजोबांना त्यांचे आजोबा सांगायचे की, “ मला कळतंय तसं गावात सप्ता होतोच.”
    सप्त्याच्या आधी गावात पट्टी गोळा केली जाते. पूर्वी सप्त्याच्या आधी लोक घरं सारवून घ्यायचे. आता एवढा उत्साह नसतो. आदल्या दिवशीच मंडप उभारला जातो. दर्शनी भागात विठ्ठल आणि संतांच्या प्रतिमा लावून त्यांना सजवले जाते. सप्त्याच्या पहिल्या दिवशी प्रतिपदेला विणा उभा राहतो. हा विणा सात दिवस (रात्रीसह) जमिनीला टेकवायचा नसतो. हातोहात हा विणा सात दिवस अधांतरी झंकारत ठेवायचा. रात्री, अपरात्री, पहाटे विण्याच्या पहाऱ्यासाठी उत्स्फूर्त स्वयंसेवकांची कधीच कमी पडत नाही. पंढरपूरच्या श्री.ह.भ.प. धोंडोपंत दादांच्या फडात तर ह्या फडाच्या स्थापनेपासून आजतागायत विणा उभा आहे. पुढेही विण्याचा पहारा सुरूच राहील. हा विणा टेकवलाच जाणार नाही. कधीच.
        सप्त्यात तुकाराम बीज आणि एकनाथ षष्ठीला गुलाल पडतो. शेवटच्या अष्टमीच्या दिवशी काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फुटते. काल्याचा प्रसाद वाटला जातो. त्यानंतर गावातून नगरप्रदक्षिणेसाठी दिंडी निघते. वाटेने वारकरी पाऊल खेळतात. फुगड्या खेळतात. मनोरे रचतात. सगळा गाव ही दिंडी बघायला लोटतो. वारकरी घामेघूम होतात. आनंद. केवळ आनंद असतो.
       सप्त्याचे सात दिवस भल्या पहाटे गावातील मुले-मुली ज्ञानेश्वरीचे वाचन करतात. याला ‘पारायण’ म्हणतात. यातही काही मुलं नुसतीच बोटं फिरवतात. तर काही मुलींशी सूत जुळवू पाहतात. हरेक नमुना सापडतो. पारायणानंतर थोड्या वेळाने सकाळचे तुकाराम गाथ्याचे भजन होते. थोडा ब्रेक. त्यानंतर दुपारी गुलालाचे कीर्तन. पुन्हा प्रवचन. पुन्हा लगेच सायंकाळी हरिपाठाचे भजन होते. पुन्हा थोड्या विरामानंतर रात्रीचे कीर्तन उभे राहते. असा भरगच्च कार्यक्रम असतो.
          दुसरीला असल्यापासून मी सप्त्यात भाग घ्यायचो. पहाटेच्या पारायणापासून रात्रीच्या कीर्तनापर्यंतच्या सर्व शिफ्टमध्ये भाग घ्यायचो. कुठली ऊर्जा अंगात संचरायची कोण जाणे!
        त्या शालेय वयात माझे सदरे पोटावर छिद्र पडलेले असायचे. कारण भजन करताना टाळ आवरायची नाही. त्यामुळे पोटाच्या आधारानं टाळ पेलून वाजवायची. त्यात सदरा सापडून कुटून जायचा.
       माझ्या लहानपणी सगळा मंडप गच्च भरलेला असायचा. लोक मंडपाबाहेर बसून, आपापल्या दारापुढं बसून कीर्तन ऐकायचे. आता लहान मंडपही अर्ध्याहून अधिक रिकामाच असतो. पूर्वी मनोरंजनाची साधनं नव्हती. लोक श्रद्धाळू आणि परंपराप्रिय होते. आता ऐन काल्याच्या कीर्तनाच्या वेळी वर्ल्ड कपची मॅच सुरू असते. किंवा रात्रीच्या कीर्तनाच्या वेळी आयपीएलची मॅच सुरू असते. किंवा नवा चित्रपट सुरू असतो. गावात टिव्ही नव्हता तेव्हा सप्ता सणासारखा वाटायचा. लेकीबाळींना सप्त्यासाठी मुराळी धाडला जायचा. पाहुण्यारावळ्यांना बोलावलं जायचं. वर्षभराच्या ब्रेकनंतर भारत पाच एकदिवसीय मालिका खेळावा इतकं सप्त्याचं अप्रुप असायचं आणि मंडपाचं स्टेडियम तुडुंब भरायचं.
       अनेक वारकरी, कीर्तनकार सप्त्याला यायचे. घरोघरी त्यांची आंघोळीची, राहण्याची व्यवस्था केली जायची. ते म्हणायचे, “ अहो, तुमच्या गावच्या सप्त्याची गोडीच न्यारी बुवा! भलेमोठे सप्ते बघितले पन असा सप्ता कुठंच रंगत नाही बघा..”
   वारकरी संप्रदायाचा एक वैशिष्ट्य म्हणजे वारकरी लोक एकमेकांच्या पाया पडतात. बालक, लहान, मोठा, स्त्री, पुरूष असा भेद नसतो. तुकारामांनी लिहून ठेवलेलं तंतोतंत पाळलं जातं.
‘पंढरीस नाही।कोणा अभिमान॥पाया पडती जन।एकमेका॥‘
गाव, घर या पाहुण्या वारकऱ्यांच्या वर्दळीनं गजबजून जायचं. अनेकांचे दर्शन व आशिर्वाद मिळायचे; यातच समाधान वाटायचं. एखाद्या वर्षी एखादा परगावचा वारकरी सप्त्याला आला नाही तर गावातले लोक त्याची आठवण काढायचे. विचारपूस करायचे. तेव्हाचे वारकरीही असे जीव लावण्यासारखेच होते. निर्मोही. प्रेमळ. संतत्वाच्या जवळ गेलेले.
       आम्हाला कधी शाळेचा गणवेश फाटला तर लवकर मिळायचा नाही. कधी सणावाराला कपडे मिळायचे नाहीत पण सप्त्याचा निमित्तानं बहुधा नवे कपडे मिळायचे आणि तोही शाळेचा गणवेशच.
    अलिकडे गावोगावी सप्ते होतायत, ही आशादायक गोष्ट आहे पण कुठेच पूर्वीसारखा उत्साह दिसत नाही. ‘अखंड हरिनाम सप्ताह’ हे शब्द जरी उच्चारले तरी मनात विण्याचा षड्ज झंकारतो. पखवाजाच्या धुमाळ्या, सरपट्या घुमतात. टाळांची गाज कानात व्यापते.
     अलिकडे जातीजातीत वाढलेली दरी कमी करायची असेल तर सप्त्यासारखा सुंदर पर्याय नाही.
           





रविवार, १७ फेब्रुवारी, २०१९

मोठा आशय असलेल्या 'बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या'


प्रसाद कुमठेकर या लेखकाची ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ ही बहुचर्चित कादंबरी नुकतीच वाचली. म्हटलं तर ही कादंबरी आहे. म्हटलं तर हा कथासंग्रह आहे. म्हटलं तर ही व्यक्तीचित्रे आहेत. एक वेगळाच फॉर्म लेखकाने वापरला आहे. यात एकतीस ष्टोऱ्या आहेत. लघुकथेसारखी दीड ते अडीच पानांची एक ष्टोरी. प्रत्येक ष्टोरीचा निवेदक हा वेगळा आहे. हे निवेदक वेगवेगळ्या वयोगटातील व वेगवेगळ्या स्तरातील आहेत. या ष्टोऱ्यांचा एकमेकाशी संबंध आहे. त्यामध्ये एक सूत्र आहे. म्हणून या रचनाबंधाला कादंबरी असं म्हणता येतं. मराठीत बहुधा कादंबरीचा निवेदक एकच असतो. वि. स. खांडेकरांनी ‘ययाती’ या कादंबरीत ययाती, शर्मिष्ठा, देवयानी या तिघांच्या निवेदन व दृष्टिकोनातून गोष्ट सांगितली आहे. इथे तर प्रत्येक ष्टोरीचा निवेदक वेगळा आहे. त्याची भाषाशैली वेगळी आहे. असे प्रयोग करायला गेल्यास कादंबरी फसण्याची शक्यता असते, पण कुमठेकरांनी यात यश मिळवले आहे. याला कथेकरी फॉर्म म्हणता येईल. हा आपल्या मातीतलाच फॉर्म आहे. जातककथा, लीळांशी नाते सांगणारा हा वाड्.मयप्रकार आहे.
        पूर्णपणे उदगिरी बोलीचा वापर हे या कादंबरीचे एक ठळक वैशिष्ट्य! बोलीभाषेचा इतका सुंदर वापर खूपच कमी कादंबऱ्यांतून झालाय. उदगिरी बोली लेखकाने खूप बारकाव्याने आणि तिच्या अंगभूत वैशिष्ट्यांसह वापरली आहे. उच्चारानुसारी लेखनामुळे बोलीचा लहजा सांभाळण्यात लेखक यशस्वी झाला आहे. कादंबरीच्या शेवटी शब्दार्थाचे परिशिष्टही जोडले आहे. त्यामुळे या बोलीचा परिचय नसणाऱ्या वाचकालाही समजायला कुठेच अडथळा येत नाही.
        ह्या ष्टोऱ्या खूपच गमतीशीर पद्धतीने सांगितल्या आहेत. त्यामुळे कुठेही कंटाळवाण्या वाटत नाहीत. या ष्टोऱ्यांमध्ये ह्युमरही आहे आणि त्याखाली दडलेली करूणाही आहे. लेखकाने आजचे वास्तव खूपच समंजसपणे व प्रत्ययकारी पद्धतीने मांडले आहे. यात दोन पिढ्यांमधला मूल्यसंघर्ष आहे. अलीकडे गावात झालेले बदल आहेत. वास्तवाचा आरसा दाखवणे एवढेच काम निवेदक करत नाही; तर प्रत्येक निवेदकाला स्वतःची मतं आहेत. लेखक परंपरेतल्या सगळ्याच गोष्टींचे उदात्तीकरण करत नाही. जे आऊटडेटेड आहे ते सोडून द्यायची त्याची तयारी आहे. मराठी लेखकांमध्ये विशेषतः ग्रामीण लेखकांच्या लेखनात जो भाबडेपणा दिसतो, तो या पुस्तकात कुठेच आढळत नाही. किंवा सगळंच टाकाऊ आहे; असा उद्दाम अभिनिवेशही नाही. यासाठी लेखकांनं तटस्थतेनं भवतालाकडे पाहणं आवश्यक असतं. असा तटस्थपणा प्रसाद कुमठेकर यांना साधला आहे.
 ‘भिजकं घोंगडं’ ह्या ष्टोरीतले भाऊ गावकडे मिळूनच राहतात. यातले बाकीचे शहरात तर एक गावात असतो. घर एकत्र ठेवल्याचा त्यांना अभिमानही आहे. पण शहरात शिकलेली त्यांची मुलं प्रॅक्टिकल आहेत. जे आमचं आहे ते आम्हाला देऊन टाका; असं मुलं म्हणतात. शेवटी व्हायचा तो इमोशन ड्रामा होतोच. मुलं वाटणी करून घेतात आणि काही झालंच नाही असं एकमेकांशी गप्पा मारत एकाच चुलीवर केलेलं आनंदानं जेवतात. लाठ्याकाठ्या न घेताही वाटणी होऊ शकते हे गावातल्या लोकांसाठी नवीनच आहे. ह्या ष्टोरीचा शेवट यादृष्टीने बघण्यासारखे आहे-
“ पर असं वाटन्यायचं भिजकं घोंगडं घरच्यांच सगळ्यांनी मिळून बकिटीबाहीर काढून, त्येला व्यवस्थित पिळून असं दाराम्होरल्या दोरीवर व्यवस्थित वाळत घातलेलं घर, त्यांनी पहिल्यांदाच पाहत आस्तीन.”
    बदलते दृष्टिकोन, बदलती मानसिकता, बदलता गाव हे सर्व लेखकाने खूपच अचूकतेने टिपले आहे. कादंबरीची अर्पणपत्रिका लक्ष वेधून घेते. ही अर्पणपत्रिका मला एक स्वतंत्र कविताच वाटते.
    मितव्ययी लेखनशैली हे या लेखकाचे आणखी एक वैशिष्ट्य नजरेत भरण्यासारखे आहे. कवितेत असतो तसा गोळीबंद आशय प्रत्येक ष्टोरीत आहे. काही प्रतिमा आणि रूपकंही यात आली आहेत. जीवनाकडे पाहण्याची पूर्वग्रहरहित व मिष्किल दृष्टी असल्याशिवाय असं लेखन संभवत नाही.
   या कादंबरीची अर्पणपत्रिका लक्ष वेधून घेते. ही एक स्वतंत्र कविताच वाटते.
     उदगीर परिसराची भाषिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक,भौगोलिक वैशिष्ट्ये नोंदवणारी ही नव-देशीवादी कादंबरी आहे. ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या कादंबरीने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढून खूप पुढे नेऊन ठेवले आहे. यासाठी लेखक प्रसाद कुमठेकर यांचे अभिनंदन!
       
                 - प्रमोद कमलाकर माने

कादंबरीचे नाव -बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या
                          (द्वितीय आवृती)
लेखक- प्रसाद कुमठेकर
प्रकाशक- पार पब्लिकेशन्स्
पृष्ठे – 120
मूल्य- ₹180

शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

पाखरं

जवारीचे कणसं निसवल्यावर, कणसात दुधाचा हुरडा भरल्यावर, भल्या पहाटे रानात पाखरं राखायला जावं  लागायचं. न्याहारीला रात्रीचीच शिळी भाकर, जवसाची चटणी, वर थोडं दही नाहीतर घण्याचं गोडंतेल घातलेलं. चिरगुटात भाकर बांधून, गोफण आणि पत्र्याचा एक डबा घेऊन मी वडील, चुलते किंवा आजोबांसोबत झुंजूरक्याच रानात जायचो. जवारीतल्या आटुळ्यावर उभारून गोफण फिरवायचो.  हाऽ असा आवाज करत काठीनं पत्र्याचा डब्बा वाजवत फिरायचो. गोफणीतून सुटलेला खडा पिकात भिर्रकन पडायचा आणि पाखरांचा थवा चिवचिवत उडून बाजूच्या झाडावर जाऊन बसायचा. मागून उगीचंच वाईट वाटायचं.  भरल्या ताटावरून हात धरून उठवलेल्या लेकरासारखी वाटायची ती पाखरं.
       घरासमोर अंगणात भलंमोठं बाभळीचं झाड होतं. उन्हाळा आला की, आजी कुंभारानं दिलेलं काळंभोर लोटकं झाडाच्या फाट्याला बांधायची. रोज सकाळी मला त्या लोटक्यात पाणी भरायला सांगायची. अंगणात दाणे पसरायची. दाणे टिपायला चिमण्यांची झिम्मड पडायची. तहानलेली पाखरं त्या लोटक्यातल्या पाण्यात चोची बुडवून तृप्त होत. खरंतर तेव्हापासूनच मला पाखरांचा लळा लागला.
     चिमण्या अंगणात बिनधास्त यायच्या. वळचणीला घरटं करायच्या. एकदा चुकून वळचणीचं घरटं हलून त्यातली चिमणीची इवलीइवली लालबुंद पिलं भुईवर पडली आणि चोची वासून मरून गेली. आजही ती घटना आठवली की, अंगावर सर्र्कन काटा येतो. पिसाटलेल्या चिमणीनं दिवसभर घरात हैदोस घातला. शेवटी कुठं बेपत्ता झाली कुणास ठाऊक?
      पिवळ्या पायाच्या काळ्या साळुंकीची आजी गोष्ट सांगायची: ‘साळुंकीचे पाय काळे होते. मोराचे पाय पिवळे. एके दिवशी लग्नाला जाताना साळुंकीनं मोराचे पाय उसने घेतले. घेतले ते  घेतले, पुन्हा परतच केले नाहीत. म्हणून अजूनही मोराचे पाय काळे आणि साळुंकीची पाय पिवळेच दिसतात. म्हणूनच अजूनही मोर नाचताना पायाकडे पाहून रडतो.’ मला खरंखरं वाटायचं. ही लोककथा पिढ्यानुपिढ्या चालत आलेली. आणि शेवटच्याच मुक्कामावर असलेली.
       कधीकधी शेतात हिंडताना अचानक मोरपीस दिसतं; तेव्हा गुप्तधनाचा हंडा सापडल्यासारखा आनंद होतो. कधीकधी वढ्याकडून म्याँवऽ म्याँव ऽ असा मोठा केकारव ऐकू येतो. सकाळी मुगाच्या पिकात फिरताना मोरांच्या पावलांचे ठसे दिसतात. मुगाची सालपटं ओळीनं पडलेली दिसतात. एकदा एकटाच शेताकडे निघालो असताना पिसारा फुलवून नाचणारा मोर समोर दिसला. अनाहूत. मंत्रमुग्ध होऊन जागच्या जागी थिजल्यासारखा उभारून ते अलौकिक आणि दुर्मिळ दृश्य पाहिलं. मोराच्या नाचायच्याही ठरलेल्या जागा असतात. आमच्या चवाळीचं कोपरं, बापूच्या मोरंडीतलं विहिरीजवळचं उमाट... याठिकाणीच हमखास मोर नाचताना दिसायचा.
       कोकीळच्या  कुहूऽला हुबेबूब कुहूऽनं उत्तर द्यायला मजा यायची. मोठा झालो तरी हा मोह आवरत नाही. लेकरांसोबत मीही लेकरू होतो. रान पाखरांच्या संगितानं जिवंत वाटायचं. चिवचिवऽ चिवचिवऽ... कॉयकॉयऽ कॉयकॉय...टिट्ऽ टटिव टिट् ऽटटिव...कुहूऽकुहूऽ... या आवाजांमध्येही मेळ असतो. टिटवीचा आवाज मात्र अजूनही मनात भीतीचं काहूर निर्माण करतो.
    हिवाळ्यात तळ्यावर लांबलचक कारकोचे यायचे. कारकोचांचा थवा उडताना फार सुंदर दिसतो. नंतर कळलं की; हे परदेशी पाहुणे आहेत. हजारो किलोमीटरचा प्रवास करून ते आपल्या गावच्या तळ्यावर आलेत याचं अप्रुप वाटायचं. एकदा एक जखमी कारकोचा मासे धरणाऱ्या पोरांनी उचलून आणला. तेव्हा त्याचा भलामोठा आकार पाहून भीतीच वाटली. उडताना किती लहान दिसतात अन् प्रत्यक्ष एवढा मोठा! हल्लीच्या दुष्काळी दिवसात तळंच कोरडं असतं. अर्थातच कारकोचेही येत नाहीत.
       रात्री पिंपळावर झोपी गेलेले बगळे फारच सुंदर दिसतात. पिंपळ पांढराशुभ्र होतो. गुरं चरताना त्यांच्या मागं मागं पळणारा, पाठीवर बसणारा बगळा ध्यान देऊन पहावा. वरून उडणाऱ्या बगळ्यांकडे बघत, हाताच्या बोटांचे नख एकमेकांवर घासत ‘बगळ्या बगळ्या कवड्या दे’ म्हणत बालपण भुर्र्कन केव्हा उडून गेलं कळलंच नाही.
        गुरुजींनी ‘चित्र काढा रे!’ म्हटल्यावर पोपटाचंच चित्र काढायचो. सुंदर पक्षी. निळकंठराजाही असाच सुंदर!
      चिमणी, कावळा, मोर, पोपट, घार, कोकीळ, पावश्या (चातक), सुगरण, साळुंकी, होला, चित्तर, सुतारपक्षी, बदक, बगळा, नीळकंठराजा, हंस इतकेच पक्षी ओळखता येतात. काही ओळखीचे आहेत पण नावं माहीत नाहीत. कित्येक पक्षी माहितीही नाहीत. आमच्या भागातले गुंजोटीचे पक्षीनिरीक्षण करणारे डॉ. सुहास मोहरीर हे कॅमेरा घेऊन आमच्या तळ्यावर पक्षीनिरीक्षणार्थ यायचे. त्यांचे लेखही छापून यायचे. अशा वेड्या लोकांचं मला कौतुक वाटतं.
      पक्ष्यांची संख्या लक्षणीय कमी झालीय. पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले. कित्येक प्रजाती नष्ट झाल्या. माळढोक सारख्या काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
   चिमण्या तर बेपत्ताच आहेत. मोबाइलच्या रेडिएशचाही पक्ष्यांवर घातक परिणाम होतोय, असं वाचलंय. आपण पाखरं जगावीत म्हणून मोबाईल काही सोडणार नाही. मोबाईलवरच पाखरांचे वॉलपेपर, स्क्रीनसेव्हर ठेवू. आणि कलरवाचा रिंगटोन!

   


रविवार, २७ जानेवारी, २०१९

येळवस


आमच्या उस्मानाबाद-लातूर जिल्ह्यात मार्गशीर्ष महिन्यातल्या अमावस्येला येळवस हा कृषीसंस्कृतीतला सण साजरा केला जातो. येळवस म्हणजेच वेळा-अमावस्या. थंडीचे दिवस. संक्रांतीच्या आधीचा सूर्याच्या संक्रमणाचा काळ. इथून दिवस मोठा होत जातो. म्हणूनच इकडं ‘येळवशीचा उंडा आनी दिवस झाला धोंडा’ ही म्हण प्रसिद्ध आहे.
   येळवशीच्या दिवशी जल्दी उठून कर्ता माणूस आंबीलाचं बिंदगं डोक्यावर घेऊन सगळ्यांच्या आधी शेताला जातो. मागून सगळे बैलगाडीत बसून शेताला निघतात. गाडीत सैपाकाच्या डाली कापडानं बांधून व्यवस्थित ठेवल्या जातात.  गाडीवाटेनं मुलांच्या आग्रहावरून बैलगाड्यांच्या शर्यती लागतात. एकमेकांना हुर्रे करत, धुराळा उडवत गाडी शेतात पोचते.
  येळवशीच्या आदल्या दिवशीच शेताला जाऊन वांगे, मेथी, रानभाज्या, तुरीच्या शेंगा, हरभऱ्याचे ढाळे, गाजरं, पातीचा लसून, कांदा, चिंचा, पूजेसाठी पेरू असा भरगच्च रानमेवा आणला जातो. आपल्या शेतात जे नाही ते दुसऱ्याच्या शेतातून मागून आणायचं. आपल्या शेतातलं दुसऱ्याला द्यायचं. येळवशीच्या आदल्या दिवशी खास बाजार भरतो. त्याला भाजीपाला म्हणतात.
      आणलेल्या भाज्या निवडणे, शेंगा सोलणे ही कामं लहानगे आणि गडीमाणसंही करू लागतात. रात्री ढणढणत्या चुलीवर रानमेवा शिजतो. रानमेव्याची भज्जी, सजगुऱ्याचे (बाजरीचे) उकडलेले उंडे, वांग्याचं भरीत, ताकाला पीठ लावून केलेलं आंबील, खिचडा, खीर, गूळशेंगा वाटून तयार केलेल्या कोंदीचे लाडू आणि पोळ्या असे एकाहून चढ एक पदार्थ...दोन डाली गच्च भरतात. इष्टमित्र, पाहुणे, शेजारी यांना आवतन दिलेलं असतं.
   येळवशीला प्रत्येक घरी शहरातले पाहुणे आल्यानं सकाळी गावात अनेक नवनवे चेहरे दिसू लागतात. पण दिवसभर आमच्या भागातली गावं, शहरं कर्फ्यू लागल्यासारखी दिसतात. सगळ्या बाजारपेठा बंद, दुकानं बंद, घरं बंद... सर्वत्र शुकशुकाट असतो. शिवारातली शेतं मात्र गजबजलेली असतात.
       शेतात कडब्याच्या पेंढ्या लावून लहान कोप आदल्या दिवशीच तयार केलेली असते. कोपीत पाच पांडवाचे पाच दगड ठेवलेले असतात. शेतात गेल्याबरोबर पांडवांवर मध्यभागी कावाचा गोल ठिपका आणि त्याच्याबाहेरील बाजूने चुन्न्याचा पट्टा लावून पांडवांची पूजा करतात. सगळे कोपीसमोरच झाडाच्या सावलीत बसलेले असतात. एका खापराच्या येळणीत आंबील आणि त्यात चुरलेले सजगुऱ्याचे उंडे तर दुसऱ्या येळणीत पाणी घेऊन ‘हर बोलो, भगतराजे हर बोलो ऽ  शंभूशंकराच्या नावांनं हर बोलो ऽ ढवळ्या नंदीच्या नावानं हर बोलोऽʼ म्हणत ज्वारीच्या पानाने  सगळ्या पिकात चर शिंपले जाते. वडीलधारे पुढे चर शिंपायला, तर लहानगे मागे पाणी शिंपायला. शिवार ‘हर बोलो’च्या जयघोषानं दुमदुमून जातं. चर शिंपून आल्यावर चर शिंपणाऱ्यांनी उंडा घेण्यासाठी हात मागे पाठीवर ठेवून, गुडघे टेकून पांडवांच्या पाया पडायचं. तेव्हाच बाया पाठीवरच्या उलट्या ओंजळीत हळूच सजगुऱ्याचा किंवा कोंदीचा उंडा ठेवतात. उंडा खायचा. उंडा खाल्ल्यावर भूक आणखीनच चाळवते.  त्यानंतर विहीरीला निवद दाखवून पूजा केली जाते. मग पंगत पडते. अन्न गोड लागतं. पोट भुगेस्तोवर जेवून वरून आंबील पिऊन अंग जड होतं. सुस्ती येते. पानाचे विडे खायला दिले जातात. गप्पाट्या रंगतात. माणसं तिथंच लोळतात. झोप लागते. पोरं बोरं खात, मव्हाळं शोधत रानभर हिंडतात. कुणाला मधमाशी चावल्यामुळे तोंड सुजलेलं दिसतं. जास्त आंबील पिऊनही तोंड सुजतं. डोळे तारवटून लाल होतात. मध खाऊन तोंड गोडमिट्ट पडतं. एकमेकाच्या कोपीवर बोलावलं जातं. भेटीगाठी होतात. ख्याली-खुशाली समजते. थट्टा-मस्कऱ्या रंगतात. भज्जी- उंडे खाण्याचा आग्रह होतो. ‘नको पोट तुडूंब झालंय’ म्हटल्यावर ‘खावा. आज पोट मोठ्ठं होतंय. येळवशीचं अन्न कितीबी खाल्लं तरी पचतंय.’ असं म्हटलं जातं. मग त्यांच्या भज्जीची  टेस्ट बघावीच लागते. रात्रभर जागून सैपाक केल्यामुळे जेवणानंतर बायाही तोंडावर पदर घेऊन डारडूर झोपी जातात.
           दिवस कलायला लागतो. दगडाची चूल करून त्यावर बाया खापराच्या लोटक्यात दूध-शेवयाचं आधण ठेवतात. आजूबाजूच्या काटक्या, शेण्यावर चूल पेटते. धुपू लागते. धूर पसरतो. आधण उतू जातं. ज्या दिशेला उतू गेलं तिकडचा शिवार पुढच्यासाली जास्त पिकणार असं मानलं जातं.
      सांजच्यापारी गाडी जुंपली जाते. आवराआवर होते. पसारा गाडीत भरला जातो. धुराळा उडवत सोनेरी प्रकाशात गाडी गावच्या वाटेला लागते. शेतकरी हेंडगा फिरवण्यासाठी मागे शेतातच थांबतो. पिकाला ऊब भेटावी म्हणून पेटता हेंडगा सावळ्या रानात फिरवून, घरी न येता थेट मारूतीच्या देवळापुढं हेंडगे आणून टाकले जातात.  लहानगे त्या जाळावर ऊसं भाजतात. भाजलेले ऊसं मारूतीच्या पारावर ‘बजरंग बली की जय!’ म्हणत फटाफट फोडले जातात. मग ते ऊस घरी घेऊन आल्यावर येळवस संपते. असं म्हणतात की; येळवशीपासून रानातली थंडी गावात येते.
       

बुधवार, १९ डिसेंबर, २०१८

चांदवेल

वेल म्हणजे काय? हे कळू लागलं त्या वयात रानात चरणाऱ्या बैलांमागं हिंडताना मी एका  पांढऱ्या फुलाजवळ गेलो.
आजोबांना विचारलं,
'आप्पा, ही कशाचं फूल हाय?'

आप्पा म्हणाले,
'ही चांदयेल हाय. '

'ह्येला चांदयेल का म्हनतेत?'

'ह्येचे फुलं बग. पांडरेशिप्पट हायते का न्हाई? चांदबी पांडराशिप्पट. मनून ह्या चांदावानी फुलाच्या येलाला चांदयेल मनायचं.'

आप्पाचं स्पष्टीकरण एकदम पटलं.  तेव्हापासून चांदवेल माझ्या मनात सारखी हेलकावत आहे.

   चांदवेलीपासून मला वेलींचा छंदच लागला. नवीन वेल दिसली की, आजोबांना तिचं नाव विचारायचा मी सपाटाच लावला.  एकेका वेलीचं नाव कळू लागलं. दुधानी, नागवेल, इचका, भोपळा, कारलं, मोगरा अशा अनेक वेली. कोणती वेल जनावरं खातात? कोणती नाही; ते आप्पा सविस्तर सांगत. वेलींच्या गोष्टीही सांगायचे.

  रानात कोट्यावर भोपळ्याची वेल होती. त्या वेलीला बघत होतो. आप्पांनी अकबर आणि बिरबलाची गोष्ट सांगितली. ती गोष्ट थोडक्यात अशी:

अकबर आणि बिरबल जंगलात फिरत असतात. अकबर भोपळ्याच्या वेलीला लागलेले मोठमोठे भोपळे बघून बिरबलाला म्हणतो देवालाही कळालं नाही. एवढ्या नाजूक वेलीला मोठमोठे भोपळे आणि आंब्याचं झाड एवढं मजबूत आणि मोठं असून आंबे मात्र किती छोटे. असं म्हणत अकबर आंब्याच्या झाडाखाली बसतो. बिरबल हळूच झाडावर चढतो आणि एक आंबा तोडून अकबराच्या अंगावर टाकतो. अकबर कळवळतो. बिरबल म्हणतो, एवढ्याशा आंब्याच्या मारानं एवढं ओरडताय. भोपळ्याएवढे आंबे असते तर काय झालं असतं? अकबराला त्याची चूक कळते. तो म्हणतो देवानं बरोबरच केलंय.

     आजी घराच्या अंगणात कारल्याचं बी लावायची. वेल मोठी झाल्यावर मी तिला मांडव करू लागायचो. वेल मांडवभर पसरली की, आम्ही मुलं मांडवाखाली घरकूल करून खेळायचो.

   शेताच्या वाटेनं दुतर्फा मिरगुडाची भरपूर झुडपं होती. त्यावर पिवळी सोन्याच्या तारेसारखी अमरवेल यायची. तिला आमच्याकडं 'सोनवेल' म्हणतात. आम्ही पोरं या वेलीला 'वायर' म्हणायचो. हे वायर ओरबडून घ्यायचो. सारी मिरगूड ह्या पिवळ्या पानं नसलेल्या वायरसारख्या सोनवेलीनं झाकून गेलेली असायची.

    पुढं महाविद्यालयात गेल्यावर जीवशास्त्राच्या एका प्रात्यक्षिकाला ही सोनवेल पुढ्यात बघून धक्काच बसला.  मनात म्हटलं,
 'आयला! ह्ये वायर अभ्यासक्रमातबी येऊन बसलंय की!'
 बाॅटनीच्या झोंबाडे सरांनी सांगितलं की, 'काही वनस्पती परपोषी असतात. या वनस्पती झाडांचं अन्नद्रव्य शोषून घेतात. अमरवेलही याच प्रकारची वेल आहे. हे असलं ग्यान पचनी पडायला वेळ लागला. तरी वेलींबद्दलची भावना मी रूक्ष होऊ दिली नाही.

    .....अशा अनेक वेली, त्यांना चिकटलेल्या अनेक आठवणी मनात रुंजी घालतात.
       
      माझं एक स्वप्न होतं: रानातली चांदवेल पौर्णिमेच्या टप्पोऱ्या चांदण्यात बघावी. चांदवेलीचं फूल की चंद्र? कोण देखणं दिसतंय ते बघावं. माझं हे स्वप्न अद्यापही पूर्ण झालं नाही. रानात  गाजरगवत फोफावल्यापासून चांदवेल कुठं दिसतही नाही. तरी अजून चांदवेल  माझ्या मनात एकसारखी हेलकावतच आहे.

रविवार, १८ नोव्हेंबर, २०१८

गावरान

 


सध्या बाजारात 'गावरान' म्हणून जे खपवलं जातं; त्यातलं कितपत गावरान असतं, हा संशोधनाचाच विषय आहे. लोकांना गावरान भाजीपाला, गावरान धान्य हवं आहे; हे व्यापाऱ्यांनी अचूक हेरलंय. गावरान म्हणून विकत घेतलेला भाजीपाला फक्त दिसायला गावरान असतो. चव मात्र नसते.

   पूर्वी शेतात कायकाय असायचं. दुपारची भाकरी खाण्याआधी बाया खुरपता-खुरपता पातरंची, तांदुळजाची, करडईची भाजी गोळा करून आणायच्या. तोंडी लावायला कच्च्या भाज्या असल्याने व्हिटॅमिन कमतरतेची प्रश्नच नसायचा. 

    आम्ही शेतात कायकाय चरत फिरायचो. बोरं, जांबं, सिताफळं, जांभळं, आंबे इ. सिझनल फळे तर खायचोच; रानातल्या पिकातही रानमेवा पेरलेला असायचा. शेता आल्याबरोबर ज्वारीतल्या पिकलेल्या छिन्न्या आणि वाळकांचा घमघमाट नाकात शिरायचा. वानरासारखं वाळकं, छन्न्या खात हिंडायचो. पट्ट्यात वाट्याण्याच्या शेंगा खात फिरायचो. हरभऱ्याचे ढाळे तर आताही मिळतात; पण पूर्वी प्रत्येक शेतकरी घरी लागणारे सगळे जिन्नस पेरायचे. तीळ, जवस, मोहरी, वाटाणा, कारळे, भगर, भेंडी यांचे पिकात पट्टे असायचे. माळव्याच्या वाफ्यात कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर, मेथी, पालक, चुका असा भरगच्च मेळा असायचा. तेलासाठी भुईमूग, सूर्यफूल, कुरडई, अंबाडी इ. वाण पेरले जायचे. मटकी, मसूर, बाजरी, जोडगहू, पिवळा(ज्वारी), मका, साळ इ. सगळं कुद्रू-मुद्रू पेरलं जायचं. संक्रांत, नागदिवे आणि येळवस या सणांना बाजरीच्या भाकरी, उंडे केले जातात. खिरीसाठी जोडगहू लागायचे. बाळंतिणीला आणि आजारी माणसाला लवकर ताकत यावी म्हणून काळी साळ आणि काटीजवा हमखास पेरत. काटीजवा हा गव्हाचा एक गावरान वाण आहे. याला कांडून तुपात लाडू बांधून खायला दिले की माणूस लवकर घोड्यासारखा व्हायचा. कारळ्याचं पीठ(कूट) प्रत्येक कालवणात असायचं. त्यामुळे चव यायची. आता सर्रास शेंगदाण्याचं कूट वापरलं जात. त्यामुळे भाज्या चवीला मस्सड लागतात. आता मस्सड म्हणजे काय विचारू नका! माझ्याकडे यासाठी दुसरा शब्द उपलब्ध नाही. असो.

     घरातले वर्षानुवर्षे जतन केलेले बियाणेच वापरले जायचे. माळवदाच्या हलकडीला ज्वारीचे सर्वात मोठे कणसं शेतकऱ्यांच्या घरोघरी अडकवलेले दिसत. तेच पुढच्या वर्षीचे बियाणे असे. प्रत्येकाच्या घरी लाकडी काठीच्या वळणीवर लसूण वाळत घातलेला दिसायचा. गाडग्याच्या उतरंडीत, गुम्म्यात बियाणे वाळवून राख लावून जतन केले जाई. बियाण्यांच्या गुम्म्याला वरून पाचट किंवा चगळ घालून मातीचा लेप दिला जाई. त्याला आमच्याकडे  लिपण म्हणतात. बायाच हे काम करायच्या. आमची आजी कितव्या उतरंडीला कितव्या गाडग्यात कारल्याचं किंवा भोपळ्याचं बी आहे, ते बिनचूक सांगायची. शेतातल्या कोट्यावर किंवा घरांपुढे अंगणात लाकडाचा मांडव करून त्यावर कारले, भोपळ्याच्या वेली सोडल्या जायच्या.

    गुम्मे, सलदं आणि कणग्या, दुरड्या, पाट्या गावातले किंवा फिरस्ते कैकाडी, बुरूड समाजाचे लोक तयार करून देत. यासाठी हे लोक शिंदीच्या झाडाचे फाटे कोयत्यानं सवाळून आणत. घराच्या अंगणात बसून त्यांचे हे विणकाम चाले. कणगी मोठ्या पिंपाच्या आकाराची, गुम्मे मोठ्या डब्ब्याच्या आकाराचे तर सलदं टोपलीच्या आकाराचे असायचे. सलदावर शंक्वाकार झाकण असे. सलदाचा उपयोग पापडं, खारूड्या, कुरूड्या ठेवण्यासाठीच केला जाई. नवीन गुम्मे, कणग्या, सलदं आतून बाहेरून शेणानं सारवून त्यांची छिद्रं बुजवली जात.

     आजोबा शेतावरून येताना धोतराच्या सोग्यात बांधून दररोज काहीतरी रानमेवा आणायचेच. एकदा तर काहीच नवीन नाही म्हणून त्यांनी ज्वारीचे धाटं सोलून आणले होते. ते धाट ऊसासारखे गोड लागले होते. गावरान ज्वारीची किमया. घरी खाण्यासाठी एकदोन पट्टे  गावरान ऊसाची लावणही केली जायची. एकदम मऊ आणि गोड असायचा हा ऊस. दुधाच्या दातांच्या लेकरांनो सोलून खावा असा.

    आमच्या परिसरात त्र्याण्णव साली भूकंप झाला आणि त्यात सगळं मातीत मिळालं. उतरंडी फुटल्या, गुम्मे गडप झाले. गावं नुसते मातीचे ढिगारे झाले. लोकांसोबत त्यांचे बियाणेही मातीत गडप झाले. नवीन घरातून उतरंडी, कणग्याही हद्दपार झाल्या. ते तयार करणारेही उरले नाहीत.

  हरितक्रांतीची पावलं पडत गेली तशी पारंपारिक शेती ही संपुष्टात आली. जमिनीचे तुकडीकरण झाल्याने अल्पभूधारक आणी सीमांत शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. जगण्यासाठी   क्वालिटीपेक्षा क्वांटिटी महत्त्वाची वाटू लागली. जागतिकीकरणामुळे  शेतीवर आणि शेतकऱ्यावरच अरिष्ट आलं. दारिद्र्यातून बाहेर पडण्यासाठी शेतकरी नगदी पिकांच्या मागे लागला आणि शेतातलं बाराजिनसी कुद्रू-मुद्रू अडचणीचं ठरू लागलं आणि पर्यायाने हद्दपार झालं.  कांग्रेस म्हणजेच गाजरगवतासारखे नवनवे तणं शेतात माजू लागले. या तणांनी जुने तणं कुरघोडी करून नष्ट केले. यातच रानभाज्यांचाही अंत झाला. जास्त उतारा देणाऱ्या नव्या संकरित बियाण्यांचा सुळसुळाट झाला आणि गावरान बियाणे कुजून नष्ट झाले.

    कोंभाळणे ता.अकोले जि.अहमदनगर येथील राहीबाई पोपेरे यांनी त्यांच्या घरीच जवळपास 53 पिकांच्या 114 गावरान बियाण्यांचे जतन केले आहे. त्या अशिक्षित आहेत, हे विशेष. तर याच गावातील ममताबाई भिंगारे यांनी सुमारे 100 वाणांच्या बियाण्यांचे जतन व संवर्धन  केले आहे. त्यांचा गावरान बियाणे संवर्धनाचा प्रकल्प खूप महत्वाचा आहे. त्यांची ही गावरान बियाणे बँक पाहण्यासाठी व काही बियाणे विकत घेण्यासाठी  कोंभाळणेला जायची खूप इच्छा आहे.  राहीबाई यांच्या बियाणे संकलनामध्ये बायफ संस्थेचे मोठे योगदान आहे, असे समजते. बीबीसी मराठीने यावर स्टोरी केली आहे. युट्यूबवरही या प्रकल्पाची माहिती मिळेल.  राहीबाई, ममताबाईंच्या या धडपडीचे स्वागत तर करायलाच हवे; पण ज्याला 'गावरान' मेवा पाहिजे त्यांनीही असे प्रयत्न करायला हरकत नाही.

सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१८

Innovation List | Teachers As Transformers - IIMa

Innovation List | Teachers As Transformers - IIMa

'Teachers As Transformers' या IIM Ahamadabad ने विकसित केलेल्या वेबसाईटवर माझे तीन नवोपक्रम प्रकाशित झाले आहेत. इथे अनेक उपक्रमशील शिक्षकांचे उत्तम नवोपक्रम आपल्याला वाचायला मिळतील. यासाठी वरील लिंकला टच करा.

मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१८

सुक ना दुक


गनामामाला सगळं गाव नेता म्हनायचं. गावात कुठला पुढारी आला, परचारसबा आसली की, गनामामा हार घालायला सगळ्यात पुडं. इस्टेजवर खुडचीत गनामामा दिम्माकात बसायचा. गनामामा आडानी  फाटका मानूस, पर कोनी 'नेते' म्हनलं, की ह्याचं आंग फुगायचं. टोप्या घालायला गनामामा वस्ताद. पैशे घेऊन कोर्टात खोट्या साक्शी द्याचं कामबी करायचा. एकदा साक्श द्यायला गेल्यावर गनामामानं पानाची पिचकारी मारली. ती नेमकं बघितलं जजनं. हूं का हूं. टाकलं बसवून. हिकडं आशील हुडकून बेजार. शेवट त्येनं दुसरा साक्शीदार हुडकून भागिवलं. येताना गनामामा दिसला. गरीबावनी तोंड करून बसलेला. दंड भरून सोडवून आनावं लागलं. पावनेरावळे हुडकत नाही तितं जायाचा. खाऊन पिऊन निगताना तिकिटाला मनून धा-पंदरा रूपय मागायचा, लईबी नाही. ह्येच्या शेतात तुरीचं धाटबी नसलं तरबी, जुन्या वळकीवर आडत्याकून तुरीवर उच्चल आनायचा.
     थोरली शकुंतला. तिला समदे 'छकी'च मनायचे. तिच्या पाठीवरचा राजा. गनामामाचं खटलं काय जास्त नव्हतं. बायकू तर गायीवनी गरीब. छकीचं लगीन झालतं. राजाचं लगीन करून गनामामानं त्येला खात-बी-बियान्याच्या दुकानात चिटकावलता. समदं मार्गी लावून गनामामा एक्या दिवशी आंगावर ईज पडून मेला.
     राजा बापाच्या वरचं निगालं. एक आवतन सोडायचंनी. आवतन नसलं तरबी खूत मारून जेऊनच निगायचं. रईवारी सुट्टीच्या दिवशी  मैस घिऊन लोकाचे बंधारे तुडवत हिंडायचं. मैस चारून तैट करायचं. कामाला जातानाबी कुनाची  फुगटची गाडी मिळत्याय का बगायचं. बाप मेल्यावर सरकारी ईमा मिळाला. कोन गाठ पडलं का त्या पैशांचंच बोलायचं. शेवटला 'माजा बाप लई चांगला  होता गा!' मनून रडायचं.
     फुटकं नशीब घेऊनच छकी जन्माला आली. छकीचा सोभाव  सुतासारका सरळ. तिला आचपेच कळतनी. भोळंभाबडं छकी. बिनमळी. सासू कजाग. भांडन केल्याबिगर तिला भाकरच गोड लागतनी. नवरा ट्रकडायवर. बेवडा. मायीचं आयकून छकीला गुरासरकं बडवायचा. जाच सोसत का व्हयना छकी नांदलालती. दोन सोन्यासरके लेकरं झाले. लेकरावाकड बगून रोजगार करत, शिव्या खात, मार खात तिनं संवसार करलालती. नवरा एडसनं धरनीला पडला. छकीनं त्येचं समदं केलं. माय मननारीबी नाकाला पदर लावून लांब बसायची. इळबर वदरायची. 'हिनंच पांडऱ्या पायाची हाय. इवशी घरात शिरली मनून तर माज्या  लेकराची कड लागली.' मनायची.
     नवरा मरून गेला. दोन लेकरं घेऊन छकी माहेरच्या आसऱ्याला आली. ह्या कडू राजाच्या जीवाला घोर लागला संबाळायचा.
वरल्या वाड्यातली सरूआत्या आलती गिरनीला दळन घेऊन. तिला बगून छकी गडबडीनं बाहीर आली.

छकी मनली,
"लई चांगलं लगीन झालं मन की ये तुझ्या पुरीचं."

" हूं! का करावं? चिट्टी दिऊनबी तू आलनीसच की लगनाला."

"लई  जीव वडलालता ये आत्या, पर ह्येन्ला  लईच  झालतं बग. हालायलाबी येना झालतं. कसं यिऊ सांग  ह्येन्ला टाकून?"

"काय बाई तुझं दैव छकी! शाऊ लेकराचं वाटूळं  झालं. रांडा सुकानं नांदलालत्या. सासू आसली. यी गं कळी न बस पाटकुळी. जाच सोसूनबी तू नांदायला नगं म्हनलनीस. कसला का आसना नवरा बिचारा, पर तुला आर्द्या हिरीत सोडून निगून गेला. म्हायेरच्या आसऱ्याला आल्यायस पर बापबी मरून गेला. राजाबी लई हावलाखोर हाय कडू भाड्या. बाईचा जलमच वंगळा बग. दुबत्या जनवारावनी जन्माला आल्याबरूबर गळ्याला दावं..."
सरूआत्या भडभडा बोललाली. छकी उगू गप आइकुलालं खाली बगत.

"म्हायेर, सासर, कोनचं आपलं की काय की? तुला बगितल्यावर पोटात चर्र करतंय बग." सरूआत्याला दुक दाटंना. पदर डोळ्याला  लावून बसली.

छकी हासंतच मनली,
"उगूच आवगड वाटून घिवलालीस माय. नशिबात आसल्यालं  का चुकतंय? माय-आन्नानं चांगलं घर हाय मनूनच दिलते की तितं. ती काय की मनतनीते गोम कुटं हाय तर...."

दोघी सुकदुक उकलत बसल्या. जरा वेळानं सरूआत्या गेली. छकी  तसंच बसलं. सुक ना दुक आसं.
     छकी आधीच काळी. त्येच्यात भुंडं कपाळ. गालं बसलेले. डोळे खोल. तोंड लईच वटवट दिसलालतं. वरचीवर बारीकबी दिसलालती. राजाचं ध्यान कुठं ऱ्हातंय घरात? त्येला बायकूकड बगायला फुरसत नाही. भैन तर लांबच ऱ्हायली.
    राजाची बायकू रंगी. तिच्या बापानं तिला वटी यिऊन वरीसबी लोटू दिलनी. हाडं भाजून मोकळा झाला. एकाम्हागं एक लेकरं हून रंगीबी पार चिपाड झालती. नवरा आसला माकडावनी.
     रात्री उशीरा मटरेल तोंडात धरून राजा आला. रंगीनं ताट वाडलं.

"ती थुका आता तोंडातलं. आन चुळ भरून जेवा."

राजा तोबरा धरून 'हूं ' मनला. चूळ भरून जेवाया बसला. वचवच वान्न्यारावनी जेवलाला. रंगीचं बोलनं चालूच होतं. आसं झालं. तसं झालं. हेचं ना जेवल्यावर ध्यान, ना बोलन्यावर.

"आवोऽ ताई लई वंगळं दिसलालत्या."

"हूं. " मचमच मच...

"त्येंचे मालक एडसनं मेलते जून की ओऽ"

"तुज्या मायला." राजा.

"तुमी काय बी मना. मला तर तीच संवशय यिवलालाय. कमीपना वाटाया का झालंय? उगवू संवशय तर काडा. लव्हाऱ्याला न्हिवून दावा. सरकारी दवाखान्यात रगत तपासल्यावर कळतंय मन ओऽ"

राजा गप हात धिऊन उटला. लक्षुमीच्या कट्ट्यावर आला. समोरच्या टपरीत एक छिटा सुपारी सांगून रामतात्याजवळ येऊन बसला.

 " आज केलो बगा एक नोट खडी तात्या."

आसलंच बोलनं कडूच्या तोंडात. हावरं मुलकाचं. सदा डोस्क्यात  पैशाचं येड. आसा मनात इचार करत तात्या मनले,
 "छकीला का झालंय रे? लई वंगाळ दिसलाल्याय. जरा दावावं का न्हाई डाक्टरला. काय तर टानिकबिनीक दिल्यावर फरक पडतंय."

" अय! का होतंय तात्या? आसं झालंय मनून दोसरा काडल्याय जून. कायबी झालनी."

" तसं नव्हं रे, दावायचं दाव बर!" जोर देऊन तात्या मनले

"हूं! बगू."  राजा.

        शेवट राजानं शकूताईला लोहाऱ्याच्या सरकारी दवाखान्यात न्हेला. रगत तपासलं. डाक्टरनं राजाला बोलवून घेऊन रिपोट दिला. एड्स हाय मनून सांगितलं. भाऊ बाहीर आल्याआल्या छकीनं  इचारलं,

"का मन ये भाऊ डाकटर?"

"कायबी नाही चल."
मनत राजा  छकीला घेऊन स्ट्यांडवर आला.
यसटीत बसून राजानं पक्का इचार केला. उद्या शकूताईला रानातल्या कोट्यात हालवायचं.
    छकीला  कोट्यात टाकल्यापसून सोयरे, गावातले लोकं रोज बगायला याचा सपाटा सुरू झाला. येवस्ता करायला मायीशिवाय कोन ऱ्हातंय? रंगीला तर घर सोडाया कसं जमतंय? तिचे दोन, छकीचे दोन लेकरं, नवरा, सासू-नंदंचा डब्बा... छकी मयाळू. त्येच्यात तिच्या आयुश्याचं आसं मातरं  झाल्यानं लोकबी लईच सुटलं तिला बगाया  कोट्यावर. गावकरीच शेत होतं. काय आवगडबी नाही. रोज सकाळी घरला येताना माय कोट्यातले बिस्कुटपुडे आनायची. रंगीच्या, छकीच्या लेकरावाला रोज च्यासंगं बिस्कुटं खायाला मिळलाले. राजाबी मागायचाच दोन बिस्कुटं.

    उनासंगं छकीचं दुकनंबी वाडत चाललं होतं...........

      उनाचं जिजाक्का छकीला बगाया आलती. जिजाक्काची छकीवर बारकी आसल्यापसूनच मया. 'बाजंवर पडल्याली छकी हातरूनात दिसना सुद्द्या झाल्याय की माय!' वाटलं जिजाक्काला.

आक्काला बगून छकी उल्लास आनून मनलं,
"यी ये! ह्यवडं उनाचं का आल्यायस आक्का? जरा तवरून येवं का न्हाई ये?"

 आक्का बाजंवर बसत मनली,
"आले माय. घरातबी रकरक करलालतं. तुजीच याद यिवलालती. आले सरसर. का लई लांब हाय?"

जिजाक्कानं पुडा हातात दिल्यावर छकी रागानं मनली,
"मी का नेनती हाव का ये? कशाला आनल्यायस? उगू बोलून जायाचं दोन गोश्टी."

कोरड्या व्हटावर जीब फिरवत छकी बोललाली.
" आक्का, मायच करलाल्याय बग माजं समदं. आता हामी मायीचं करायचं, तर आजूबी मायीकूनच करून घेवं का ये? मी मेल्यावर आता कुटं जातेव ये? पुन्ना मला आसली माय मिळंल का ये?"

 छकीचे डोळे डबडब भरले. मायनं रडायचा सूरच काडला. जिजाक्का दोगीलाबी समजावलाली. आपूनबी रडलाली.

"माय, आक्काला शरबत तर कर ये. लिंबू हाय जून की. " छकी.

" गप्प. रोज तुला बगाया ढिगारा लोकं यितीते. का सगळ्याला शरबत पाजवत बसाया जमतंय?" आक्का कळवळून मनली.

    छकीनं डोळे झाकल्यावनी केली. पुना डोळे उगडून मनली,
" बग माय, तुला अक्काच्या पुडं सांगलालेव. मी मेल्यावर पंडूचं ट्याकटर सांगून न्ही ट्याकटरमदी. कुनाच्या तोंडाकड बगत बसनूक. लोकं कायबी बोलतीते. ध्यान दिवनूक. तुला बोलनं सोसतनी आदीच. लोकाचे तोंडं का धराया येतंय, व्हय ये आक्का?"

मधीच छकी आक्काकड वळली.
"बग ये आक्का, माजंमाजं ताट, वाटी येगळं ठीव मनलं तर आयकंना माय. त्येच्यातच जेवत्याय आपूनबी. आपलापून जपून ऱ्हावं का नाही बर? तू तर सांग ये!"

जिजाक्का चमकून मनली,
"व्हय वो, लेकराचं खरंच हाय की!"

"....आनी का माय, माजी पोरगी तू संबाळ. आजू नेनती हाय. पोराला सासूकड सोडून यी. तिला तर दुसरं कोन हाय? आनी दोनीबी लेकरं तुज्याच गळ्यात नकू माय..."

बोलत बोलत छकीची नजर कोट्याबाहीर गेली. उनानं एकदम तिचे डोळे बांदल्यावनी झालं. बोडक्या रानावर चिटपाखरू दिसत नव्हतं. उनाच्या झळानं शिवार करपल्यावनी झालतं. व्हावटळीनं कडब्याचा पाचोळा गरगरत वर वर आबाळाला जावलालता.
------------------------------------------------------------------------
पूर्वप्रसिध्दी: मिळून साऱ्याजणी (डिसेंबर 2010) साभार
 चित्रे साभार- सुयोग कांबळे
टिप- कथेचे पुनर्लेखन केलेले आहे.

गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८

घर

आमचं मातीचं घर होतं. मागं सात खण इमला. पुढे पत्र्याची ओढणी. मोठं अंगण. एका बाजूला गुरांचा गोठा. वाड्याच्या बाहेरच्या भिंती शेणानं सारवलेल्या. खोल्यांमध्ये फक्त पांढऱ्या मातीचं पोतरं. खाली धूम्मस केलेल्या जमिनीवर शेणाचं सारवण. अंगणात शेणाचा सडा. सडा-रांगोळ्या झाल्यावर घर कसं लख्ख व निर्मळ वाटे.
    देव्हाऱ्यावर ज्ञानेश्वरी. तुकाराम गाथा, एकनाथी भागवत, हरिपाठ, शिवलीलामृत आदि ग्रंथ बासनात व्यवस्थित बांधून ठेवलेले असायचे. देव्हाऱ्यात दोन लंगडे बाळकृष्ण, घोड्यावरचा सिद्धनाथ, विठ्ठल-रखुमाई, अंबाबाई, गणपती...अशी देवांची वर्दळ. अंगणात तुळशीचा कट्टा. तुळशीबुडी महादेवाची पिंड.
    इमल्याच्या दोन खोल्यांना लागून एक जुनी अंधारी खोली होती. या खोलीत फासा, कुऱ्हाडी, चाडे, नळे, कुदळी...अशी इकनं, गठुडे, घुंगुरमाळा, दृष्टमण्यांच्या माळा, मुंगसे, जुनी गंजाटलेली तलवार, पाळणा, मोठमोठ्या रव्या, हंडे, गाडग्याच्या उतरंडी, कनगी, गुम्मे....असे बरेच अडगळीचे सामान असे. त्या खोलीची मला फार भीती वाटायची. मी रूसल्यावर आजी मला भीती घालायची, "गप्प बैस, न्हायतर जुन्या खोलीत कोंडवीन."
मी शहारून गप्प बसायचो. हळूहळू या खोलीची भीती कमी झाली. आईच्या पदराला घट्ट धरून कधीमधी खोलीत जाऊ लागलो. सुट्ट्याला आत्याचे लेकरं आल्यावर मी त्यांना दहशत घालू लागलो, " जुन्या खोलीत बावा हाय." ते मानायचे नाहीत. मग मी त्यांना दारापाशी थांबायला सांगून; आत अंधारात जाऊन खुंटीवरच्या घुंगुरमाळा वाजवायचो. बाहेर येईपर्यंत सगळे आवाज ऐकून पसार झालेले असायचे. नंतर ते मला विचारायचे, "भावजी, तुला तो बावा कसा खात नाही रे?"
मी सांगायचो, " त्येनं माजा दोस्त हाय."
घरात कुणी रागावलं की, मी जुन्या खोलीत आतून कडी घालून, अंधारात दिवसभर उपाशी बसायचो." बाहेरून कुणी कित्ती विणवलं तरी बाहेर यायचो नाही. आजोबांची प्रेमळ हाक ऐकल्यावर मात्र नाईलाज व्हायचा.
      चौथीच्या इतिहासातील शिवराय व मावळ्यांचा प्रताप भान विसरून वाचायचो. अन् त्या जोशात जुन्या खोलीत जाऊन; ती काळी जड तलवार कशीबशी हातात घेऊन हात फिरवायचो. शिंक्यावरच्या मोठ्या सलदाला शत्रू समजून घाव घालायचो.
      वाड्यात एका बाजूला अर्धवट बांधकाम झालेला गोबरगॅस होता. दोन्ही बाजूंच्या हौदांमधून आत उतरायचो. आतील भाग मंदिरासारखा. वर गोलाकार घुमट. उन्हाळ्यात तिथं थंडगार वाटायचं. हीच आमची खेळायची जागा.
       मी चौथीला गेल्यावर शेजारच्या मनामायनं अभ्यासासाठी तिनं स्वतः तयार केलेली चिमणी दिली होती. माझ्या शिक्षणाला मिळालेली ही पहिली प्रेरणा! त्या दिव्याउजेडी बसून मी कवाबवा घटकाभर पुस्तकातली चित्रं बघायचो. चिमणीचा धूर नाकात जाऊन नाक काळंभोर झालेलं सकाळी दिसायचं.
     पडवीला वडील, चुलते, बामणाचा पबाकाका, हबीबचाचा यांच्या रामायण, महाभारत, पुराण, संत, भक्ती, शेती या विषयांवरच्या गप्पा चालत. आम्ही भावंडं शांत बसून या गोष्टी ऐकायचो. काही कळायचं. काही कळायचं नाही.
      आप्पांची बाज अंगणात. मी त्यांच्याजवळ झोपायचो. ते चांदण्या रात्री आकाशातील तिफण, इच्चू, ध्रुव अशा नक्षत्रांची ओळख करून द्यायचे. मला चांदण्या मोजून दाखव म्हणायचे. थोडावेळ माझी मज्जा बघायचे. आप्पांनी मला बाजेवर पडल्या-पडल्या अनेक अभंग शिकवले. नाटी शिकवल्या. मी त्यांच्या मागे म्हणायचो.
    'आम्ही कुणबियांची मुलं।
     आम्हा सार्थक विठ्ठल ॥
     धरिला द्रव्याचा नांगर ।
     काशा काढितो सागर ॥
     रामनामाची कुऱ्हाडी ।
     प्रपंचाच्या पालव्या तोडी ॥
  मी अभंग म्हणत होतो. वडील आप्पांना म्हणाले, " उगू कायबी शिकवनूक त्येला. ही अभंग गाथ्यात नाही. मनानं जोडलेला हाय."
आप्पा म्हणाले, " हाय गा ! नामदेवाच्या गाथ्यात हाय." मग वडील निरूत्तर होत.
      जनावरांचा गोठा साफ करून वाड्याचं सडासारवण करता-करता आई मेताकुटीला यायची. घरात दारिद्र्य असूनही सडासारवण, रांगोळ्या अशा नीटनेटकेपणामुळेच या घरच्या लेकी म्हणजे आमच्या आत्या चांगल्या घरी गेल्या. अडीनडीला, दुष्काळानं गांजून एकेक जनावर विकून टाकल्यानं गोठा रिकामा झाला. काही दिवसांनी गोठाही काढून टाकण्यात आला.
       खोल्यातली भूई खडबडीत झाल्यावर धूम्मस केली जाई. जमीन खोदून, पाणी-माती कालवून, सपाट करून, पुन्हा बडवून सपई केली जाई. उन्हाळ्याच्या दिवसांत धूम्मस केलेल्या घरात थंडगार वाटे. वर लाकडी फळ्यांचा इमला (माळवद). इमल्याच्या खोलीत उन्हाळ्यात थंडगार तर हिवाळ्यात उबदार वाटे. हा इमला वडिलांनी माळाला सात पोते तुरी झाल्यावर घातला. पाच पोत्यांना  तेराशे रूपये पट्टी आली आणि वडलांचं 'इमल्याचं' स्वप्न पूर्ण झालं. इमला घातला त्यावेळी मी रांगत होतो म्हणे!
      मोठ्या माणसांचा डोळा चुकवून  न्हाणीघराच्या आखूड भिंतीवरून उडी मारून मी पाटलाच्यात टीव्ही पहायला जाई. तेव्हा गावात तेवढाच एक टीव्ही होता. एकदा टीव्ही बघत पाटलाच्या सोप्यात बसलो होतो. बाहेर खूप अंधार पडलेला. दारातून हाळी ऐकू आली, "बाग्याऽव" मी तटकन उठून बाहेर आलो. बाहेर मुसळधार पाऊस. वडील पोत्याचं घोंगतं पांघरून आलेले. वारं-वावधान. ईजा चमकत होत्या. वडलांच्या पुढंपुढं घरी आलो. मोठ्या दारातून आत आलो. समोरची सोप्याची भिंत ढासळून पत्रे खाली आले होते. वडलांनी शिव्या-मन-शिव्या दिल्या. पोटभर शिव्या खावून झोपी गेलो. नशीब! मार मिळाला नाही. वडलांनी कधी पाची बोटांनी शिवलं नाही. आईचा मार मात्र उठता-बसता खायचो. कामाच्या दगदगीनं आणि घरातल्या लोकांच्या बोलाला वैतागून सगळा राग ती माझ्यावर काढायची.
     पुढं भूकंप झाला. तेव्हा अंगणात पत्र्याच्या खोपी घातल्या गेल्या. तेव्हा साऱ्या गावात खोपीच खोपी. माणसांना या खोलीत वाकूनच वावरावं लागे. या त्रासाला कंटाळून शेवटी आम्ही बैलगाडीनं वढ्यातले बेशरमाचे सोट कापून आणले. त्यांचं कूड गुंफून अंगणात पत्र्याच्या दोन वढण्या घातल्या. बरीच वर्षं त्या बेशरमाच्या कुडाच्या घरात राहिलो. कधी स्वप्नातही असं रहायचा विचार केला नव्हता.
       पुढं काही वर्षांनी भूकंप पूनर्वसन अनुदान म्हणून एक खोलीच्या बांधकामाचे साहित्य आणि थोडे पैसे मिळाले. त्यात काही पैसे घालून आम्ही पक्क्या विटांचा वाडा बांधला. खोल्यांना दारं, भिंतींना गिलावा, फरशी....काहीच करू शकलो नाही. या पक्क्या इटकुराच्या लाल घरातही बरीच वर्षं काढली. पुढे दहाबारा वर्षांनी उरलेली कामं माझ्या हातानं झाली. घराला घरपण आलं. आता तर आरसीसी घरही बांधून झालं. पण वडलांनी हौसेनं बांधलेलं मातीचं, इमल्याचं, धूम्मस केलेलं, सडा-सारवण-रांगोळ्यांचं, गोठ्यासहित मोठ्या अंगणाचं ऐटदार घर; 'घर' या नावाला शोभणारं होतं.

    (पूर्वप्रकाशित : तिफण)

शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१८

बाईपणातून जाणाऱ्या बाईचा प्रवास: झिम पोरी झिम



  बालाजी मदन इंगळे यांची 'झिम पोरी झिम' ही पहिलीच कादंबरी.  यापूर्वी त्यांचा 'मातरं' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे.  या संग्रहाने त्यांना ग्रामीण कवी म्हणून मान्यता मिळवून दिली. त्यांच्या काही कवितांमधून  स्त्रीचे भावविश्व साकारले आहे. ग्रामीण स्त्रीचे समग्र भावजीवन त्यांना नेहमीच खुणावत असावे. या अस्वस्थतेतूनच त्यांनी कादंबरी हा जास्त अवकाश असणारा वाङ्मयप्रकार जाणीवपूर्वक निवडलेला दिसतो.

       या कादंबरीतील मध्यवर्ती पात्र असलेल्या जनीचे प्रथमपुरुषी निवेदन वाचकाला सरळ तिच्या गावात, तिच्या घरी नेऊन सोडते. जनी ही कुठल्याही खेड्यातली, कुठल्याही सामान्य कुटुंबातली एक सामान्य मुलगी आहे. ती तिच्या जीवनातल्या वरवर सामान्य वाटणार्‍या गोष्टी सांगत एक असामान्य अनुभव देते. मुलगी म्हणून जन्माला आल्यामुळे तिचे त्या घरातले दुय्यम स्थान तिला शंकर या तिच्या भावाच्या जन्मानंतर प्रकर्षाने जाणवते. तिच्या जन्माच्या वेळी 'दुसऱ्या वेळीही मुलगीच झाली' हा मायबापाचा असंतोष तिच्या वाट्याला आलेला असतो. मात्र जनी आजारी पडते तेव्हा हेच मायबाप तिची काळजी घेतात, हा विरोधाभासही तिला जाणवतो. यातून लेखक खेड्यातल्या माणसांच्या स्वभावातील सूक्ष्म बारकावेही किती नेमकेपणाने मांडतो आहे, हे कळून येते.

       घरातल्या कामाचा भोगवटा ग्रामीण भागातल्या मुलींच्या वाट्याला अगदी कोवळ्या वयापासूनच येतो. जनीही त्याला अपवाद नाही. हे शेतकरी कुटुंब या घरातल्या मुलीच्या लग्नपाई सावकाराच्या पाशात सापडते व त्याच्या शोषणामुळेच भूमिहीन होऊन उघड्यावर येते. जनीचे माय, बाप, बहीण या साऱ्यांनाच लोकांच्या शेतात मजुरीने कामाला जावे लागते. जनीला अपरिहार्यपणे घरातल्या कामाचा बोजा पडतो. तिला तिची शाळा सांभाळून घरातली कामं करावी लागतात. जरा सवड मिळाली की हळूच ती मैत्रिणींसोबत खेळायला सटकते. हे सर्व अत्यंत चित्रमय पद्धतीने लेखकाने सजीव केले आहे.

       जनीचे घरातल्या प्रत्येकासोबत असलेले नैसर्गिक भावबंध लेखकाने अत्यंत कारागिरीने विणले आहेत. खेड्यातल्या चालीरीती, हुंडाप्रथेमुळे मुलीच्या लग्नाची मायबापाच्या मनातली धास्ती, या लोकांच्या जगण्यावर पडलेल्या मर्यादा अचूकपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे. आजच्या टीव्ही चॅनल्सच्या युगात लोप पावत चाललेली खेळगाणी, लोकगीते या मुलीच्या जगण्याचा एक भाग बनून येतात.  ही गीते वजा केली तर तिच्या या गोष्टीला अर्थच उरणार नाही, इतकी ती तिच्या व्यक्तिमत्त्वाशी, जीवनाशी एकरूप होऊन येतात.

      ग्रामीण बोलीच्या सहजतेसह कादंबरीचा ओघवतेपणाही लक्षात येतो. या कादंबरीच्या भाषेचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही केवळ मराठवाड्यातील उमरगा परिसराची बोली नसून; ती या प्रदेशातील ग्रामीण स्त्रीची अस्सल बोली आहे. ग्रामीण बोलीचा जिवंतपणा पुरुषांपेक्षाही स्त्रीच्या बोलण्यातचं अधिक शिल्लक आहे. सुरुवातीला वाचताना शहरी पांढरपेशा वाचकाला काहीसं अडखळल्यासारखं झालं तरी, पुढे वाचक या भाषेला सरावतो. 'करलालतं',  'वाटलालं',  'काढलालेव',  'यिवलालतं',  'दिसलालतं', 'दुखलालंय' यासारखी क्रियापदं ह्या भाषेला सुलभ व गोड बनवतात, तसेच लयही प्राप्त करून देतात. या भाषेसह या प्रदेशातील म्हणींचाही वापर व्हायला हवा होता, असं मात्र जाणवतं.  'येळवस' या सणाचे, लग्नाचे वर्णन वाचताना आपल्याला या प्रदेशाच्या ग्रामीण कृषिनिष्ठ संस्कृतीचीही ओळख व्हायला मदत होते.

        या कादंबरीतून प्रकट झालेले ग्रामीण वास्तव हे पांढरपेशी शहरी वाचकांसाठी निश्चितच धक्कादायक आहे. तालुक्यापासून जवळचे गाव असूनही या मुलींना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. साठ-सत्तरच्या दशकातल्या कादंबरीत चित्रित झालेले ग्रामीण वास्तव व आजची परिस्थिती यात फारसा फरक नसल्याचे ही कादंबरी वाचताना लक्षात येते. यावरून स्वातंत्र्योत्तर पाच-दहा दशकांतली ग्रामीण विकासाची कल्पना करता येईल. त्यासाठी पंचवार्षिक योजनांचे आराखडे, आकडे, राष्ट्रीय/दरडोई उत्पन्नातील वाढ अशा गोष्टींकडे पाहण्याची गरज उरत नाही. गावात कॉइनबॉक्स आला हा वरकरणी किरकोळ वाटणारा बदलही लेखकाने टिपला आहे. गावात मोबाईल फोन, टीव्ही आले तरी जनीच्या जीवनाशी या वस्तूंचा संबंध येत नसल्याने त्यांचा उल्लेख नसावा.

    तिच्या मैत्रिणींचं वयात येणं, तिचं वयात येणं, पौगंडावस्थेत शारीरिक बदलांमुळे गोंधळलेली मानसिकता, तिच्या तईचे पाटलाच्या पोराबरोबरचे शारीरिक संबंध, बन्याचं तिच्या मागं लागणं, धोंडुरामच्या पोरांनं तिला मिठी मारणं, ती घरी एकटी असताना नात्यातला मुलगा घरी आल्यावर निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना, कावळे मास्तराचा लोचट व विकृत स्पर्श, स्वतःच्या शरीरावयवांची चीड, मैत्रिणींचे अनुभव, तिच्या अपेक्षा, शेवटी तिच्या वाट्याला आलेलं भीषण वास्तव, अशा साऱ्यातून लेखकाने जनीचे जे लैंगिक भावजीवन उभे केले आहे ते चकित करणारे आहे. स्वतः पुरुष असूनही त्यांनी आपल्या नायिकेला चांगला न्याय दिला आहे. लैंगिक बाबीवर लिहिताना त्यांच्या लेखणीचा कुठेही तोल ढळला नाही.

त्यामुळेच हे वाचताना कधीही लैंगिक भावना चाळवल्या जात नाहीत.
       जनीनं तिच्या शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाचा तपशीलही या कादंबरीचे महत्त्वाचे अंग आहे. तिच्या लग्नाचे बापाच्या डोक्यावरचे ओझेही त्यामुळे कमी झाले असले तरी; लग्नानंतर समाजमान्य चौकट लाभल्यानंतरच खऱ्या अर्थाने तिचे लैंगिक व आर्थिक शोषण सुरू होते, हे वाचताना स्त्रीला केवळ माणूस म्हणून नव्हे तर स्त्री म्हणून समजून घेता येण्याची गरज अधोरेखित होते.                                                                                                              कादंबरीचे कथानक सुरुवातीला काहीशा संथ गतीने पुढे सरकते. नंतर जनीची दहावी, बारावी, डीएड, लग्न असा थोडा वेग घेते. लेखकाला या कथानकावरची पकड ढिली होऊ द्यायची नसल्याने असे झाले असावे. मात्र त्यामुळे मूळ विषयापासून भरकटत जाण्याची व निरर्थक, अनावश्यक तपशिलांचा भरणा होण्याची भीती कमी झाली आहे हेही जाणवते. लेखकाने कथानक व पात्रांचे नैसर्गिक विकसन यांवरच भर दिला असल्याने आपोआपच अन्य गोष्टींकडे काहीसे दुर्लक्ष झाले असावे. उदाहरणार्थ, या कथानकाच्या विकासक्रमात कुठेही प्रतिमांचा वापर लेखकाने केला नाही. पण यामुळे हे कथानक कुठेही लंगडे पडले आहे, असेही म्हणता येत नाही. उलट रांगडी व जिवंत अनलंकृत बोलीभाषा तसेच वास्तवाची थेट मांडणी यामुळे ते अधिक प्रत्ययकारी झाले आहे. जगण्यातील वास्तव कलात्मकता सांभाळूनही थेटपणे मांडण्याचे आव्हान लेखकाने येथे सांभाळले आहे. वाचकाला चकित करण्यासाठी भुलवण्यासाठी अन्य कोणतीही क्लृप्ती लेखकाने वापरलेली नाही.

         कादंबरीचा शेवट करतानाही लेखक वास्तवाची कास सोडत नाही. 'आजपसून निवड मंडळाच्या परीक्षेचा अभ्यास चालू करू आसं ठरविले. वतलापुढून उठले. करकचून केस बांधले अन् आंघोळीला आले.'  या शेवटच्या ओळी जनीचा संघर्ष लग्नानंतरही सुरूच आहे, हे सूचित करतात. बाया खंबीरपणे वास्तवाला तोंड देतात. जीवन थांबत नसतं ही लेखकाची जाण इथे प्रकट होते.               
थोडक्यात, ग्रामीण स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण शिक्षणामुळे सकारात्मकपणे बदलणारी तिची मानसिकता, बाईपणातून जाणाऱ्या कुठल्याही बाईच्या मानसिक, भावनिक, लैंगिक व बौद्धिक गुंतागुंतीचे अनेक पदर त्या गुंतागुंतीच्या नैसर्गिक बंधासह प्रभावीपणे लेखकाने मांडले आहेत.

(साभार : नवाक्षर दर्शन, जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर 2009)

सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

आमराईतले दिवस


  शाळेच्या परीक्षा संपल्या की, कोंडलेलं मांजर धूम पळावं तसं मी आमराई गाठायचो. मला बघितल्यावर गुरं सोडून आमराईत धिंगाणा घालणारे गुराखी लगोलग गुरं वळवायचे.
    आख्खं शिवार जळताना आमराईतली सावली थंडगार वाटायची. दिवसभर आमराई हलू द्यायची नाही. आमराई साऱ्या शिवाराला साद घालायची. सकाळची कुळवपाळी आटपून आजूबाजूचे कुळवकरी दुपारी आमराईत टेकायचे; अन् बापाचा गप्पांचा फड रंगायचा. आम्ही पोरं इळभर सुरपारंब्या खेळण्यात दंग. माकडासारखं ह्या फाट्यावरून त्या फाट्यावर. आमचा गलका वाढला की बाप वरडायचा. मग आम्हाला गुपचूप ओळीनं झोपावं लागायचं. खेळून, दमून गडद झोप लागायची. ऊनाचा एखादा चुकार ठिपका तोंडावर आला की, झोपमोड व्हायची. बाप जागा बदलून झोपायला सांगायचा. आमराईत ऊनाच्या झळाही लागत नसत. थंडगार! झिरपणाऱ्या खापरातल्या बिंदगीतलं पाणीही थंडगार!
    मग झोप मारून झाल्यावर पडल्या-पडल्या नजर इकडून तिकडं पळणाऱ्या खारींवर जायची. तुरूतुरू एखादी खारूताई वर-वर जायची. माझ्या नजरेचा पाठलागही सुरूच असायचा. एक नेमक्या आंब्याजवळ जाऊन खारूताई त्याला टोकरायची. त्या टोकरलेल्या ठिकाणी लालबुंद दिसायचं. मी एकदम आनंदानं उठून; सरसर चढून तो पहिला पाड तोडून आणायचो. पडलेल्या पाडांवरून आम्हा पोरांची भांडणं लागायची. मग वाटणी. मला फक्त कोय!
     पहिल्या पाडाचा शोध खारूताईनं लावल्यापासून, आमराईची राखण करायची एक नवी जिम्मेदारी आमच्यावर न सांगता पडायची. मग दररोज सकाळी जल्दी उठून, भाकर घेऊन आमची टोळी आमराईत दाखल व्हायची. गेल्याबरोबर पाड हुडकायची स्पर्धा लागायची. दुपारपर्यंत पडलेले पाड तोंडी लावायला घेऊन आम्ही जेवायचो. साधंच जेवण अगदी गोड लागायचं.
       आमराईतलं प्रत्येक झाड वेगळं. एक गुठली आंबा. त्याचे आंबे फारच लहान. साखरआंबा खूप गोड. शेपूच्या भाजीच्या चवीचा शेपूआंबा.  केसरआंब्याच्या कोयीला केसरच जास्त. एक खाराचा (लोणचं) आंबा. रसाचा आंबा. या गावरान आंब्यांच्या जाती आता नामशेष होत आहेत. आमच्या साखरआंब्याच्या चवीपुढे तर हापूस सुद्धा झक मारतो. साखरआंब्याचा एक तरी आंबा खाल्ला तरच मला आंबा खाल्ल्यासारखं वाटतं. या आंब्याच्या कोया मी लावल्या होत्या. दोन उन्हाळे जमादाराच्या डुबीचं पाणी खांद्यावर आणून झाड जगवले. तरी झाडं पुढं जगले नाहीत. बारक्या बंधूनेही अशीच खटपट करून पाहिली; पण यश आलं नाही. असो.
     पाड पडल्यानंतर आम्ही पोरं एकमेकांना चोरून आंब्याची अढी घालायचो. एकमेकांच्या अढ्या शोधून काढायचो. दुसऱ्याच्या अढीतले आंबे बिनपत्त्यानं फस्त करताना मजा वाटायची. पुन्हा बघतो तर माझ्या अढीचाही कुणीतरी चोरून फडशा पाडलेला असायचा.
  उन्हाळ्याचे रखरखीत दिवस आमराईच्या संगतीनं सुखात जायचे. आंबे उतरवताना हातांना, तोंडाला चीक उतून दुखं पडायचे, तरी त्याचा तेव्हा गुमानच नसायचा. आंबे उतरून झाल्यावर आमराई सुनी-सुनी वाटायची.
  माणसांना, गुरांना, पशुपाखरांना, भर उनात मायेची सावली देणारी आमराई...पुरणपोळीला मधुर आमरस देणारी आमराई... मधमाशांना पोळं करायला आसरा देणारी आमराई... ती आमराई आता उध्वस्त झालीय. त्यातलं एक आंब्याचं झाड वाढत्या वयाच्या खुणा अंगावर वागवत कसंबसं तग धरून उभं आहे. तेही बिचारं एकटेपणानं कावून गेलंय. जास्त दिवस टिकेल असं वाटत नाही.

कथा

सुक ना दुक

गनामामाला सगळं गाव नेता म्हनायचं. गावात कुठला पुढारी आला, परचारसबा आसली की, गनामामा हार घालायला सगळ्यात पुडं. इस्टेजवर खुडचीत गनामामा ...

उपशीर्षक